Monday, February 20, 2017

चिन्मय शंकर


चिन्मय शंकर पाटील.
मला सरांचा पुढचा प्रश्न काय असेल याचा अंदाज होता - कुठल्या शाळेतून आलास? पण मी नाव सांगितल्यावर सर जोरजोरात हसू लागले, सर हसू लागले म्हणल्यावर, सगळी मुलं पण दबक्या आवाजात हसू लागली. सरांनी हसता हसता, माझ्या मागे तीन-चार ओळी सोडून उभ्या असलेल्या एका धिप्पाड मुलाकडे पाहिले आणि ते म्हणाले - काय शंकरराव, पोरगा लयच हुशार हाय की तुमचा, तुमी दोगबी येकाच इयत्तेत होय? आता सगळी मुलं माझ्याकडं बघून जोरजोरात हसत होती. मला पहिल्यांदा काय जोक झाला ते कळालंच नाही पण नंतर लक्षात आलं. मी हळूच मागच्या ओळीतल्या शंकरकडे पाहिलं, तोपण पोट धरून हसत होता. मला एकदम बाबांचा चेहरा डोळ्यासमोर आला, काही सुचेना. देवा मला रडू नको येवूदे, देवा प्लीज.
बरर्र, कुट्ल्या शाळंतन आलास तू?
वडनीळ सरांच्या प्रश्नाला उत्तर द्यावसंच वाटतं नव्हत मला. मी म्हणालो - नवीन मराठी माध्यमिक शाळा. 
सर आपल्या हातातल्या ओबडधोबड लाकडी पट्टीला कुरवाळत म्हणाले - आताच्यामायला, नवीन शाळेतून जुन्या शाळंत आलास की रे. मुलं परत जोरात हसायला लागली. मला हा तास कधी एकदा संपेल असं झालं होतं. एकतर प्रार्थनेनंतर कधी पीटीचा तास असतो का? प्रार्थनेनंतर मराठीचा तास असायला पाहिजे खरंतर, पण इकडं सगळच वेगळं दिसत होतं. एकतर प्रार्थना म्हणजे फक्त प्रतिज्ञा आणि मग जनगणमन झालं होतं.
कुट्ल्या गावात होती तुमची ही नवीsssन मराssssठी शाळाआ? 
मी म्हणालो - गुहागर. 
सर परत जोरजोरात हसू लागले, हसताहसताच म्हणाले - गुहागर असं गाव हाये होय, आमच्याकडं तर सकाळी संडासला जायचं असंल तर म्हणतात, जरा गुहागरला जावून येतो.  सगळी मुलं जोरजोरात, एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून हसू लागली होती. देवा, हे स्वप्न असूदे, देवा, प्लीज. माझे डोळे भरुन आले होते, ओठ मुडपून कसतरी मी रडू थांबवलं. आता पुढं सर काय प्रश्न विचारतील या विचारानेच मी घाबरलो होतो.
तेवढ्यात सर जोरात ओरडले - गब्बसा, रांड्डच्च्यांनो, दात काय काढायलाय्त? चला, चार फेर्‍या मारा. 
सगळी मुलं चिडीचूप शांत झाली. पुढचा पळायला लागला, त्याच्या मागोमाग मी गप पळू लागलो. लांबवर गेल्यावर मी मागे पाहिले, वडनीळसर कानात बोट घालून, कान हलवत होते आणि स्वत:शीच हसत होते. पळताना शेजारच्याला, त्याचं नाव विचारावं का अस मला वाटलं, पण त्याचा मगासचा हसतानाचा चेहरा आठवून मला काही बोलूसच वाटेना. या पीटीच्या तासात काही खेळच नव्हता, पळत पळत ग्राउंडला नुसत्या फेर्‍या मारत होतो आम्ही. थोड्या वेळाने एकदाची घंटा वाजली.
दप्तरांच्या ढीगात माझं दप्तर एकदम खाली गेलं होतं, मी वरची दोन-तीन दप्तरं बाजूला ठेवली आणि माझ दप्तर ओढून काढलं. माझं रडू आता गेलं होतं.

मी वर्गात गेल्यावर दारापाशीच उभा राहिलो होतो, सगळी मुलं बसत होती तोवर बाई आल्या. हातातली फाईल टेबलावर ठेवतच मला म्हणाल्या - पाटील ना तू? मी म्हणालो - हो. 
पूर्ण नाव काय रे तुझं? विसरलेच बघ मी. मला अगदी नको असलेलाच प्रश्न विचारला त्यांनी. मी हळू आवाजातच म्हणालो - चिन्मय पाटील. बाई म्हणाल्या - हां हां, आठवलं आता, चिन्मय आणि पाटील, हं, गंमत आहे. 
एवढं बोलून त्यांनी मला खुणेनंच पहिल्या बेंचवर बसायला सांगितलं. 
तिथे आधीच दोघे होते, मीपण तिथंच? मी तसाच सरकून उरलेल्या जागेत बसलो. बाईंनी आमच्याच बेंचवर तीनदा डस्टर जोरजोरात आपटला आणि हजेरी सुरू केली. हजेरी झाल्यावर सगळी मुलं परत आपापसांत बोलू लागली. मी शेजारी बघितलं तर ही दोघं, मधे बसलेल्याच्या दप्तरात अंधारात काहीतरी बघत होती. बाई काही शिकवतच नव्हत्या, त्यांची त्यांची फाईल काढून काहीतरी लिहीत होत्या.
मी इकडेतिकडे बघत वर्गाचं निरीक्षण करु लागलो, तेवढ्यात बाईंनी मला बोलावलं. मी टेबलापाशी गेलो तर त्या कसलातरी  फॉर्म भरत होत्या. मला म्हणाल्या - कसं रे मधेच दाखल होता तुम्ही, बरं, तुझ्या नावाचं स्पेलींग काय? 
मी परत हळू आवजातच बोललो - सी एच आय एन एम ए वाय. 
त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाल्या - एन एम? म्हण परत? 
मी म्हणालो - एन एम. 
त्यांनी सुस्कारा टाकला आणि म्हणाल्या - बर्र, बर्र, एन एम ! खालच्या मजल्यावर ऑफिस आहे, तिथे जाऊन हे फॉर्म देवून ये, तिथे एक सर असतील त्यांना म्हणावं वत्तूरकर बाईंनी दिले आहेत. काय सांगशील? वत्तूरकर. नाहीतर तू उत्तुरकर म्हणायचा.
मला एकदम बरं वाटलं, मी निघणार तेवढ्यात थांबवून त्यांनी मला विचारलं - आई काय करते तुझी? 
मी म्हणालो - घरीच असते. 
मग पुढे त्या म्हणाल्या - शिकलीय का? 
मला खूप छान वाटलं, मी लगेच सांगितलं - हो, एम. ए. आहे.
बर्र, जा, नीट देवून ये फॉर्म्स  - बाई हसत म्हणाल्या.

माझ्या शेजारी बसलेली दोघं, योगेश सपकाळ आणि कौस्तुभ देशपांडे नावाची मुलं होती. ती त्यांच्यात्यांच्यातच होती. आपलं नाव सांगितलं, माझ्याकडे बघून एकदोनदा हसली पण नंतर काही बोलली नाहीत, एकमेकाशी मात्र खूप कायकाय बोलत होती, आणि दोन तासांच्या मधे सारखं दप्तरात डोकावत होती. 
मधली सुट्टी झाली. मी माझा डबा उघडून खाणार तेवढ्यात मागून पाठीत एक जोरात गुद्दा बसला. मी मागे वळून पाहतो तर पाठोपाठ खाडकन कानाखाली. मी थरथरू लागलो, आणि डोळ्यातून पाणी येवू लागलं. 
एक आडदांड मुलगा माझ्याकडे बघत म्हणाला - परत माझ्या दप्तराला हात लावायचा नाही हां, सांगून ठेवतो. 
मी रडतरडतच म्हणालो - मी नाही लावला हात. खरंच, आईशप्पथ. 
तो म्हणाला - गप्पे शप्पथ, तुझ्याआयचा पुचा तुझ्या. माझे केस ओढून तो आणि त्याच्याबरोबरचा एक मुलगा वर्गाबाहेर निघून गेले. 
मी बेंचला डोकं टेकवून रडू लागलो. मागून सपकाळ म्हणाला - अरे तो चांडक, त्याच्या नादाला लागू नकोस, हे घे, भजी खाणार? 
मी नको म्हणालो आणि तसाच रडत रडत माझा डबा संपवला. मला आईची खूप आठवण येत होती. कधी सुटणार शाळा?
हा दिवस संपतच नव्हता. अधेमधे चांडक माझ्याकडे बघून गुद्द्याचे हावभाव करत होता आणि त्याच्या शेजारचा मुलगा हसत होता.

एकदाची घंटा वाजली, उगाच चांडकने पकडायला नको म्हणून मी सपकाळ आणि देशपांडेच्या मागं मागं पळतच, वर्गाबाहेर गेलो. गेटपाशी लांब आई दिसत होती. मला आईला बघूनच खूप रडू येवू लागलं. मी कसंबसं रडं थांबवल आणि पळतपळत आईपाशी गेलो. 
मला वाटलं, आई बघून छान हसेल पण ती मला म्हणाली - काय रे चिन्मय? असा का दिसतोयस? बरं वाटत नाही का? कुणाशी भांडाभांडी झाली का? 
मला आईचा राग आला, मी म्हणालो - नाही गं, भूक लागलीय खूप, चल घरी लवकर. 
रस्ता क्रॉस केल्यावर बसस्टॉप होता, तिथे जास्त गर्दी नव्हती, शाळेच्या बाजूच्या स्टॉपवर मात्र तुडुंब गर्दी होती. रस्ता क्रॉस करताना आईने माझा हात धरला, आलं हे हिचं नेहमीचं. नेहमी असं करायचो नाही पण आज मला राहवेना, मी माझा हात सोडवून घेतला आणि जोरात ओरडलो - उगाच काय गं हात पकडतेस, मी काय कुक्कुलं बाळ आहे का आता? मला येतो रस्ता क्रॉस करता. 
मला वाटलं आई आता ओरडणार. निदान, नीट शांतपणे आपलं म्हणणं सांगावं हे तरी ऐकायलाच लागणार. पण आईचा मूड काय भारी होता देव जाणे, ती म्हणाली - बरं बाबा, एकटा चल, मी नाही धरणार परत तुझा हात. मग म्हणाली - कॅडबरी पाहिजे का? मला खरंतर हवी होती पण मला इथे खायची नव्हती - च्चक्, नको. 
आम्ही रस्ता क्रॉस करुन बसस्टॉपवर, बसची वाट बघत थांबलो. तिथे आमच्या वर्गातला एक मुलगा उभा होता, अगदी मला नको तोच - शंकर पाटील. तो माझ्याकडे बघत होता, हसल्यासारखा वाटला. 
आई म्हणाली - चिन्मयच्या वर्गात आहेस का रे तू? नाव काय तुझं? तो म्हणाला - शंकर गणाजी पाटील. आईने त्याला विचारलं - कॅडबरी खाणार का? आणि देवूनही टाकली. अशी कशी आहे यार ही. मग अचानक उगाचच बाजूला जावून उभी राहिली. 
शंकर मला म्हणाला - कुठल्या बसने जाणार तू? 
मी म्हणालो - सूतगिरणी, आणि तू? 
मी दोन बशी बदलून जाईन, इथून पहिले यडबूर आणि मग तिथून पुढे हातकणंगल्याला एस्टी असते. 
मग आम्ही कायकाय बोलू लागलो, त्याने मला सगळ्या सरांची नावं सांगितली, बाईंची नावं सांगितली. बोलताना मधे मधे तो खूप शिव्या देत होता - म्हणजे मला नुसते कळत होते त्या शिव्या आहेत ते, अर्थ समजत नव्हता. 
लांबून यडबूर बस येताना दिसली तेव्हा तो म्हणाला - उद्या माझ्याशेजारी बस वर्गात. 
मी म्हणालो - सगळे हसतील आपल्याला. 
तो बसमधे चढतच म्हणाला - कुणाचा बा हसअल ?

यडबूर-सूतगिरणी-यडबूर बस आली. आईच्या पाठोपाठ मी चढलो. आई म्हणाली - वेळ लक्षात ठेव. नीट चढशील ना? पायरी बघूनच पाय टाकायचा हां. झालं सुरू. मी आपली मान डोलावली. 
मला सारखा वडनीळसरांचा आणि चांडकचा चेहराच आठवत होता. मग आईबाबांचा. आई समोर आहे पण चांडकचा चेहरा आठवला की मला आई सकाळी कशी दिसते ते उगाच आठवत होतं.

रात्री बाबा उशीरा आले, माझ्या डोक्यावरुन त्यांच्या स्टाईलने हाताची बोटं फिरवून म्हणाले - काय चटर्जी, झोपला नाही का? मी पार झोपायलाच आलेलो. गाद्यांवर लोळत मी चांदोबातली चित्र बघत होतो. मग बोर झालो आणि एखादं चमत्कार-बिमत्कार असलेलं चरित्र मिळतंय का बघायला म्हणून दुसर्‍या खोलीत गेलो. बाबांना आई हळूहळू आवाजात कायकाय सांगत होती. थोड्या वेळाने आई नेहमीप्रमाणे जोरात म्हणाली - तुम्हाला काही सांगण्यातच अर्थ नाही. 
मला भारी पुस्तक मिळाले तोवर, सांबनाथ महाराजांचं चरित्र. काकांची असली बरीच कायकाय पुस्तकं होती. आईचा आवाज - झोप रे आता, उगाच रात्रीच जास्तवेळ वाचत बसू नकोस.
*

मला आज आईबरोबर शाळेत जायची विशेष इच्छा नव्हती, माझामला रस्ता आणि बस कळली होती पण आई म्हणाली आहे पहिले दोन दिवस ती सोडायला येणार म्हणजे ती येणारच. 
सगळं आवरल्यावर बाबा म्हणाले - चलो चटर्जी, मी सोडतो आज शाळेत तुला. 
मला वाटलं, यांना काही कळाले का काय? शाळेत येवून भेटणार-बिटणार नाहीत ना? म्हणून मी विचारलं - पण बॅंकेत जायचं नाही का आज तुम्हाला?
जायचंय की लेका, पण आधी मला एका खातेदारांकडं जायचय, ते तुमच्या शाळेच्या साईडलाच राहतात, तुला सोडून जाईन, मग तिथून बॅंकेत. येताना बसने नीट येशील ना, का आई येवूदे आणायला?
मी आनंदानेच म्हणालो - नको नको, मला नीट कळाला आहे रस्ता, बसचं सांडगपण कळलं आहे नीट.
वाटेत मी बाबांना विचारलं - इथून परत गुहागरसारख्या एखाद्या चांगल्या शहरात बदली होईल का हो आपली? तर ते म्हणाले - सगळीच गावं चांगली असतात. 
आता काय बोलणार पुढे, यांना काय माहीत, वडनीळ सर कसे आहेत आणि तो चांडक कसला आहे.
शाळेपाशी स्कूटरवरून उतरताना बाबा म्हणाले - हे बघ चिन्मय, उगाच कुणाशी भांडण करू नकोस. पण कुणी आपल्याला चार रट्टे दिले तर आपणपण त्याल दोन द्यायचे. कमी मार देवून, जास्त मार खाल्ला तरी हरकत नाही. पण ऐकून नाही घ्यायचं.

प्रार्थनेच्या रांगेतच शंकरने मला हाक मारली, माझे मित्र होतात हळूहळू पण पहिल्याच दिवशी स्वत:हून आजपर्यंत कुणी नव्हतं बोलावलं मला, मी जरा हळूहळूच गेलो त्याच्यापाशी. तो खणखणीत आवाजात जनगणमन म्हणत होता, मलापण उत्साह आला आणि जय हे ला मीपण असला आवाज चढवला, आणि आम्ही दोघे एकमेकाकडे बघून हसायला लागलो. आज वडनीळ सर आलेच नव्हते. म्हणजे आलेले पण पीटीच्या तासाला आले नव्हते. 
मी शंकरला विचारलं - आपला पहिलाच तास कसा काय असतो रे पीटीचा, आणि आपणच कसे फक्त ग्राउंडवर, बाकी तुकड्या? 
तो म्हणाला - अरे वत्तूरकर बाईंना यायला उशीर होतो म्हणून वडनीळ सर घेतात पहिला तास, नाहीतर खरं पहिला बाईंचाच असतो. ग्राउंडवर कोणीच थांबले नाही सगळे वर्गात परत चालले, मी शंकरला विचारलं काहीतरी खेळायचं का तर तो फक्त ह्यॅ म्हणाला. 
मी आजपर्यंत कधी शेवटच्या बाकावर बसलो नव्हतो, पण सपकाळ आणि देशपांडेशेजारी पहिल्या बाकावर बसण्यापेक्षा बरे म्हणून शंकरशेजारी बसायला गेलो. 
मधेच चांडकने माझ्याकडे पाहिले आणि शंकरकडेपण पाहिले. शंकर करकटाने बाक कोरत बसला होता, मी विचारलं काय करतोयस तर म्हणाला काही नाही - आपल्याकडून जास्त फी घेतात उगाच, आपण असच बाक कोरायचे मग नवीन वर्षी शाळेला नवीन बेंच घ्यायला लागतो. 
शेजारच्या बेंचवरचा मुलगा तर सरळसरळ झोपला होता. मी तोंडाने छोटे फुगे सोडत बसलो. शंकर करकटक थांबवून विचारलं - अरे हे काय करतोयस? मी म्हणालो - फुगे. 
शंकरचे डोळे एकदम मोठे झाले होते, तो जवळजवळ ओरडलाच - अरे पण फक्त तोंडानेच कसे सोडतो आहेस, साबणाचं पाणी आणि गव्हाचं चिपाड लागतं की. 
मला गंमत वाटत होती, मी म्हणालो - अरे, अवघड काही नसतं, आपल्या जीभेच्या खाली लाळग्रंथी असतात, त्यातून थुंकी येते तोंडात. खालच्या दातांच्या मागे जीभ अशी लाळग्रंथींवर दाबायची मग हळूच एक फुगा जीभेच्या टोकावर येतो, त्याला फुटू न देता हळूच फुंकर मारायची, हे बघ अस्सं.
शंकरने माझ्या खांद्यावरच हात ठेवला आणि म्हणाला - मला जमतय का बघ, नीट.
मी नीट जवळून पाहिलं, शंकरच्या तोंडाला दुधाचा वास येत होता. आई म्हणते असा काही वास नसतो दुधाला, पण असतो मला येतो.
जमेल रे, शंकर तुला एक-दोन दिवसात, तू सगळ एकदमच करतोयस, आधी फक्त फुगा तयार करायची प्रॅक्टिस कर, मग नंतर फुंकर मार. 
शंकरने मान डोलावली आणि आता काही बोलू नकोस म्हणाला.
थोड्यावेळाने वत्तूरकर बाई आल्या, हजेरी झाली. मधल्या सुट्टीत चांडकने मला मुतारीपाशी उगाच धक्का दिला, मी रागाने पाहिले तर परत आणि काहीतरी शिवी दिली. मला शंकरला सांगावेसे वाटले पण मी काही बोललो नाही. 
शाळा सुटल्यावर आम्ही दोघे बसस्टॉपपाशी गेलो, शंकर म्हणाला - बससाठी किती रुपये आहेत तुझ्याकडे?
दोन.
शंकरने आपल्या खिशातून तीन रुपयाची नाणी काढली आणि म्हणाला - चल, तुझे दोन आणि माझे तीन, पेरु आणि दोन भेळ येतीलच की.
मी घाबरून म्हणालो - मग घरी कसं जायचं?
शंकर म्हणाला - अरे सोप्पय, स्कूटरवरून जाणार्‍या लोकांना लिफ्ट मागायची. 
मी थोडा घाबरलो होतो - आणि कोणीच नाही भेटले तर?
सरळ बसमधे चढायचं, आणि कंडक्टरकाकांना सांगायचं - मला तिकीटाला दिलेले पैसे हरवले, मी उद्या नक्की देईन, माझं नाव लिहून घ्या असंपण म्हणायच. ते आरामात बसमधे चढू देतात आणि दुसर्‍या दिवशी काही विचारतपण नाहीत. पण रोज नाही असं करायचं, कधीतरीच गंमत.
मी म्हणलो - तुला कसं कळलं हे, तुलापण कोणी सांगितलं का? तर शंकर म्हणाला - नाही, मला माहितीय असंच.
मला लगेच लिफ्ट मिळाली.

मला फार भारी वाटत होतं, घरी गेल्यावर आईला सांगावसं वाटत होतं, पण नाही सांगितलं.
*

सकाळी शंकरला वडनीळसरांनी खूप मारलं, थुकशील का परत थुकशील, असं ओरडत ओरडत, गुडघ्याच्या मागं दहा पंधरा पट्ट्या मारल्या. तो शाळेत आल्यापासूनच एकदम एकदम शांतशांत होता. शेवट वत्तूरकरबाईंच्या तासाला मी विचारलं - काय झालं रे, बोलत का नाही जास्त आज, मारलेलं दुखतंय म्हणून का? 
तर तो म्हणाला - ह्या. अरे, माराच काय, मला सकाळपासूनच सांगायच आहे खरंतर - तू दिलेल्या पुस्तकातले दोन चांदोबा सापडत नाहीयेत. तुझी आई रागवेल का तुला? मी दादांना सांगेन, ते देतील भरून.
मला हसूच आले - अरे नाही रे, भरूनबिरून नको. आई नाही रागवायची, पुढच्यावेळी नीट ठेव म्हणेल, पण रागावणार तर नाहीच, अजिबात, ह्या.

मधल्या सुट्टीत मी हात धूत होतो तर हा ओरडतच आला - अरे चिन्या चल लवकर, चल. कुठंबिठं विचारायच्या आत त्याने मला मागच्या गेटने ओढतच नेलं. दलाल चौकात खूप गर्दी आणि तीन घोडे होते. एक माणूस भिंतीत खिळा ठोकल्यासारखा घोड्याच्या पायात खिळे ठोकत होता. एक आख्खा नाल ठोकून होईस्तोवर शंकरची कॉमेंट्री सुरू होती - बघ साल्या तो घोडा रडतोय तरी का? हां, बघ च्यायला घुसलाच आता, अजून एकच खिळा राहिला आहे. 
शेवट मी म्हणालो - चल रे, नाहीतर वडापाव आपल्या पायात खिळे ठोकेल. शंकर आणि मी हसतहसत परत चाललो. 
वाटेत तो म्हणाला - अजून पुढंच्या चौकात दोन बार आहेत तिथे मधे बैलाला आणतात आणि चढवतात, बघायला येणार का कधीतरी? 
मी म्हणालो - हां चालेल की, च्यायच्चा शंक्या तू बेक्कार बाराचा आहेस रे.

पुढच्या तासाला परत वडनीळ सर आले - शंकर, चांडक आणि तीनचार मुलांची नावं घेतली आणि त्यांना घेवून चालले. शंकर म्हणाला आंतरशालेय क्रिडामहोत्सवाची तयारी. वर्गातून बाहेर पडताना सर विसरल्यासारखं थांबले आणि मला म्हणाले - ए गुsssssहागरवाल्या, चल, तुला धावयला टाकतो, सकाळी चांगली फेरी मारतोस.

मला बाबा उशीरा आले की आवडायचं नाही. लवकर आले की ते मला कायकाय मस्त गोष्टी सांगत बसायचे, बॅंकेतले जोक, फरक कसा काढायचा, असलं काय काय. हल्ली बाबा घरी खूप उशीरा यायचे आणि हळू हळू बारीक आवाजात आईला काहीतरी कामाचं सांगत बसायचे. पण आजकाल आईबाबा जास्त भांडत नव्हते त्यामुळे मला बरं वाटायचं. कधीकधी बाबांबरोबर साठेकाकापण यायचे, मग उशीर झाला असला तर आई साठेकाकूंना हाक मारायची. मग काकू त्यांचा स्वयपाक आणि पियूला घेवून जेवायलाच यायच्या - पियूशी खेळायला जाम गंमत येते. ती काही बोललं तरी दाद्दा दाद्दा म्हणते आणि हसते.
*

संध्याकाळी अचानक साठेकाका आले, बरोबर काकू आणि पियू पण होते. काका एवढ्या लवकर कसे आले असा विचार करतोय तोवर काका मला म्हणाले - अरे पटकन जा आणि रिक्षा घेवून ये, गांधी चौकात जायचय म्हणाव. मी रिक्षा घेवून आलो तोपर्यंत आई, काका काकू दारात उभे होते. आईचा चेहरा एकदम उतरलेला. मी विचारलं काय झाल तर काका मला म्हणाले - जरा आपलं काम आहे पोलिस स्टेशनमधे, चल तुला दाखवतो कसं असतं सगळ तिथं. बाबापण आहेत तिथेच. 
आई म्हणाली - नाहीतर हा राहूदे का? 
काकू लगेच म्हणाल्या - अहो, तेच म्हणणार होते मी आत्ता, तो, पियू आणि मी थांबतो आपल्या घरी. जेवण करून झोपेल वाटल्यास आपल्याकडेच.
साठेकाका दोघींकडं बघत म्हणाले - अहो, तुम्हाला कळत नाही हो वहिनी, हा असूदे बरोबर. काही नाही होत.
आई मला म्हणाली - जा पटकन शर्ट बदलून ये.
काका म्हणाले - नको, नको अगदी घरातल्याच कपड्यांवर चल, वहिनी आता तुम्ही चला लवकर.
आम्ही रिक्षातून गांधी चौकात आलो, काकांनी डायरेक्ट माझा हात धरला आणि आम्ही स्टेशनमधे आत गेलो. तिथे समोर एक इन्स्पेक्टर होते, बहुतेक इन्स्पेक्टरच असतील. त्यांच्या समोर एका खुर्चीवर बाबा बसलेले. दुसर्‍या खुर्चीवर एक गलेलठ्ठ माणूस होता, त्याच्या मागे, फाईली घेवून अजून एक माणूस होता. 
बाबा इन्स्पेक्टरांना काहीतरी समजावून सांगत होते - हे बघा पूर्ण ऐकून घ्या साहेब तुम्ही माझं, ...
साठेकाकांनी मला आणि आईला जरा लांबच्या बाकड्यावर बसवलं, इन्स्पेक्टरांच आमच्याकडं लक्ष गेलं, त्यांनी माझ्याकडे बघितल, मला काय करावं कळेना, मी त्यांना पटकन जयहिंद केलं. 
काका, बाबांच्या शेजारी आणि एक खुर्ची घेवून बसले. 

सगळ्यांच काय काय बोलणं चालू होतं. बोलण काय भांडणच. गलेलठ्ठ माणूसाला आणि इन्स्पेक्टरांना, बाबा सारखं, अहो शेठ, साहेब, शेठजी, ऐका माझं असं म्हणत होते. मला कंटाळा आलेला, आईकडं बघितलं तर ती आठ्या घालून सगळं बघत बसली होती. घरी कधी जायचं विचारण्यात काही अर्थ नव्हता. मी आजूबाजूला पाहिलं तर, एका पोलिसमामांनी, माझ्याकडे बघून दोन्ही भुवया उडवल्या. मी हसलो तर ते म्हणाले - चहा पिणार का? मी मानेनेच नाही म्हणालो.
बराच वेळ गेला, मी बोर झालो होतो.
अचानक शेठजींचा आवाज चढला आणि मी बघू लागलो - 
हे बगा, इन्स्पेक्टर साहेब, मला कर्जबिर्ज जास्त काय माहित नाही. हे पाटीलसाहेबांनी रात्री गोडावून ताब्यात घेतलं, आणि सील लावलं. माझ्या पोराला काय कळालं नाय, त्याची काय किल्ल्या दिल्या म्हणून सही नाही. त्याच्या गोडावूनमधे माझे दहाहजाराचे तागे होते ते चोरीला गेले आहेत. चोरीला गेले का, पाटीलसाहेबांनी स्वत: विकले मला नाय माहीत. मला एकतर ते परत द्या नाहीतर मी कंप्लेट करणार, हे आमचा मुलगा आणि दोन बाजूचे दुकानवाले विटनेस आहेत. काय असेल तसं पाटीलसाहेब तर आत्ताच सांगा, आमी सबुरीने घेवू. सील तुमीच लावले, त्याच्याआदी माल होता.
बाबा ताडकन उठून उभे राहिले आणि जोरातच म्हणाले - 
ओ शेठ, वडिलांच्या वयाचे आहात म्हणून गप्प बसलोय. दुपारपासून नीट समजावून सांगतोय, मराठी कळत नाही का? सकाळी बॅंक जप्तीला येतीय कळंल, तर सगळे लोक गोडाऊन लुटून नेतील एवढी देणी आहेत - असं तुमच्याच मुलानं मिनतवार्‍या करून सांगितलं मला. आता माझ्यावरच असं उलटताय? रितसर पंचनामा झालाय, काय? रात्री सील लावताना तुम्हाला फोन आलेला ना? तेव्हा का नाही आला, तुमचे दहाहजाराचे तागे घ्यायला? तेव्हा तुम्ही मस्त जेवून, ढेरीवर हात फिरवत झोपला होता. फुकटची पचवायची सवय लागली आहे तुम्हा लोकांना. 
काय कंप्लेंट करायची ती करा, मी कुणाचा एक छदामही घेतलेला नाही, वर बसलाय तो बघतोय. 
हे बघा इन्स्पेक्टरसाहेब - मी घरी चाललो आहे. दुपारपासून उगाच माझा वेळ वाया घालवत आहात. मला आत टाकयचं असलं तर आत्ता लगेच आत टाका, उगाच तेचतेच परत सांगत बसणार नाही मी तुम्हाला. 
इन्स्पेक्टरांकडे बाबा असे बघत होते की मला वाटलं आता मारतात का काय त्यांना. आत्या मला नेहमी म्हणते - अरे तुझे बाबा शांत आहेत तोवर ठीके - एकदा चिडले की काही खरं नाही.

बाबा उठून आपल्या फायली पिशवीत घालत होते, साठेकाका म्हणाले - शेठजी, आम्ही ऐकतो म्हणून माजला काय? जरा वकुबानं बोला, आणि कंप्लेंट कराच तुम्ही, मग उद्यापासून तुम्हाला कुठल्या बॅंकेतून ओव्हरड्राफ्ट मिळतो ते बघतो मी. 
बाबा माझ्या आणि आईपाशी आले आणि म्हणाले - चल गं, चलो चटर्जी.
बाहेर आल्यावर साठेकाकांना  बाबा म्हणाले - मी निरोप सांगितला तर चांगलीच युक्ती काढलीस रे, तू.
काका म्हणाले - अहो साहेब, माझ्या डोक्यात नाही आलं. शिंदेवकीलांना फोन केला होता, त्यांनी सांगितलं. ते उद्या गावात येत आहेत, मग काही काळजी करू नका म्हणाले. शिवाय मी स्टेट बॅंकेतल्या सोनवण्यांनापण युनियनचा निरोप दिला आहे.
बाबा हसत म्हणाले - अरे काळजी कसली, बसून कंटाळा आल होता मात्र, कर नाही तर डर कशाला?

साठेकाका आमची स्कूटर घेवून गेले आणि आम्ही रिक्षाने घरी परत आलो. मी काय झालं होतं नक्की, विचारलं तर बाबा जावूदेच म्हणाले. मग आईनी सगळं नीट सांगितलं - शेठजींच्या मुलाने कर्ज फेडलं नव्हतं म्हणून बॅंकेनं त्यांच गोदाम जप्त केलं होतं, ते सोडवायला म्हणून शेठजी अरेरावी करून पोलिसात खोटी तक्रार करेन म्हणत होते.
बाबा म्हणाले - या लोकांच नेहमीचं आहे, दिवाळं निघालं म्हणून बॅंकेची कर्ज फेडायची नाहीत आणि एकीकडं चारचाकी गाड्या फिरवायच्या. बाबा पुढं कुठली शिवी देणार होते ते मला कळालं होतं, आईकडं बघून ते गप्प बसले. मी हसलो म्हणताना तेपण हसले, मग आईपण.
*

क्रिडामहोत्सवासाठी आम्ही सकाळीच निघालो तिघंपण. तिथे आईबाबा प्रेक्षकात थांबले, मी वडनीळसरांना शोधत आत गेलो. शंकर म्हणाला, आज माझे आईदादापण आलेत. एकदम खुशीत होता. मीपण. मग आम्हाला सगळ्यांना वडनीळ सरांनी कोंडाळ्यात घेतलं. प्रत्येकाला नीट खेळा, लक्ष द्या सांगितलं. मी १०० आणि २०० मीटरमधे होतो. मग वडनीळ सर चांडक आणि शंकरला घेवून दुसरीकडं गेले. त्यांची मातीतली कुस्ती होती. 
मी १०० मीटरमधे दुसरा आणि २०० मधे पहिला आलो. अर्ध्या तासाने शंकर ओरडतच आला - तो कुस्तीत तिसरा आला होता. आजपर्यंत आमची शाळा कुस्तीत कधी जिंकली नव्हती. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. मागून वडनीळ सर आले तेपण प्रचंड खूश दिसत होते. त्यांनी आल्याआल्या आम्हाला सगळ्यांना कायकाय झालं विचारलं, मला म्हणाले - अरे खुळ्या, तू जरा जोर लावलास्तास तर शंबर मधेपण यायचास खरतरं. 
सर शंकरच एवढं कौतुक करत होते की, मोहिले शेवट म्हणाला - सर आम्हीतर पहिले, दुसरे आलोय की. सर म्हणाले - तुमी गपारे.
सरांनी आम्हाला एकेक वडापाव दिला, त्यांना कळालच नाही, आम्ही त्यांच्याबरोबर वडापाव खाताना एवढं का हसत होतो ते.

शंकर म्हणाला - चल, माझे आईदादा आलेत, आईला तुला बघायचय. मी म्हणालो - माझ्यापण बाबांना तुला भेटायचय. मला २०० च्या शर्यतीत धावताना आई दिसली होती आम्ही तिकडे चाललो. शंकर म्हणाला - ते बघ आमचे दादा. बघतो तर काय पांढर्‍या शुभ्र लेंग्यातले दादा बाबांना टाळी देत होते आणि दोघे जोरजोरात हसत होते. आई आणि शंकरची आईपण काहीतरी मनापासून बोलताना गढून गेलेल्या दिसल्या. 
मी शंकरला म्हणालो - अरे ते बघ, आपल्या आईबाबांची ओळख झालीसुद्धा. आम्ही ओरडत आमचे नंबर सांगत आपापल्या आईकडे गेलो. 
आम्ही त्या दोघींशी बोलतोय तोवर, बाबांनी शंकरच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याला म्हणाले - अरे तू काय शंकर? आमच्या गणपतीचा दोस्त. तो जोरजोरात हसायला लागला. 
शंकरचे दादा म्हणाले - साहेब मी तुम्हाला मळ्यावर बोलावून दमलो, आता आपल्या पोरांची एवढी दोस्ती आहे कळाल्यावर तरी या की एकदा, काय वहिनी?
बाबा म्हणाले - मला कुठं माहिती दादासाहेब, तुमचा मुलगाच आमच्या चिन्मयचा शंक्या. आता तुम्ही दिवस सांगा, आम्ही हजर होतो बघा.
दादा हसले आणि म्हणाले - ठरलं तर मग, रविवारी सकाळीच जीप पाठवतो, तुमच्या पोराबरोबर आहे म्हणजे मला आता शंकरची काय काळजी नाही पुढची. तर बाबा हसत म्हणाले - पुढच्या वर्षाची काय गॅरंटी नाही बा दादासाहेब.

शंकर जीपनं आणि आम्ही स्कूटरनं घरी आलो.
*

शेवटचा पेपर झाल्यावर मी माझं पॅड आणि कंपासपेटी घेवून शंकरपाशी गेलो, कसा गेला अस विचारलं तर तो म्हणाला - गठ्ठ्यातून आणि आम्ही हसलो. 
तिकडून चांडक येताना दिसला मला, त्याचं पोस्टऑफिस उघड होतं. मी जोरात ओरडलो, ऐ चांडक, पोस्टात पत्र टाकायचय का? 
सगळी मुलं जोरजोरात हसू लागली. चांडक खाली बघून बटणं लावता लावता म्हणाला - गपे तुझ्यायचा पुचा. मी खाडकन त्याच्या डोक्यात पॅड हाणलं आणि आख्खा कंपासच त्याच्या कानापाशी मारला. तो कळवळत खाली पडला बघितल्यावर तर मला चेवच चढला - तुझ्यायच्या बोच्यात पाय चांडक्या, तुझ्याआजीला लाव्ला गाढव, साल्या, आज तुला सोडणार नाही मी - असे म्हणून, त्याच्या छातीवर बसून मी त्याला जोरजोरात मारू लागलो. 
शंकर ओरडला - अरे सोड रक्त येतंय त्याच्या नाकातनं, त्याचे बाबा शेठ आहेत मोठे, नाव सांगेल तो.

त्याच्या बोरांवर एक लाथ मारून मी उठलो - अरे छप्पन्न शेट पाहिलेत असले. चांडक्या, परत आईवरून काही बोलायचं काम नाही, सांगून ठेवतो.
***

Sunday, February 12, 2017

खेमक्याची गोष्ट


आज अचानक आरेवाडीच्या काकांची आठवण झाली आणि त्यांची ती सुप्रसिद्ध खेमक्याची भुताची गोष्ट. गोष्ट सस्पेन्स वगैरे काही नाही, भितीदायक तर अजिबातच नाही, एकदम प्रेडिक्टेबल आहे, पण काका आवाजात चढउतार करुन ती अश्शी काही सांगायचे की बासच. वाचताना कदाचित तेवढी(किंवा काहीच) मजा येणार नाही.

अकरावी-बारावीपर्यंत मी नियमीतपणे सोडवीच्या मावशीकडे जायचो. नंतर त्यांनी गाव सोडलं मग आमचे जाणे तर संपलेच. मावशी कुलकर्ण्यांच्या वाड्यात बिर्‍हाडकरू होती. वाडा म्हणजे नावाला वाडा - मोठ पडकं घरच ते. मधे मोकळी जागा, त्यामागे लांबरुंद सोपा होता, आणि चारीबाजूनी दोन-दोन छोट्या स्वतंत्र खोल्यांची सबघरं, एका कडेला पाण्याची टाकी. (संडास म्हणजे टाकीमागचे कॉंग्रेस गवत).
वाड्यात ताई(मालकीण) आणि अजून चार बिर्‍हाडं होती. ताई एकट्याच रहायच्या - मुलगा, सून, नातवंड सुट्टीत पाटणहून यायचे, बाकी बिर्‍हाडकरुंकडचे पाव्हणे पण त्या सुमारास यायचे - मेमधे संध्याकाळी सगळ्यांची मधोमध जेवणं उरकली की तशाच खरकट्या हातांनी दोन-चार तास गप्पा. आरेवाडीचे काका आले असले तर ठरवून भुताच्या गोष्टी, मग चांगला बारा-एक वाजेपर्यंत कार्यक्रम. आरेवाडीचे काका म्हणजे ताईंचा मावसभाऊ. त्या भागातले नावाजलेले आचारी होते, पण मला आठवतयं तसे त्यांनी ते काम थांबवलेलेच होते. खरेतर ते आजोबांच्या वयाचे पण सगळे त्यांना काका म्हणायचे म्हणून आम्हीपण काका.
तसे लोकात जास्त रमणारे नव्हते ते, मोजकंच बोलणार, तेपण फक्त ताईंशी आणि त्यांच्यात्यांच्या नातवंडांशी. ते असं प्रीसंध्याकाळ यायचे. फेटा काढून ठेवून, नॉयलॉनची चट्टेरीपट्टेरी पिशवी खुंटीला टांगायचे. आत बसून ताईंशी तासभर गप्पा मारुन मग हनुमानाला जायचे ते थेट जेवणाच्या वेळी हजर. काका आलेले कळालं कीच आम्ही सगळे एक्साईट व्ह्यायचो - आज जेवताना भुताचा विषय निघणार म्हणून, विशेषत: आम्ही शहरातली मुलं.

जास्त वर्णन करत बसलो तर  खेमक्याच्या गोष्टीपर्यंत पोचणार नाही आपण. जेवण झाल्यावर कुणीतरी मोठ्ठ माणूस म्हणायचचं - काका, तो खेमक्याचा काय हो तुमचा अनुभव, सांगा की, खरं म्हणायचं का गोष्ट नुसती? मग काकांचा नूरच पालटायचा.
*
खेमक्याची गोष्ट

अरे ती गोष्ट नाही बाबा, असा अनुभव, कधी विसरणारच नाही बघ. तसा मी माणच्या बाहेरच्या कामाला नाहीच म्हणायचो. पण लाडूमामासारख्या खणखणीत माणसाकडून निरोप आल्यावर नाही म्हणायला जागाच नव्हती. चार मुलींवर मुलगा झालेला त्यामुळे खेमक्याच्या नामदारांना गावजेवण घालायचे होते. पाचसहा गावं जेवणार होती. मला खास जिल्बीसाठी आणि दशरथदादांना बुंदीसाठी माणमधून बोलावणे धाडले होते. आदल्यादिवशी रात्रीच पोचलो आम्ही दोघं, इनामदारांच्या घरातच सगळ्यांची रहायची व्यवस्था केली होती, घर कसलं गढीच होती. इनामदार येवून जातीनं चौकशी करुन गेले. किती माणसं होतील, ऐनेवेळेला सामानासाठी कुणाला हाक मारायची वगैरे सगळं सांगून गेले, लाडूमामांनी मोठ्ठं काम केलं बघा माझं, अस दोनदोनदा म्हणाले.
दुसर्‍या दिवशी पहाटेपासून जो पिट्ट्या पडला म्हणून सांगू. दुपारी चार काय पाचपर्यंत पंगती उठत होत्या. नुस्ता मठ्ठा म्हणशील तर दर पाच मिनीटाला बंबाएवढा संपत होता. आमची दोन्ही बारीची जेवण, एकाचवेळी संध्याकाळी झाली. जेवणं झाल्यावर इनामदारांनी सगळ्यांना पाकीटं दिली, म्हणाले निजा इथं आणि उद्याचच निघा आता. आम्ही एवढं थकलो होतो की आम्हाला काय, पडत्या फळाची आज्ञा.

इनामदारांच्या माणसानं सोप्यात प्रत्येकाला एकेक जागा दिली. आम्ही आपापल्या पिशवी मानेखाली घेतल्या आणि तिथे लागलीच पाठ टेकवली. अर्ध्यातासाभरात वाड्यात निजानीज झाली. मला अतिश्रमाने म्हणा किंवा दरथदादांच्या घोरण्याने म्हणा झोपच लागेना. तिथून उठलो, जिन्याशेजारी बसलो थोडावेळ, पाठ धरली होती त्यामुळे जास्तवेळ बसवेना. मग परत आपल्या जागी झोपायला चाललो तेव्हा सोप्याच्या कोपर्‍यात एक ओटा दिसला. त्याच्यावर चांगलं स्वच्छ पांढरं जेन घातलं होतं. मला वाटलं एखाद्या गड्याची झोपायची जागा असेल, लघवीबिघ्वीला गेला असेल. मी माझ्या जागेवर झोपायला गेलो, झोप काही परत येईना. मग परत ओट्याकडे नजर गेली तर रिकामाच. दुसर्‍या जागी झोप लागेल कदाचित असा विचार करुन मी चंबुगबाळं आवरुन तिथे झोपायला गेलो. आणि पाठ टेकताक्षणीच जी झोप लागली की ज्याचं नाव ते.
कितीवेळ झोपलेलो काही आठवत नाही, अचानक खूप उकडायला लागलं, परक्याच्या घरात असल्यानं मी काही शर्ट काढला नव्हता. एवढं उकडायला लागल्यावर काढला, आणि पहाटेच्या वेळी मात्र घालू परत असा विचार करुन झोपलो. जरा वेळ झोपतोय तोवर पाठीला कडकडून काहीतरी चावलं, बघितलं तर मुंगीबिंगी काही नव्हती. झोपलो तसाच दामटून. पण थोड्याच वेळाने आवाज आला - ए ऊठ, इथे नको झोपूस. मला वाटलं भास झाला, मी दुर्लक्ष केले तर आवाज वाढला. आता पेकाटात काठी टोचत होती आणि वरुन आवाज येत होता - ए ऊठ, आमची जागा आहे ही, उठ पटकन, दुसरीकडे नीज. आता मात्र मी घाबरलो, झोप उडाली, खाडकन डोळे उघडून पाहिलं तर आजूबाजूला कोणी नव्हतं. मग परत आवाज आला - इकडं वर बघ, आमची जागा आहे ही, इथं नाही झोपायचं, इथून ऊठ, दुसरीकडं जा, तुला काही त्रास देणार नाही आम्ही. मी वर पाहिलं तर तुळईवर सात माणसं बसली होती, मळका शर्ट, पांढरे धोतर, तुळईवरुन चौदा पाय लोंबकाळत होते. आश्चर्य वाटेल तुम्हाला, भूतं बघतोय हे मला कळालं होतं. पण नुसता आवाज ऐकून जी भिती वाटत होती ती त्या सात जणांना बघितल्यावर कुठल्या कुठं पळून गेली. मी त्यांना म्हणालो - अहो इथे चांगली झोप लागली होती तुम्ही उठवेपर्यंत, बाकी कुठे झोप येत नाहीये. खूप दमलोय हो, जिलब्या तळून हात खांद्यापासून मोडून आलाय.
वरच्यातला एकजण म्हणाला, आचारी आहेस का तू? मी म्हणालो - होय हो. तेवढ्यात दुसरा म्हणाला, गळ्यात माळ आहे, वारीला जातोस का? मी म्हणालो - हो, नियमीत नाही तसा पण दोन-तीन वर्षातून एकदा तरी चुकवत नाहीच. तुळईवर बसलेला शेवटचा ईतरांना उद्देशून म्हणाला - जाऊ दे गड्यांनो, आपल्यासारखाच आहे. मग मला म्हणाला - हे बघ एवढी रात्रच हां, उद्या परत येशील आणि इथे झोपायचंय म्हणशील तर तसं नाही चालणार. मी म्हणालो - नाही हो, उद्या सकाळीच खेमका सोडणार मी.
बरं बरं, झोप मग - असं म्हणत ते सातजण शांत बसले, मी एकवार वर नजर टाकली तर चंची काढून तंबाखू मळत बसले होते. मग पांघरुणात डोकं खुपसून ढाराढूर झोपलो.

सकाळी जाग आली ती गलबल्यानंच. पांघरुण काढून उठतो तोवर कळालं की, आख्खा वाडा सोप्यात जमला आहे आणि सगळे माझ्याकडे बघताहेत. जरा पुढं, आम्हाला अंथरुणं घालून देणारा कालचा गडी दातखीळ येवून पडलेला, दोनचार जण चप्पल-कांदा घेवून त्याच्यापाशी बसले होते. तेवढ्यात इनामदार आले आणि म्हणाले - अवं पाव्हणं, तिकडं कसे गेला तुम्ही. काय झालं असतं म्हणजे केवढ्याला पडलं असतं बगा. मी काही बोलायच्या आत मला म्हणले, आता तुम्ही काही बोलू नका, पाणी कढत ठेवलयं, ईथनं उठून आधी अंघोळ करा, बाजूला मारुतीला जा आणि मग डायरेक वरच्या दिवाणात या. मी हो म्हणून दशरथदादांकडं बघितलं आणि उठलो.
अंघोळ, मारुती उरकून वरच्या माडीत गेलो तर इनामदार  आणि त्यांच्या शेजारी दशरथदादाही होते. मी आल्यावर इनामदार लगेच उठले आणि म्हणाले - या, या, रागवला नाही ना, मगाशी जरा आवाज चढला होता. मी मान डोलावली. चहा आला. दोन बशा झाल्यावर इनामदार म्हणाले - काही बोलायच्या आधी एक सांगा, काही त्रास नाही ना झाला रात्री, आत्ता होत नाहिये ना? कशात काही नसेल तर तुमच्या डोक्यात काही भरायला नको उगा.

मी बारीकसा हसलो त्यावरुनच त्यांना कळालं. मग सगळा झाला प्रकार मी त्यांना सांगितला. इनामदार डोळे मोठ्ठेच ठेवून म्हणाले - चांगलीच बडदास्त ठेवली म्हणायची की तुमची, वाड्यातलं कुणी तिथं पाच मिनीटं बसू शकत नाही, अंगाची लाही होती. आणि एकदम गप्प बसले.
शेवट चहा झाल्यावर मीच विचारलं - इनामदार आता, एवढं कळालं आहे, कोण आहेत हे लोकं तेपण सांगा की, पूर्वज आहेत का तुमचे? काही उपाय का करत नाही तुम्ही.
इनामदार म्हणाले - अहो, सगळे उपाय झाले, मी काय, माझ्या आजोबांपासून सगळ्यांनी बरेच उपाय करून पाहिले, पण हे सातजण काही जात नाहीत. आणि बाकी काही त्रास नाही त्यांचा तसा, त्यामुळे, आम्हीपण मग काही जास्त गोवत नाही तिकडं. जोवर तिथे कोण बसत-झोपत नाही, सगळं बरायं.
हे घर आमच्या आजोबांनी बांधलं बघा. त्याच्याआधी हे आहे त्याच्या दुप्पट घर होतं याच जमिनीवर. पण ते बरच पडलेलं, रोजची डागडुगी इतकी की, पणजोबापासून सगळ्यांच्या डोक्यात होतं, नवीनच घर बांधावं. आमच्याच तोंडान सांगतोय आता, आणि नाहीतरी बाहेर पडल्यावर हे कळंलंच तुम्हाला. आमचे पूर्वज लय बेरकी होते.
आठ-दहा पिढ्यांपूर्वीची गोष्ट आहे - तेव्हा खेमका तसं मोठ्ठ होतं तसं, बाजरपेठेचं गाव होतं. पण आमची ही जागा मुख्य गावाच्या बर्‍याच बाहेर, आताआता गाव इथपर्यंत पसरलंय, तेव्हा दोनचार पांद्या ओलांडून यायला लागायचं. तेव्हाचे इनामदार, आमचे पूर्वज गडगंज होते पण वृत्तीनं एकदम बेकार. दोघे भाऊ होते, ताडमाड रंगेल गडी, तोंडाळ नंबर एक, तोंड उघडलं की शिव्याच. अंगात रग एवढी की, जरा एखाद्याचा शब्द मागंपुढं झाला की मारायला कमी करायचे नाहीत. एकाच शेतचं खाल्ल्यालं, घरच्या बायकाही तशाच. शेतात कुळं होती त्यांना काम सोडून जायची सोय नव्हती. गावतले बाकीचे इनामदारांशी कशाला वाकडं घ्या म्हणून त्यांना काम द्यायचे नाहीत, त्यामुळे शेताचं सगळ नीट चालायचं. पण यांना घरकामाला काही गडी मिळायचा नाही. एकतर वाडा हा एवढा लांब, रानात, आणि यांची किर्ती ही अशी. बायकांच्या भुणभुणीला वैतागून दोघा इनामदारांनी बसून एक उपाय काढला. दोघे आषाढीला पंढरपूरला गेले. तिथे पुढचंमागचं कोण नसलेला एक धडधाकट गडी बघितला. बोली ठरली - वर्षाला पाच रुपये, एक धोतरजोडी आणि पंचा, वारीला तीन आठवडे सुट्टी, आणि दोनवेळचं खायला मिळेल - पण काम कुठलं पडेल ते. रिकाम्या हातांसाठी देवच पावला जणू. परत येवून जुंपला गड्याला वाड्यावर. दिवसरात्र कामाचं जू. एकदा वाड्यावर आल्यानंतर क्वचित कधीतरी गडी खेमक्यात गेला तर गेला. शक्यतो न्हाईच. पण दोनवेळच्या व्यवस्थित जेवणानं गडी खूष होता. आणि मगाशी म्हणलं तसं इनामदार बेरकी होते, त्याला जास्त त्रास द्यायचे नाईत.
वर्ष झालं, इनामदार म्हणाले - घट्ट निघालास मर्दा, आता वर्ष झालं बघ, संध्याकाळी मागच्या पडवीत ये, तिथे धोतरजोडी देतो आणि मग जावून ये सुट्टीला. मागची पडवी म्हणजे इनामदारांचा खास भाग होता तिथे त्यांचे सगळे कार्यक्रम चालायचे, झाडझूड सोडली तर तिथे जास्त वावर नव्हता. रात्री गडी आला, त्याला धोतर, पाच रुपये दिले. धाकटा इनामदार म्हणाला - दादा धान्य देवूया थोडं, एवढं वर्षभर राबतोय, हूंकीचूं नाही केलं कधी. दादा म्हणाले - कळीचं बोललास. मग मोठे इनामदार-दादा, गड्याला म्हणाले - ये रे खालच्या घरात, गड्याला ही खोली नवीन होती, एकदम छोटी. दादांच्या पाठोपाठ हा आला. दादा म्हणाले - थांब हा, मी गोणी आणतो. पटकन पाच पायर्‍या चढून वर गेले आणि तळाघराचं दार बंद करून आडणा टाकला. गड्याला काही कळायच्या आत तो अंधार्‍या चिंचोळ्या खोलीत अडकला. आठवडाभराने, दोघा इनामदारांनी स्वत: तळघरात जावून त्याला तिथेच पुरला.
मग परत पंढरपुरला नवीन वर्षासाठी नवीन गडी शोधायला निघून गेले. गावात कुणाला काही कळायचा प्रश्नच नव्हता, एकतर हा गडी जास्त गावात जायचाच नाही आणि पंधरा दिवसानी तर दोघे भाऊ नवीन गड्यासोबत परत यायचेच.
सध्याचे इनामदार एवढं सांगून शांत बसले, माझा चेहरा बघून म्हणाले - अवो मी नाही हो त्यांच्यातला, घाबरू नका, तुम्हाला चांगलं सोप्यात सगळ्यांना एकत्र झोपायला दिलेल नां? असं म्हणाले आणि आम्ही सगळेच हसलो. मग इनामदार अभिमानाने म्हणाले - पण खरंच हां, आमच्यात त्यांचं रक्त नाही. त्यांची मूलं काही जगली नाहीत कोणी, आम्ही सगळे मामाकडून दत्तक आलेल्याची पिढी.
मी म्हणालो - बरं, मग हे थांबलं, कसं सात गड्यांनंतर?
इनामदार म्हणाले - अहो सातवा गडी तल्लख निघाला, तळघरात गेल्यागेल्या त्यानं विचार केला, एवढ्या छोट्या चिंचोळ्या खोलीत इनामदार धान्य कशाला ठेवतील आणि इथली जमीन तर कधी मी सारवली नाही, इथं कसं धान्य ठेवतात. त्यानं मोठ्ठ्या इनामदारांकडे बघितलं, आणि क्षणात दोघांना एकमेकाचे पुढचे विचार समजले. वयानं म्हणा किंवा अपेक्षित नसल्याने म्हणा मोठे इनामदार बावचळले आणि पायर्‍या चढताना पडले. गड्याने तिथलीच कोठी यांच्या डोक्यात घातली, पण तेवढ्यात धाकटे इनामदार तिथं आले आणि त्यांनी दार लावून टाकले.
आम्ही पिढीजात ही गोष्ट ऐकत आलो, कधी वाटायचं कुणीतरी आपलं इनामदारांच्या बदनामीसाठी रचलय. आजोबांनी जुनं पाडून नवीन घर बांधलं, पूर्वीच्या त्या छोट्या तळघराच्या जागेवर आत्ताचा सोप्यातला तो ओटा आला. नवीन घरात त्या कोपर्‍यात झोपणार्‍यांना सगळ्यांना चित्रविचित्र अनुभव यायला लागले मग आमचा या गोष्टीवर विश्वास बसायला लागला. पूर्वी तिथ ओटा बांधला नव्हता, नंतर आपला एक ओटा बांधून आम्ही तिथं जेन टाकलं. आजतर तुम्ही सात जण बसली होती सांगून पक्की खात्रीच केलीत.

इनामदार शांत बसले, दशरथदादानं खुणेनंच सांगितल मला की चल आता. मी मग उठून म्हणालो - बरं तर मालक, आम्ही आमच्या आरेवाडीला निघतो. तिथं जेनबिन ठेवू नका बघा तेवढं, एखाद्याला झोपुसं वाटायचं तिथे परत.
*

आरेवाडीच्या काकांच्या या गोष्टीनं सुरुवात झाल्यावर मग पुढे मैफिल चांगली रंगायची. वेताळाची पालखी, किरुताईचा चहा, वाचलास रे वाचलास, सगळेच किस्से आठवायला लागलेत आता.
***

Thursday, February 9, 2017

खडतर


माझ्या मेंदूवर मानसिक ताण आला आहे आणि त्यामुळेच उजवा डोळाही दुखतो आहे.(संशय). 

कुणाचे चूक, कुणाचे बरोबर, काय चूक, काय बरोबर? काही कळत नाही. कुणाचे का कोणाचे तेपण नाही कळत. कुणाचे किती चूक, किती बरोबर? मी जे चूक म्हणतो ते समोरची व्यक्तीपण चूकच म्हणते का? जर तसे नसेल तर माझ्यादृष्टीने तरी ते चूक का असावे. पण मग मी ते बरोबर मानले तर माझे सगळे बरोबर मानलेले चूक ठरणार का? मी लोकासाठी एवढा त्रास का घ्यावा? मी आत्ता प्यायलो नाहीये. ऑफिस, इन जनरल जीवनपण चढू शकतं माणसाला.

आपल्यापेक्षा गरीब लोक असतात, श्रीमंतपण असतात, त्यांचे विचार वेगळे असतात म्हणून ते चूक नाहीत. लोकांचा विचार केला पाहिजे, प्रत्येकाची एक बाजू असते ती समजून घेतली पाहिजे. पण आपले काय? 
शाळेतून पाल्याला आणायला गेटपाशी एकदम पुढे उभा राहिलो. एक बाई म्हणाली - असली कसली घाई, सगळ्यांना सोडणारेत. बायकांविषयी काही ग्रह बाळगायचे नाहीत. प्रत्येकजण वेगळावेगळ्या ग्रुपमधे उभे असतात. एकतर इथे रांग नाहीये, लोक कसेही कुठेही गप्पा मारत उभे आहेत. एकदा वॉचमनने आत सोडले आणि आपण मागे पडलो तर १०-१५ मिनीटे उशीर तरी नक्कीच. किती रमतगमत गप्पा मारत जातात, रस्ता अरुंद आहे, मागच्यांना पुढे जायचे असेल असा काही विचारच नाही. मी आणि एकजण रोज गेटपाशी एकदम पुढे उभे राहतो, लोकांना आणि या उपस्थित बायकांना पक्कं माहित आहे हे, रोजचं आहे. पुढे जायला जागा का करुन देत नाही मग तुम्ही मला? तुम्ही पुढे उभ्या असता तर मी गेलो नसतोच ना. परत घाई कसली म्हणजे काय? वेळेचा प्रश्न नाही, यांच्यामगं चालायचं म्हणजे काय बोलायची सोय नाही. एवढं हळू चाललं की पायच दुखतील माझे, असं मला वाटतं. त्यांच्या भूमिकेतून विचार करायचा म्हणलं तर, त्यांना आवडत असेल मैत्रिणींबरोबर रमतगमत जायला. शक्य आहे. सगळ्यांचच सगळं बरोबर असतं. 
दिवसभर उन्हातान्हात उभा असतो म्हणून या वॉचमनविषयी वाईट वाटावं तर तोपण असला डॅंबिसपणा करतो. चकाचक सूट्बूट घालून आलेल्यांना - अभी नही जा सकते सर अंदर, दस मिनीट रुकिये, असं अगदी प्रेमळ आवाजात सांगतो, अजीजीने. आमच्यासारखा एखादा दाढी वाढलेला बघितला की खेकसतयं - मागे व्हा वो, टाईम व्हायचाय अजून. तुझा पगार काय, झवाड्या? असा विचार येतो माझ्या मनात. पैशाचा सुप्त माज आहे म्हणजे आपल्याला, तरी काय बिझनेसमन नाही आपण, साधे नोकरदार तरी असं. मग ते अतियशस्वी माणसांच्या मनात थोडेफार असेलच की पैशाविषयी. त्यामुळे मग ते पिक्चरमधे असं गरीब माणसाशी प्रेम केल की विरोध करतात.

परवा चहा प्यायला गेलो पॅंट्रीत तर, एका कपाच्या वरच्या बाजूला चहाची गोल रिंग तशीच, नीट विसळला नव्हता कप. मित्र म्हणाला - देख साले कैसे साफ करते है, फ्री का पैसा चाहिये. दुसरा त्याला म्हणाला - तेरे कोड का १००% कव्हरेज होता है क्या बे, २-४ सिनारिओ छोडही देता है ना साले, जेयुनिट या एएफटी लिखतेसमय? तू जैसे कामचोर है वैसे ये पॅंट्रीबॉयभी. हा भडकला, म्हणाला मी १० दिवसाचे काम ५ दिवसात केले, माहितेय तुम्हा लोकांना. खरं होतं हे. याची मजबूरी होती मान्य आहे. पण तशीच पॅंट्रीबॉयचीही मजबूरी असू शकेल असा आमचा मुद्दा होता. असेलही, पण कप नीट घासला नव्हता ही सध्याची डोळ्यासमोरची फॅक्ट जशीच्या तशी मान्य करायला काय अडचण आहे. आपला मित्र कामचुकार नाही हे आम्हाला माहिते, तरी त्याची क्षुल्लक चूक काढली आम्ही. पॅंट्रीबॉय खरच कामचुकार असेल अशी शक्यता आहे हे पहिल्याप्रथम मान्य करायला काय हरकत आहे. आपण तसे केले तर असंवेदनशील ठरू असे मेंदूला वाटत असेल का?
जगणं कॉम्प्लेक्स झालं आहे. असं आदिमानवालाही वाटत असेल. परत तेच. आदिमानवाचा संबंध काय आत्ता, त्याला कसं का वाटेना? माझाच मेंदू माझ्याच विचांरावर जजमेंट देवून पुढचे विचार का निर्माण करतो? काय येडेगिरी आहे ही? सगळ्यांनाच असे होते का? अच्युत आठवलेसारखं होईल का माझं म्हातारपणी?

सगळ्यांचच सगळं बरोबर म्हणलं तर अध्यात्मिक लोकपण बरोबर. रिटायत्मिक लोक म्हणजे, रिटायर झाल्यावर अध्यात्माच्या मागे लागणारे लोक तर बरोबरच. मला तर ते आवडतातच. डोक्याला ताप नाही, आपलं आपलं काहीतरी अध्यात्मिक ॲक्टिव्हीटी करत बसतात. करुन करुन भागले आणि देवपूजेला लागले ही जीवनशैली बरोबरच आहे, एखाद्याला आवड असेल तर आपण कोण थांबवणारे?

तशी मेहनत तर प्रत्येकालाच करायला लागते. पूर्वी मला वाटायचं की, या मॉडेल पोरी काय च्यायला, उगाच हसायचं, फोटो द्यायचा आणि  पैसे घ्यायचे. एक दिवस एका जाहिरातीचं शूटिंग पाहिलं मी - पोरीच एकच काम होतं - विरुद्ध दिशेने एक गाडी येणार, हिला बघून चालक हॅंडब्रेक मारुन गाडी बरोब्बर वळवतो जागच्या जागी, आणि दार उघडतं. मग ही बाळ त्यात चढणार. दिवसभर ते हॅंडब्रेकचं लफडं जमत नव्हतं. दर दहा मिनीटांनी ही गुणी पोर, मेकअप/टचप करुन, पर्स घेवून तयार होऊन उभी राहणार. सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहापर्यंत या लोकांच हेच सुरू होतं - मेकअप, टचअप, स्टॅंडअप. साडेसहा काय, पार प्रकाश आहे तोवर, धर्मयुद्धाचा नियमच जणू. मला दिसत होतं ऑफिसच्या खिडकीतून, वाटतं सोप्प पण अवघड आहे. तेव्हापासून तर मला, नाना पाटेकर असं म्हणाला-वाले वॉटसॅप फॉर्वरड खरंच वाचावेसे वाटतात.

लहान मुलांचं तरी काय यार, कोणीही येतं आणि उचलून घेतं, कधी बाहेर आणि काहीही बोलतात लाडे लाडे, त्यांना त्रास होत असेल. मस्त बिचारं रमलं असतं कशाततरी लोक येणार, प्रेमाने घेणार. त्रास. मला झाला असेल का लहानपणी, देव जाणे.

सगळ्यांचच जीवन खडतर आहे.