Saturday, October 17, 2009

शुभ दीपावली


<बालिश>
दिवाळीवर दहा मुद्दे - 
१. दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे - सर्वात म्हणजे, सर्वात म्हणजे, सगळ्यात जास्त आवडणारा सण, गणेशोत्सवापेक्षापण जास्त
२. दिवाळीच्या पहिल्या दिवशी चकल्यालाडू खाताना मला "सारखं तेच तेच खाऊन कंटाळा आलाय" अशी तक्रार करायला आवडते. परंतु फराळाचे पदार्थ मला दिवाळीआधी आणि दिवाळीनंतर खायला आवडतात.
३.  माझे आवडते फटाके - चिमणी, कावळे, सुतळी बाँब, लक्ष्मीबाँब, रंगीत काड्यापेट्या, फुलबाज्या, झाड [याला काही लोक अनार म्हणतात - I ain't judging anybody here ;) ]
याशिवाय आपला पोपट करणारे सर्व  फुसके फटाके - लहानपणी एक झाड बराच वेळ का उडत नाही ते बघायला गेलो मी आणि डोक्यातच उडाले की ते. डाव्या बाजूचे केस जे जळाले ते परत आलेच नाहीत, लोकांना वाटतं की टक्कल पडायला लागले आहे, तसे नाहीय पण.
४. माझे नावडते फटाके - असे काही बाण असतात की ते उडविल्यावर त्यातून पॅराशूट खाली पडते. तसले फटाके मला आवडत नाहीत कारण ते महाग असायचे, सध्या माहीत नाही काय किंमत आहे.
५. दिवाळीचे आवडते साबण - मोती मोती मोती, उटणे टोचते पण चालायचंच तेवढं आता.
६. दिवाळीतील आवडते वाचन - वर्तमानपत्रातले सुट्टीचे पान, हे मोठे झाल्यावर आवडायला लागले, लहानपणी बोर व्हायचे.
७. मला किल्ले बनवायला फार आवडते, प्रत्येक किल्ल्याला २ बुरुज व आत ४ गुहा असणे कंपल्सरी आहे, नंतर या गुहांचा वापर किल्ला उध्वस्त करण्यासाठी होतो
८. आपल्याला पत्र्याच्या आत मेण घालून केलेल्या छपरी पणत्या आवडत नाहीत, मातीच्याच चांगल्या, त्यापण एकएकट्या सुट्या. पन्नास पणत्या एकत्र करुन काहीतरी नंदादीपटाईप वगैरे बनविलेले पण विशेष आवडत नाही आम्हाला. आमची मर्जी.
९, १०. दिवाळी, दिवाळी, दिवाळी.
</बालिश> 

<शुभेच्छा> 
ही दिवाळी सर्वांना आनंदाची व सुखासमृद्धीची जावो.
</शुभेच्छा> 

<उपदेश> 
सर्व छोटीमोठी दु:ख तेवढ्यापुरती विसरुन ही दिवाळी आनंदात साजरी करा.
</उपदेश>  


<बाष्कळ कविता>  

नकोत वेदनांचे फुत्कार अन्‌ भावनांचे हुंकार,
वर्णू नका प्रेमाचे आणि हृदयाचे जुगार
आठवणी, ओलावा, चाहूल हे शब्दच साले सुमार,
बोहाराणीला द्या तुमचे असले लेडीज रुमाल
अंतरंगाचे पापुद्रे सोलण्याचे धंदे लेको तुमचे,
अश्रूंच्या टाक्या आणि  आणाभाकांच्या नळकांड्या
हट्‌ रे हट्‌, नकोच नको हे सगळे,
त्यापेक्षा फटाके उडवा फटाके
धडामधुडुम ऐकून, रोषणाई बघून,
कुत्र्यामांजरांच्या शेपट्यांना लवंगी बांधून
 चिल्ल्यापिल्ल्यांच्या फुलबाज्या पळवून
हसा फिदीफिदी,
आसुरी तर आसुरी, पण हसा फिदीफिदी

नंतर आहेच सगळं,
फटाक्याची  राख पाहून, ढासळलेले किल्ले बघून
चुकचुकणं
ओसरलेला उत्साह पाहून, फिसकटलेल्या रांगोळ्या पाहून
चुकचुकणं
त्यावरुन आणि परत दु:खाची पिलावळ प्रसवणं

पण तोवर च्यायला,
लावा हजाराची माळ आणि काढा रंगीत सापांचा जाळ
संपवून टाका फुलबाजीची काडीन्‌काडी,
शुभदीपावली अन्‌ एन्जॉयमाडी
हा हा हा.

</बाष्कळ कविता>  

॥शुभ दीपावली॥

***