Saturday, October 17, 2009

शुभ दीपावली


<बालिश>
दिवाळीवर दहा मुद्दे - 
१. दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे - सर्वात म्हणजे, सर्वात म्हणजे, सगळ्यात जास्त आवडणारा सण, गणेशोत्सवापेक्षापण जास्त
२. दिवाळीच्या पहिल्या दिवशी चकल्यालाडू खाताना मला "सारखं तेच तेच खाऊन कंटाळा आलाय" अशी तक्रार करायला आवडते. परंतु फराळाचे पदार्थ मला दिवाळीआधी आणि दिवाळीनंतर खायला आवडतात.
३.  माझे आवडते फटाके - चिमणी, कावळे, सुतळी बाँब, लक्ष्मीबाँब, रंगीत काड्यापेट्या, फुलबाज्या, झाड [याला काही लोक अनार म्हणतात - I ain't judging anybody here ;) ]
याशिवाय आपला पोपट करणारे सर्व  फुसके फटाके - लहानपणी एक झाड बराच वेळ का उडत नाही ते बघायला गेलो मी आणि डोक्यातच उडाले की ते. डाव्या बाजूचे केस जे जळाले ते परत आलेच नाहीत, लोकांना वाटतं की टक्कल पडायला लागले आहे, तसे नाहीय पण.
४. माझे नावडते फटाके - असे काही बाण असतात की ते उडविल्यावर त्यातून पॅराशूट खाली पडते. तसले फटाके मला आवडत नाहीत कारण ते महाग असायचे, सध्या माहीत नाही काय किंमत आहे.
५. दिवाळीचे आवडते साबण - मोती मोती मोती, उटणे टोचते पण चालायचंच तेवढं आता.
६. दिवाळीतील आवडते वाचन - वर्तमानपत्रातले सुट्टीचे पान, हे मोठे झाल्यावर आवडायला लागले, लहानपणी बोर व्हायचे.
७. मला किल्ले बनवायला फार आवडते, प्रत्येक किल्ल्याला २ बुरुज व आत ४ गुहा असणे कंपल्सरी आहे, नंतर या गुहांचा वापर किल्ला उध्वस्त करण्यासाठी होतो
८. आपल्याला पत्र्याच्या आत मेण घालून केलेल्या छपरी पणत्या आवडत नाहीत, मातीच्याच चांगल्या, त्यापण एकएकट्या सुट्या. पन्नास पणत्या एकत्र करुन काहीतरी नंदादीपटाईप वगैरे बनविलेले पण विशेष आवडत नाही आम्हाला. आमची मर्जी.
९, १०. दिवाळी, दिवाळी, दिवाळी.
</बालिश> 

<शुभेच्छा> 
ही दिवाळी सर्वांना आनंदाची व सुखासमृद्धीची जावो.
</शुभेच्छा> 

<उपदेश> 
सर्व छोटीमोठी दु:ख तेवढ्यापुरती विसरुन ही दिवाळी आनंदात साजरी करा.
</उपदेश>  


<बाष्कळ कविता>  

नकोत वेदनांचे फुत्कार अन्‌ भावनांचे हुंकार,
वर्णू नका प्रेमाचे आणि हृदयाचे जुगार
आठवणी, ओलावा, चाहूल हे शब्दच साले सुमार,
बोहाराणीला द्या तुमचे असले लेडीज रुमाल
अंतरंगाचे पापुद्रे सोलण्याचे धंदे लेको तुमचे,
अश्रूंच्या टाक्या आणि  आणाभाकांच्या नळकांड्या
हट्‌ रे हट्‌, नकोच नको हे सगळे,
त्यापेक्षा फटाके उडवा फटाके
धडामधुडुम ऐकून, रोषणाई बघून,
कुत्र्यामांजरांच्या शेपट्यांना लवंगी बांधून
 चिल्ल्यापिल्ल्यांच्या फुलबाज्या पळवून
हसा फिदीफिदी,
आसुरी तर आसुरी, पण हसा फिदीफिदी

नंतर आहेच सगळं,
फटाक्याची  राख पाहून, ढासळलेले किल्ले बघून
चुकचुकणं
ओसरलेला उत्साह पाहून, फिसकटलेल्या रांगोळ्या पाहून
चुकचुकणं
त्यावरुन आणि परत दु:खाची पिलावळ प्रसवणं

पण तोवर च्यायला,
लावा हजाराची माळ आणि काढा रंगीत सापांचा जाळ
संपवून टाका फुलबाजीची काडीन्‌काडी,
शुभदीपावली अन्‌ एन्जॉयमाडी
हा हा हा.

</बाष्कळ कविता>  

॥शुभ दीपावली॥

***

Monday, September 28, 2009

सात विषय

उगाच उठून काहीही निरर्थक खरडणे आता मला बोर झाले आहे, म्हणजे सध्या थोडे दिवस. आता मी एक एक विषय घेवून त्या विषयानुसार लिहिणारे. खालचे सगळे विषय म्हणजे प्रकार वाटतील पण माझ्यासाठी ते विषयच आहेत.

विषय १: वादावादी - ऑफिसमधून घरी जाताना मॉनिटर बंद करणे गरजेचे आहे का?
अ: तू मॉनिटर कधीच बंद करत नाहीस घरी जाताना, करत जा ना बाबा.
ब: मी करणार नाही, इथिकली चूकीचे वाटते मला, माझ्या तत्त्वात बसत नाही.
अ: What? Are you kidding? विसरतो मी, कंटाळा येतो मला वगैरे कारणे ऐकली होती, तत्त्वात बसत नाही? महान आत्म्या, ह्यात काय चूक आहे? उर्जा वाचेल, ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल.
ब: एकतर मूळातच मला उर्जा वाचवणे वगैरे यात काडीचाही रस नाही. आपण उगाच कष्ट घेऊन उर्जा-बिर्जा वाचवा, काही गरज नाहीये, काही क्रायसिस नाहीयेत. बाकी कोणी वाचवत नाहीये इथे काही, F1, लास वेगासचा, मॉल्सचा झगमगाट पाहा.
अ: अरे, सगळ्यांनीच असे म्हणले तर कसे चालेले, दुसरा वाईट काम करतो म्हणून आपणपण करायचे का?
ब: मी काही वाईट करत नाहीये रे मित्रा, बोलण्याच्या गोष्टी वेगळ्या, थेंबे थेंबे तळ साचते का खरंच? तुम्हा लोकांना कळत नाही रे, साधे लॉजिक आहे. जर खरेच मोठ्ठा प्रॉब्लेम असता तर मोठ्ठ्या प्रमाणावर जी पेट्रोल आणि उर्जेची नासाडी होते ती बंद झाली असती, नव्हे करायलाच लागली असती. उदाहरणार्थ, मी ईयत्ता चौथीत असल्यापासून ऐकतो आहे पेट्रोल संपणार लवकरच म्हणून, संपले का?
अ: ठीके. मी करत जाईन रोज बंद तुझा मॉनिटर
ब: माझ्या मॉनिटरला हात लावायचे काम नाही, मी करणार उर्जेची नासाडी. काय म्हणणे आहे - काहीही होणार नाहीये, वेळे येईल तेव्हा शास्त्रज्ञ योग्य ते शोध लावतील व सगळे सुरळीत होईल. किंवा असे शोध लागलेही असतील आत्ताच, अमेरीका/युरोप सांगत नाहीत जगाला. हायड्रोजनवर चालणारी कार ७० मधेच तयार होती, फोर्डने दाबले ते संशोधन.
अ: ए भाउ, अमेरीका, युरोप राहूदे, खेडोपाड्यात वीज नसते, त्याचातरी विचार कर.
ब: आपली कंपनी कुठे आहे देशी आहे? देउदेत की पैसे लाईटबिलाचे, इतके लोक थकवितात MSEB चे पैसे, आपल्या कंपनीकडून जरा जास्त जावूदेत. आणि खेडोपाड्याचे फंडे मला नको देवूस, मी खेड्यातलाच आहे. भारतातल्या समस्त सॉफ्ट्वेअर ईंजिनीयर्सनी असले टुकार मॉनिटर बंद करुन वीज वाचवली तर त्यामुळे एका गावात दिवसभरसुध्दा दिवे लागायचे नाहीत. असले काहीतरी सांगून तुम्ही लोक मूळ प्रश्नाकडे दूर्लक्ष करता. खेड्यातल्या वीजेचा प्रश्न सोडविण्यास जादा वीजनिर्मिती पाहिजे. १०० मेगावॅट गरज असताना, ४० मेगावॅट वीज निर्मिती करुन त्यात बचत करण्यापेक्षा, सरळ ११० मेगावॅट वीज निर्माण करणे योग्य.
अ: तू युस्लेस आहेस रे, देशाचे पैसे जातात सबसिडीवर.
ब: देशाचे पैसे कशावर जात नाहीत? शिवाय तुम्हा लोकांसारखे खोट्या बिलांची लफडी नाही करत मी टॅक्स भरताना. जोवर हे बेकायदेशीर नाही तोवर मला माझा मॉनिटर सुरु ठेवण्याचा नक्कीच अधिकार आहे.
अ: नशीब, म्हणजे कायदा झाला असा काही तर तो तरी पाळशील, का त्यावेळी काही नवे कारण?
ब: कायदा होउ नये म्हणून आंदोलन करीन, जीवाचे रान करीन. पण झालाच तर इमानेइतबारे पाळीन, तुम्हां लोकांपेक्षा जास्त कसोशीने पाळीन.
अ: मुद्दामून आडमुठी भूमिका घेतो आहेस यार तू. बाकी राहूदे, निसर्गासाठी तरी कर एवढे निदान.
ब: निसर्गाच्या पोटातूनच कोळसा, क्रूड ऑईल काढतो की आपण. निसर्ग स्वच्छ होतो. गंमत नाहीये, ज्वालामुखीमुळे प्रदूषण होतेच ना? निसर्ग स्वत: किडे करतोच की. राहता राहीला माणसाला होणारा प्रदूषणाचा त्रास तर you deserve it, you know, तुमची लायकीच ती आहे लेको. You know human species is the only species...
अ: साहेब बास्स, आता मानवजातीचा उद्धार नको, नका करु बंद मॉनिटर.
ब: नाहीच करणार मग.

विषय २: लघुकथा
बरेच दिवस एक लघुकथा लिहायची होती, लघु म्हणजे लघुच अगदी, ३-४ परिच्छेदात संपणारी. जमत नाही म्हणून काय झाले, प्रयत्न केले पाहिजेत हो माणसाने, ब्लॉग लिहायला काय पैसे पडतात का?
गोष्टीचे नाव: रघूचे पातेले - वरवर साधी वाटणारी पण लहान मुलांच्या निरागस भावविश्वाचे चित्रण करणारी छोटीशी अतिफालतू गोष्ट.
एका दुपारी(उन्हाळ्याची सुट्टी सुरु आहे) रघू घरी एकटाच असतो, त्याची आई भिशीला गेली असते. तेव्हा शेजारच्या काकू येतात(त्या भिशीत नसतात) आणि रघूला विरजणाला थेंबभर ताक* मागतात. रघू दानशूर आणि नको तिथे डोके चालविणारा. तो म्हणतो काकूंना, "हे छोटे भांडेच घ्या". काकूंना ते भांडे बघून वाटते की मागच्या वेळी आपण वाटली डाळ घालून दिलेले भांडे ते हेच. [रघूच्या आईच्या मते, वाटली डाळ दिलेले भांडे तिने गोळ्याच्या आमटीच्यावेळी परत केले आहे आधीच].
तीनचार दिवसांनंतर रघूची आई, काकूंकडे विरजणाचे भांडे परत मागायाला जाते तेव्हा काकू म्हणतात, "कुठलं भांड वहिनी? माझ्याच भांड्यातून विरजण घेउन गेले मी, म्हणला नाही का रघू?"
"रघू तर म्हणाला, आमच्या भांड्यातूनच दिले त्याने" - रघूची आई.
"हाहा, तुमचा रघू तसा वात्रटच आहे हां, गंमत केली असेल त्याने तुमची, लहान मुले आणि त्यांच्या थापा एकेक" - काकू.
रघूची आई विषय बदलते आणि भाजीमंडईचे काहीतरी बोलून परत जाते घरी. रघू खूप गोष्टीवेल्हाळ असतो आणि गोष्टी सांगायच्या नादात कधीकधी काहीही थापा मारत असतो. शिवाय "रघू ना आमचा. काहीतरी बोलतो, लहान मुले आणि त्यांच्या थापा एकेक" हे वाक्य रघूच्या आईने पूर्ण बिल्डिंगभर केले होते. यावेळी त्याने थाप मारली नाही हे तिला माहित असते त्यामुळे घरी गेल्यावर रघूच्या आईची जाम चिडचिड होते.
नंतर एकदा रघूचे आणि शेजारच्या पमीचे कडाक्याचे भांडण होते तेंव्हा रघू पमीची वेणी ओढतो. पमी हिसका देवून पळून जाते आणि जाताना ओरडते, "थापाड्या तो थापाड्या, आणि वर मुलींचे केस ओढतो". रघू चक्रावतोच. दोघांची दोन तीन तासांनी परत बट्टी झाल्यावर तो पमीला मगाशी थापाड्या का म्हणालीस ते विचारतो. मग त्याला कळते की काकूंनी भांडे परत दिलेच नाही, पण त्याला जास्त राग काकूंनी त्याला थापाड्या म्हंटल्याचा येतो. तो लक्षातच ठेवतो काकूंचे वागणे.
एक दिवस पेपरवाला पेपरचे बिल घ्यायला येतो तेव्हा पमीचे बाबा त्याला उद्या ये म्हणतात. पुढे पेपरवाला रघूच्या घरी येतो. तो येवून गेल्यावर रघू पमीला सांगतो की, "पेपरवाले काका म्हणाले की तुम्ही कधी वेळेवर पैसे देत नाही, पेपर मात्र रोज सहाला पाहिजे". हे कळाल्यावर पमीची आई पेपरवाल्याशी कडाक्याचे भांडते. थोड्या वेळाने काकू आणि पमीबरोबर गॅसचा नंबर लावायला जाताना रघू सांगतो की त्याने थाप मारली होती. पेपरवाले काका असे काही म्हणालेच नव्हते. मोठेपणी रघू पमीच्या धाकट्या बहिणीशी लव्ह मॅरेज करतो.
*विरजणाला दूध आणि ताक दोन्ही लागते परंतु ताक कमी लागते असे काहीतरी आहे, ताक चुकीचे असले तर - तर काय? चूक तर चूक पण शेवट ताक, दही, लोणी सगळे दूग्धजन्यच.
**निरागस भावविश्वाची कथा लिहीता लिहीता चुकून सूडकथाच झाली.

विषय ३: नाटक
पास.

विषय ४: भावनिक लेखन
मला बरेच दिवस झाले काहीतरी भावनिक लिहायचे आहे. इतके प्रामाणिकपणे भावनिक लिहायचे आहे की मी मगासच्या वाक्यात मला ‘सेंटी’ लिहायचे आहे असे नाही म्हणालो. आत्ता मागचे पोस्ट आठवले त्यात पण असेच मला भावनिक विचार करायचा होता पण जमले नाही. नातेसंबंधांवर नेहमी भावनिक सुचते लोकांना. मला नाही सुचले पण. मी विचार करायला लागलो तर मला खालील ओळी सुचल्या, ज्या कुठल्याही अँगलनी भावनिक निघाल्या नाहीत -
"मित्र निवडता येतात, नातेवाईक नाही. नातेवाईक निवडता आले असते तरी आम्ही निवडले नसते. नातेवाईकांचे ढोबळमानाने दोन प्रकार असतात - आईकडचे नातेवाईक आणि बाबांकडचे नातेवाईक. कधी कधी काहीतरी दूरदूरचे नाते लागून सामाईक नातेवाईकपण असतात. पण अशा सामाईक नातेवाईकांचेसुद्धा नकळत आईकडचे किंवा बाबांकडचे असे वर्गीकरण होते(दोन्हीबाजूच्या नात्यांच्या लांबीनुसार). लहानपणी नातेवाईकांना भेटायण्यासाठी सुट्ट्यांचा(Holidays holidays, चिल्लर नव्हे) वापर व्हायचा. माणूस जसे मोठे होतो तसतसे त्याच्यामागचे उपद्व्याप वाढत जातात आणि नात्यांची वीणपण क्षीण होते जाते"
नातेसंबंध कॅन्सल.
-
निवडुंगाच्या काट्यात अडकून राहीला होता तो पावसाचा थेंब एकटाच. सर ओसरुन गेली. ढग आपल्या वाटेने निघून गेले, पुढे कुठेतरी आपली काळी गोठडी रिकामे करतील, न करतील. सगळे थेंब जमिनीत जिरुन निर्माण झालेला मृद्‌गंधपण आता ओसरु लागला होता. एखाद्‌दुसरा झाडाच्या पानांवर रेंगाळणारा थेंबसुद्धा आता मातीच्या मायेला भुलून गेला होता. पूर्ण परिसरात एकच निवडुंग होते ते आणि त्याच्या अगणित काट्यांमधल्या एका काट्यावरचा तो एक थंब. तो काटाही इतरांसारखाच पांढरट टोकदार, विशेष काही फरक नाही. थेंबही इतर पावसाच्या थेंबांसारखाच पारदर्शक, सभोवतालचे प्रतिबिंब म्हणजे स्वत:चे अस्तित्व समजणारा. इतरांना टोचणारा तो काटा या थेंबासाठी मात्र नाजूक झोका होता. काट्यासाठी तो थेंब काय होता? कित्येक जलबिंदू त्याला ओलावून गेले. सगळे निरीच्छेनेच त्याच्यावर बरसले, "मलापण लांबरुंद पिंपळाच्या पानावरुन घसरून मातीत झेपावायला मिळाले असते तर, पण आमच्या नशिबी हा काटा" असे म्हणत म्हणत, कर्तव्य म्हणोन काट्याला ओले करत गेले. पण हा मात्र झोके घेतोय ! प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की, आईच्ची जय, काय रद्दडे. संपले भावनिक.

विषय ५: भाषांतर
भाषांतर म्हणजे एका भाषेची वाट लावतो ती पुरेशी न वाटल्याने अजून एक भाषा आपल्या सुमार बुद्धिमत्तेच्या दावणीला बांधायची.
मला Led Zepppelin चे टँजरीन गाणे भयानक आवडते त्याचा स्वैर अनुवाद टाकू आपण.



Measuring a summers day,

I only finds it slips away to grey,

The hours, they bring me pain.

*Tangerine, tangerine,

Living reflection from a dream;

I was her love, she was my queen,

And now a thousand years between.

Thinking how it used to be,

Does she still remember

times like these?

To think of us again?

And I do



ग्रीष्मातले रुक्ष दिवस
कंठण्यातला फोलपणा,
संथ क्षण अन्‌ स्तब्ध निमिषे
वेदनांची केवळ निमित्ते

टॅंजरीन, टॅंजरीन...
हळव्या गोड स्वप्नांचा,
छोटासाच कवडसा
पण आभास चेतनांचा

होती माझी स्वामिनी
अन्‌ मी तिचा श्वास,
आता अंतरलली मने
अन् आठवणी खग्रास

व्याकुळते का तीपण
त्या ग्रीष्मआठवणींनी ?
आठवतात का अजूनही
तिला माझ्या उ:श्वासछाया ?

**
विषय ६: दीर्घकथा
पास. दुसरा पास झाला हा. पास नावाची गोष्ट किवा नाटक लिहिले पाहिजे एकदा.

विषय ७: निरर्थकपणा
खरे तर वरील सर्व निरर्थकपणाच आहे त्यामुळे वेगळे लिहीण्यात काही पॉईंट नाही पण आता शीर्षक टाकलेच आहे तर लिही चार ओळी. समोर एक गाणे चालू आहे vh1वर. काही मनात येईल ते दाखवितात ईंग्लिश गाण्यांच्या व्हिडिओजमधे. एक माणूस रस्त्याकडेला उभा होता त्याने आकाशाकडे पाहिले आणि मग डायरेक्ट वाळवंटात जाउन नाचू गाउ लागला. काहीतरी अर्थ असेल म्हणा पण मला काही झेपला नाही. एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की, बाकी जवळजवळ सर्व धर्मात माणसाला पुरतात(मेल्यावर), पारश्यांच्यात विहिरीत टाकतात (का असे च काहीतरी). फक्त हिंदूंच्यातच जाळतात. परवा फार्मव्हिला खेळताना मला उत्तर सापडले - हिंदूंचा समाज पूर्वापारपासून कृषिप्रधान आहे, बाकीचे नव्हते एवढी शेती करत. आपल्याकडे पुरले आणि नंतर कोणीतरी नांगरताना घोळ झाला म्हणजे बसा. म्हणजे बाकीपण काही शास्त्रीय कारणे असतील पण हेसुद्धा असायला पाहिजे. इन्ग्लोरियस बास्टर्डस भन्नाट आहे, मला अचंबा वाटतो की माणसं दहा-दहा वर्ष विषय डोक्यात ठेवून सिनेमा बनवतात. मला गेले पाच वर्ष झाले पाचसहा जेनेरीक युटीलीटी प्रोग्रॅम्स लिहायचे आहेत, एका आठवड्याच्या वर नाही लागणार वेळ त्यांना, पण अजून मुहूर्त नाही लागला माझ्याच्याने. दरवेळेला काहीतरी नवीनच खुस्पट निघते, मधे मधे मी वेड्यासारखे सिनेमे बघायचो, मग नंतर फार्मव्हिलाचा नाद लागला आता परत सिनेमे. ओबामा टीव्हीवर काहीतरी बोलतो आहे. हा मनुष्य कशावरही सगळे माहित असल्यासारखे बोलतो राव. एक नंबर बोलबच्चन. उद्या त्याला कुणी विचारले -Sun चे UNIX Servers, आमच्या कंपनीने काढून त्याऐवजी HP चे घेतले हे योग्य वाटते का? तर तो दहापानी उत्तर दईल. बरेच जण असतात तसे, कशावरही मत व्यक्त करु शकतात. मीपण तसाच आहे म्हणा. २०१२ पिक्चरचे ट्रेलर पाहिल्यापासून मला दिवसरात्र जग खरेच संपले तर काय मज्जा येईल असे विचार येत आहेत. हॉलिवूडवालेपण लेकाचे मागेच लागले असतात, येनेकेनमार्गाने त्यांना संकट आणायचेच असते आणि काहीतरी भयंकर उपाय त्याच्यावर. उद्या एखादे असे मोठे संकट आले तर शास्त्रज्ञांकडे जाण्यापेक्षा सर्वप्रथम हॉलिवूडमधल्या दहा डायरेक्टरांना फोन लावावेत, भारी उपाय सापडतील. आत्ता असले काही सुचते आहे, तेव्हा फाटेल. बास करावे, बोर झाले.

***

Sunday, August 16, 2009

निरर्थक - Nth

हे फार भंगार आहे, ब्लॉगवर टाकू नये असे वाटले होते एकदा, पण आपल्याला काय?
*
जाताना/जायच्या(गावाला) आधी लिहायचं म्हणून हे निरर्थकच्या लायनीमधले नथ(nth) पोस्ट. यावेळीपण एअरपोर्टवर नोंदी लिहून ठेवतो, मागच्याखेपेला वेळ चांगला गेला होता. आज चौदा ऑगस्ट आहे, पाकचा स्वातंत्र्यदिन, उद्या आपला. लहानपणी शाळेत जिलबी द्यायचे. शाळा अव्वाच्या सव्वा फी वसूल करुन आपल्याला लुटते हे मनात ठसले असल्याने आम्ही दोन जिलब्या खायला चारेक तास तरी उन्हात उभे रहायचो. मी एकदा दायना दर्शक होतो परेडमधे, नक्की आठवत नाही काय करायचे असते ते, बहुतेक सगळी जनता सलाम ठोकताना पाहुण्यांकडे बघते, दायन्या दर्शकाने गपचूप समोर बघायचे असते, असे काहीतरी. एकुण शाळेतल्या आठवणी हा भागच भारी असतो, परवा आमचे सर्व रुममेट्‌सचे दुर्मिळ एकमत झाले की, बालपणीचा काळ सुखाचा वगैरे बोलण्याच्या गोष्टी असतात. आमच्यापैकी कुणालाही परत शाळेत जावेसे, ते दिवस परत यावेत etc. काही वाटत नाही. आत्ताचाच काळ सुखाचा आहे, लहानपणी साध्या साध्या गोष्टींची जाम टेन्शन्स असतात. छोट्या अडचणीसुध्दा प्रचंड मोठ्या वाटतात. शिवाय सतत काही ना काहीतरी लफडी चालू असतात, त्यात तो अभ्यास आणि गृहपाठ. आता कशाचेच काही वाटत नाही, सगळे बरे आहे, कामाचेपण टेन्शन नाही, आपोआप होते ते, अभ्यास नाही व्हायचा आपोआप. एकदा सर गृहपाठ तपासत होते, माझ्या शेजारी बसलेल्या हिरोने केला नव्हता.
सर म्हणाले, "का नाही केला?"
"सर, विसरलो, उद्या नक्की दाखवतो सर."
"विसरलो? असा कसा विसरलास? जेवायचे विसरतोस का?", असे म्हणून सरांनी दिली एक ठेवून त्याला. तेव्हाच मला हे उत्तर सुचले होते की, "जेवायला भूक लागते सर, अभ्यासाची भूक नाही लागत." असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते त्याने, एवीतेवी मार खायचाच होता, जास्त खावा लागला असता पण. टाईममशिन मधून जावून एकदा असे सगळे बोलून आले पाहिजे. एक सर बळंच, वर्गात काही संबंध नसताना मी मूर्तिपूजक नाही वगैरे सांगत सुटायचे, त्यांच्या घरी बाहेरच्या खोलीत भिंतीवर असंख्य देवदेवतांचे फोटो लावले होते, मला नेहमी म्हणावेसे वाटायचे, सर मग सगळे फोटो काढून टाका की भिंतीवरचे. चांगले असतात तसे शिक्षक पण त्यांना काहीतरी विचित्र काव्यशास्त्रविनोद करुन मुलांची खेचण्यात प्रचंड मजा वाटते. काही लोक तर वर्गात हाणून गप नाही बसायचे, घरच्यांनापण सांगणार नंतर. म्हणजे घरी परत ओरडा खावा.
तसा मी बऱ्यापैकी उलट बोलायचो. एकदा मात्र बाबा खूश झाले होते माझ्या उलट बोलण्यावर. उन्हाळ्याची सुट्टी सुरु होती आणि शनिवारी मी बाबांच्या बँकेत गेलो होतो, काहीतरी स्वत:हून आपले खाते उघडा त्यात दहा रुपये टाका वगैरे आईचे विचार इंप्लिमेंट करायला. बँक छोटीच होती, मी पटापट खाते उघडून, लोकांकडून फुकटचे कौतुक करुन घेत बसलो होतो. अगदी सगळेच काही कौतुक करायचे नाहीत. बँकेत एकजण होते, ते नेहमी लहान पोरांना पकडून एक कोडे घालायचे - "१ किलो कापूस आणि १ किलो लोखंड यात कशाचे वजन जास्त?" मुलं आपली लोखंड लोखंड म्हणायची, मग ते समजावून सांगायचे आणि हसायचे सातमजली. मी नंतर एकाला हे सांगितले होते, मग तो पूर्वतयारी करुन गेला होता - बरोबर उत्तर देउन आलाच शिवाय वजन आणि वस्तुमान असले काहीतरे फंडे देउन आला तो त्यांना.
तर मूळ कथा, उन्हाळ्याच्या सुट्टीत मी बँकेत गेलो होतो तिथे एक सर आले आमचे, पैसे काढले त्यांनी बँकेतून, मोजले दोनदा. मग त्यांना मी दिसलो. काउंटरच्या आतल्या बाजूला माझे चालू असलेले कौतुक बघवले नसावे त्यांना. बाहेरून मला म्हणाले, इकडे ये रे. मी गेलो तर म्हणाले, "हे पैसे मोजून सांग बरोबर हजार आहेत का?" आता काय संबंध? एकतर हे महाराज इतिहास शिकवायचे, शिवाय शाळेला सुट्टी. मी न मोजताच म्हणालो, "सर, २ नोटा कमी आहेत". आणि बँकेतली जनता प्रचंड हसली. सर पुढे काहीतरी थातुरमातुर म्हणाले पण पोपट झाला होताच. नंतर एकदा बाबा म्हणाले, का रे असं का म्हणालास? मी म्हणालो, मला आत्ता काय गरज होती असे पैसे मोजायचे काम सांगायची? शाळा सुरु नाहीये ना, आम्ही जातो का सुट्टीत त्यांना काही शंका विचारायला. बाबा लय खूश झाले होते उत्तरावर, पण मला म्हणाले, पुढच्या वर्षी हाणणार लेका तुला हे सर. मला मोजून तीन चार शिक्षक आवडले असतील आजतागायत, चिपळूणच्या देवधर बाई. ह्या बाईपण उन्हाळ्याच्या सुट्टीत भेटल्या होत्या बँकेत, त्यांनी वरील सरांप्रमाणे आगाउपणा केला नाही, त्या म्हणाल्या, वा सुट्टीत बाबांना मदत करतोस वाटतं?[बाबांना हा आगाउपणा वाटला का ते विचारायला हवे]. मग त्यांनी मला खाउला आठाणे दिले आणि म्हणाल्या, उन्हातान्हाचे खेळत जावू नका, सावलीत खेळा.
एक वाईट शिक्षक झाले की दुसरे चांगले, पोलिटीकली करेक्ट रहायची सवय लागलीय. आमचा न्हावी कायम पोलिटीकली करेक्ट असतो, भारताविषयी काही बोलायचे असले तरी तो आधी दहा स्पष्टिकरणे देणार, Not that it's bad or anything, but you guys eat a lot of spicy food. बळंच नॉट दॅट बॅड वगैरे.
हल्ली शाळेत मारत नाहीत म्हणे, एक छोटा मुलगा होता, भारतात गेलो होतो तेव्हा भेटला होता. मी कुणाकडे काहीतरी निरोप द्यायला गेलो होतो, ते येईपर्यँत वाट बघत बसावे लागले. हे ध्यान एकटंच होतं. लहान मुलांना तसा मी घाबरुनच असतो, उगाच चार लोकात शोभा करतात, विचित्र काहीतरी बोलून. सगळ्या भिंती निरखून, शोपीस पारखून झाल्यावर मी त्याला विचारले, "मारतात का रे शाळेत तुला?". तर म्हणाला नाही. मी विचारले मराठी मिडीयमला नाहीस का, तर म्हणाला, मराठी माध्यामाच्या शाळेतच जातो. आश्चर्यच वाटले. करावं लागायचे आमच्या वेळच्या शिक्षकांनापण. ते तरी काय करणार, पोरं असली मंद. मनात म्हणत सुध्दा असतील ते, "Its only business, nothing personal" वगैरे. काहीही बरळत आहे मी.
परवा मला भारी जोक सुचला. पुलंच्या नावावर खपवला असता मी तर सुपरफेमसच झाला असता.
जोक -
मराठीचा सहामाही पेपर सुरु आहे, निबंधाला एकच विषय यावेळी, चार ऑप्शन्स नाहीत. हां तर विषय होता, "मी पंतप्रधान झालो तर". मी उत्तर लिहीले - "सिलॅबसबाहेरचा प्रश्न आहे, मी मराठी आहे".
मी ज्यांना ज्यांना सांगितला त्यातले पन्नास टक्के लोकच हसले. गडद विनोद (dark humour) ची जाण नाही हो, दुसरं काय?
शाळा हा विषय भारी आहे पण, माझा निबंध एकदा वर्गात वाचून दाखवला होता. तेवढं एकच यश शालेय जीवनातले. रीपीटेशन - एकूण बालपणीचा काळ सुखाचा वगैरे नसतो, मोठेपणी बरे असते, मनाला यील ते करा, हवे तेवढे सिनेमे बघा, हवा तो टीपी करा, कामाचे पण विशेष काही नाही नंतर नंतर ते आपोआप स्वत:हूनच होते.
*
गेले २-३ मिनिटं मी शाळेविषयी भावनिक विचार करायचा प्रयत्न करत होतो, पण जमेचना. समोर एक बाळ बसले आहे. भारी आहे हा मुलगा, त्याने स्वत:साठी एवढ्या लहान वयातच खेळ शोधला आहे. स्वत:चीच लाळ मुद्दामून ओठातून बाहेर काढायची आणि आता पडणार म्हणल्यावर खालचा ओठ दुमडून ती गिळायचा प्रयत्न करायचा. आणि जमल्यावर खिदळायचे. हुशार आहे राव. असले काय काय एअरपोर्टवरचे लिहायला लागला माणूस म्हणजे संपलच. मला आजकाल असे वाटते आहे की हल्ली मला गाण्यातले थोडे थोडे कळायला लागले आहे. म्हणजे मला एखादे रेडिओवरचे गाणे आवडले आणि मी घरी येउन ते शोधून पाहीले की बरेचदा प्रसिध्द निघते. कदाचित रेडिओवर सगळी प्रसिध्द गाणीच लावत असतील. असो.
शाळा, सरलोक, बाईलोक यांचा विषय डोक्यातून जातच नाहीये. ईचलकरंजीला तीन शाळा होत्या गंगामाई, गोविदराव आणि व्यंकटराव अशा नावाच्या. ही तिघं राजघराण्यातली भावंड होती असे मला नेहमी वाटायचं, खरंखोटं देव जाणे. बॅटरी मरत आली.
**
मगाशी भावनिक विचार करायचा प्रयत्न केला, आत्ता आत्ता काहीतरी सुचायला लागले.
बॅटरी संपली म्हणून डोक्यात विचार यायचे थोडेच थांबणारेत. शाळा संपली म्हणून शिक्षण थोडीच थांबते. कुणी लिहीले नाही म्हणून शब्द...काही जमत नाही पुढे.
***