Tuesday, July 10, 2018

चिडचीड


प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही कायम थीम्स असतात असे माझे मत आहे. आणि ते योग्यच आहे. पुस्तकात किंवा सिनेमात असतात तशा. (एखाद्या समीक्षकाने सांगितल्याशिवाय आपल्यासारख्याला कळत नाहीत त्या - त्याग, सूड, रिडेंम्प्शन वगैरे)
माझ्या आयुष्यातील थीम खालीलप्रमाणे - 
१. आळस/कंटाळा.
२. आळस करूनही बर्‍यापैकी यशस्वी होणे.
३. झोप पूर्ण न होणे.
४. विनाकारण, अनोळखी लोकांनी मदत करणे.
५. कारण नसताना एखाद्या गोष्टीचे क्रेडिट मिळणे.
६. लहानांकडून पाणउतारा, मोठ्यांकडून कौतुक.
७. काय अध्यातमध्यात नसताना उगाच मार बसणे.
८. मला दुसरेच कोणीतरी समजणे.


गेले अनेक वर्ष मला अनोळखी लोक दुसरं कोणीतरी समजतात आणि माझ्याशी बोलायला येतात (किंवा बघून पळून जातात.) दुसरं कोणीतरी म्हणजे, दुसरं कोणीतरी अनोळखीच, अगदी डॉपलगँगर नव्हे. उदा. रिक्षावाला, केळेवाला, गार्ड, वेटर, मॅनेजर वगैरे - विविध वर्गातली विविध माणसे.  मला आजतागायत राग आला नाहिये - सवयीने नाही, पहिल्यापासूनच आला नाही, पण तेव्हा बरोबर असलेल्या कुटुंबियांना मात्र कधीकधी राग येतो अशा वेळेला. मला कालतागायत राग आला नव्हता असे म्हणले पाहिजे खरेतर. काल पहिल्यांदा आला आणि मी भांडलोपण बर्‍यापैकी - हेन्स द पोस्ट.
शिवाय माझ्या डोक्यात आले की, आपल्याला कायकाय समजले आहेत लोकं पूर्वी ते नोंदवून ठेवले पाहिजे आपण.

प्रसंग एक: घाणेरडी चित्रं काढणारा मुलगा.
नवीन शाळेत गेल्यावर पहिल्या दिवशी, वर्गशिक्षिका बाईंनी एक काहितरी कागद सुपरवायजर सरांना द्यायला सांगितलं, तास सुरू असतानाच. आपल्याला काय गेलो - त्यांना आत येवू का सर, असे विचारले तर ते स्वत:च खुर्चीतून उठले. वा, काय भारी शाळा आहे, मुलं आल्यावर सरच उभे राहत आहेत, अशी सुखद भावना मनात येण्याअगोदरच सरांनी वीजेच्या वेगाने हालचाली केल्या (काळा पहाड वगैरे संकटातून सुटायला करतो तशा), आणि माझी कॉलर धरून मला कानाखाली खणखणीत ठेवून दिली - "असले धंदे करायला आईवडील शाळेत पाठवतात का? ऑं? अंगठे धरून उभा रहा इथे दोन तास आणि उद्या पालकांना घेवून ये" असे गरजले. मी हातातला कागद पुढे करून घाबरत म्हणालो - पण मला या या बाईंनी पाठवले आहे, मी मुद्दामून तासातून बाहेर नाही आलो. त्यांनी कागद वाचल्यावर त्यांची चर्याच बदलली. एकदम - अरे माफ कर हं मला, मी तुला दुसराच मुलगा समजलो. असे म्हणाले, कागद घेतला आणि मग जा परत म्हणाले. नंतर मला कळाले की, एक मुलगा तास सुरू असताना घाणेरडी चित्रं (सपोजेडली नागड्या बायका) काढत होता, त्याला सरांनी बोलावले होते, तेव्हा नेमका मी गेलो.

प्रसंग दोन: टिव्हीचा अँटिना लावणारा प्रोफेशनल माणूस.
एक माणूस मी व दुसरे माझे बाबा. एकदा गच्चीवर अँटिना लावताना खिडकीतून एका बाईने विचारले, किती घेता हो अँटिना बसवायचे? बाबा म्हणाले, चहा आणि एक डिश, काहीतरी पोहेउप्पीट. तरी त्या काकूंना कळाले नाही त्या म्हणाल्या - अहो पण पैसे किती, पैसे? मग त्यांना सांगितले, आमचा आम्हीच लावत आहोत. तर त्या आयुष्यभर अपोलेजेटीक होत्या बिचार्‍या. लाजेने खाल्लेली बाई म्हणतात ती हीच. (त्यांचा अँटिना पण बसवला आम्ही, पण काकूंना वाईट वाटायचे काही थांबले नाही.)

प्रसंग तीन: रिक्षावाला
अकरावी-बारावीत असताना चालतचालत घरी येत होतो तेव्हा, बहिणीशी काहितरी बारीक मारामारी सुरू असताना, तिचा फटका बसू नये म्हणून मी पटकन पळत एका कडेला गेलो. तिथे एक रिक्षा उभी होती त्यात मागे बसून खेळणारी मुलं अचानक "अरे, काका आले, काका आले" म्हणत पळाले. बहिणीचा फटका परवडला असता एवढं चिडवलं नंतर तिनं मला.

प्रसंग चार: केळे/चप्पल/गरे/कपडे वाला
हे कॉमन आहे. जनरल बरोबरची लोकं हळू चालतात, त्यामुळे मी पुढे जावून केळाच्या, चपलेच्या किंवा जो काही माल आहे त्याच्या हातगाडीवर हात ठेवून उभे राह्यलो तर लोकं भाव विचारतात. माहीत असला तर मी प्रामाणिकपणे भाव सांगतोही. केळ्याचे काय, गेले अनेक दिवस चाळीस रुपये डझन आहेत.

प्रसंग पाच: बॅंकेचा माणूस
अगदी नुकतंच झालं हे. एका आजोबांना हात थरथरतोय म्हणून बॅंकेत स्लीप लिहून देत होतो. तर त्यांच्यामागे दोनजण रांगेत उभे राहिले, दोन मिनीटांनी एक जण म्हणाला - ओ आटपा की लवकर, कामं आहेत पुढं आम्हाला, एका माणासालाच एवढा वेळ लावला तर कसं व्हायचं? त्यांना समजावून सांगितल्यावर त्यांनी सॉरी म्हणले, पण आजोबा पेटले, त्या मनुष्याला लय झापला त्यांनी.

प्रसंग सहा: बिग बझार मधील कर्मचारी
एक लक्षात ठेवा मुलांनो - बिग बझारमधे कधी गेलात तर, लाल-निळ्या चेक्सचा शर्ट आणि निळी जीन्स घालून जावू नका.

प्रसंग सात: कॉलेजमधला मुलगा
परवा शहाळं आणायला गेलो - एक कॉलेज आहे, त्याच्यासमोर शहाळेवाला बसतो. एक कुठलीशी परिक्षा होती आणि परिक्षेच्छुक विद्यार्थ्यांची छान रांग लावली होती, बंदोबस्ताला पोलीस होते. शहाळेवाल्यापाशी रांग कट झाली होते, मी शहाळेवाल्याला ऑर्डर देवून गपचूप उभा आहे तर पोलीसकाका एक दांडू मारून म्हणले, ए नीट उभा राहा लायनीत, असा काय आडवा-तिडवा? मी शहाळं घेतोय म्हणालो तर म्हणाले - खरंच का?

असे अनेकविध प्रसंग आहेत, बरेचसे विनोदी (माझ्या मते). ९०% लोकांना नंतर फार वाईट वाटते, आपण एखाद्याचा उपमर्द केला वगैरे वाटते. मला छान वाटतं, दिवसभर बोलायला एखादा विषय मिळतो. 
मधे एकदा मी भाजीची पिशवी घेवून लिफ्टमधे आलो तेव्हा एक कपल लिफ्टमधे होते. मी पटकन घरी गेलो, गाडीत काहीतरी विसरले म्हणून परत पळत गेलो, हातात पिशवी तशीच. लिफ्ट आली तर तेच कपल परत खाली चालले होते. माझ्या हातात तशीच भाजीची पिशवी बघू त्या मुलीला वाटले मी घरपोच ताज्या भाज्यांची डिलीव्हरी देतो, ती म्हणाली - कुठ्ल्या साईटसाठी काम करता हो?

रविवारचा प्रसंग हा माझ्या आयुष्यातला पहिला असा प्रसंग आहे की, मला अशावेळी राग आला.

प्रसंग आठवा: भाजीवाला
रविवारी मंडईत गेलो होतो. (हे थोडे मिसॉजिनीस्ट होणारे पण पर्याय नाही.) मला एकतर मंडईत जायची क्रेझ वगैरे नाहिये, भाज्या बघून खूप उल्हासानंद वगैरे होत नाही. एक कर्तव्य म्हणून मी मंडईत जातो. कर्मण्येटाईप मला फळाची अपेक्षापण नसते, पण घरच्यांच्यामते फळं आरोग्यासाठी गरजेची आहेत. एकतर माझ्यासारखी बरीच लोकं पटापटा भाज्या घेवून सुटत असतात. थोडीफार जोडपीच चिकित्सा करत घासाघीस करतात, पण तेपण पट्पट. काहीच सॅंपल आधुनिक पोरपोरी येतात आणि उच्छाद मांडतात अक्षरश:.
या लोकांने ओळखणे अतीसोपे आहे - शॉर्टबिर्ट तर हल्ली सगळेच घालतात, ही मुलं/मुली सगळी कामे अल्ट्राहळू करतात - आठवड्याभराची सगळी चर्चा तिथेच, भाजी घेताना - ऐसा करेंगे, कल टिंडी करते है, अरे कल दिदी नही आनेवाली, ठीक है, कल के लिये गोबी लेते है. हे सगळं भेंडीवाल्यासमोर उभी राहून बोलण्यात काय पॉईंट आहे? या जनतेच्या पिशव्या पण भाजीच्या पिशव्या नसतात, अडनिड्या कसल्या तरी पिशव्या. जाळीच्या पिशवीत कोणी कधी गवार किंवा भेंडी घेतं का? 
या लोकांना भाजी आणणे म्हणजे गंमत वाटते, खाऊ वाटतो खावूवू. बुशी डॅमला जावू, मुळशीला जावू तसे भाजी आणायला येतात वीकेंड इव्हेंट म्हणून. 
भाजी आणणे हे खूप रिस्की काम आहे, कसली एकेक शास्त्रं - आखूडशिंगी, बहुगुणी, दुधाळ भाजी लागते. जास्त जून नाही, जास्त कोवळी नाही, अशी भाजी बघा. त्या अळूच्या देठाचा रंग बघा (अळूच्या असे लिहिल्यावर आळूच्या आईच्चा असाच पुढचा शब्द आला होता मनात खरेतर), लिंब हात लावून अगदी मऊ/कडक नाहीत ना हे बघा, केळाचे देठ जास्त हिरवे नकोत, पालेभाजीची पाने बघा, कुणाची मोठी असायला पाहिजेत, कुणाची छोटी, त्यात एखादी भाजी जास्त हाताळली तर भाजीवाले कावणार. सांगितलेले सगळे आणायचेच, वर प्रोॲक्टिव्हली, स्वत:हून एखादी चांगली काही दिसली तर आणायची असते. एखादवेळेला सगळे जमून आले तर, घरी गेल्या गेल्या मुलांची मनं डायव्हर्ट करायला लागतात - नाहीतर, पिशवीत डोकावून, बाबा शेंगा नाही मिळाल्या, कणीस नव्हतं का, असले निरागभोचक प्रश्न विचारतात. केवढं प्रेशर असतं.
बरं हे सगळं असुदे, सगळ्याना नाही पटणार, ज्यांना टाईमपास करत सच्छिद्र पिशवीत भाजी घ्यायचीय त्यांनी घावी, मला का त्रास देता? मला त्रास दिला त्यामुळे मला हे एवढं लिहावं लागत आहेत.

मी नेहमीप्रमाणे पटापट एफिशियंटली भाजी घेत होतो. एफिशियंटली भाजी घेणे म्हणजे सोप्पे अल्गो आहे- 
१. आधी गेल्या गेल्या काही घ्यायचे नाही.
२. पूर्ण मंडईभर फेरफटका मारायचा, जनरल कुठे काय चांगले आहे ते बघायचे, भाव आपोआप कळताच.
३. नंतर एकेक घेत सुटायचे - पारंपारीक क्रमानुसार, आधी कांदे, खाली कडक, वर मऊ भाजी वगैरे.

तर मी तोंडली घ्यायला गेलो तर, अचानक मला व एका सद्गृहस्थाला ढकलून दोन पोरी पुढे आल्या. मी जावूदे म्हणालो, म्हणजे खरच जावू दे, पुढे. 
त्या निघाल्या स्लोमोशनमुली. स्लोमोशन मुली म्हणजे - सिनेमात मुलींच्या ज्या दिलखेचकटाईप अदा स्लो मोशनमधे दाखवतात त्या सारख्या सारख्या खर्‍या आयुष्यात करणार्‍या मुली. (उदा. ओढणी सारखी इकडून तिकडे करणे, क्लच काढून केस मोकळे/एकत्र वॉटेवर करणे अपेक्षित आहे ते करुन, तो परत लावणे)

या दोन मुलींपैकी एकीने आधी समोर उभे राहून मग, कैसे दिया भैया असे विचारून असले केस नीट करणे वगैरे बिनभाजीचे उद्योग सुरू केले. भाजीवाला पण ओरडला, कितना लेना मॅडम जल्दी बोलो. हां भय्या रुको ना, असे हेल काढून म्हणूत तिथे यांची चर्चा - कितना ले? लास्ट टाईम कितने लोग थे हम, तू यही पे रहती थी क्या उसटाईम? नही श्रुती के साथ रहती थी, है ना? 
हे सर्व चालू असेतो मी आपला मिळालेल्या कोपर्‍यात भाजीवाल्याशेजारीच उभा राहिलो होतो, भाजीवाल्याकडे पाटी एकच, ती या मैत्रिणींनी घेतलीली, तो बिचारा, दादा दोन मिनीट हं म्हणून गिर्‍हाईकाची काळजी घेत होता.

शेवट या मुलींचा निर्णय झाला, पिशवी किती पुढे करावी याचा पत्ता नाही, त्यामुळे निम्मीअर्धी तोंडली खाली पडली. त्यातली थोरली खेकसली - क्या भय्या, आपको सब्जी देनाभी नही आता. भय्या म्हणाले, मॅडम सुबहसे हजार लोगोको दिया, किसीका नही गिरा, तुमको लेना नही आता.
त्यावर ही देवी माझ्याकडे बघून ओरडली - "अरे, देख क्या रहे हो, उठाओ नीचेसे ओर भरो ना मेरे थैलीमे".
मला लक्षात आले की, मी भाजीवाल्याशेजारी उभा असल्याने तिचा गैरसमज झाला आहे की मीपण भाजीवाल्याचा सहकारी आहे. मी शांतपणे म्हणालो - मै कस्टमर हूं, आपका हुवा तो पाटी देदो, मुझे खरीदना है.
आजातागायत भेटलेले सगळे, यापॉईंटला मला - "सॉरी चुकून आपल्याला xyz समजलो" असे म्हणाले आहेत. 
पण यांच्यातली धाकटी म्हणाली - "कस्टमर है तो क्या हुआ, हेल्प करो"
मी म्हणालो - "आप करो ना, आपकी फ्रेंड है ना"
तर तिने असा काही लूक दिला की, मी आणि चिखलात हात घालू? एव्हाना भाजीवले काका वैतागले आणि त्यांनीच ती सगळी खालची तोंडली जमा केली, तर ही बाई म्हणे, बदलून द्या, खाली पडलेली  नकोत.

पुढे बरेच रामायण झाले, ते लिहायला मला आता बोर झाले आहे. शेवट भाजीवाल्यानी त्यांना रागावून कटवले, आणि मला फायनली तोंडली मिळाली. जाताना पोरींनी मला रागीट लूक दिले.

एकूण लोकं नीट वागत नाहीत राव, हल्ली. 

***

No comments: