Tuesday, March 24, 2009

हिरवळ

मुद्दा अतिशय गंभीर आहे. समाजाच्या सर्व थरातील लोकांना भेडसावणारा हा एक ज्वलंत सामाजिक आणि रासायनिक प्रश्न आहे. पण सामान्य लोकांमधे ‘हा एक महत्वाचा प्रश्न आहे ऍन्ड इट्स रिअली भेडसविंग अस’ अशी जाणीवच निर्माण झाली नाहिये मूळी.
मी ती करुन देणारे आज - आस्क नॉट वॉट समाज कॅन डू फॉर यु, आस्क वॉट यु कॅन डू फॉर समाज.

मुद्दा असा आहे की, आज बऱ्याचश्या बागांमधे हिरवळीवर बसू देत नाहीत. हिरवळीवर बसू नये, हिरवळीवर चेंडू खेळू नये अशा पाट्या लावल्या असतात आणि आमच्यासारखी जनता अशा बागांमधे तिकिट काढून जाते.
ह्याला काय अर्थ आहे? बागेत हिरवळीवर नाही बसायचे तर कुठे बसायचे? हिरवळीवरुन नाही पळायचे तर कशावरुन पळायचे?

हिरवळ खराब होते म्हणजे काय? रस्ते, छत्र्या, चपला काहीच वापरु नयेत मग. बाकड्यांवरच बसायचे असले तर आम्ही बस स्टँडवर जाउन बसु, शाळेत अजुन एक वर्ष नापास होउ.
नुसती छान हिरवळ बघुन काय करायचे आहे? ऍनिमल प्लॅनेट लावून घरी बघू हवी तेवढी.
हिरवळीवर कॅच कॅच खेळायचे नाही तर काय सिमेंटच्या रस्त्यांवर खेळायचे, आं?

आम्ही जास्त काही बोलणार नाही, आमचे काम झाले आहे. पुढचा विचार व कृती करणे समाजाच्या हातात आहे. पण लहानपणापासूनच सगळ्यांचा विचार करायची वृत्ती असल्याने सर्वसमावेशक असा उपाय पण सांगून ठेवतो -

बागेत असा एक भाग ठेवावा जिथे क्वालिटी हिरवळ असेल आणि तिला फक्त बघत बसावे लोकांनी.
दुसरा युजेबल भाग ठेवा जिथे आमच्यासारखे मनसोक्त धावतील, लोळतील, कोलांट्याउड्या खातील, एरवी घरी सोडतो ते झेल डाय(डाईव्ह) मारुन घेतील.
आत्ताच पैजेवर सांगतो, आमच्या भागात जास्त जनता असेल - एक दिवसपण आमच्या भागाचे पाप्युलेसन कमी असले तर...तर दुसऱ्या दिवशी जाउन शेपूट सरळ करुन यीन हां.
*
आज अचानक आठवायचे कारण म्हणजे उद्यानविषयक बडबड सुरु होती आणि ऑफिसमधल्या लोकांशी चर्चा करताना जाणवले की लोकांना याचे काहीच वाटत नाही, सगळ्या जणांनी गृहितच धरले आहे की हिरवळीवर बसायचे नसते. तेव्हा मी जनजागरण करायचे ठरवले आणि तडक इथे आलो. तडकफडक येताना एक शेरपण सुचला -

अगर कुचलते भी है हम,
तो कुचलते है अफसोससे

अरे ये चंद सिक्कोवाले बागबॉं क्या जाने
अरे ये चंद सिक्कोवाले बागबॉं क्या जाने

शगुफ्त है हरियाली,
मासूम मुस्कुराहटोंसे

फाजलीसाब की जय !
***

Tuesday, March 17, 2009

ह्या माणसांना भेटायचे आहे

०. "नारुचा रोगी कळवा, १०० रुपये मिळवा" या योजने अंतर्गत १०० रुपये मिळालेत असा मनुष्य. - लय उत्सुकता आहे मला अशा माणसाला बघायची

. ‘साजणा, दिवाणाअसले शब्द मराठी कविता/गाण्यात पहिल्यांदा वापरणारी व्यक्ती - कितीही मोठ्ठा कवी/कवयित्री असो, असले शब्द वापरण्याचा बावळटपणा का केला हे विचारायचे आहे मला.

. "क्या हुआ तेरा वादा" या गाण्यात नायिकेला जाब विचारणारी लहान मुलगी. कुणी हे गाणे पाहिले नसले तर मरण्याआधी एकदा तरी पहा - .३५ ते .४३ या वेळेत ही मुलगी दर्शन देते. काय तो आवेश, काय ती जाब मागण्याची पध्दत - तिला काही विचारायचे नाही मला, पाया पडायचे आहे फक्त.

. ‘ऑपरेशन डायमंड रॅकेटया कन्नड पिक्चरमधे संपूर्ण ईंग्लिश गाणे टाकणारे गीतकार, गायक

"If you come today, it's too early
If you come tomorrow, it too late,
You pick the time, tick tick tick..."

काय ते गाण्याचे बोल, काय तो ऍक्सेंट वा !
***

Sunday, March 15, 2009

लीजंड ऑफ द सीकर

हे लिहिण्यात खरेतर काही पॉईंट नाहीये पण लिहीतो आता मनात आहे तर.

शनि/रवीला दुपारी "लीजंड ऑफ सीकर" नावाची एक ईंग्लिश मालिका लागते. ही सीरियल म्हणजे गोऱ्या लोकांनी काढलेली चंद्रकांता. आपला हिरो ना एक लाकूडतोड्या असतो, पण थोड्याच वेळात कळते की हा एक हजारो वर्षातून एकदाच जन्मणारा असा "सीकर" आहे ! तो आणि त्याच्याबरोबर असलेली अनाथ राजकन्या मिळून एका दूष्ट जादूगराला मारायच्या मिशनवर असतात. दर एपिसोडला दोघेपण कुत्र्यागत मार खातात आणि एपिसोड संपता संपता संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग वापरून कसेतरी सटकतात.

जेव्हापण म्हणून मी ही मालिका बघायला लागतो तेव्हा हिरोचा एखादा किसींग सीन सुरु असतो. आणि दर वेळेला राजकन्या सोडून नवीन कोणतरी पोरगी आणि नवीनच पार्श्वभूमी - एकतर तो मालिकेतल्या प्रत्येक मुलीला बाय डिफॉल्ट आवडतो. कधी दुष्ट चेटकीण त्याच्यावर जादू करते आणि सुरु, कधी जादूगाराची एखादी लेडी सैनिक त्याला बांधून ठेवते - एवढ्या हजार वर्षातून एकदा जलमलेल्या शत्रूला बांधल्यावर एखादी बाई पटकन - कानाखाली लावून घेईल किनई पण नाही ह्या बाईपण सुरु. हे सगळे सोडले तर लहानपणीची मैत्रिण वगैरे आहेच अडिनडीला. हाईट म्हणजे कोणीही सजीव आजूबाजूला नसेल तर हा लाकूडतोड्या तलवार, अंगठी, माळ अशा गोष्टींचे चुंबन घेतो. सलग मिनिटे ही मालिका पाहिली आणि त्या मिनिटात एकही किसिंग सीन नाही निघाला तर हे प्रचंड दुर्मिळ आहे असे समजावे. कर्वे पुतळा ते डेक्कन जाताना एकाही सिग्नलला लाल दिव्याला थांबायला लागणे एवढी दुर्मिळ आहे ही घटना. "लिजंड ऑफ किसर" :)
***

Saturday, March 14, 2009

महाश्वेता

कसा मी रोज सकाळी उठून अर्ध्या झोपेत धडपडत धडपडत बेसिनपाशी जायचो आणि पालीला बघुन दचकायचो. नंतर आपली रोजची पालच आहे ते बघुन कसा सुखावायचो वगैर वगैरे सगळे आठवून दाटून कंठ आला
एवढी आठवण आली की मग कविता करण्याशिवाय पर्याय नव्हता.

*किळसवाण्या सहित्यप्रकाराची ज्यांना किळस आहे त्यांनी कृपया वाचू नका

महाश्वेता

ओसरला हा संधिप्रकाश,
दिनकरास करकच्च रजनीपाश
झाल्या शुभंकरोत्या,
अन्‌ आटोपली स्तोत्रे

लावल्या खिडक्या
आपटली दारे,
घाबरल्या ताई, माई, अक्का
अन्‌ हादरले बाळूचे पप्पा,

फटीतून घुसले
भिंतीवर बसले,
चिलट म्हणावे का डास?
बघून त्या गट्ट्या बाळूस
पिपासूने बेत बनवला खास

अहा, ते गोबरे गाल
होतील कसे लाल
चावण्यास कडकडून
सर्वसज्ज हा डास

पण...

कडाडल्या वीजा
थरारली धरणी

चक्क चक्क चक्क चक्क,
आवाज भिंतीवरून
चक्क चक्क चक्क चक्क,
आवाज ट्यूबमागून

शक्ती ही दैवी कोणी
घोर ही रणरागिणी
रोखुन शीत हरितनेत्र
फुलवुनी लिबलिबीत गात्र
अवतरली ही महाश्वेता

पांढरीफट्ट, पांढरीफट्ट
रोवूनि पाय घट्ट
आली एक सुपाल

लांबवून जिव्हा चपळाईने
क्षणार्धातच हा घेतला घास,
पालोदरी विसावला पापी डास
पालोदरी विसावला पापी डास
*
यडपट कसा हा बाळू
मंद म्हणावे का द्वाड
पसरून भोकाड
म्हणतो आईगं, आईगं
आली पाल,
आली पाल
***

पालीचे एक चित्र काढायचा विचार होता, पण विचारनेच कसेतरी झाले, यक्क्क्क
*

Thursday, March 12, 2009

केऑस

छिद्रान्वेषी वृत्तीने, प्रत्येक चांगल्या सॉफ्टवेअरमधे काहीतरी छोटीशी चूक दाखवून तिचे भांडवल करणे आणि आख्खे सॉफ्टवेअर कसे मंद आहे हे लोकांना सांगणे हा माझा आवडता टाईमपास आहे.
आज दुपारच्या डाराडूरप्रहरी एका मीटिंगसाठी गेलो तेव्हा रुममधे आधी बसलेल्या लोकांनी फळ्यावर एक सुबक आणि गुंतागुंतीची एक मोठी आर्किटेक्चर डायग्रॅम काढली होती. एकापण रंगाचा मार्कर सोडला नव्हता, लाल, हिरवे, निळे झाडून सगळ्या रंगाच्या रेषा काढल्या होत्या एकडून तिकडे.

एवढे मन लावून कुणी आकृती काढावी अन्‌ आम्ही लोकांनी तिचे विश्लेषण न करता स्वार्थीपणाने डायरेक्ट स्वत:ची मीटिंग सुरु करावी म्हणजे त्या फळ्यावरच्या सोल्यूशनचाच केवढा मोठ्ठाआआ अपमान आहे.

हे म्हणजे कौरवांनी दूरूनच मयसभा बघुन असे म्हणण्यासारखे आहे -
"वा, वा, छान बर कां युधिष्ठिरा, चांगलीच बांधली आहे खोली आपल्या मयाने - पण आत काही येत नाही आता, दिवसाउजेडी हस्तिनापूरी पोचलेले बरे"
"हो ना रात्रीचे हे नवं घोडं जरा बिचकतंय"
"राहिलो असतो रे, पण संध्याकाळी परतायचे म्हणून दुधाचे भांडे बाहेर ठेवले आहे, गवळी दूध घालून जायचा आणि उगाच वाया जायचे शेरभर दूध"
आयला हे असले संवाद संपायचे नाहीत.

तर मुद्दा असा की, आम्ही सर्वांनी आपल्या मीटिंगच्या आधी त्या रंगीबेरंगी आकृतीचे विश्लेषण करायचे ठरविले. बहुसंख्य लोकांनी एकूण सोल्युशनची प्रचंड प्रशंसा केली. पण ज्या मीटिंगमधे मला बोलवत नाहीत त्यात काही दर्जेदार काम होत नाही असा माझा ठाम विश्वास असल्याने मी त्यातल्या छोट्या छोट्या चुका निर्भयपणे जगजाहीर केल्या - प्रवाहाविरुध्द वगैरे जावून.
लोक मला आता जाम पकले असावेत, एक जण म्हणाला "असं कर मग, हे सगळे फळ्यावरचे पूस आणि तुला हवेत ते बदल करुन नवीन आकृती काढ".
This was total आणि 100% breach of निंदानालस्ती act. आमच्या साहेबांना हे पक्केच माहित आहे आणि माझी अपेक्षा होती की त्यांनी झाला तो फालतूपणा पुरे, आपल्या कामाला लागू असे म्हणावे. पण नाय, त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्यांनी सांगितल्यावर करावेच लागले.

एकुण नवीन चित्रपण रंगीबेरंगी आणि चांगले गुंतागुंतीचे होते, पण पब्लिकने माझेच काही मुद्दे सोयिस्कररीत्या वापरले आणि माझे हसे केले. मग आमच्या साहेबांनी "हे प्रभो ह्याला क्षमा कर..." च्या नजरेने माझ्याकडे पाहिले आणि डायलॉग मारला -
"Any big system is a chaos, one way or other way"

ते चित्र, लोकांचे माझ्याकडे बघुन हसणे आणि सायबांचा डायलॉग, पिक्चरमधे दाखवतात तसे हे सर्व माझ्या मनात घुमत,आदळत राहिले, chaos...chaos...chaos

आताशा मी स्वत:ला लय भारी कवी समजायला लागलो आहे त्यामुळे

Black, Green, blue, red
I can see, each feasible shade
And there're many more
zealously cutting each other

That board used to be white
before they held that brutal fight
Yes, there still are some white blocks
just to tell, this is a fresh chaos
*
च्यायला काय भंकसगिरी आहे, कसली पोस्टस आहेत ह्या ब्लॉगमधे, मी असे केले, मला असे वाटते, मी यांव आहे, माझे चित्र बघा...किती ते स्वत:चेच कौतुक आणि आत्मकेंद्रीत वृत्ती...शाहरुख परवडला हो.
***

Monday, March 9, 2009

गॅलोज पोल, दंडस्तंभ, शूलक

आयुष्य, जीवन वगैरे शब्दांनी सुरुवात झाली की कसे एकदम सेंटी सेंटी आणि जोडीला गंभीर असे वातावरण होते. [ज्यात लिहितो आहे ते नोटपॅड ऍप्लिकेशन इतर वेळेला पेंगत असते, हे शब्द वाचले की ते एकदम हात-पाय तोंड धुवुन, ताठ उठुन बसते]
आयुष्यात प्रत्येकाची शक्य/अशक्य स्वप्न असतात. माझ्या एका मित्राचे स्वप्न त्याच्या शब्दात सांगायचे म्हणले तर -
"यार ये दुनिया के सातो वंडर देखने है लाईफ में एक बार, और हर वंडर के यहा सात दिन रहना है", इथे संपले असते तर बरे झाले असते..."हर वंडर के यहां उस देश की एक लडकी पटानी/* है"...अशा स्वरुपाचे स्वप्न आहे. पैशाचे म्हणाल तर जमवेल तो, बाकी काही नाय जमायचे, बोलाची कढी.

माझे स्वप्न आहे की रोमानिया मधे काउंट ड्रॅक्युलाच्या महालाच्या गच्चीवर बसुन, नाही महालाला गच्ची बरे नाही वाटत. काउंट ड्रॅक्युलाच्या महालाच्या गवाक्षात बसुन चहाचा घोट घेत घेत लेड झेपलीनचे "गॅलोज पोल" (Gallows Pole) गाणे ऐकावे. [माझी स्वप्नं काय मित्रासारखी क्षणिक सुखाची असणारेत का :) ]

असाच शनिवारी दुपारी, लेड झेपलीन-३ ऐकत बसलो होतो आणि गॅलोज पोल सुरु झाले.

"Hangman, hangman, hold it a little while, I Think I see my friends coming, riding many mile".

प्रचंड सुंदर गाणे आहे हे. एका युरोपिअन लोकगीतावर आधारीत आहे आणि तिलिस्मी टाईप - एकदम मध्ययुगात नेते. तेव्हा युरोपात लोकाना फाशी द्यायला जो खांब आणि एकुण आजुबाजुची जी रचना असायची त्याला गॅलोज पोल म्हणायचे. आणि प्रथा अशी होती की, त्या फाशी देणाऱ्याला जर काही लाच दिली तर गुन्हेगाराला सोडुन द्यायचा तो - परत गावात/राज्यात फिरकायचे नाही या बोलीवर.
एका स्त्रीला फाशी देत आहेत आणि ती सुटकेसाठी मित्र, बहिण यांच्या मदतीने याचना करते आहे अशी एकुण गाण्याची थीम आहे.

गाणे ऐकताना, मी मनातल्या मनात मराठीत भाषांतर करत होतो आणि Hangman ला योग्य असा शब्दच आठवेना. जो केवळ त्याचे काम आहे म्हणून फाशी देतो - "public executioner" त्याला काय म्हणतात मराठीत?
खूप माहितीचा शब्द आहे पण आठवत नाहिये असे झाले होते/आहे - हिंदी/उर्दूत जल्लाद, संस्कृत मधे वधक. मराठीत जे चांडाळ, डोंब, कसाई, खाटिक हे जे शब्द आहेत ते फिट्ट बसत नाहीत. मला आठवतोय तो - न आठवणारा शब्द वेगळा.
पन्नास एक मराठी/संस्कृत शब्दकोष डाउनलोड केले तरी मिळाला नाही राव.
भारतात पूर्वी काय काय व्यवसाय होते त्यांची नावे पाहिली दोनअडीच तास नेटवर, त्यातपणा डोंब/डोम, जल्लाद असेच आले.
शेवटचा उपाय म्हणून आईला फोन केला - वूमन्स डेला पहाटे तीन वाजता आईला उठवून पब्लिक एक्झ्युक्युशनरला मराठीत काय म्हणतात हे विचारले. मला म्हणाली, आठवत नाही लगेच, नंतर आठवले तरीपण आता सांगणार नाही. संभाषण संपंण्याआधी एक महान सल्ला दिला की मुद्राराक्षस नाटकाच्या शेवटच्या अंकात चंदनदास, त्याचा मुलगा आणि त्याला त्याला फाशी देणाऱ्यांच्यात एक संवाद आहे. ते नाटक मिळते का बघ नेटवर, त्यात असेल कदाचित तुला हवा असलेला शब्द.
म्हणजे तीन वाजता प्राचीन नाटकातले चंदन का फंदनदासचे संवाद आठवू शकतात आणि मूळ विचारलेला एक साधा शब्द आठवू नये !

असो पण गुगलने माझ्यासारख्या अडल्यानडल्यांसाठी प्राचीन साहित्य आपले शिक्के मारुन स्कॅन करुन ठवले आहे (उद्या पब्लिकला वाटायचे विशाखादत्त गुगलमधे टेक्निकल रायटर होता)
रडतरडत मुद्राराक्षस वाचायचा प्रयत्न केला तर चार एक तासांनी त्यात दोन शब्द मिळाले - चांडाळ आणि शूलयतन: नुसता शेवट वाचायचा म्हणले तरी एवढा वेळा लागला, वर पाहिजे तो शब्द मिळालाच नाही.

आतापावेतो मी नाद सोडला राव. च्यायला हा शब्द म्हण्जे काय ऍप डीबीचा पासवर्ड आहे का की नसला म्हणजे आम्हाला एकपणा क्वेरी मारता येउ नये. काय शब्दांचा राजा लागून गेल्लाक्का?

मीच एक नवीन शब्द काढला आहे आता - शूलक.

शूलक शब्दाचा दुसरा काय अर्थ असेल तर आय डोन्ट केयर बाबा. इटस रिकली व्हेरी सिंपल, यु सी:
*दुसरा एखादा अर्थ असला तर - इट वील हॅव वन मोअर मिनींग - वॉट बेटर कॅन हॅपन इन धिस पूअर वर्डज अनहॅपनिंग लाईफ - मोरोव्हर वॉट वर्स कॅन हॅपन इन इटस ओपोसिट वर्डस लाईफ
*त्याला मूळातच काही अर्थ नसेल तर - इट कान्ट रिअली कम्प्लेन अबाउट एनीथिंग, इव्हन अबाउट इटस मिनींग हं - नोबडी कॅन नो वॉट यु वॉंट, व्हेन यु डोन्ट एव्हन एक्झिस्ट.
ही ही हा हा, गंडला बिचारा.

शूलक म्हणजे "Public executioner"
शूलक म्हणजे "Hangman"
शूलक म्हणजे जल्लाआआआद.

शूलकाला आता वापरले पाहिजे.
बिनाघोडे का भाई और बिनकविताका शब्द इन दोनोंको मार्केटमे कोई अहमियत नही देता.

खालील मराठी गाणे/कविता "Gallows Pole" चा स्वैर भावानुवाद आहे. लेड झेपलीन म्हणतात त्या - गीताचे बोल
(लोकगीतात बदल करुन त्यांनी गीत शोकांत केले आहे - गाणे नाय गीत, वा, मी कवी मूडमधे जात आहे आता)

मूळ गाणे मध्ययुगीन लोकगीत असल्याने अनुवाद पण जुनाट वाटावा म्हणून अधेमधे संस्कृत शब्द पेरतो [ तसा २-३ संस्कृत नाटकांचा अभ्यास आहे माझा उदा. मुद्राराक्षस ]

मूळ गाण्यात प्रौढ विषय आणि सूचक संदर्भ असल्याने अठरा वर्षांखालील लोकांनी कृपया वाचू नये. [खरोखरची व मनापसून सूचना आहे]

सुमार दर्जाच्या कविता/गाणी सहन न होणाऱ्या प्रौढ लोकांनी, दोन्ही हातांनी डोळे गच्च बंद करुन, दोन बोटांच्या फटीमधून अनुवाद वाचावा.

***


गॅलोज पोल - दंडस्तंभ

शूलका, क्रूर शूलका,
थांब एक घटिका,
बघ दूरवर, क्षितीजासमीप
मज भासे तो सखा माझा,
हो माझा प्रियकच, धावितसे शतयोजने,

रे कांता,
काय तू आणलेस मजसाठी?
मला तारण्यास,
दंडस्तंभ खंड्ण्यास?

वैभव नाही माझ्यापाशी,
नाहीत रत्न अन्मोती,
निर्धन मी हा प्रेमी,
दंडस्तंभी प्रेमदाह ज्याच्या दैवी

नको रे शूलका
क्रूर शूलका,
थांब एक घटिका,
बघ दूरवर, क्षितीजासमीप
मज भासे तो सहोदर माझा,
हो माझा अनुजच, धावितसे शतयोजने,

रे अनुजा,
काय तू आणलेस मजसाठी?
मला तारण्यास,
दंडस्तंभ खंड्ण्यास?

रौप्यमुद्रा अन्दशनिष्के,
आणले मी अल्पस्वल्प,
तुला तारण्यास,
गं अत्तिके,
दंडस्तंभ खंड्ण्यास

धस्स्स...हे शूलका,
काय हे केलेस?

क्रूर शूलका,
थांब एक घटिका,
बघ दूरवर, क्षितीजासमीप
मज भासे ती सहोदर माझी,
हो माझी अनुजाच, धावितसे शतयोजने,

अनुजे माझ्यासाठी,
हो विषयरत ह्याच्यासंगे,
रममाण कर ह्या शूलका
पातक मी याचते तुला,

शूलका, अरे अधमा,
कर त्वरा
खंडूनी ह्या दंडस्तंभा
आता करी बंधमुक्त मला,

प्रसन्न मी एक शूलक
भाग्य जयाचे उजळले
द्रव्य बहु लाभले,
अप्सरेने सर्वांग शमविले,
तृप्त केले विरुप शूलका

किंतु अबले,
गं दीन अबले,
विपरीत तुज अपेक्षा
करुणा कोठे नृशंसा

संपल्या आता घटिका
एकच माझा बलप्रहार
दंडस्तंभी देह निष्प्राण
अन्शिर तुझे दूरवर

आसमंतात नाद माझा
हर्षोल्हास अन्उत्सव माझा
हर्षोल्हास अन्उत्सव,
हर्षोल्हास अन्उत्सव...
*

आयला, निबंध म्हणून पण खपेल. भाषांतर करायला विचारायला लागते राव मूळ कवीला, पण हे लोकगीत आहे की त्यामुळे चालते.
काय लांबड लागली ह्या पोस्टमधे

***

Monday, March 2, 2009

डाकू मंगलसिंग

दुष्ट दिसणाऱ्या माणसांची चित्रे काढायला फार आवडते मला - हा पहा डाकू मंगलसिंग. मंगलसिंग कधी डाकूचे नाव असू शकेल का, कुणी वापरले असेल हे पहिल्यांदा?



माझ्या पेन्सिलमधली लेड/लीड जे काय असते - बारकुळे शिसे ते संपल्याने पूर्ण नाही होउ शकले चित्र . खूप प्रॉब्लेम झालेत त्यामुळे - दाढी दाट नाही आली, त्याच्या चेहऱ्यावर दुष्ट्पणा पूर्ण उतरला नाहीये, बंदूक अशी बिनापट्ट्याची आहे, डायरेक्ट पाठीवर मागे लोंबकळत [ एका हाताने त्याने ती पाठीमागे धरली आहे असे समजावे] नेव्हर्दलेस्स तो पूर्ण दुष्ट डाकू आहे, त्याच्या चेहऱ्यावर जावू नका, क्रूर आहे तो - शंका नसावी.

ऍक्च्युअली मंगूला लहानपणापासूनच बंदूक अशी एका हाताने पाठीमागे धरायची सवय आहे. त्यामुळेच लोक त्याला "मंग्या रे मंग्या, एका हाताला मुंग्या" असे चिडवतात. जन्मतःच लाईट-हार्टेड व्यक्तिमत्व असल्याने मंगल ते हसण्यावारी नेतो - पण चिडवणारा डाकू/पोलिस असेल तरच हां.
एकदा एका सामान्य पण आगाव माणसाने, आगाव म्हणजे बिल्लू बार्बर मधले बिल्लूटाईप एखादे आगाव कॅरॅक्टर असते ना, अशा माणसाने त्याला चिडवले होते - तेव्हा मंग्याने त्याला ऑल्मोस्ट ठोकलाच होता, पण तो माणूस टिंगलसिंगचा बालमित्र निघाला म्हणून वाचला यडा.
***