Sunday, April 24, 2016

वाहतूकविषयक चार युक्तीच्या गोष्टी

माणसाने आयुष्यात, "कोणास ठावूक कसा" गाण्यातल्या सशासारखे असावे, एकदम चोख आणि फोकस्ड. त्याला कोरडे कौतुक नको आहे, रोकडा मंगताय. गुरुजी शाब्बास म्हणाले तर म्हणाला, ते असुदे, पास करा.  विदूषकाला चहा मागितला, शाबासकी वगैरे राहूदे. तसंच पान मागितलं दिग्दर्शकाकडे. असं पाहिजे. आजकाल ते Be like Bob वगैरे येतं ना फेसबुकवर तसं Be like Sasa. लहानपणीच किती महत्त्वाची गोष्ट शिकवायचा प्रयत्न केला आहे. या गाण्याचे महत्त्व आपल्या देशवासीयांना पटले तर डोक्यावर घेवून नाचतील या सशाला. डावे सगळीकडे सभा आयोजित करुन सांगतील, कसा exploited आहे बघा हा ससा आणि आता तो जागा झालाय. उजवेपण सांगतील, मग, अमेरीकेन युनिव्हर्सिटीमधे सशावर एक धडा आहे मॅनेजमेंटकोर्समधे. असो. आपल्याला ससा चिकार आवडतो, आपण त्याचा फ्लेक्सबोर्ड लावायलाही तयार आहे.

लेखाचे शीर्षक वेगळेच आहे, या सगळ्याचा वाहतूक विषयाशी काही संबंध नाही. पण या सशाविषयी बरेच वर्ष लिहायचे होते मला. गोष्टी, बालगीतं भारी असतात यार, "मामाची बायको सुगरणं, रोज, रोज पोळी आणि शिकरणं", मामीची कसली घेतलीयं ना, भारी. रामदासांच्या शिष्याचीपण अशीच एक गोष्ट आहे. भोला बहुतेक. रामदासांनी गावाला जाताना त्याला आश्रमाची जबाबदारी सोपवली, हेच केरफरशा, पूजा-नैवेद्य etc. एकनाथांटाईप त्यानेपण देवाला साक्षात जेवायला लावले समोर बसवून, पण सगळ्यात भारी म्हणजे ३-४ दिवसांनी त्याने सगळ्यांना कामाला लावले. (आम्हाला ढोबळमानाने गोष्ट अशी सांगण्यात आली आहे, मूळ वेगळी असू शकते, लगेच अतिचिकित्सा नको). सीतेला म्हणाला, माई, मी बोर झालोय सगळी कामं एकट्यानेच करून. आजपासून तू स्वयंपाकाचं बघ. काय मीठमिरची, सामान लागेल ते राम आणेल. लक्ष्मणा तू खालून पाणी आण, हनुमान जळणाला लाकडे आणेल. खल्लास. लोकं म्हणतात बघा कशी भक्ति, निरागसपणा वगैरे वगैरे. ते नेहमीचं आहे, भक्त उदंड झालेत. पण तो कसा एकदम फ्लॅट हायरारकीवाला आहे बघा ना, आपल्याला काय पाहिजे ते बोलून दाखविल्याशिवाय कसं कळणार? देवाला कशाला कामं सांगाबिंगा, देव किती मोठा, असा काही विचार नाही. मी ४ दिवस काम केलं, आता तुम्ही करा. देव म्हणून काही स्पेशल डिस्कांउट नाही. मग. जनता सांगते मुलांची चौकसबुद्धी वाढली पाहिजे, असा मोकळेपणा असल्याशिवाय वाढेल का? एकदम खबरदार टाच मारुनी जाल पुढेसारखं.
टोल्किनला वॉल्ट डिस्ने आवडायचा नाही, तो फेअरी टेल्स oversimplify करायचा, गोष्टींचे शेवट बदलायचा, अशाटाईप टोल्किनचं म्हणंणं होतं. स्वत: टोल्किनची काही पात्रं तशीच आहेत, तो भाग निराळा. त्याला मराठी बालगीतं आवडली असती कदाचित. दुकानदार आणि डॉक्टरलोकांना तुफान टॅक्स लावायला पाहिजे, काही भरत नाहीत लेकाचे.

आजचा विषय, वाहतूक. सिनेमात हिस्टेरीक झालेल्याला कसा थोबाडीत मारुन, दोन तीनदा नाव पुकारून शुद्धीवर आणतात तसे केले पाहिजे मला.
एंटर
एंटर
एंटर
एंटर
विसरा सगळं वरचं.

ज्ञान वाटल्याने वाढत असल्याने मी आज वाहतूक या विषयावर चार शब्द लिहिण्याचा कटू निर्णय घेतला आहे. वाहतूक हा विषय अतिशय जटील झाला आहे. एकदम गंभीर.

प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे आमचे:
इच्छितस्थळी, लवकरात लवकर आणि सुखरुप पोचणे. (आणि आपुल्यामुळे* कुणाला काही इजा हौ नये याची काळजी घेणे.)
वाहतूकीचे काही रुढ नियम आहेत, आपण ते बरेचदा पाळतो, बरेचदा नाही पाळत, काही हेल्मेटसारखे नियम तर पाळणं अपेक्षितंच नाहीये. हे सर्व नियम पाळून, गाडी जास्त जोरात न चालवता लवकर कसे जायचे याविषयी मी सर्वांना चार युक्तीच्या गोष्टी सांगणार आहे.
खालील सर्व टाईमपाससाठी लिहीण्यात येत आहे, ते वाचून व त्यानुसार कुणी वाहन चालवणे अपेक्षित नाही. स्वत: बेकायदेशीर कृत्य करु नका अथवा दुसर्‍या व्यक्तीसही करण्यास भाग पाडू नका.

१. कायम हेल्मेट घालूनच बाहेर पडावे - पोलीस हेल्मेटवाल्यांना शक्यतो पकडत नाहीत. गेल्या अनेक वर्षाच्या निरीक्षणावर आधारीत मत आहे हे माझे. शेजारुन लायसेन्स चेक करायला गेले तरी स्कीप मारतात हेल्मेटवाल्याला. पोलीसांनी अडवले नाही की लवकर पोचणारंच ना.

२. टेलिंग – मुद्दामून टेलगेटींग म्हणले नाहीये. आयुष्यातले महत्त्वाचे तत्त्व म्हणजे, जेवढे होईल तेवढे काम दुसर्‍यावर ढकलणे. जबाबदार्‍यांचे विकेंद्रीकरण. तेच इथेपण लागू. गाडी चालवताना कायम अटेंन्शनमधे असले पाहिजे. सगळी इंद्रीयं सज्ज. नजर सगळीकडे, कुठला सिग्नल बदलला, पुढे कुठे कोणी पडला का, एखादी इंच जागा झालीय का पुढ सरकायला, वगैरे वगैरे. कानाने सगळे आवाज टिपावेत, कधी कधी, सिग्नल पडत नाही पण पोलिस शिट्टी मारुन पुढे जायला सांगतात, कोण कुठे वळणार असलं तर कळतं. कोण कपल्स - इकडून नाही तिकडून, मागच्यावेळी असेच अडकलेलो असे काहीबाही बोलत असली तर लक्ष ठेवावे, शक्यतो, त्यांच्या लेनमधून मग बाहेर पडावे लागते. कानात बकुळीच्या कळ्यांसारखे पांढरे हेडफोन घातलेले कुठेही लवकर पोचत नाहीत. पोचलेच तर त्यांनी येताना रीस्क घेतली आहे, ३-४ जणांना कट मारले आहेत असे समजावे. नाकपण तयार असुदेत, वाटेत कुठे पेट्रोलबिट्रोल सांडले असले तर लगेच कळ्ळे पाहिजे. एकूणात गरीबांचा शेरलॉक बनून गाडी चालावावी. अशा सगळ्यातूनच आपल्याला मग सब्जेक्ट सापडतो, ज्याचे आपण टेलींग करायचे आहे. असा हुशार, कार्यकर्ता/र्ती जो खूप कौशल्याने, नियम पाळत, जास्त लोड न घेता, एकदम सपासप योग्यरितीने लेन बदलत, असा अकिलीससारखा पुढे निघाला आहे. तोच आपला सब्जेक्ट. (सावज शब्द दरवेळेला टाळतो आहे मी). तुम्हाला वाटेल, ह्ह्या, असं कोण सापडेल का. तर हो, चिक्कार असतात असे. लय टॅलेंट आहे आपुल्या देशात. एकदा सब्जेक्ट सापडला की शांतपणे त्याच्या मागे मागे जावे. बास. चारचाकीवाल्यांनी अजून एक खबरदारी घ्यावी की शक्यतो ड्रायव्हर उंचावर बसला असेल असा सब्जेक्ट शोधावा. त्यांना खूप दूरचं दिसतं त्यानुसार ते योग्य लेन पकडतात. त्यामुळेच बरेचदा, ट्रक, मिनीटेंपोवाले, मारुती काय नॅनोलापण मागे टाकतात. आता एक मात्र आहे, जोपर्यंत आपल्याल सब्जेक्ट सापडत नाही तोपर्यंत आपुल्या अंगीचे सर्व कौशल्य पणाला लावून आपल्याला गाडी चालवणे भाग आहे. याच कालावधीत आपणच कुणाचेतरी सब्जेक्ट होऊन बसू शकतो, हरकत नाही, जीवो जीवस्य जीवनं ।
एकमेकाला सहकार्य तर केलेच पाहिजे. सगळ्यांना अपेक्षित असलेली एकता देशवासीय केवळ ट्रॅफिकमधेच दाखवतात. एखादा बिनसिग्नलचा चौक भर ट्रॅफिकमधे क्रॉस करायचा असेल तर बघा. सगळे लोक, जातधर्मआयुसंपत्तिलिंगप्रांतभाषापक्ष निरपेक्ष होऊन, न सांगता एकत्र येतात, आणि एक भिंत बनवून, हळूहळू इंचइंच पुढे सरकत रस्ता ओलांडतात. पुढचे ३० सेकंद केवळ त्यांच बाजूची वाहने रस्ता ओलांडतात. मला लय इमोशनल व्हायला होतं अशावेळी. एकच ध्येय. एकदम क्रांतीवीरमधला, बता इस्मेंसे हिंदू का खून कौनसा, और मुसलमान का कौनसा ओरडणारा नाना पाटेकरच आठवतो.
असो, मूळ मुद्दा काय चांगला सब्जेक्ट शोधा आणि टेलींग करा त्याचे. (ऍम्ब्युलन्स वगैरेच्या मागे जायचे असला काही आचरटपणा करु नका.)

३. खड्डे-बिड्डे वगैरे – रोजचा जायचा यायचा रस्ता तोंडपाठ पाहिजे. अनेकदा खड्डा लहानच असतो पण तो चुकविण्याच्या नादात मनुष्याचा अपघात होतो. तेव्हा परिस्थिती बघून निर्णय घ्या. यातलाच अजून एक प्रकार म्हणजे कुत्रंमांजरी मधे येणे. कुत्र्यांचं एक वैशिष्ट्य सांगूने ठेवतो. त्यांना गाडीचा धक्का लागल्यावर ते तिथल्या तिथं आंदोलनाला बसतात, आणि एकदम जीभबिभ बाहेर काढून, आपल्याला वाटावं मेलं, पुढचा अर्धा तास तसेच म्लान अवस्थेत असतात, पण नंतर टुणटुणीत. त्यामुळे अशा बाबी जास्त मनाला लावूने घेवू नयेत. लागतो एखादवेळेला धक्का. मांजर छोट्टंसं असतं कधी मधे आल्याच अनुभव नाही मला. (किंवा कधी मधे आलं असेलं तर कळालं नाही बुवा).

४. भांडणे, शिव्या वगैरे – तुम्हाला कुठेही जायला उशीर व्हायचे मेज्जर कारण म्हणजे भांडणे. जाता येताना लोकांचे कट लागणार, आपलं काही पटलं नाही तर लोकं शिव्या देणार. सगळं गौतम बुद्धासारखं स्थितप्रज्ञ राहून शक्यतो सहन करा. आपुली चूक असेल तर एवढा केविलवाणा चेहरा करा की बासंच. लगेच सॉरी सरबिर म्हणून टाकायचं. हे अवघड आहे हे, पण सरावाने जमेल. नंतर मनातल्या मनात सगळ्या शिव्या द्या. मी पूर्वी सिग्नल मोडणार्‍यांना खूप शिव्या द्यायचो, पण नंतर लक्षात आलं, २ प्रकार आहेत. एक चुकून मोडणारे आणि दुसर्‍यांना सिग्नल पाळायचा असतो हे माहीतच नसतं. दोघांवरही ओरडून काही उपयोग नाही.

५. बाकी सर्व – मला आता बोर झालायं खरंतर, अजुन तीनचार गोष्टी आहेत, सगळं मीच का सांगू, तुमचं तुम्ही शोधून काढा. शातं चित्तानं वाहतूक एंजॉय करायचा प्रयत्न करा, मगे तुम्हाला पुढेपुढे भारी वाटायला लागेल. ट्रॅफीकमधे मिळतं तेवढं ज्ञान कुठे मिळत नाही. (कदाचित मुंबईवाले लगेच लोकलमधे सगळ्यात जास्त ज्ञान मिळतं म्हणतील. इतर शहरवासीयांनो, आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही बसमधून लटकत, दारातून वगैरे कधी नियमित गेला असाल तर लोकलमधे चढणं अजिबात अवघड नाहीये, मुंबईच्या जनतेने लोकल, गर्दी याला उगाच कल्टरुप दिले आहे. पुण्यातली लोकं पुण्यात बाईक चालवणं किती अवघड आहे वगैरे सांगतात तसाच प्रकार. काही नसतं तसं.)
एकदा मी बसस्टॉपवर उभा होतो तेव्हा तिथे एक मनुष्य बहुधा मित्राची वाट पाहून भयानक फ्रस्ट झाला असावा. पंधरा एक मिनीटांनी जेव्हा तो मित्र अवतरला तेव्हा याने काय प्रश्न विचारावा. “तू माणसांत मोडतोस का ?” माणूस असला तरच पुढंच बोलण्यात हाशील आहे. कसला बेसिक प्रश्न. मला एकदम १९८४ मधला विन्स्टन स्मिथच आठवला.

*
"आपुल्या" कधी म्हणावे व "आपल्या" कधी म्हणावे ? तुम्हीपण माझ्यासारखे चौकसबुद्धीचे असाल तर तुम्हालापण हा प्रश्न कधी ना कधी पडलाच असेल. आमुच्यापरीने आम्ही यावर उत्तर शोधले आहे. एकदम निरागस, सात्त्विक, परोपकारी, इनोसंट असे भाव प्रकट करायचे असतील तर, आपुल्या म्हणावे अन्यथा आपल्या. उदाहरणार्थ इथे आपुल्या बापुड्यामुळे कुणाचा अपघात नको व्हायला बाबा, असे सांगायचे आहे, कर्ता एकदम शामळू, पापभिरु, एके हंगल वाटला पाहीजे म्हणून आपुल्या.

12 comments:

Meghana Bhuskute said...

वेलकम बॅक. सविस्तर होलसेल कमेंट नंतर.

Meghana Bhuskute said...

वेलकम बॅक. होलसेल कमेंट मागाहून.

Saee said...

Welcome back. Sahi ahe lekh. Sasa mala pan awadto.

काळा सरदार said...

यो यॉडा भाई!!

Manjiri said...

भारी! Welcome Back!

Yawning Dog said...

Thanks for the warm welcome Meghana, Saee, Kala Sardar And Manjiri :)
Not sure if I'll continue regularly though.

Vidya Bhutkar said...

Aare wah....barech divasani, varshani lekh. :) Welcome back.As usual, mast lihile ahe. Always looking forward to your writing. :)

Vidya.

Nil Arte said...

Haha thats what I call "method in madness"

I want to smoke/drink whatever u were smoking/drinking when u wrote this gem :)

Rajat Joshi said...

मस्तच!

सर्किट said...

yO.DO. bhai, mastach.. bahuut saalonke baad. Was missing your knowledge gems. :-)

सर्किट said...

yO.DO. bhai, mastach.. bahuut saalonke baad. Was missing your knowledge gems. :-)

Yawning Dog said...

Thanks Circuit, yes, after long time in deed :)