Monday, March 9, 2009

गॅलोज पोल, दंडस्तंभ, शूलक

आयुष्य, जीवन वगैरे शब्दांनी सुरुवात झाली की कसे एकदम सेंटी सेंटी आणि जोडीला गंभीर असे वातावरण होते. [ज्यात लिहितो आहे ते नोटपॅड ऍप्लिकेशन इतर वेळेला पेंगत असते, हे शब्द वाचले की ते एकदम हात-पाय तोंड धुवुन, ताठ उठुन बसते]
आयुष्यात प्रत्येकाची शक्य/अशक्य स्वप्न असतात. माझ्या एका मित्राचे स्वप्न त्याच्या शब्दात सांगायचे म्हणले तर -
"यार ये दुनिया के सातो वंडर देखने है लाईफ में एक बार, और हर वंडर के यहा सात दिन रहना है", इथे संपले असते तर बरे झाले असते..."हर वंडर के यहां उस देश की एक लडकी पटानी/* है"...अशा स्वरुपाचे स्वप्न आहे. पैशाचे म्हणाल तर जमवेल तो, बाकी काही नाय जमायचे, बोलाची कढी.

माझे स्वप्न आहे की रोमानिया मधे काउंट ड्रॅक्युलाच्या महालाच्या गच्चीवर बसुन, नाही महालाला गच्ची बरे नाही वाटत. काउंट ड्रॅक्युलाच्या महालाच्या गवाक्षात बसुन चहाचा घोट घेत घेत लेड झेपलीनचे "गॅलोज पोल" (Gallows Pole) गाणे ऐकावे. [माझी स्वप्नं काय मित्रासारखी क्षणिक सुखाची असणारेत का :) ]

असाच शनिवारी दुपारी, लेड झेपलीन-३ ऐकत बसलो होतो आणि गॅलोज पोल सुरु झाले.

"Hangman, hangman, hold it a little while, I Think I see my friends coming, riding many mile".

प्रचंड सुंदर गाणे आहे हे. एका युरोपिअन लोकगीतावर आधारीत आहे आणि तिलिस्मी टाईप - एकदम मध्ययुगात नेते. तेव्हा युरोपात लोकाना फाशी द्यायला जो खांब आणि एकुण आजुबाजुची जी रचना असायची त्याला गॅलोज पोल म्हणायचे. आणि प्रथा अशी होती की, त्या फाशी देणाऱ्याला जर काही लाच दिली तर गुन्हेगाराला सोडुन द्यायचा तो - परत गावात/राज्यात फिरकायचे नाही या बोलीवर.
एका स्त्रीला फाशी देत आहेत आणि ती सुटकेसाठी मित्र, बहिण यांच्या मदतीने याचना करते आहे अशी एकुण गाण्याची थीम आहे.

गाणे ऐकताना, मी मनातल्या मनात मराठीत भाषांतर करत होतो आणि Hangman ला योग्य असा शब्दच आठवेना. जो केवळ त्याचे काम आहे म्हणून फाशी देतो - "public executioner" त्याला काय म्हणतात मराठीत?
खूप माहितीचा शब्द आहे पण आठवत नाहिये असे झाले होते/आहे - हिंदी/उर्दूत जल्लाद, संस्कृत मधे वधक. मराठीत जे चांडाळ, डोंब, कसाई, खाटिक हे जे शब्द आहेत ते फिट्ट बसत नाहीत. मला आठवतोय तो - न आठवणारा शब्द वेगळा.
पन्नास एक मराठी/संस्कृत शब्दकोष डाउनलोड केले तरी मिळाला नाही राव.
भारतात पूर्वी काय काय व्यवसाय होते त्यांची नावे पाहिली दोनअडीच तास नेटवर, त्यातपणा डोंब/डोम, जल्लाद असेच आले.
शेवटचा उपाय म्हणून आईला फोन केला - वूमन्स डेला पहाटे तीन वाजता आईला उठवून पब्लिक एक्झ्युक्युशनरला मराठीत काय म्हणतात हे विचारले. मला म्हणाली, आठवत नाही लगेच, नंतर आठवले तरीपण आता सांगणार नाही. संभाषण संपंण्याआधी एक महान सल्ला दिला की मुद्राराक्षस नाटकाच्या शेवटच्या अंकात चंदनदास, त्याचा मुलगा आणि त्याला त्याला फाशी देणाऱ्यांच्यात एक संवाद आहे. ते नाटक मिळते का बघ नेटवर, त्यात असेल कदाचित तुला हवा असलेला शब्द.
म्हणजे तीन वाजता प्राचीन नाटकातले चंदन का फंदनदासचे संवाद आठवू शकतात आणि मूळ विचारलेला एक साधा शब्द आठवू नये !

असो पण गुगलने माझ्यासारख्या अडल्यानडल्यांसाठी प्राचीन साहित्य आपले शिक्के मारुन स्कॅन करुन ठवले आहे (उद्या पब्लिकला वाटायचे विशाखादत्त गुगलमधे टेक्निकल रायटर होता)
रडतरडत मुद्राराक्षस वाचायचा प्रयत्न केला तर चार एक तासांनी त्यात दोन शब्द मिळाले - चांडाळ आणि शूलयतन: नुसता शेवट वाचायचा म्हणले तरी एवढा वेळा लागला, वर पाहिजे तो शब्द मिळालाच नाही.

आतापावेतो मी नाद सोडला राव. च्यायला हा शब्द म्हण्जे काय ऍप डीबीचा पासवर्ड आहे का की नसला म्हणजे आम्हाला एकपणा क्वेरी मारता येउ नये. काय शब्दांचा राजा लागून गेल्लाक्का?

मीच एक नवीन शब्द काढला आहे आता - शूलक.

शूलक शब्दाचा दुसरा काय अर्थ असेल तर आय डोन्ट केयर बाबा. इटस रिकली व्हेरी सिंपल, यु सी:
*दुसरा एखादा अर्थ असला तर - इट वील हॅव वन मोअर मिनींग - वॉट बेटर कॅन हॅपन इन धिस पूअर वर्डज अनहॅपनिंग लाईफ - मोरोव्हर वॉट वर्स कॅन हॅपन इन इटस ओपोसिट वर्डस लाईफ
*त्याला मूळातच काही अर्थ नसेल तर - इट कान्ट रिअली कम्प्लेन अबाउट एनीथिंग, इव्हन अबाउट इटस मिनींग हं - नोबडी कॅन नो वॉट यु वॉंट, व्हेन यु डोन्ट एव्हन एक्झिस्ट.
ही ही हा हा, गंडला बिचारा.

शूलक म्हणजे "Public executioner"
शूलक म्हणजे "Hangman"
शूलक म्हणजे जल्लाआआआद.

शूलकाला आता वापरले पाहिजे.
बिनाघोडे का भाई और बिनकविताका शब्द इन दोनोंको मार्केटमे कोई अहमियत नही देता.

खालील मराठी गाणे/कविता "Gallows Pole" चा स्वैर भावानुवाद आहे. लेड झेपलीन म्हणतात त्या - गीताचे बोल
(लोकगीतात बदल करुन त्यांनी गीत शोकांत केले आहे - गाणे नाय गीत, वा, मी कवी मूडमधे जात आहे आता)

मूळ गाणे मध्ययुगीन लोकगीत असल्याने अनुवाद पण जुनाट वाटावा म्हणून अधेमधे संस्कृत शब्द पेरतो [ तसा २-३ संस्कृत नाटकांचा अभ्यास आहे माझा उदा. मुद्राराक्षस ]

मूळ गाण्यात प्रौढ विषय आणि सूचक संदर्भ असल्याने अठरा वर्षांखालील लोकांनी कृपया वाचू नये. [खरोखरची व मनापसून सूचना आहे]

सुमार दर्जाच्या कविता/गाणी सहन न होणाऱ्या प्रौढ लोकांनी, दोन्ही हातांनी डोळे गच्च बंद करुन, दोन बोटांच्या फटीमधून अनुवाद वाचावा.

***


गॅलोज पोल - दंडस्तंभ

शूलका, क्रूर शूलका,
थांब एक घटिका,
बघ दूरवर, क्षितीजासमीप
मज भासे तो सखा माझा,
हो माझा प्रियकच, धावितसे शतयोजने,

रे कांता,
काय तू आणलेस मजसाठी?
मला तारण्यास,
दंडस्तंभ खंड्ण्यास?

वैभव नाही माझ्यापाशी,
नाहीत रत्न अन्मोती,
निर्धन मी हा प्रेमी,
दंडस्तंभी प्रेमदाह ज्याच्या दैवी

नको रे शूलका
क्रूर शूलका,
थांब एक घटिका,
बघ दूरवर, क्षितीजासमीप
मज भासे तो सहोदर माझा,
हो माझा अनुजच, धावितसे शतयोजने,

रे अनुजा,
काय तू आणलेस मजसाठी?
मला तारण्यास,
दंडस्तंभ खंड्ण्यास?

रौप्यमुद्रा अन्दशनिष्के,
आणले मी अल्पस्वल्प,
तुला तारण्यास,
गं अत्तिके,
दंडस्तंभ खंड्ण्यास

धस्स्स...हे शूलका,
काय हे केलेस?

क्रूर शूलका,
थांब एक घटिका,
बघ दूरवर, क्षितीजासमीप
मज भासे ती सहोदर माझी,
हो माझी अनुजाच, धावितसे शतयोजने,

अनुजे माझ्यासाठी,
हो विषयरत ह्याच्यासंगे,
रममाण कर ह्या शूलका
पातक मी याचते तुला,

शूलका, अरे अधमा,
कर त्वरा
खंडूनी ह्या दंडस्तंभा
आता करी बंधमुक्त मला,

प्रसन्न मी एक शूलक
भाग्य जयाचे उजळले
द्रव्य बहु लाभले,
अप्सरेने सर्वांग शमविले,
तृप्त केले विरुप शूलका

किंतु अबले,
गं दीन अबले,
विपरीत तुज अपेक्षा
करुणा कोठे नृशंसा

संपल्या आता घटिका
एकच माझा बलप्रहार
दंडस्तंभी देह निष्प्राण
अन्शिर तुझे दूरवर

आसमंतात नाद माझा
हर्षोल्हास अन्उत्सव माझा
हर्षोल्हास अन्उत्सव,
हर्षोल्हास अन्उत्सव...
*

आयला, निबंध म्हणून पण खपेल. भाषांतर करायला विचारायला लागते राव मूळ कवीला, पण हे लोकगीत आहे की त्यामुळे चालते.
काय लांबड लागली ह्या पोस्टमधे

***

7 comments:

Unknown said...

tu mahan ahes..evdha upadvyap??? :O

baki, gane ekdam sanskrutodbhav vagere zalay! ( thodkyat pahilya vachanaat kahi total lagat nahi!)

aso, chhan ahe pan! .. :)

Yawning Dog said...

he he he Thanks Bhagyashree :)

Gane vatale naa sanskrutodbhav, mala taree kuthe poorna zepale aahe...hai keyboard to badavneka :D

Maithili said...

Tuzi soochana n eikata mi ha BHAVANUVAAD vaachala.
lay bhaari...
aani tuza sanskrit naatakaancha abhyas vaigare asel ase vaatale navhate mala. abhigyanshakuntalam, malvikagnimitrm ityadi asati tar kahi vatale hi naste pan direct mudrarakshas vaigare? mahan aahes tu. kalpak, kalatmak, hushar, ase sagle shabd fike padtil tuze koutuk karanyasathi.

ऋयाम said...

select all from
"Maithili baiche mhanane"

copy and paste.

Yawning Dog said...

baap re baap....thanks a lot of Maithili n Ruyam.

Nachiket said...

phashi denaryala marathit "mang" mhanatat

Yawning Dog said...

Wow thanks Nachiket...finally!
Haach shabda aathvat hoto me