Monday, August 17, 2009

निरर्थक - Nth

हे फार भंगार आहे, ब्लॉगवर टाकू नये असे वाटले होते एकदा, पण आपल्याला काय?
*
जाताना/जायच्या(गावाला) आधी लिहायचं म्हणून हे निरर्थकच्या लायनीमधले नथ(nth) पोस्ट. यावेळीपण एअरपोर्टवर नोंदी लिहून ठेवतो, मागच्याखेपेला वेळ चांगला गेला होता. आज चौदा ऑगस्ट आहे, पाकचा स्वातंत्र्यदिन, उद्या आपला. लहानपणी शाळेत जिलबी द्यायचे. शाळा अव्वाच्या सव्वा फी वसूल करुन आपल्याला लुटते हे मनात ठसले असल्याने आम्ही दोन जिलब्या खायला चारेक तास तरी उन्हात उभे रहायचो. मी एकदा दायना दर्शक होतो परेडमधे, नक्की आठवत नाही काय करायचे असते ते, बहुतेक सगळी जनता सलाम ठोकताना पाहुण्यांकडे बघते, दायन्या दर्शकाने गपचूप समोर बघायचे असते, असे काहीतरी. एकुण शाळेतल्या आठवणी हा भागच भारी असतो, परवा आमचे सर्व रुममेट्‌सचे दुर्मिळ एकमत झाले की, बालपणीचा काळ सुखाचा वगैरे बोलण्याच्या गोष्टी असतात. आमच्यापैकी कुणालाही परत शाळेत जावेसे, ते दिवस परत यावेत etc. काही वाटत नाही. आत्ताचाच काळ सुखाचा आहे, लहानपणी साध्या साध्या गोष्टींची जाम टेन्शन्स असतात. छोट्या अडचणीसुध्दा प्रचंड मोठ्या वाटतात. शिवाय सतत काही ना काहीतरी लफडी चालू असतात, त्यात तो अभ्यास आणि गृहपाठ. आता कशाचेच काही वाटत नाही, सगळे बरे आहे, कामाचेपण टेन्शन नाही, आपोआप होते ते, अभ्यास नाही व्हायचा आपोआप. एकदा सर गृहपाठ तपासत होते, माझ्या शेजारी बसलेल्या हिरोने केला नव्हता.
सर म्हणाले, "का नाही केला?"
"सर, विसरलो, उद्या नक्की दाखवतो सर."
"विसरलो? असा कसा विसरलास? जेवायचे विसरतोस का?", असे म्हणून सरांनी दिली एक ठेवून त्याला. तेव्हाच मला हे उत्तर सुचले होते की, "जेवायला भूक लागते सर, अभ्यासाची भूक नाही लागत." असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते त्याने, एवीतेवी मार खायचाच होता, जास्त खावा लागला असता पण. टाईममशिन मधून जावून एकदा असे सगळे बोलून आले पाहिजे. एक सर बळंच, वर्गात काही संबंध नसताना मी मूर्तिपूजक नाही वगैरे सांगत सुटायचे, त्यांच्या घरी बाहेरच्या खोलीत भिंतीवर असंख्य देवदेवतांचे फोटो लावले होते, मला नेहमी म्हणावेसे वाटायचे, सर मग सगळे फोटो काढून टाका की भिंतीवरचे. चांगले असतात तसे शिक्षक पण त्यांना काहीतरी विचित्र काव्यशास्त्रविनोद करुन मुलांची खेचण्यात प्रचंड मजा वाटते. काही लोक तर वर्गात हाणून गप नाही बसायचे, घरच्यांनापण सांगणार नंतर. म्हणजे घरी परत ओरडा खावा.
तसा मी बऱ्यापैकी उलट बोलायचो. एकदा मात्र बाबा खूश झाले होते माझ्या उलट बोलण्यावर. उन्हाळ्याची सुट्टी सुरु होती आणि शनिवारी मी बाबांच्या बँकेत गेलो होतो, काहीतरी स्वत:हून आपले खाते उघडा त्यात दहा रुपये टाका वगैरे आईचे विचार इंप्लिमेंट करायला. बँक छोटीच होती, मी पटापट खाते उघडून, लोकांकडून फुकटचे कौतुक करुन घेत बसलो होतो. अगदी सगळेच काही कौतुक करायचे नाहीत. बँकेत एकजण होते, ते नेहमी लहान पोरांना पकडून एक कोडे घालायचे - "१ किलो कापूस आणि १ किलो लोखंड यात कशाचे वजन जास्त?" मुलं आपली लोखंड लोखंड म्हणायची, मग ते समजावून सांगायचे आणि हसायचे सातमजली. मी नंतर एकाला हे सांगितले होते, मग तो पूर्वतयारी करुन गेला होता - बरोबर उत्तर देउन आलाच शिवाय वजन आणि वस्तुमान असले काहीतरे फंडे देउन आला तो त्यांना.
तर मूळ कथा, उन्हाळ्याच्या सुट्टीत मी बँकेत गेलो होतो तिथे एक सर आले आमचे, पैसे काढले त्यांनी बँकेतून, मोजले दोनदा. मग त्यांना मी दिसलो. काउंटरच्या आतल्या बाजूला माझे चालू असलेले कौतुक बघवले नसावे त्यांना. बाहेरून मला म्हणाले, इकडे ये रे. मी गेलो तर म्हणाले, "हे पैसे मोजून सांग बरोबर हजार आहेत का?" आता काय संबंध? एकतर हे महाराज इतिहास शिकवायचे, शिवाय शाळेला सुट्टी. मी न मोजताच म्हणालो, "सर, २ नोटा कमी आहेत". आणि बँकेतली जनता प्रचंड हसली. सर पुढे काहीतरी थातुरमातुर म्हणाले पण पोपट झाला होताच. नंतर एकदा बाबा म्हणाले, का रे असं का म्हणालास? मी म्हणालो, मला आत्ता काय गरज होती असे पैसे मोजायचे काम सांगायची? शाळा सुरु नाहीये ना, आम्ही जातो का सुट्टीत त्यांना काही शंका विचारायला. बाबा लय खूश झाले होते उत्तरावर, पण मला म्हणाले, पुढच्या वर्षी हाणणार लेका तुला हे सर. मला मोजून तीन चार शिक्षक आवडले असतील आजतागायत, चिपळूणच्या देवधर बाई. ह्या बाईपण उन्हाळ्याच्या सुट्टीत भेटल्या होत्या बँकेत, त्यांनी वरील सरांप्रमाणे आगाउपणा केला नाही, त्या म्हणाल्या, वा सुट्टीत बाबांना मदत करतोस वाटतं?[बाबांना हा आगाउपणा वाटला का ते विचारायला हवे]. मग त्यांनी मला खाउला आठाणे दिले आणि म्हणाल्या, उन्हातान्हाचे खेळत जावू नका, सावलीत खेळा.
एक वाईट शिक्षक झाले की दुसरे चांगले, पोलिटीकली करेक्ट रहायची सवय लागलीय. आमचा न्हावी कायम पोलिटीकली करेक्ट असतो, भारताविषयी काही बोलायचे असले तरी तो आधी दहा स्पष्टिकरणे देणार, Not that it's bad or anything, but you guys eat a lot of spicy food. बळंच नॉट दॅट बॅड वगैरे.
हल्ली शाळेत मारत नाहीत म्हणे, एक छोटा मुलगा होता, भारतात गेलो होतो तेव्हा भेटला होता. मी कुणाकडे काहीतरी निरोप द्यायला गेलो होतो, ते येईपर्यँत वाट बघत बसावे लागले. हे ध्यान एकटंच होतं. लहान मुलांना तसा मी घाबरुनच असतो, उगाच चार लोकात शोभा करतात, विचित्र काहीतरी बोलून. सगळ्या भिंती निरखून, शोपीस पारखून झाल्यावर मी त्याला विचारले, "मारतात का रे शाळेत तुला?". तर म्हणाला नाही. मी विचारले मराठी मिडीयमला नाहीस का, तर म्हणाला, मराठी माध्यामाच्या शाळेतच जातो. आश्चर्यच वाटले. करावं लागायचे आमच्या वेळच्या शिक्षकांनापण. ते तरी काय करणार, पोरं असली मंद. मनात म्हणत सुध्दा असतील ते, "Its only business, nothing personal" वगैरे. काहीही बरळत आहे मी.
परवा मला भारी जोक सुचला. पुलंच्या नावावर खपवला असता मी तर सुपरफेमसच झाला असता.
जोक -
मराठीचा सहामाही पेपर सुरु आहे, निबंधाला एकच विषय यावेळी, चार ऑप्शन्स नाहीत. हां तर विषय होता, "मी पंतप्रधान झालो तर". मी उत्तर लिहीले - "सिलॅबसबाहेरचा प्रश्न आहे, मी मराठी आहे".
मी ज्यांना ज्यांना सांगितला त्यातले पन्नास टक्के लोकच हसले. गडद विनोद (dark humour) ची जाण नाही हो, दुसरं काय?
शाळा हा विषय भारी आहे पण, माझा निबंध एकदा वर्गात वाचून दाखवला होता. तेवढं एकच यश शालेय जीवनातले. रीपीटेशन - एकूण बालपणीचा काळ सुखाचा वगैरे नसतो, मोठेपणी बरे असते, मनाला यील ते करा, हवे तेवढे सिनेमे बघा, हवा तो टीपी करा, कामाचे पण विशेष काही नाही नंतर नंतर ते आपोआप स्वत:हूनच होते.
*
गेले २-३ मिनिटं मी शाळेविषयी भावनिक विचार करायचा प्रयत्न करत होतो, पण जमेचना. समोर एक बाळ बसले आहे. भारी आहे हा मुलगा, त्याने स्वत:साठी एवढ्या लहान वयातच खेळ शोधला आहे. स्वत:चीच लाळ मुद्दामून ओठातून बाहेर काढायची आणि आता पडणार म्हणल्यावर खालचा ओठ दुमडून ती गिळायचा प्रयत्न करायचा. आणि जमल्यावर खिदळायचे. हुशार आहे राव. असले काय काय एअरपोर्टवरचे लिहायला लागला माणूस म्हणजे संपलच. मला आजकाल असे वाटते आहे की हल्ली मला गाण्यातले थोडे थोडे कळायला लागले आहे. म्हणजे मला एखादे रेडिओवरचे गाणे आवडले आणि मी घरी येउन ते शोधून पाहीले की बरेचदा प्रसिध्द निघते. कदाचित रेडिओवर सगळी प्रसिध्द गाणीच लावत असतील. असो.
शाळा, सरलोक, बाईलोक यांचा विषय डोक्यातून जातच नाहीये. ईचलकरंजीला तीन शाळा होत्या गंगामाई, गोविदराव आणि व्यंकटराव अशा नावाच्या. ही तिघं राजघराण्यातली भावंड होती असे मला नेहमी वाटायचं, खरंखोटं देव जाणे. बॅटरी मरत आली.
**
मगाशी भावनिक विचार करायचा प्रयत्न केला, आत्ता आत्ता काहीतरी सुचायला लागले.
बॅटरी संपली म्हणून डोक्यात विचार यायचे थोडेच थांबणारेत. शाळा संपली म्हणून शिक्षण थोडीच थांबते. कुणी लिहीले नाही म्हणून शब्द...काही जमत नाही पुढे.
***

24 comments:

Satish Gawde said...

तू वैधानिक चेतावनी दिलेली असल्यामुळे फार अपेक्षा न ठेवता वाचायला सुरुवात केली आणि मस्त टाईमपास झाला...

लेख नेहमीसारखा यॉडॉ स्टाईलचा झाला आहे... जियो !!!

Anonymous said...

"१ किलो कापूस आणि १ किलो लोखंड यात कशाचे वजन जास्त?"

या कोड्याचे उत्तर काय? जरा एलाबोरेट कराल का प्लीज??????

Anonymous said...

आरे वा! इचलकरंजीचं नाव आल्यावर एकदम सही वाटलं... आम्ही इचलकरंजीचे, गंगामाई शाळेतले... त्यामुळे उगाचंच लई भारी वाटले. बाकी सगळं दिसायचंच बंद झालं जणु... शाळेची आठवण झाली. मला शाळा आवडायची. अजुन आवडते, खुप. May be...कारण आम्हला शाळेत कधी मारत नसत. May be... बर्याचश्या इतर कामामधुन सुटकेचे ते कारण होते. May be... मला राजवाडे खुप आवडतात आणि बालविद्या मंदिर, आमची शाळा, ज्यु कॉलेज सगळं राजवाड्या जवळ होतं, म्हणजे खंरतर राजवाड्याचेच भाग होते आणि कॉलेज तर खुद्द राजवाड्यात होतं. असो. मजा आली पोस्ट वाचताना.ती बॅटरी तेवढी संपायला नको होती.

Dark humour : गुड वन!

P.S.
उगाच सांगावसं वाटलं म्हणुन,
[ऐकीव माहीतीवर आधारीत. चुकभुल देणे, घेणे]
अदी व्यंकटराव : इचलकरंजी संस्थानाचे संस्थापक
गंगामाई : व्यंकटराव यांच्या पत्नी. [पेशव्यांची बहीण]

यांच्या descendents मध्ये, आणि काही व्यंकटराव होते... ते काय details महीत नाहीत.

गोविंदराव : लास्ट्चे घोरपडे सरकार नारायणराव घोरपडे याचे चिरंजीव.

खुप बोर केलं मी राव... सॉरी.
Have a great week ahead!

Raj said...

मस्त रे! तू टीपी म्हणून लिहितोस तसे लिहायला आम्हाला कष्ट करावे लागतात. :-)
मास्तरांची इकेट मस्त काढली. :ड विनोदही महान.

इथे एक प्रसंग आठवला. मी हातात कधीकधी अंगठी घालतो. एकदा घातली होती. आमच्या एका मित्राला चौकशा करायची भारी खोड. लगेच सुरू.

मित्र : अंगठी घातलिये.
मी : हो.
मित्र : हे गुरूचं बोट आहे.
मी : हे माझं बोट आहे.

पब्लिक हसल आणि अखेर मित्र गप्प झाला. :)

Harshal said...

मजा आली वाचताना ... आणि नेहमीच काही अर्थवाही पोस्ट लिहिली पाहिजे असे काही नाही... तू जे काही लिहितोस त्यातून : तू : दिसला पाहिजेस ... तुझे विचार पोचले पाहिजेत .... tenvha asech lihit जा ... hi tar तुझी शैली आहे ... भन्नाट
त्या बालाचे निरिक्षण तर मस्त होते... आम्ही मित्र अश्या कितीतरी अर्थहीन goshti बघत असतो ... अणि mag tyavar ब्रेन स्टोर्मिंग करतो ... उगाच ... काही युप्योग नसतो तसल्या गोष्टींचा पण ती सहज होऊं जाणारी एक गोष्ट आहे ... मला त्याचीच आठवण आली. मस्तपोस्ट !

सर्किट said...

:-))

kaaheechyaa kaahee aahe he!! agadi nehemi pramanech.

india la jato ahes kay? kandapohe programs ki kay? ;-)

tasa asel tar porila tuza blog dakhavv.. yekdum fidaa hoil tuzyavar.

jamalyas tikaDunahi YoDo-giri karat raha!

Surendra said...

..ईचलकरंजीला तीन शाळा होत्या गंगामाई, गोविदराव आणि व्यंकटराव अशा नावाच्या. ही तिघं राजघराण्यातली भावंड होती असे मला नेहमी वाटायचं, खरंखोटं देव जाणे.

When were you in Ichalkaranji? Which school(s) of the above three you studied in?

Mugdha said...

lihun jhalyavar khup bara vatla asel na?
mala kuni ekhada mulga akhanda bolat aahe asa bhaas jhala mhanun vichartey...
malahi aavadata asach akhanda khup kahi mahatvacha na bolayala...
baki lokhanda kaapus..masta..ugach chalayache lok tevha...:)
-mugdha
mugdhajoshi.wordpress.com

केसु said...

विषय होता, "मी पंतप्रधान झालो तर". मी उत्तर लिहीले - "सिलॅबसबाहेरचा प्रश्न आहे, मी मराठी आहे".

ha hah ha...lai bhari rao.. mastach... :)))

Anonymous said...

Dark Humour
HAHAHAHAHA
HIHIHIHIHI
HUHUHUHUHU
HAIHAIHAIHAI

a Sane man said...

lay bhaariii! :)

pantapradhan....lol

:)

Bhagyashree said...

hhehe bharri post !

to lahan mulga kasa dolyasamor ala are !! hats off lihlays tu! :)

tula airport var aslya bhari goshti disnar astil, tar tula sarkha pravas karayla lago ! :)

Vidya Bhutkar said...

निर्रथक कुठले अरे हे? तू याला ’अर्थपूर्ण-१’ नाव दे. :) तसे तू बोधकथा वगैरे लिहिल्या आहेस पण तरी हे ’अर्थपूर्णच’. :-) मलाही शाळेत परत जावेसे वाटत नाही. अजूनही कसलीतरी स्वप्न पडतात तेव्हाच्या टेंशनने. एकदा लायब्ररीचे पुस्तक मी वेळेवर दिले नव्हते तर कित्येक रात्री झोप लागली नाही. आणि मारके शिक्षक, खडूस बाई,इ तर आहेच. एक बाई तर मी वेळेवर गॄहपाठ करते म्हणून चिडल्या एकदा, का तर अजून धडा संपायचा होता, हहहाअहा. :-)
असो. पण एकदम बरोबर लिहिला आहेस लेख. :-) मोठे झालो ते बरेच झाले म्हणायचे.
-विद्या.

Yawning Dog said...

@सतीश - धन्यवाद :)
@विक्रांत - दोन्हीचे वजन सेम असे तेव्हा तरी म्हणायचे आता आणि काय नवीन शोध लागला असेल तर माहीत नाही बुवा :)
@पिलूरायटर - वा, सहीच बोर नाही झालं, बसल्या बसल्या माहिती मिळाली, गंगामाईशेजारी DKT होते बहुतेक तेव्हा मला टेक्सटाईल ईंजिनियर व्हावे असे वाटायचे, नंतर विसरलो :)
@राज - हा हा हा, गुरुच्या बोटचा विनोद भारी, लक्षात ठेवतो :)
@हर्षल - धन्यवाद :)
@सर्किट - नाही भारतात नाही आलो :) BTW मला दोन्ही ब्लॉगच्या परमिशन मिळतील का? (contact.yawning.dog@gmail.com)
@सुरेन्द्र - "Which school(s) ...three you studied in?" गंगामाईमधे कसा शिकीन राव :) गोविंदरावला होतो मी, ९२ ला असीन बहुतेक, कसेतरी वर्षभर होतो मी इचलकरंजीला.
@मुग्धा, केसु, आल्हाद, सेन मॅन, भाग्यश्री - धन्यवाद :)
@विद्या - बरं वाटलं, असच अजून कुणालासुध्दा वाटतं म्हणून :D
"एक बाई तर मी वेळेवर गॄहपाठ करते म्हणून चिडल्या एकदा, का तर अजून धडा संपायचा होता" - असंच होतं, काहीही केले तरी ओरडा हा ठरलेलाच असायचा :D

सखी said...

’मी पंतप्रधान झालो तर....’
हे भाईंच्या नावावर खपवायची गरजच नाही मुळी.
असंही हसू येतंय. गडद विनोदाची जाण लोकास्नी न्हाई हे मात्र खरं.
एअर्पोर्टवर हे असं काहीबाही सुचतं आणि तरीही ते वाचावंसं वाटतं यतच आलं सगळं काही.

सखी said...

आणि सर्कीटरावांचे प्रोफाईल ऍक्सेस लिमिटेड आहे काय?...
हा प्रश्नाचा आणि पोस्टचा काहीही संबंध नाही तरीही...

Yawning Dog said...

@Sakhi, thanks :)
*
"आणि ...हा प्रश्नाचा आणि पोस्टचा काहीही संबंध नाही तरीही"
Ase disate ahe ekun

आल्हाद said...

पंतप्रधान एकदम भयंकर ....
UP तला पेपर महाराष्ट्रात फुटल्यास असे प्रश्न येतील
:)
lolz dude ..
बाय द वे ... radio वर सनम बेवफ़ा ची सूश्राव्य गाणी पण वाजतात

Unknown said...

lihaa kI navin post aataa... !

Anonymous said...

Yawning Dog..correct name for your writting is microphilosophy..Or nanophilosophy..most powerful..!

मी बिपिन. said...

एकच शब्द... क्लास. केवळ क्लासिक आहे हे. मुजरा सरकार. गमती गमतीत छान टपल्या पण मारल्या आहेस.

Unknown said...

Excellent , specially for the good observation of the child on the airport

hash said...

YD, Sept sampt alay tri tuza ajun ekahi blog nahi.... Pls lihi kahitri

भानस said...

विषय होता, "मी पंतप्रधान झालो तर". मी उत्तर लिहीले - "सिलॅबसबाहेरचा प्रश्न आहे, मी मराठी आहे".हाहा...हा,सहीच रे.
वाचता वाचता खूप हसले, मध्येच जरा सिरीयसही झाले. शेवटी कधी नव्हे ते नवराही डोकावला,:). एकदम झक्कास रे. खूप आवडले. टीपी आहेच पण त्यातही अनेकविध गोष्टींचा मस्त मागोवा घेतला आहेस.