Friday, January 1, 2010

वर्ष खल्लास

दर एखाद्या अशा शुभेच्छेबल घटनेला नवीन पोस्ट टाकून आम्ही आमच्या ब्लॉगचे नळस्टॉपवरील एका राजकीय अभिनंदनफलकात रुपांतर केले आहे हे येथे मान्य करुन; आम्ही आज आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देवू इच्छितो.

माझ्या प्रिय चिंटू आणि मिनींनो,
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना चांगलं जावो. काल दारु प्याली असल्यास परत एकदा वाचा - "माझ्या प्रिय चिंटू आणि मिनींनो हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना चांगलं जावो". परत आम्हाला कुठे हॅप्पी नू ईअर केलेस तू असे म्हणतात हो लोक. आपण टून्न होता असे सांगितले तर स्वत:च्या पैशाने पितो-बितो लेक्चर ऐकायला लागायचे. असो. शुभेच्छांचा उत्तरार्ध - "तुमची प्रगती, भरभराट होवो, सुखसमृद्धी..."
काम संपलं.

३१ डिसेंबर साजरा करणे हे फॅड मी ईयत्ता पाचवीत असताना आमच्यापर्यंत आले. मध्यमवर्गीय जनतेला अचानक तीन चार कुटुंबानी एकत्र येउन भोंडलाटाईप काहीतरी करावे असे वाटू लागले. त्या नादात आमच्यासारख्या निरागस मुलांच्या कोमल मनावर खराखरा चरे पडले. सकाळी क्लासमधे ज्या मुलीला चिडवले तिच्या घरीच संध्याकाळी ३१ डिसेंबरचे पाहुणे म्हणून जावे लागणे, सायकल एका बाजूला कलती करुन सकाळी जिला स्टाईलमधे ओव्हरटेक केले तिच्याच दारात संध्याकाळी मोठ्ठे पितळी पातेले घेउन उभे राहायला लागणे असले प्रकार झाले हो. इमेज बिघडते ना, पालक लोकांना याचे गांभीर्य वाटत नाही. एकूण समाजात असा नियम केला पाहिजे की लहान मुलमुलींची मैत्री असेल तरच एकत्र सहकुटुंब भेटावे. मुली लय डांबरट असतात, असल्या एकत्र प्रसंगांचा गैरेफायदा घेवून मुलांना त्रास देतात. तुम्ही दोघे एकाच क्लासला ना म्हणल्यावर मुलीने उत्तर काय द्यावे? "होSSS, पण हा क्वचितच दिसतो मला". म्हणजे आईवडिलांना शंका येते की आपला मुलगा नियमित क्लासला जातो का परस्पर कुठे जावून आकडा लावतो, शिवाय आपले प्रगतिपुस्तक आहेच शक को यकीन मे तबदिल करने के लिये.
स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी. एकतीस डिसेंबर काय आपला सण आहे का? मी भात खावून झोपेन आपला असे दणदणीत सांगून मी सुटका करुन घेवू लागलो. मन उडाले माझे एकूण एकतीस डिसेंबरवरुन, नंतर कॉलेजमधे गेल्यावर मी उपचारापुरते नॉर्मल एकतीस डिसेंबरींग करु लागलो. टिव्हीवाले एवढे मन लावून काय काय कार्यक्रम बनवतात त्यामुळे सर्वात उत्तम म्हणजे टिव्ही बघणे पण लोक बघू देत नाहीत, कुठेतरी जाउचयात असा हट्ट करतात त्यामुळे जावे लागते.

संकल्प करणे मात्र मला मनापासून आवडते. काय संकल्प करावा याचा विचार मी फार उशीरा सुरु करतो त्यामुळे सहा-सात जानेवारी उगवतो माझ्या संकल्प्सना. आपण तसे मेहनतीने पाळलेपण आहेत हो काही संकल्प. बरेचदा माझा संकल्प असे की यावेळी आधीपासूनच अभ्यास करुन वार्षिक परिक्षेत चांगले गुण मिळवायचे. आधीपासून अभ्यास केल्याने नंतर सगळे विसरते असे लक्षात आल्याने मी तो संकल्प कटाप केला. नंतर एकदा संकल्प केला होता की नवीन वर्षापासून उतार आला की लुना बंद करायची, पेट्रोलचे पैसे वाचवायला. हा संकल्प मात्र चांगला चालला, लुनेला तो इतका आवडला की कधी कधी ती चढावरसुद्धा स्वत:हूनच बंद होउ लागली. यावर्षी दोन जॉबस्विच तरी मारायचेच असेपण ठरवले होते एकदा, ते नाही जमले. मागच्या वर्षीचा माझा संकल्प होता की रोज एक सिनेमा बघावा - कसोशीने पाळतो आहे तो मी अजूनही.
संकल्प बोर झाले. लोकं संकल्प नाव ठेवतात मुलाचे. थेंब पण नाव ठेवतात म्हणे लोक. थेंबे थेंबे तळे साचे म्हण ऐकल्यावर कसे वाटेल त्या चिमुकल्या जीवाला? हल्ली मी काही भूमितीमधली नावे पण ऐकली आहेत. आकृती. या मुलीला आकृती काढा प्रश्न जमत नसतील तर किती लाज? हे काही आज चालू नाही झालं. महाभारतापासून सुरु आहे , व्यास काय नी कर्ण काय. मला तर हातचा हे नाव फार आवडले आहे. त्याच्या मामाला मजा येईल - हा माझा भाच्चा, हातचा.
लोकांची मुलं, आपल्याला काये? आपण जावून एकतीस डिसेंबरींग करावे.
**

तळटिपा:
; - प्लिज नोट अर्धविराम आहे तो, किती लोकं वापरतात असा अर्धविराम आं, आं ? (आमचा अभ्यास असे सांगतो की "अर्धविराम" हा शब्द अर्धविराम चिह्नापेक्षा जास्त वापरला जातो, ही उपेक्षा व अन्याय दूर करण्याचा वसा मी घेतला आहे)
इच्छितो - अशा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद लुटूनच आयुष्य फुलवायचे असते हं.
क्लासमधे - क्लास म्हणजे वर्ग नव्हे, क्लास म्हणजे शाळेतल्या सरांच्या घरी जावून शिकण्याचे ठिकाण. क्लास आणि ट्यूशनमधे फरक हा की ट्यूशनवाले सर विद्यार्थ्याच्या घरी येतात आणि क्लासमधे उलटे. माहिती असलेले बरे असते.
आवडते - शक्य तेवढं नॉर्मल माणसासारखं वागावं हो, या समाजात राहायचे आहे ना आपल्याला?
लागली - मालक एवढं करतायत म्हणल्यावर I also need to go for that extra mile असे कुठल्याही वाहनाला वाटणं साहजिकच आहे

***

27 comments:

Anonymous said...

सुपर्ब..

Anonymous said...

सुपर्ब..

सखी said...

"थेंब पण नाव ठेवतात म्हणे लोक. थेंबे थेंबे तळे साचे म्हण ऐकल्यावर कसे वाटेल त्या चिमुकल्या जीवाला?"

:D :D परतल्यासारखं वाटलं तुझ्या ब्लॉगवर.
हे असं काहीतरी तू चार-पाच पानी लिहिलंस तरी चालेल. पण ते ’बाकी काय’ वाचून .....म्हणजे हे कसं.....काय....जाउच दे असं काहीबाही वाटून गेलं...
समजून घे!! :)
नवीन वर्षात फार नाही पण किमान ३६५ पोस्टसपुरतं तरी तुला लिहिता यावं यासाठी शुभेच्छा!!

Ajay Sonawane said...

Ek NUmber !!! maja ali.

Dhananjay said...

as usual, good.

Samved said...

अशक्य....हातचा हे नाव!!!

:)

अपर्णा said...

एकतीस डिसेंबरींग ....changal chalu dya....maja aali...

अपर्णा said...

एकतीस डिसेंबरींग ....changal chalu dya....maja aali...

अपर्णा said...

एकतीस डिसेंबरींग ....changal chalu dya....maja aali...

सिद्धार्थ said...

भन्नाट. मस्त. तुमचा आणि लुनेचा दोघांचा संकल्प लय भारी. आणि हो क्लास आणि ट्युशन मधला फरक समाजवल्याबद्दल आभारी आहे. मला हे खरचं माहीत नव्हतं.
नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

Malhar said...

besht ahe...

ha 31 december ani class chya porincha problem amhala pan yayacha

pan aami kaal apan tya pori barobar party keli he sangun bhaav khayaco !!!


ani ho

happy new year

आनंद पत्रे said...

>>>> मुली लय डांबरट असतात, असल्या एकत्र प्रसंगांचा गैरेफायदा घेवून मुलांना त्रास देतात. तुम्ही दोघे एकाच क्लासला ना म्हणल्यावर मुलीने उत्तर काय द्यावे? "होSSS, पण हा क्वचितच दिसतो मला". म्हणजे आईवडिलांना शंका येते की आपला मुलगा नियमित क्लासला जातो का परस्पर कुठे जावून आकडा लावतो, शिवाय आपले प्रगतिपुस्तक आहेच शक को यकीन मे तबदिल करने के लिये.

एकदम फर्मास!!!!

Maithili said...

Saaahhhhi aahe. Btw Happy new year.
Aaani ho ha class aani tution madhala pharak navhata maahit mala.
Sangitalya baddal dhanyavad.

Anonymous said...

मस्त लेख, मज्जा आली.
मी एका मुलीचे 'ठिपका' असे नाव ऐकले आहे. खरंच सांगतोय. हे काय नावं झालं? काहीच्या काही.


-अनिकेत

शब्द सितारे... said...

khup chhan.

navin he varsh sukhache javo
happy new year 2010http://yajaganyavar.blogspot.com/

Raj said...

णवीण वर्षाच्या अनेक शुभेच्छा. हातचा आवडला. त्याच्या बहिणीचे नाव बाकी ठेवायला हरकत नसावी. (आई बेरीज, बाबा गुणाकार) :प

हेरंब said...

आयला जबरेश!!! सोल्लीडच झालंय ३१ डीसेंबरिंग !!

Anonymous said...

लुनेला तो इतका आवडला की कधी कधी ती चढावरसुद्धा स्वत:हूनच बंद होउ लागली.

Lay bhari aahe he! LoL!
He lihatana suddha hasa aavarat nahi aahe. Mazee pan ek luna hoti kadhi kaLi... laiiii aaThavan zalee mala tichi.

Harshal said...

; - प्लिज नोट अर्धविराम आहे तो, किती लोकं वापरतात असा अर्धविराम आं, आं ? (आमचा अभ्यास असे सांगतो की "अर्धविराम" हा शब्द अर्धविराम चिह्नापेक्षा जास्त वापरला जातो, ही उपेक्षा व अन्याय दूर करण्याचा वसा मी घेतला आहे)

Hasun hasun vaat lagli! Like your style

ओहित म्हणे said...

लयी मजा आली राव!! मुली खरच डांबरट असतात ... अगदी सहमत ...! माझंपण असं वस्त्रहरण बऱ्याचवेळा झालय. एकदा कोणीतरी सांगीतलं माझ्या घरी "आमचा क्लास लांब नाहीए काही!! पलीकडच्याच गल्लीत आहे!!" आणि मग मला पुढचे २ दिवस मी सायकल का घेऊन जातो याची विविध कारणं द्यायला लागलेली!!

असो ... मजा आली मालक. धन्यवाद

Jaswandi said...

तुम्हाला हे असं कसं काय सुचतं राव? भन्नाट लिहीलं आहे एकदम! मस्तच :)

a Sane man said...

hatcha; lol!

Anonymous said...

YD.. another super sixer..

Dhamal.

Happy 2010.

Yawning Dog said...

sagaLyaanche manapasson aabhaar aanee navavarshachya shubheccha

Bhagyashree said...

tu mahan ahes baki kahi nahi !

maza bhaccha, hatcha ?? vedd !! :)))))

मी बिपिन. said...

fa n ta s ti c ! ! !

asmi said...

majjay tujha blog !