Sunday, May 31, 2009

नवीन म्हण

नवीन म्हण

"आई आजारी, बाप पुजारी"

शब्दार्थ - आई आजारी पडली असताना तिची शुश्रुषा करण्याचे महत्वाचे काम सोडून, बाप देवाची पूजा करत बसला आहे.
भावार्थ - सर्वांच्या दृष्टीने महत्वाचे व तातडीचे काम करणे सोडून आपलेच काहीतरी कमी महत्वाचे काम करत बसणे.

ही म्हण वापरता येईल असे बरेच प्रसंग असतात. दोनचार उदाहरणे बघू.

उदाहरण १.
सुरेश आणि रमेश आपले सामान नवीन घरी नेत होते. दोघांनी सोफा उचलायला हात लावला, अचानक रमेशने हात काढला आणि म्हणाला,
"सोफ्याच्या लेदरवर डाग कसले पडलेत? सुरेश थांब, तू धर सोफा असाच, मी लांबून बघतो जरा, हे डाग किती ठळक आहेत ते"
यावर सुरेश म्हणाला, "रम्या लेका, एकट्याने एवढा जड सोफा धरला आहे मी, आता धड खालीपण ठेवता येत नाही, तुला आत्ता या क्षणी, टोचतायत का ते डाग? तुझे म्हणजे, आई आजारी आणि बाप पुजारी"

उदाहरण २.
"महाराज, गुप्तहरांनी वार्ता आणली आहे की, वायव्यदिशेने सम्राट पश्तुनकेतू सात अक्षौहिणी सैन्यासह आपल्या राज्यावर चालून येत आहे", प्रधानजी त्वरेने बोलत होते.
"ह्म्म, बरं एक सांगा प्रधानजी, वसंतोत्सवाची सर्व तयारी झाली ना?", महाराज वदले.
"होय महाराज, सर्व तयारी झाली आहे, आज्ञा असावी, निघतो आम्ही", प्रधानजी चरफडतच राजमहालाबाहेर आले व मनात म्हणाले, "आई आजारी, बाप पुजारी"

तिसऱ्या उदाहरणाची खरेतर काही गरज नाहीये, पण असुदे, आमच्या क्षेत्रातले आहे.
उदाहरण ३.
काहीतरी गडबड झाली असल्याने सर्व इंटरनॅशनल कॉल्स फुकट जात होते, त्यामुळे कस्टमरने इंटरनॅशनल कॉल सुविधा बंद केली होती. गणेशने दोन तास खपून यावरचा फिक्स प्रॉडक्शनमधे पाठवला. फिक्स टेस्ट करायला प्री-प्रॉडक्शन टीम इतका वेळ का घेते आहे याची चौकशी करता त्याला कळाले की टेस्टर आपली टाईमशीट भरण्यात व्यस्त आहे. गणेश त्याला म्हणाला, "गाढवा आधी हे टेस्ट कर, नंतर भरा तुम्ही किती तास काम केले ते, अवघड आहे कंपनीचं आपल्या, इथे आई आजारी अन्‌ बाप पुजारी"

***

Thursday, May 28, 2009

टर्मिनेटर सॅल्व्हेशन

टर्मिनेटर सॅल्व्हेशन

प: "पुढची १५ मिनीटे, हे गाढव येणाऱ्या पिक्चरांच्या जाहिराती दाखवणार. आमच्यासारखे महागाढव त्या बघुन परत नवीन पिक्चरला येणार"

फ: "ईंग्लिश पिक्चरमधे मध्यांतर का नसते? नेहमीची कारणे नकोत - लांबी कमी असते, लिंक तुटता कामा नये"

ब्रुस विलीसच्यासरोगेटसपिक्चरची जाहिरात. फारच भारी जाहिरात एकुण.

प: "वॉचमनच्या वेळेस आपण वूल्व्हरीनची जाहिरात पाहिली, वूल्व्हरीन बघायला आलो तेव्हा टर्मिनेटरची पाहिली. आता टर्मिनेटरच्यावेळी सरोगेटस. धिस इज एंडलेस, थांबवले पाहिजे हे आपण"

फ: "काहीतरी कॉन्स्पिरसी थेअरी आहे याच्यामागे - आपल्याकडे मध्यांतर असते"

ब: प आणि फ, साल्यांनो, एकाने तरी हात काढा की खुर्चीच्या हॅंडरेस्टवरचा. सगळीकडे तेच, गाडीत, विमानात, थिएटरमधे. "handrests are supposed to be shared by passengers, आपापल्या हद्दीत हात ठेवला पाहिजे, तुम्ही लोक..."

प + फ: ओ मास्तर, चुकले आमचं. भाषण बंद करा पण.

प: पण सिरीयसली यार, आपण हे थांबवले पाहिजे, दर वेळेला नवीन प्रोमो, नवीन प्लॅन्स. पुढच्या वेळेला व्यवस्थित रीव्ह्यू बघूनच यायचे.

ब: वॉचमन, वूल्व्हरीन, टर्मिनेटर, सरोगेटस. एक लक्षात घेतलेस का आपण ग्राफिकल नॉव्हेल वरचे पिक्चर बघतो सगळे शक्यतो.

फ: ग्राफिकल नॉव्हेल म्हणजे काय?

टर्मि. सॅ.च्या पाट्या सुरु. ताठ बसतो.

प: गपा रे, पिक्चर सुरु होतोय.

फ: अरे येड्या, तु कशाला सावरुन बसलास? तुला काय पिक्चरमधे काम नाही करायचय आत्ता. शूटिंग झाले त्यांचे आधीच.

ब: हा, हा, हा. शूsssश... खरंच सुरु झाला आता.

प: डायरेक्टेड बाय McG.हा काय प्रकार आहे. फ नेटवर बघ, McG कोण आहे.

फ: आत्ता लगेच?

प: डेटा प्लॅन कशाला घेतलास मग मोबाईलवर?

ब: मोबाईलशी खुडबुड नको रे आत्ता, McG नाव आहे त्या डायरेक्टरचे. चार्लीज अँजेल्स वाला. शांत बसा आणि बघा.
**

आता महत्वाचे काहीतरी लिहायला पाहिजे, सीरीयस एकदम. झंडू बाम नको.
***

Wednesday, May 27, 2009

निरर्थक -३

निरर्थक -३, दिवसेंदिवस निरर्थकचे शेपूट वाढतच आहे.
*
देव आणि आठवणी या दोन विषयांवर बरीच पोस्टस वाचली मी मधे. लगेच आपला शहाणपणा दाखवायला मला "भूत आणि भविष्य" अशा सामाईक विरुद्ध विषयावर पोस्ट लिहावेसे वाटले.
पण भूत शब्दाचा अर्थ स्केअरी घोस्ट असा न घेता भूतकाळ असा किंवा भूतदया मधला भूत असापण घेतला जाउ शकतो. मग माझे टायटल ‘पूर्ण’ विरुद्धार्थी होणार नाही. भूत शब्द मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर की शिकार है.
"दानव आणि भविष्य" पण नको कारण दानव हेच बऱ्याच लोकांना देव वाटतात.
सगळा गोमकाला झाला, मेंदूमधे अशी धड्डाधड्ड validation exceptions येत गेली आणि अल्गोरिदमच गंडले फुल्ल मग असला काही आचरटपणा करण्याचा विचार मी सोडून दिला.
*

तर एकुण मला आठवणीच कमी असल्याने असे उलटे काहीतरी लिहायची इच्छा झाली असा मी निष्कर्ष काढला. तशा मोठमोठ्ठ्या आठवणी चिक्कार असतात प्रत्येकाला. पण सूक्ष्म म्हणावे असे काहीतरी आठवले पाहिजे. पूर्वी कसे आवडते शब्द लिहीले होते तसे बाकी पण सटरफटर काय काय आवडते ते लिहायला पाहिजे. भविष्यात सूक्ष्म आठवणी कमी पडू नयेत म्हणून आत्ताच पाउले उचलणे गरजेचे आहे. भविष्यासाठी तजवीज करणे मला फार आवडते. मी नोकरी करतो.
*

आवडती आडनावे
देवधर, पाटील, ढसाळ, ठाकरे, स्मिथ, पेज, पटाटा, ज्ञानसागर.

आवडती नावे
एप्रिल, समर(युध्द, वॉर, तबाही नव्हे - उन्हाळा), टँजरीन, केतकी, शंकर, अण्णा, काका, बापू, मन्या.
[अण्णा, काका, बापू ही नावे नाहीत सर्व/विशेष नामे आहेत असा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे - ही सगळी नावं पण असतात प्रगतिपुस्तकात. अण्णा का आण्णा ? ]

आवडते चौक
जुना संगम ब्रिज आणि आरटीओ रस्ता, नळस्टॉप, बिनखांबी गणेश मंदिराचा चौक, विंडसर आणि नीलचा चौक, मंडईतल्या दत्तमंदिराचा चौक - हा तर जीवनाचे कटू सत्य वगैरे सांगणारा चौक आहे, देव आहे, भाजी आहे, मिठाई आहे, ...

आवडते रस्ते
सिंहगड रस्ता, वाडिया कॉलेजच्या इथून ब्ल्यू डायमंडकडे जायचा रस्ता, ओंकारेश्वराचा पूल - हापण डेडली आहे, इकडे कार्यालय तिकडे स्मशान - लढा !

आवडत्या ओळी:
As we wind on down the road, our shadows taller than our soul
(Stairway to heaven)

बोर झाल्या सूक्ष्म आठवणी.

देव राहिलेच की यार. माईल्ड धार्मिक लोकांवर फार अन्याय होतो या जगात. माईल्ड सायन्सवाल्यांवरपण होतो. माईल्डपणावरच अन्याय होतो इन जनरल.
**

सौम्यस्मरणी

निबीड चकवणी
वेताळी आडवळणी,
वाट गारठवणी,
खर्ज घुबडगाणी
भूतांच्या आठवणी
काळजाची ठारचाळणी
रुधिराची साखळवणी
पापाची धमकावणी
पुण्याची चाचपणी
देवांची आळवणी
आर्त विनवणी
राउळाची ओळखणी
ज्योतीची तेजळणी
घंटेची किणकिणी
शक्तिची उजळणी
धाकधुक थांबवणी
मनाची शांतवणी
सौम्यस्मरणी

अरेरेरे, सरस्वतीदेवी कधी भेटली तर दोन कानसुलात देईल मला आणि म्हणेल - "शब्दांची नासवणी, काय ही फळकवणी".
असो. मीपण माईल्ड धार्मिक आहे, अंधाऱ्या निर्मनुष्य रस्त्याने मी एकटा चाललो असलो तर येडं लागते मला, मग मी एकदम मनापासून धार्मिक वागतो - पुढचे २-४ दिवस शिव्या देत नाही.
**

देवधर्म ज्यांना आठवला ते -
संवेद, मेघना (ह्या बिचाऱ्यांनी धर्मावर लिहिले आहे पण चालतयं की वो)

आठवणींवर लिहिणारी देवमाणसे -
भाग्यश्री, राज, अनिकेत
***