Tuesday, November 11, 2008

सौरवदादाची वही

निधड्या छातीचा आमचा सौरव दादा निवृत्त झाला, तेव्हा हळहळलो, त्याच्याविषयीची एक जुनी दुर्मिळ आठवण ताजी झाली.
गांगुलीचे साम्राज्य अजुन स्थापन व्हायचे होते ते दिवस...नुकताच सचिनबरोबर ओपनिंगला यायला लागला होता तो. मला आवडायचा कारण स्पिनरला डेड्ली सिक्स मारायचा, पण त्याने बऱ्यापैकी फटकेबाजी सुरु केली आणि त्याच्या शतकांचा वेग जसा वाढत गेला, तशी माझ्या मनात धाकधूक - कायमच सचिनपेक्षा चांगला तर नाही ना खेळायचा हा गडी, सचिनपेक्षा जास्त शतके काढली तर ? तशातच तो कर्णधार पण झाला !

अन एक दिवस माझ्या एका मित्राने गौप्यस्फोट केला -
मित्र: पश्या, तुला माहितेत का गांगुलीचे धंदे?
मी: आयला, कसले धंदे ?
मित्र: त्याने परवा एका प्रेस कॉन्फरन्स मधे सांगितले, माझ्यात आणि सचिनमधे हेल्दि कॉम्पिटिशन आहे
मी: काय बोल्तोस काय? सरळ म्हणाला का उघड, उघड?
मित्र: मग काय, ४ सिक्सा काय मारल्या आणि सचिनशी बरोबरी करतो, पण यार तुला माहिते का
मित्र: ...मागच्या १० मॅचेस मधे त्याचे ऍव्हरेज सचिनपेक्षा जास्त आहे !
मी: सध्या नवीन आहे रे, बॉलर्सना सवय नाही त्याची, ऍव्हरेज वगैर जास्त दिवस टिकत नाही, आणि एकदा बॅड पॅच येवूदे मग बघ बाहेर पडता पडता कशी वाट लागेल
मित्र: मग जाईल सचिनकडेच सल्ला मागायला...
(सातमजली कुत्सित हास्य)
मित्र: पण बॉस, मेन खबर सांगितलीच नाही तुला
मी: ?
मित्र: गांगुलीने एक वही ठेवली आहे, प्रत्येक वन डे नंतर त्यात तो स्वत:च्या आणि सचिनच्या रन्स लिहितो...प्रत्येक मॅचनंतर सचिनला गाठायला किती रन्स पाहिजेत ते पण लिहीतो
मित्र: आणि सचिन शून्यावर गेल्यावर लाल शाईत लिहितो...
मी: ....(सावरायला १ मिनीट तरी लागले असावे)
मी: काय रे, पण सचिनला माहिते का ह्या वहीबाबत ?
मित्र: कुत्र्यापेक्षा बेक्कार हसला, गुड्घ्यावर पडलायस का, तुला माहिते आणि त्याला माहित नसणार होय ?

त्यानंतर कधीपण गांगुली सचिनपेक्षा कमी रन्स काढून आउट झाला तर मी चेकाळून ओरडायचो...
अरे, जा रे लिही ना आता तुझ्या वहीत, का आता संपली रिफील ?
***
असो, पण गांगुलीचा करिअर ग्राफ आणि माझे वय हळू हळू वाढले...त्याने लॉर्ड्सवर शर्ट काढून त्या चार अक्षरी दिव्य ईंग्लिश शब्दाचा गजर केला आणि मी त्याची वही विसरलो ते आजतागायत !