Tuesday, July 10, 2018

चिडचीड


प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही कायम थीम्स असतात असे माझे मत आहे. आणि ते योग्यच आहे. पुस्तकात किंवा सिनेमात असतात तशा. (एखाद्या समीक्षकाने सांगितल्याशिवाय आपल्यासारख्याला कळत नाहीत त्या - त्याग, सूड, रिडेंम्प्शन वगैरे)
माझ्या आयुष्यातील थीम खालीलप्रमाणे - 
१. आळस/कंटाळा.
२. आळस करूनही बर्‍यापैकी यशस्वी होणे.
३. झोप पूर्ण न होणे.
४. विनाकारण, अनोळखी लोकांनी मदत करणे.
५. कारण नसताना एखाद्या गोष्टीचे क्रेडिट मिळणे.
६. लहानांकडून पाणउतारा, मोठ्यांकडून कौतुक.
७. काय अध्यातमध्यात नसताना उगाच मार बसणे.
८. मला दुसरेच कोणीतरी समजणे.


गेले अनेक वर्ष मला अनोळखी लोक दुसरं कोणीतरी समजतात आणि माझ्याशी बोलायला येतात (किंवा बघून पळून जातात.) दुसरं कोणीतरी म्हणजे, दुसरं कोणीतरी अनोळखीच, अगदी डॉपलगँगर नव्हे. उदा. रिक्षावाला, केळेवाला, गार्ड, वेटर, मॅनेजर वगैरे - विविध वर्गातली विविध माणसे.  मला आजतागायत राग आला नाहिये - सवयीने नाही, पहिल्यापासूनच आला नाही, पण तेव्हा बरोबर असलेल्या कुटुंबियांना मात्र कधीकधी राग येतो अशा वेळेला. मला कालतागायत राग आला नव्हता असे म्हणले पाहिजे खरेतर. काल पहिल्यांदा आला आणि मी भांडलोपण बर्‍यापैकी - हेन्स द पोस्ट.
शिवाय माझ्या डोक्यात आले की, आपल्याला कायकाय समजले आहेत लोकं पूर्वी ते नोंदवून ठेवले पाहिजे आपण.

प्रसंग एक: घाणेरडी चित्रं काढणारा मुलगा.
नवीन शाळेत गेल्यावर पहिल्या दिवशी, वर्गशिक्षिका बाईंनी एक काहितरी कागद सुपरवायजर सरांना द्यायला सांगितलं, तास सुरू असतानाच. आपल्याला काय गेलो - त्यांना आत येवू का सर, असे विचारले तर ते स्वत:च खुर्चीतून उठले. वा, काय भारी शाळा आहे, मुलं आल्यावर सरच उभे राहत आहेत, अशी सुखद भावना मनात येण्याअगोदरच सरांनी वीजेच्या वेगाने हालचाली केल्या (काळा पहाड वगैरे संकटातून सुटायला करतो तशा), आणि माझी कॉलर धरून मला कानाखाली खणखणीत ठेवून दिली - "असले धंदे करायला आईवडील शाळेत पाठवतात का? ऑं? अंगठे धरून उभा रहा इथे दोन तास आणि उद्या पालकांना घेवून ये" असे गरजले. मी हातातला कागद पुढे करून घाबरत म्हणालो - पण मला या या बाईंनी पाठवले आहे, मी मुद्दामून तासातून बाहेर नाही आलो. त्यांनी कागद वाचल्यावर त्यांची चर्याच बदलली. एकदम - अरे माफ कर हं मला, मी तुला दुसराच मुलगा समजलो. असे म्हणाले, कागद घेतला आणि मग जा परत म्हणाले. नंतर मला कळाले की, एक मुलगा तास सुरू असताना घाणेरडी चित्रं (सपोजेडली नागड्या बायका) काढत होता, त्याला सरांनी बोलावले होते, तेव्हा नेमका मी गेलो.

प्रसंग दोन: टिव्हीचा अँटिना लावणारा प्रोफेशनल माणूस.
एक माणूस मी व दुसरे माझे बाबा. एकदा गच्चीवर अँटिना लावताना खिडकीतून एका बाईने विचारले, किती घेता हो अँटिना बसवायचे? बाबा म्हणाले, चहा आणि एक डिश, काहीतरी पोहेउप्पीट. तरी त्या काकूंना कळाले नाही त्या म्हणाल्या - अहो पण पैसे किती, पैसे? मग त्यांना सांगितले, आमचा आम्हीच लावत आहोत. तर त्या आयुष्यभर अपोलेजेटीक होत्या बिचार्‍या. लाजेने खाल्लेली बाई म्हणतात ती हीच. (त्यांचा अँटिना पण बसवला आम्ही, पण काकूंना वाईट वाटायचे काही थांबले नाही.)

प्रसंग तीन: रिक्षावाला
अकरावी-बारावीत असताना चालतचालत घरी येत होतो तेव्हा, बहिणीशी काहितरी बारीक मारामारी सुरू असताना, तिचा फटका बसू नये म्हणून मी पटकन पळत एका कडेला गेलो. तिथे एक रिक्षा उभी होती त्यात मागे बसून खेळणारी मुलं अचानक "अरे, काका आले, काका आले" म्हणत पळाले. बहिणीचा फटका परवडला असता एवढं चिडवलं नंतर तिनं मला.

प्रसंग चार: केळे/चप्पल/गरे/कपडे वाला
हे कॉमन आहे. जनरल बरोबरची लोकं हळू चालतात, त्यामुळे मी पुढे जावून केळाच्या, चपलेच्या किंवा जो काही माल आहे त्याच्या हातगाडीवर हात ठेवून उभे राह्यलो तर लोकं भाव विचारतात. माहीत असला तर मी प्रामाणिकपणे भाव सांगतोही. केळ्याचे काय, गेले अनेक दिवस चाळीस रुपये डझन आहेत.

प्रसंग पाच: बॅंकेचा माणूस
अगदी नुकतंच झालं हे. एका आजोबांना हात थरथरतोय म्हणून बॅंकेत स्लीप लिहून देत होतो. तर त्यांच्यामागे दोनजण रांगेत उभे राहिले, दोन मिनीटांनी एक जण म्हणाला - ओ आटपा की लवकर, कामं आहेत पुढं आम्हाला, एका माणासालाच एवढा वेळ लावला तर कसं व्हायचं? त्यांना समजावून सांगितल्यावर त्यांनी सॉरी म्हणले, पण आजोबा पेटले, त्या मनुष्याला लय झापला त्यांनी.

प्रसंग सहा: बिग बझार मधील कर्मचारी
एक लक्षात ठेवा मुलांनो - बिग बझारमधे कधी गेलात तर, लाल-निळ्या चेक्सचा शर्ट आणि निळी जीन्स घालून जावू नका.

प्रसंग सात: कॉलेजमधला मुलगा
परवा शहाळं आणायला गेलो - एक कॉलेज आहे, त्याच्यासमोर शहाळेवाला बसतो. एक कुठलीशी परिक्षा होती आणि परिक्षेच्छुक विद्यार्थ्यांची छान रांग लावली होती, बंदोबस्ताला पोलीस होते. शहाळेवाल्यापाशी रांग कट झाली होते, मी शहाळेवाल्याला ऑर्डर देवून गपचूप उभा आहे तर पोलीसकाका एक दांडू मारून म्हणले, ए नीट उभा राहा लायनीत, असा काय आडवा-तिडवा? मी शहाळं घेतोय म्हणालो तर म्हणाले - खरंच का?

असे अनेकविध प्रसंग आहेत, बरेचसे विनोदी (माझ्या मते). ९०% लोकांना नंतर फार वाईट वाटते, आपण एखाद्याचा उपमर्द केला वगैरे वाटते. मला छान वाटतं, दिवसभर बोलायला एखादा विषय मिळतो. 
मधे एकदा मी भाजीची पिशवी घेवून लिफ्टमधे आलो तेव्हा एक कपल लिफ्टमधे होते. मी पटकन घरी गेलो, गाडीत काहीतरी विसरले म्हणून परत पळत गेलो, हातात पिशवी तशीच. लिफ्ट आली तर तेच कपल परत खाली चालले होते. माझ्या हातात तशीच भाजीची पिशवी बघू त्या मुलीला वाटले मी घरपोच ताज्या भाज्यांची डिलीव्हरी देतो, ती म्हणाली - कुठ्ल्या साईटसाठी काम करता हो?

रविवारचा प्रसंग हा माझ्या आयुष्यातला पहिला असा प्रसंग आहे की, मला अशावेळी राग आला.

प्रसंग आठवा: भाजीवाला
रविवारी मंडईत गेलो होतो. (हे थोडे मिसॉजिनीस्ट होणारे पण पर्याय नाही.) मला एकतर मंडईत जायची क्रेझ वगैरे नाहिये, भाज्या बघून खूप उल्हासानंद वगैरे होत नाही. एक कर्तव्य म्हणून मी मंडईत जातो. कर्मण्येटाईप मला फळाची अपेक्षापण नसते, पण घरच्यांच्यामते फळं आरोग्यासाठी गरजेची आहेत. एकतर माझ्यासारखी बरीच लोकं पटापटा भाज्या घेवून सुटत असतात. थोडीफार जोडपीच चिकित्सा करत घासाघीस करतात, पण तेपण पट्पट. काहीच सॅंपल आधुनिक पोरपोरी येतात आणि उच्छाद मांडतात अक्षरश:.
या लोकांने ओळखणे अतीसोपे आहे - शॉर्टबिर्ट तर हल्ली सगळेच घालतात, ही मुलं/मुली सगळी कामे अल्ट्राहळू करतात - आठवड्याभराची सगळी चर्चा तिथेच, भाजी घेताना - ऐसा करेंगे, कल टिंडी करते है, अरे कल दिदी नही आनेवाली, ठीक है, कल के लिये गोबी लेते है. हे सगळं भेंडीवाल्यासमोर उभी राहून बोलण्यात काय पॉईंट आहे? या जनतेच्या पिशव्या पण भाजीच्या पिशव्या नसतात, अडनिड्या कसल्या तरी पिशव्या. जाळीच्या पिशवीत कोणी कधी गवार किंवा भेंडी घेतं का? 
या लोकांना भाजी आणणे म्हणजे गंमत वाटते, खाऊ वाटतो खावूवू. बुशी डॅमला जावू, मुळशीला जावू तसे भाजी आणायला येतात वीकेंड इव्हेंट म्हणून. 
भाजी आणणे हे खूप रिस्की काम आहे, कसली एकेक शास्त्रं - आखूडशिंगी, बहुगुणी, दुधाळ भाजी लागते. जास्त जून नाही, जास्त कोवळी नाही, अशी भाजी बघा. त्या अळूच्या देठाचा रंग बघा (अळूच्या असे लिहिल्यावर आळूच्या आईच्चा असाच पुढचा शब्द आला होता मनात खरेतर), लिंब हात लावून अगदी मऊ/कडक नाहीत ना हे बघा, केळाचे देठ जास्त हिरवे नकोत, पालेभाजीची पाने बघा, कुणाची मोठी असायला पाहिजेत, कुणाची छोटी, त्यात एखादी भाजी जास्त हाताळली तर भाजीवाले कावणार. सांगितलेले सगळे आणायचेच, वर प्रोॲक्टिव्हली, स्वत:हून एखादी चांगली काही दिसली तर आणायची असते. एखादवेळेला सगळे जमून आले तर, घरी गेल्या गेल्या मुलांची मनं डायव्हर्ट करायला लागतात - नाहीतर, पिशवीत डोकावून, बाबा शेंगा नाही मिळाल्या, कणीस नव्हतं का, असले निरागभोचक प्रश्न विचारतात. केवढं प्रेशर असतं.
बरं हे सगळं असुदे, सगळ्याना नाही पटणार, ज्यांना टाईमपास करत सच्छिद्र पिशवीत भाजी घ्यायचीय त्यांनी घावी, मला का त्रास देता? मला त्रास दिला त्यामुळे मला हे एवढं लिहावं लागत आहेत.

मी नेहमीप्रमाणे पटापट एफिशियंटली भाजी घेत होतो. एफिशियंटली भाजी घेणे म्हणजे सोप्पे अल्गो आहे- 
१. आधी गेल्या गेल्या काही घ्यायचे नाही.
२. पूर्ण मंडईभर फेरफटका मारायचा, जनरल कुठे काय चांगले आहे ते बघायचे, भाव आपोआप कळताच.
३. नंतर एकेक घेत सुटायचे - पारंपारीक क्रमानुसार, आधी कांदे, खाली कडक, वर मऊ भाजी वगैरे.

तर मी तोंडली घ्यायला गेलो तर, अचानक मला व एका सद्गृहस्थाला ढकलून दोन पोरी पुढे आल्या. मी जावूदे म्हणालो, म्हणजे खरच जावू दे, पुढे. 
त्या निघाल्या स्लोमोशनमुली. स्लोमोशन मुली म्हणजे - सिनेमात मुलींच्या ज्या दिलखेचकटाईप अदा स्लो मोशनमधे दाखवतात त्या सारख्या सारख्या खर्‍या आयुष्यात करणार्‍या मुली. (उदा. ओढणी सारखी इकडून तिकडे करणे, क्लच काढून केस मोकळे/एकत्र वॉटेवर करणे अपेक्षित आहे ते करुन, तो परत लावणे)

या दोन मुलींपैकी एकीने आधी समोर उभे राहून मग, कैसे दिया भैया असे विचारून असले केस नीट करणे वगैरे बिनभाजीचे उद्योग सुरू केले. भाजीवाला पण ओरडला, कितना लेना मॅडम जल्दी बोलो. हां भय्या रुको ना, असे हेल काढून म्हणूत तिथे यांची चर्चा - कितना ले? लास्ट टाईम कितने लोग थे हम, तू यही पे रहती थी क्या उसटाईम? नही श्रुती के साथ रहती थी, है ना? 
हे सर्व चालू असेतो मी आपला मिळालेल्या कोपर्‍यात भाजीवाल्याशेजारीच उभा राहिलो होतो, भाजीवाल्याकडे पाटी एकच, ती या मैत्रिणींनी घेतलीली, तो बिचारा, दादा दोन मिनीट हं म्हणून गिर्‍हाईकाची काळजी घेत होता.

शेवट या मुलींचा निर्णय झाला, पिशवी किती पुढे करावी याचा पत्ता नाही, त्यामुळे निम्मीअर्धी तोंडली खाली पडली. त्यातली थोरली खेकसली - क्या भय्या, आपको सब्जी देनाभी नही आता. भय्या म्हणाले, मॅडम सुबहसे हजार लोगोको दिया, किसीका नही गिरा, तुमको लेना नही आता.
त्यावर ही देवी माझ्याकडे बघून ओरडली - "अरे, देख क्या रहे हो, उठाओ नीचेसे ओर भरो ना मेरे थैलीमे".
मला लक्षात आले की, मी भाजीवाल्याशेजारी उभा असल्याने तिचा गैरसमज झाला आहे की मीपण भाजीवाल्याचा सहकारी आहे. मी शांतपणे म्हणालो - मै कस्टमर हूं, आपका हुवा तो पाटी देदो, मुझे खरीदना है.
आजातागायत भेटलेले सगळे, यापॉईंटला मला - "सॉरी चुकून आपल्याला xyz समजलो" असे म्हणाले आहेत. 
पण यांच्यातली धाकटी म्हणाली - "कस्टमर है तो क्या हुआ, हेल्प करो"
मी म्हणालो - "आप करो ना, आपकी फ्रेंड है ना"
तर तिने असा काही लूक दिला की, मी आणि चिखलात हात घालू? एव्हाना भाजीवले काका वैतागले आणि त्यांनीच ती सगळी खालची तोंडली जमा केली, तर ही बाई म्हणे, बदलून द्या, खाली पडलेली  नकोत.

पुढे बरेच रामायण झाले, ते लिहायला मला आता बोर झाले आहे. शेवट भाजीवाल्यानी त्यांना रागावून कटवले, आणि मला फायनली तोंडली मिळाली. जाताना पोरींनी मला रागीट लूक दिले.

एकूण लोकं नीट वागत नाहीत राव, हल्ली. 

***

Sunday, November 26, 2017

साईड-स्टॅंड पॅरॉडॉक्स

साईड-स्टॅंड पॅरॉडॉक्स.

म्हणजे एखाद्याला मदत करायला जावे आणि त्या मदतीमुळेच त्या व्यक्तीची अडचण व्हावी. काल एकाला मी जोरात सांगितलं - "ओ, साईड-स्टॅंड लागलय". हे गेले कित्येक वर्षं, मी अनेकांना सांगितलं आहे, आणि त्यांचा-त्यांचा जीव वाचवला आहे. तू आजपर्यंत काय काय समाजसेवा केली आहेस असे कुठल्या फॉर्मवर विचारले तर -
१. लोक गाडीवरुन जाताना त्यांचे साईड-स्टॅंड लागले असले तर त्यांना तसे सांगून वाचवले आहे
२. लोक गाडीवरुन जाताना गाडीचा दिवा लागला असेल तर (म्हणजे सकाळी, दुपारी) तर त्यांना तसे सांगितले आहे.
काल ज्या मनुष्याला सांगितले, तो मनुष्य मी हे सांगेपर्यंत शिस्तीत जात होता. माझ्या बोलण्याने त्याचे लक्ष विचलीत झाले आणि धाप्पकन पडला, त्याच्यावर ती बुलेट - माझ्याकडे रागाने बघायच्या आतच मी पोबारा केला. अवघड आहे यार. त्या क्षणीच मला मास्टर शिफू  आठवला कुंगफू-पांडामधला. तायलॉंग सुटू नये म्हणून सिक्युरीटी टाईट करा असा निरोप्या पाठवला आणि त्याच्यामुळेच तायलॉंग सुटला. 
मग मला वाटले ते खालीलप्रमाणे - अगदी याच क्रमाने असेच वाटले:
१. सेल्फ फुलफिलींग प्रॉफसी हा प्रकार आहे तसेच झाले आत्ता.
२. सेल्फ फुलफिलींग प्रॉफसीला मराठीत काय म्हणत असतील - असा विचार करावा लागतोच ही लाज नाही का? आई काय म्हणेल?
३. स्वकारक भाकीत वगैरे काहीतरी म्हणत असतील.
४. पण आपल्यामुळे घडलेल्या या प्रकाराला काहितरी वेगळे नाव दिलेच पाहिजे.
५. साईड-स्टॅंड पॅरॉडॉक्स म्हणूया - एखाद्याचे वाईट होवू नये म्हणून आपण जी क्रिया करतो त्यामुळेच त्या व्यक्तीचे नुकसान होणे.
६. असे प्रसंग सामाजिक जीवनात आल्यास, आपण आता म्हणायचे - अरे, हा तर साईड-स्टॅंड पॅरॉडॉक्स. हळू हळू लोकांना वाटेल खरंच असं काहीतरी असेल. अगदीच विकीवर जावून तपासणारे असे कितीसे असणार. त्यांना, विकीवर काय सगळं असतं का? स्पेलींग चुकलं असेल, अरे सायंटिफीक जार्गनमधे वेगळं नाव आहे, असे काहीतरी सांगून कटवू.
*

खरंतर, त्या माणसाने मला किती शिव्या घातल्या असतील. त्याचंही बरोबर आहे - कदाचित मी त्याचं लक्ष विचलीत केलं नसतं तर तो पडला नसता. माझही काही चूक नाहिये तसं बघायला गेलं तर - साईड-स्टॅंड मिटलं नसेल तर गाडी वळवताना पडलेले असे असंख्य लोक पाहिले आहेत मी, त्यामुळे मी असं सांगतो लोकांना. (शिवाय समजा त्या मनुष्याला एखाद्या ओळखीच्या माणसाने हाक मारली असती तर लक्ष विचलीत होवून तो पडला असता ना? गाडी चालवताना सतर्क राहायला नको का?)
दोघांचही बरोबर. 
असं आजकाल खूप व्हायला लागलं आहे - दोन्ही बाजूंचं बरोबर पण तणातणी. तण उपटणं भयानक अवघड आणि शक्तीचं कामं असतं. म्हणजे दोन्ही बाजूंचे मुद्दे बळकट असतात, पण ते एकत्र मांडले की भांडण/विवाद होतात. मला आताशा हे दुपारचं ऊन चढू लागलं आहे.
मनुष्याचं वय वाढलं की त्याचे विचार जास्त ॲब्स्ट्रॅक्ट व्हायला लागतात. 
दोन्ही बाजूंचे पटायाला लागल्यावर विजयी कोण हे कसं ठरवायचं यावर मी बरेच दिवस विचार केला मग सोल्यूशन मिळालं मला. प्रत्येकाचं सोल्यूशन वेगळं असतं ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार. मी ठरवलं आहे की, दोन बाजूचे लोक भांडत असले की, जो सगळ्यात कमी आक्रस्ताळेपणा करले तो जिंकला. 
लोकांच्या मनातली आक्रस्ताळेपणाची व्याख्या आणि माझ्यामनातली आक्रस्ताळेपणाची व्याख्या ही वेगळी असणार. म्हणजे कमालीची वेगळी म्हणावी इतपत वेगळी असणार. काही लोक बौद्धिक हिरो बनून सर्वसामान्य निरीक्षणातून जे समजते त्याबाबत प्रश्न उभे करतात मग समोरच्याचे ततपप झाले की, हे एक मंदस्मित देणार. स्मर्क म्हणतात तसे. याच पॉईंटला मला अनेकदा, हिंसा हा पर्याय असूच शकत नाही हे म्हणणे पटत नाही. अशावेळेला स्मर्कधारी स्त्री/पुरुषाच्या सण्णकन कानाखाली हाणावी असे वाटते. तुझे मुद्दे बरोबर असले तरी असे मांडतात का? तू दुसर्‍याला बोलण्यात हरवू शकतोस ना? मग हे घे, आता मारण्यात हरवून दाखव. एका लिमीटनंतर चर्चेने वाद सोडवा वगैरे म्हणणारे लोक मला फ्रॉड वाटतात. का चर्चेने? तुम्हाला ती चांगली जमते म्हणून का? आम्हाला हाणामारी चांगली जमते, आम्ही हाणामारीने सोडवू. एक डिस्क्लेमर म्हणजे मला चर्चा वा मारामारी दोन्ही नीट जमत नाही. एककाळ मारामारी बरी जमायची. खूप हुशार लोक जेव्हा माज करतात तेव्हा मला राग येतो. इन जनरल माजुर्ड्यांचाच मला राग येतो. 
मानसोपचारतज्ञाकडे जायची गरज नाही कारण मला आधीच माहीत आहे की, या अतीव रागाचे मूळ माझ्या लहानपणी अशी काहीतरी एक माजरिलेटेड घटना घडली आहे त्यात आहे.
मी लहानपणी एका समवयीन भावाबरोबर बुद्धिबळ खेळायचो - या मनुष्याबरोबर डाव नेहमी ड्रॉ व्हायचा, कधी कुणी जिंकले तर मीच जिंकायचो. मी जिंकल्यावर पटकन विषय बदलून (म्हणजे कुठला विषय चालू नसायचाच त्यामुळे विषय घालून म्हणले तरी चालेल) हवापाण्याच्या गप्पा मारायचो, याला वाईट वाटू नये म्हणून. एकदा हा सद्गृहस्थ माझ्याविरुद्ध जिंकला आणि त्याचा तो जल्लोष म्हणजे अशक्यच, मी विसरूच शकत नाही. म्हणजे कधीही जल्लोष शब्द वाचला की मला तो प्रसंगच आठवतो. 
तर ह्याचा परीणाम म्हणून मी कायमचा माजविरोधी बनलो आहे. मला शेरलॉक, हाऊस वगैरे मंडळी आवडली तरी माझे पहिले प्रेम मिस मार्पल याच आहेत.
(
कधीकाळी मी कोणा सिरियल किलरचा पिक्चर काढला तर आमचा किलर सगळ्या माजुर्ड्या लोकांना मारणारा असेल. त्याला शोधणारा डिटेक्टीव्ह एकदम नम्र पण ठाम, निष्ठावंत वगैरे. त्यामुळे किलरला डिटेक्टीव्हविषयी सहानुभूती असेल. पण या सगळ्यात एक लुडबूड करणारा चांगला पण माजुर्डा पत्रकार असणार. क्लायमॅक्सच्या आधी डिटेक्टीव्हला कळणार की, अर्रे यार, हा किलर आता पत्रकारालाच मारणारे. मग क्लायमॅक्स म्हणजे अगदी - किलर पत्रकाराला गोळी घालणार तेवढ्यात डिटेक्टीव्ह बाबापुता करत किलरला समजावणार की, असे नको करुस. तू स्वत: कसा चांगला आहेस पण तेवढी एक लोकांना मारण्याचीच सवय वाईट आहे ना तुझी? तसे हे माजुर्डे लोक पण चांगलेच असतात फक्त माज करायचीच सवय वाईट असते, इग्नोर करायला शीक त्यांना. मग किलर म्हणेल - हाहाहा, तुला काय वाटलं, तुझ्या लेक्चरने मी सुधारेन, अज्जिबात नाही. हा मारतो बघ याला. तेवढ्यात परत हाहाहा - यावेळी डिटेक्टीव्ह. तो म्हणेल - बघ एकदा आरशात स्वत:कडे. (म्हणजे व्हर्च्युअल आरसा, एखाद्याचे मन कसे आहे ते दाखवणारा, शरीर नव्हे.) बघ एकदा आरशात, माजुर्ड्यांना मारता-मारता तुला पण असा माज झालाय की - तू म्हणशील तेच खरं, तुझी समजूत कोणीच काढू शकत नाही. ओमायगॉड, किलरच्या डोळ्यात सेल्फ रिअलायजेशन दिसेल आणि तरीपण तो पत्रकारावर बंदूक रोखेल पण ऐनवेळी स्वत:च्या डोक्यात गोळी मारणार. संपूर्ण पिक्चरमधे कधीतरी हा सिरियल किलर का असा किलर झाला हे दाखवायचे, करुण प्रसंग, बासरीच्या म्युझिकमधे. मग शेवट त्याने आत्महत्या केली की त्याचे उदात्तीकरण सुफळ-संपूर्ण.

मी असा पिक्चर काढणार नाहीये. जर असा किलर अस्तित्वात असेल, आला, येणार असेल तर ती माझी आयडीया नाही. हे सर्व काल्पनिक आहे. खून करू नका. 
)

तर तसं असतयं हो बरेचदा. शब्दप्रभू लोक चर्चेसमधे (चर्चाचे प्लुरल) एखादा कळीचा मुद्दा मांडतात आणि मग विजयीमत्त भाव धारण करतात. एकेकाला फोडला पाहिजे ओल्या वेताने. (अजून एक डिस्क्लेमर: मी ॲक्च्युअल वेताने फटके खाल्ले आहेत. ओल्या नाही. तरीपण हे वाक्य - I deserve to write.)
गेला काही वेळ मी फारच प्रो-हिंसा लिहीत आहे. मी काय असा on the edge वगैरे नाहिये. पण वाटतं ना राव एकेकदा. आपलंपण मत आहे. आणि तात्कालिक आहे, बदलेल कदाचित.

मला बरेचदा असंपण वाटतं की, मला जे वाटतयं ते अजून कुणालातरी वाटत असेल. हे तर अतिअमहाफालतू आहे, मेन पॉईंट हा आहे की - माझ्यासारखी जडणघडण असलेला एखादा असेल त्याला पण अगदी याक्षणीच नव्हे पण साधारण वर्तमानकाळात अशाच प्रकारचे विचार मनात येत असतील की. आणि असे बरेच लोक असतील. आपल्याला नाही का मिटींगमधे वाटते - ही भारी कमेंट टाकावी, लोकं इम्प्रेस/गारद होतील, पण आपण भीडेखातर तसे करत नाही. नंतर कधीकधी दुसरं कुणीतरी करतं आणि त्या मनुष्याचं कौतुक होतं. असं बरेचदा झाल्यावर एखादवेळेला आपण हिय्या करून अशी कमेंट टाकतो आणि जनता इंप्रेस होतच नाही.
*

साईड-स्टॅंडवरून कुठे आलो आपण. साईड-स्टॅंड पॅरॉडॉक्स लक्षात ठेवा.
***

Tuesday, August 15, 2017

जय फ्लेक्स.

कुणालाही काहीही आवडू शकतं, लोकांना बेकायदेशीर गोष्टीपण आवडतात. मलाही कधीतरी काही बेकायदेशीर गोष्टी पटतात. काही गोष्टींबाबत विरुद्ध विचारसरणीच्या लोकांचे एकमत होते आणि मी फारच यडा ठरतो.
असं झालं की ब्लॉग हा एकच पर्याय आहे.

मला कायदेशीर-बेकायदेशीररीत्या लावलेले फ्लेक्सबोर्ड आवडतात. आणि त्यामुळे झालेलं शहराचं विद्रुपीकरण, सो कॉल्ड विद्रुपीकरण भयंकर आवडत. (मला सो कॉल्ड शब्दरचना वापरण अज्जिब्बात आवडत नाही, पण मला फ्लेक्सबोर्डीय विद्रुपीकरण - हे विद्रुपीकरण नाहीये हे सांगण जास्त महत्वाचं वाटतं त्यामुळे, मनावर दगड ठेवून सो कॉल्ड शब्द वापरला. कळण्याएवढा मोठा झालो आहे तेव्हापासून आजतागायत मी सो कॉल्ड असे उच्चारले नाहीये. आज लिहीला, बहुधा पहिल्यांदाच.)

अपरिहार्य कारणांमुळे फ्लेक्सबोर्ड विषयातून मधेच छोटासा ब्रेक घ्यायला लागतोय.

कुणालाही काहीही आवडू शकतं व ते जमू शकतं पण ज्यांच्या आवडीनिवडी बहुतमतीय असतात त्यांची चंगळ असते. उदाहरणार्थ गाणे येणारे. सगळे लोक जमले - स्नेही, नातेवाईक टाईप की, गाणं येणारे लोक, गाण्याकडे चर्चा वळवतात. वळवतात काय कधीकधी तर हॅंडब्रेक मारुन, अक्षरश: यू टर्न मारुन चर्चा गाण्यावर आणणार. काय अर्थ आहे का यार? आम्ही ऐकू ना रेडीओ, सीडी, फोनवर गाणी, आम्हाला हवी ती. एवढं रियाजबियाज, मेहनत करुन मग, ज्यांना म्युझिक कंपनीने सिलेक्ट केलयं त्यांची ऐकू ना. जेवायला बोलावलयं तर खायला द्या ना. मग लोकं म्हणणार - हां अरे, ते गा ना, ते तुला फार छान जमतं. मग हे गणू लोक - हो हो बरेच दिवस झाले आता, जमतयं का नाही वगैरे हंबल कमेंट करुन, स्वत:चीच कमेंट पूर्ण करायच्या आत ते गाणे सुरु करतात. अशी यांची n गाणी होतात. मग लांबड संपते.
आम्ही म्हणतो का, आम्हाला कोडींग फार छान जमतं. आम्हाला कुणी करतं का फर्माईशी - वा वा काय सुंदर कोड झाला हा...अरे तुला मल्टीथ्रेडींग छान येतं, एखादं काउंटडावून लॅच लिहून दाखव ना, नाहीतर नको - सायक्लिक बॅरिअर लिही. होतं का असं? आईच्ची कटकट.
जर कुणाला वाटत असेल की लोकांचे कौतुक केले तर याच्या पोटात दुखते. ते तर आहेच हो. पण त्याहून जास्त त्रास म्हणजे, बोर किती होतं यार इतरांना, सगळे गाणेरडे लोकं पकडून करा ना मैफिल तुमची.  शिवाय आमच्या आवडीनिवडीचं काही आहे का नाही? आजच्या प्रोग्रेसिव्ह भाषेत, आमची कुणाला काही पडलीय का नाही? हा हा हा. कॉमेडीशोवाले असेच हसतात. स्वत:च.
ब्रेक संपला आहे.

मला आजतागायत फ्लेक्सबोर्ड याविषयी सिरीयसली चांगलं बोलणारं कुणी भेटलं नाहीये. उपहासाने वगैरे लोक छान बोलतात पण सगळ्या पार्टीचे, विचारसरणीचे लोक मिळून शिव्याच घालतात. 
खरेतर लोकांनी, किंवा नेत्यांनी विविध कार्यक्रमांनिमित्त फ्लेक्सबोर्ड लावले तर काय प्रॉब्लेम आहे? शहर विद्रुप होते म्हणे? जाता येता शंभर ठिकाणी, मधेच बच्चन, हृतिक, असंख्य नट्या, विशेषत: दागिन्यांच्या जाहिराती करणार्‍या नट्या यांचे भलेमोठे बॅनर बघताना नाही का वाटत की शहर विद्रुप होते याने? (वाटत असेल तर मग हे वेगळं पब्लिक आहे, त्यांच्याशी माझा वाद नाही. त्यांच्याशी वेगळी चर्चा करावी लागेल. ते एखाद्याला फाशी देवू नका कारण मूळात फाशीची शिक्षाच चुकिची आहे म्हणणारे असतात ना तसला वर्ग असेल हा). 
जनरल जनतेला असले मेकप केलेल्या सेलिब्रिटींचे फ्लेक्सबोर्ड चालतात. पण एखाद्या गल्लीत चार जणांच्या ग्रुपने गॉगल बिगल घालून टेचात फोटो काढून एखाद्याचे अभिष्टचिंतन करणारे बोर्ड लावले की मात्र विद्रुपीकरण? इनमिन १५ दिवस असतात ते बोर्ड, नंतर निघतात. शिवाय त्या बोर्डवरच्या एखाद्याच्या गळ्यात सोन्याचे दागिनेबिगिने असले की, अजून चेकाळतात लोक - काय तो अवतार केलाय, काय ते संपत्तीचे हिडीच प्रदर्शन वगैरे. मी एक टू-व्हिलीर-वालाली पाहिले आहेत - फातिमानगरच्या सिग्नलच्या अलिकडे असेच पोरांनी एका मित्राच्या वाढदिवसाबद्दल बॅनर लावले होते, त्यात सोने घालून उत्सवमूर्तीचा कुत्र्याबरोबर फोटो होता. टू-व्हिलीरवाली बाई म्हणाली - शी काय हे बॅनर लावलंय, काय ते वेड्यासारखं घातलं आहे आणि अंगात. पुढे सिग्नलला हीच ललना म्हणाली, जेनेलिया काय सुंदर मराठमोळी दिसते ना, त्या अष्टेकरांच्या जाहिरातीच्या बॅनरवर. ( बहुधा अष्टेकर असावेत, कोणीतरी होते सराफ - अशोक सोडून). असं कसंकाय राव? कमॉन.
आणि अशा छोट्यामोठ्या बॅनरवर यमक काय सुंदर असतात, त्याच्याबद्दल तर कोणीच कौतुक करत नाही. खाली खडबडीत रस्ता, पण चिटुकल्या बॅनरने यांचे शहर विद्रुप होते. 

हे सगळं सारकॅस्टीक नाहीये.

झालं माझ्या मनातलं सगळं बोलून. मळभ दूर झालय. धन्यवाद.