Sunday, June 28, 2009

बोधकथा-३

माझ्या पूर्वीच्या बोधकथा फारच लांबड्या आणि रद्दड होत्या असे मला जाणवले. मी परत वाचून नाही बघितल्या पण मला आतून जाणवले तसे. ही पण रद्दडच होईल.
*

ही मन्याची गोष्ट आहे. मन्या एक साधा, सरळमार्गी, पापभिरू-बापूबिरु मुलगा होता.
पापभिरू-बापुबिरु टर्म बद्दल स्पष्टिकरण गरजेचे आहे. मुळात बापुबिरु वाटेगावकर हा एक चांगला रॉबिनहूडसदृश मनुष्य होता असे खटाव तालुक्यातील व आसपासच्या भागातले लोक मानतात. मीपण तसेच मानतो (बरेच लोक तसे मानत नाहीत)
पापभिरू-बापुबिरु म्हणजे, जो शक्यतो पापभिरु असतो पण त्याच्याबाबत कुणी काही अन्याय/पाप केले की चिडतो आणि मग त्रास देतो. म्हणजे ज्याला वाईट लोकांशी वाईट वागावे लागते तेपण वाईटांनी खोडी काढल्यावर असा मनुष्य. मग तो वाहवत जाउन पर्मनंट वाईट बनतो. मूळचा मनाचा चांगलाच असतो तो पण.

तर मन्या तसा होता, म्हणजे अन्याय झाल्यावर डायरेक्ट हिंसाबिंसा नाही, आपल्यावर अन्याय करणाऱ्यांचा जमेल तसा कॉन्फरन्स ब्रिजवर जाहीर अपमान करणे किंवा ५० एक लोक असतील अशा महत्वाच्या ईमेल-चेन मधे अशा लोकांचे अज्ञान दाखवून त्यांचा पोपट करणे ही त्याची मोडस ऑपरेंडी. असो, तर गोष्ट सुरु.

मन्याच्या आयुष्यात अशी फेज आली की त्याला वाटले, खूप झाले वाईट वागणे. व्यवहारात असेच करावे लागते म्हणून किती दिवस करायचे? आपण आता एकदम चांगले वागायचे.
मन्या प्रचंड मेथोडिकल प्राणी.
रोज आपण सर्वात जास्त वाईट वागतो त्या क्षेत्रात चांगले वागणे जमले तरच खरे. म्हणून त्याने नोकरीत चांगले वागायचे ठरवले. तो प्रोफेशनल होताच पण चांगले वागण्यात नक्कीच कमी पडायचा.
आपण काय करतोय त्याबबतीत फंडे क्लिअर असावेत म्हणून त्याने "चांगले वागायचे" म्हणजे कसे याचे नियम ठरवले -
१. वाईट लोकांशी शक्यतो वाईट वागायचे नाही. वाईट कोण वगैरेची व्याख्या त्याला गरजेची नाही वाटली. ज्याचे त्याला कळत असते कोण वाईट आहे ते.
२. कुठल्याही मेलमधे किंवा कॉलवर "टू द पॉईंट" उत्तरे द्यायची, वैयक्तिक पूर्वग्रह प्रदर्शित करायचे नाहीत.
३. स्वत:वरही अन्याय होउ द्यायचा नाही. स्वत:वर अन्याय होत आहे असे वाटल्यास करणाऱ्यांना सरळ सांगायचे - हे चूक आहे. बदला म्हणून आपण काही चूक वागायचे नाही.
मन्याच्या मते तिसरा पॉईंट महत्वाचा होता, बरेच संत लोक स्वत:वरच्या अन्यायाची दखल घेत नाहीत, जे चूक आहे असे त्याला वाटायचे.
असे एकुण ग्रॉउंडवर्क झाल्यावर त्याला वाटले आपल्याला हे जमू शकते कारण वागणुकीत जास्त काही बदल नाहीयेत. फक्त स्वत:हून कुणाची खोडी काढायची नाही, आणि कुणी आपली खोडी काढली तर तिसऱ्या नियमानुसार वागायचे.

त्याने तसे वागायला सुरु केले. दिवस चालले होते, साधारण महिना झाला तरी कोणी काही दखलच घेईना. म्हणजे कुणी दखल घ्यावी म्हणून त्याने असे वागणे सुरु केले नव्हते, पण लोकांना इन जनरल कळायला पाहिजे की हा किती चांगला वागतोय ते. लोक दखल घेत नाहीयेत हे बरेच आहे असे म्हणून त्याने चांगले वागणे सुरुच ठेवले.

दिवस तसे वाईट होते, मंदीचे होते. त्याच्या ऑफिसला कळून चुकले आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, ऑफिसने मोहिम हाती घेतली - सगळीकडे आपला प्रेजेन्स दाखवायचा. ईतरांनी म्हणले पाहिजे, हे लोक नसतील तर शक्य नाही बुवा क्लायेंटला सांभाळणे.

मन्यालाही ऑर्डर्स मिळाल्या की, दुसऱ्या सेंटरमधल्या कुणालाही अनॉफिशीयली मदत करायची नाही.

मग एक स्कँडल झाले. स्कँडल शब्दासारखे भयानक असे स्कँडल नाही, मन्याच्या मनातले स्कँडल - त्याला संभ्रमात टाकणाऱ्या दोन घटना -
१. दुसऱ्या सेंटरमधे एक अतिमहत्वाचा ईश्यू झाला, ज्यात फक्त मन्याच मदत करु शकणार होता. मन्याने आपल्या सर्व जुन्या मित्रमैत्रिणींच्या छोट्याश्या मदतीच्या याचना कठोर हृदयाने ठोकारल्या. मग ऑफिशियली त्याच्या स्वत:च्या सेंटरकडून आदेश आल्यावर त्याने एका फटक्यात सगळ्यांना मदत करुन ईश्यू संपवला.
मन्याच्या व त्याच्या सेंटरच्या स्तुतीचे मेल वाहू लागले. आपल्या चांगले वागण्याच्या निग्रहानुसार त्यानेपण लिहून टाकले- मी योग्य मार्गदर्शन केले तसेच इतरांनीपण मोलाचे काम केले. हे वाचून त्याची मदत घेणारे इतरेजनपण खूश झाले.

२. काही दिवसांनी दुसऱ्या सेंटरमधे परत तसा़च एक अतिमहत्वाचा फक्तमन्या ईश्यू झाला. मन्याच्या सेंटरमधे त्या इश्यूची विशेष कल्पना नव्हती तोवर त्याने आपल्या मित्रमैत्रिणींना कटकट नको म्हणून फटकन ऑफलाईन मदत केली.
जास्त लांबड न लागता सर्व रामायण संपले म्हणून तो शांत झोपी गेला. सकाळी उठून बघतो तर काय - ज्यांना मदत केली त्यांनी उगाचच जगभराला एक मेल केला की, "काल असे असे झाले व आम्ही सगळे आमचे आम्ही निस्तरले." एकुण मन्याची, तुमच्या सेंटरची गरज नाही आम्ही स्वावलंबी आहोत असा उग्र दर्प होता त्यात.
आता "चांगले वागणे"च्या तिसऱ्या नियमानुसार तुम्ही माझ्यावर अन्याय करत आहात असे तरी कसे सांगणार मन्या, तसे म्हणाला असता तर त्याला आपल्या साहेबांचे जोडे बसणार.
मग मन्याने ज्या मनुष्याला ऑफलाईन मदत केली त्यालाच ऑफलाईन जाब विचारला तर त्याला उत्तर मिळाले - एक ओशाळवाणा स्मायली.

हे सर्व काही स्कँडल वाटत नाही पण मन्याच्या मनात याने मोठ्ठे मंथन वगैरे झाले. पहिल्यावेळेला आपण बरोबर वागलो, दुसऱ्या वेळेला अगदीच आदेशाचे उल्लंघन नाही केले, बरोबरच वागलो. आपल्यावर बारीकसा का होईना अन्याय झालाच शिवाय तिसरा नियमपण पाळता येत नव्हता, सगळे फंडे गारद.
पूर्वी अशी काही कॉम्प्लिकेशन्स नव्हती हे जाणवले त्याला. तातडीने त्याने बोध घेतला व पूर्वीसारखे वागू लागला. नंतर एकदा दुसऱ्या घटनेचा त्याने बदलासुध्दा घेतला (पापभिरु- पध्दतीने)

अधेमधे मन्या सेंटी होतो व सगळ्या स्कँडलबाबत चिंतन करुन आढ्याला(नियतीला) प्रश्न विचारतो की, असे का वागावे लोकांनी?
गाण्याचा मूळ अर्थ सोडून गाण्याला आपल्या जीवनाशी रीलेट करण्याची मन्याची जुनी सवय. एक दिवस तो नुसरत आणि एडीची गाणी ऐकत होता.
फेस ऑफ लव्ह लागले, ओळी होत्या -
जिना कैसा प्यार बिना
इस दुनियामें आये हो तो
एक दुजेसे प्यार करो
मन्याला एकदम आठवले. "हो हो, असेच वाटले होते दुसऱ्या घटनेच्या आधी अनऑफिशीयली मदत करताना. काहीही होवो यार, आपण चांगले वागणे सोडून द्यायला नको होते राव"

पण त्यानंतर लगेच द लाँग रोड लागले -
And the wind keeps roaring
And the sky keeps turning gray
And the sun is set
The sun will rise another day...

We all walk the long road. Cannot stay...

लगेच मन्या स्वत:वर खूश झाला. पुढे कधीतरी वागू चांगले, सध्या तरी बरोबरच केले आपण च्यायला, असे म्हणाला. पुढे लाँग रोडच ऐकतच बसला लूपमधे.
**

तात्पर्य/बोध:
कसला आलाय डोंबलाचा बोध, बोर झालो मीच इथे. मागच्या कुत्र्यामांजरीच्या बोधकथा बऱ्या म्हणायची पाळी आली. तरीपण तात्पर्य हे लिहीलेच पाहिजे.

१. सगळ्यांशीच चांगले वागायला गेलात तर आपलेच वाईट होते.
२. संतलोक खरंच संत असतात, एकदा चांगले वागायचे ठरविले की पहिला बोध लक्षात ठेवायचा आणि तरीही चांगलेच वागायचे.

***

Sunday, June 21, 2009

उल्लेखनीय डायलॉग्स

आमच्या अपार्टमेंटमधला सर्वात मोठा(वयाने व ज्ञानाने) मित्र काही डायलॉग वापरुन, वेळोवेळी आम्हा उर्वरीत दोघांना योग्य ती समज देत असतो. आम्ही सर्वार्थाने लहान असल्याने व कसे वागावे याची काही पोच नसल्याने त्यांच्यावर अशी समज देण्याची पाळी वारंवार येते (बरेच डायलॉग हे एकाच अर्थाचे पण फक्त वेगळ्या शब्दात असतात)
खालील डायलॉग्स दिवसातून एकदाही ऐकायला मिळाले नाहीत तर कसेतरी होते -

१. मार्केट मे शरम नाम का एक सामान मिलता है, वो खरीद लेना सौ रुपये का खुद के लिये.

२. अता पता तो कुछ है नाही, आगये जबान लडाने हमसे.

३. कर दी देसी-पंती? खुदका कल्चर तो बिगाड दिया, गोरोंको भी बिगाड के छोडोगे तुम.

४. तुम्हारे गांव में कभी किसीने ऐसा किया था?

५. जाके अपने गांव में बोतल बनानेका कारखाना डालो, आगये सॉफ्ट्वेअर बनाने.

६. व्हिसा किसने दिया तुम्हे? / व्हिसा कब एक्सपायर होगा तुम्हारा?

७. एक खीच के दूंगा, चेहरे पे महाराष्ट्र/एम. पी. का नक्षा निकलेगा. (दोषी व्यक्तिनुसार राज्य बदलते) - हा लेटेस्ट डायलॉग, हल्ली हल्लीच पेपरमधे वाचला त्यांनी.

८. बद्तमिज इन्सान, तुम्हे देखके तो बद्तमिजी भी शरमा जायेगी.

९. सिव्हिलायझेशन के बारे मे तो सुनाही नही होगा तुमने.

१०.
(ऑफिसमधून उशीरा घरी आल्यास)
१०.१ एक बार पता चल गया, दिमाग नही है अपने पास, तो ऍक्सेप्ट करलो, क्यों हमेशा ट्राय करते बैठते हो?
१०.२ आगये रंगरैलिया मनाके? खालो अब चार निवाले, बरतन चमकने चाहिये.

११. जनमदिन कब है तुम्हारा, प्रशाद चढाके आवूंगा भगवानको तुम्हारे लिये.

१२. Are you out of your holy smoking, hippe freaking mind? (SNL मधे हा डायलॉग ऐकल्यापासून त्यांनी आपलासा केला आहे)

१३. (जेवताना)
यार, रोज खाना खाते हो, कभी भगवान का शुकर मानते हो? अकल के हिसाब से खाना मिलने लगा तो सालभर में एकाद रोटी के भी लाले पड जायेंगे तुम्हारे.

१४. मैं लायब्ररी जा रहा हूं, आ रहे हो? ओ सॉरी सॉरी, मैनेभी किससे पूछा.

१५. आज ऑफिसमें तुम्हारी बहोत याद आ रही थी फिर मैने डस्टबिनकी तर्फ देखा.

१६.
कॅज्युअल विचारपूस
काय झाला? बाळ रडत होता? - हा माझ्यासाठी राखीव.
कैसन छोटे ठाकूर? लूट ली इज्जते? - हा दुसऱ्यासाठी राखीव.

हे सर्व अपमानास्पद वाटू शकते पण ते अतीव प्रमापोटी आमच्याशी असे वागतात. म्हणूनच मी त्यांच्या आज्ञेनुसार हे लिहीले आहे.
आमची स्तुती करणारे ३-४ डायलॉगपण आहेत पण ते लिहीण्यास परवानगी नाही.

***

Monday, June 8, 2009

निरर्थक-४

आज अशक्य, प्रमाणाबाहेर निरर्थक.
सवय लागली आहे आजकाल निरर्थकतेची. म्हणजे निरर्थक लिहायची, डोक्यात चक्रे तर कायम अशीच फिरतात. हात दुखेपर्यंत लिहीणार आज - महाभयानक असंबध्द, दुर्बोध झाले तरी हरकत नाही.
टॅगमधे लिहावे सगळे. प्रत्येकानेच टॅगमधे लिहावे खरे तर.

<सुरुवात> <!- जून निरर्थक आणि असंबध्द वैचारीक महिना आहे-->

<नो-नेम>
किती वर्षे, नाम, क्रियापद, विशेषण, कर्मणी, कर्तरी प्रयोग? मेज्जर रिफॉर्मची गरज आहे भाषेला. पुढे मागे मशिन्सनी टेक-ओव्हर केले तर त्यांना टॅग्जमधले वाचायला सोप्पे जाईल हे. मशिन्स खूश होतील, शक्यतो जेत्यांच्या बाजुला असावे आपण. मशिन्स हरली तर नुकसान काहीच नाही.

ढगाळ हवा कारणीभूत आहे असले काहीतरी विचार मनात यायला. मागच्या वेळी पाउस होता, आता ढगाळ हवा, मग कोवळे ऊन कारणीभूत आहे म्हणाल, मग कडक ऊन - आपला मेंदू कारणीभूत आहे शेवट. नाहीतर, जास्त काम केले की असे होत असावे.
काम एक भारीच. पूर्वी चांगले होते, कधी कुणाचा जॉब जाउ नये असे वाटायचे. वामनराव पैमहाराज जसे म्हणतात, सर्वांचे चांगले होउदे, तसे वाटायचे. आता जाता येता, कुणी दिसला तर, हा बरा आहे-हा राहुदे, हा बेक्कार आहे - ह्याला फायर करायला पाहिजे असे वाटते. सॉरी.
</नो-नेम>

<ऑफिसमधे घडलेला प्रसंग>
खोलीत ३ जणं होतो. मी ‘अ’ टीमचा, बाकी दोघे‘ब’वाले. मी निवांत, आमचे सगळे नीट चालायला लागले होते.

ब टीममधला एकजण दुसऱ्याला म्हणाला - "I can see 2 million pending transatcions in the queue".
दुसरा म्हणाला, "Wait...how can it be, I've got 1.5 million pending"

दोघांकडे बघून मी कुत्सितपणे म्हणालो, "So, whose problem is it, yours or yours?"
एकजण काय बोललाच नाही. दुसरा निरागस, तो म्हणाला, "It's our problem, dude"

मीपण काय म्हणालो नाही मग. सगळे मनातच बोललो नंतर - "That's the problem with english".
हा मनुष्य मला म्हणाला, इट्स ‘अवर’ प्रॉब्लेम. अवर शब्द चूक आहे इथे.
टेक्निकली अवरमधे मीपण येतो कारण मीपण आहे या खोलीत. आणि ह्यांची पेंडिंग ट्रॅन्जॅक्शन्स ही काही माझी समस्या नाही - तुम्ही बसा बोंबलत, आयॅम कूल.

हिंदीमधे तो म्हणाला असता, "ये हमारा प्रॉब्लेम है" - इंग्लिशसारखेच

मराठीत तो काय म्हणाला असता, - मित्रा(सारकॅस्टिक) हा ‘आमचा’ प्रॉब्लेम आहे.
‘आम्ही’ आणि ‘आपण’ मधे फरक आहे. नेटवर शोधायला पाहिजे याला काय म्हणतात. मिळाले
</ऑफिसमधे घडलेला प्रसंग>

<नो-नेम>
Long tireless quest is the very essence of any classical Mahakavya. महाकाव्याऐवजी ईपिक म्हणायला पाहिजे होते. असो. हिरोचा वर्षानुवर्षाचा विविधतेने नटलेला प्रवास असल्याशिवाय महाकाव्य होउच शकत नाही. मग प्रवास सुफळ असो वा निष्फळ असो. अनेक उदाहरणे आहेत यावेळेला.

राम, पांडवांचा प्रवास. सुमेरियन महाकाव्यामधे, ग्लिग्मेश आणि एंकिदुचा प्रवास. होमरचा युलीसीस तर भटकतच राहीला लेकाचा. फिनीश कालेवला वैनामेननच्या सफरीने भरलेले आहे. म्हणजे साधरणपणे एकच सूत्र असते. सगळे चांगले चालू असते, घराबाहेर पडायला लागते काहीतरी चांगल्यावाईट कारणाने. मग अथक प्रवास, कोण कोण लोक भेटतात. चित्रविचित्र प्राणी-पक्षी. राक्षस मारा, नद्या दुभंगा, वेश पालटून रहा, पोरी मागणी घालतात त्यांना नाकारा. वैनामेननसारखे कधी स्वत:च पोरीला मागणी घाला. मित्र मरतात, ग्लिग्मेशसारखा दिवसेंदिवस शोक करत बसा. मासे मारा. असे करत करत शेवट मग मोठ्ठे युध्द होते.
आणि आयुष्याचा प्रवास वगैरे काही रुपक नाही चालणार - ऍक्च्युअल फिजीकल प्रवास पाहिजे, तरच सारखे काहीतरी होत राहते.

आपल्यासारखे नसते राव ह्या महाकाव्यातल्या नायकांचे. मला पुणे-कराड-तासगाव प्रवासात प्रश्न पडणार, वाटेत अतीत येते का? तेथे एस्टी थांबली तर चहा टाकावा का कोल्ड्रींक, बास संपले.
मधेच खंबाटकी घाटात दहा तोंडांच्या अजगराने विळखा घातला आहे. तिथे गाडी थांबते. कंडक्टर म्हणतो, ज्याच्याकडे LG चा फोन आहे आणि ज्याने शिरवळला पाव किलो अंजीरे विकत घेतली तोच या अजगराची खांडोळी करु शकेल. मग आपल्या अंजिराच्या पिशवीकडे जनता बघणार. ठीक आहे, असे म्हणत उठायचे मग गाडीतून उतरुन अजगर बघुन ह्याचे दहातले एकतरी तोंड कुठे आहे हे शोधताना, एक जख्खड म्हातारा येणार आणि हातात एक तंबाखुची चंची देणार जी पुढे कुठतरी क्लायमॅक्सला उपयोगी पडेल.
हे असले व्हायला पाहिजे काहीतरी.

पण असले काही होत नसते म्हणूनच वाचायला बरे वाटते. असो ज्यांना ज्यांना महाकाव्य किंवा दर्जेदार फिक्शन लिहायचे आहे त्यांनी हे पुढचे लक्षात ठेवावे.
Long tireless quest, that's the crux - हर्क्युलीस, फ्रोडो, पांडव, अहब कुणाचीच प्रवासातून सुटका नाही झाली. कालपरवाचा तो अल्केमिस्टवाला सँटिगोपण फिरत होता येड्यागत - महानायकाने प्रवास हा केलाच पाहिजे.
</नो-नेम>

<वरच्या टॅगविषयी>
हा वरचा टॅग शो-ऑफ करणारा होता. वाचणाऱ्याला वाटायचे लिहीणाऱ्याने सगळे वाचले आहे खरंच एवढे काय काय.

.<अचानक रुममेटशी झालेला संवाद>
सुन, तेरे आँखोके सामने कभी अचानक हवामें धुंदलीसी आकृती बनती है कभी?
लहानपणी व्हायचे असे कधी कधी मला. कधीपासून दिसायला लागल्या तुला डोळ्यासमोर आकृत्या?
अभी, गॅलरीमें खडा था तभी हुआ.
काय करत होतास?
कुछ नही, सिगरेट पी रह था यार.
गेट आउट
.</अचानक रुममेटशी झालेला संवाद>

हां तर, हा वरचा महाकाव्यवाला टॅग शो-ऑफ करणारा होता, पण कुठल्याही विषयावर एक पान लिहायला, त्या विषयाचे चार ओळी वाचन पुरेसे असते.
महाकाव्याविषयी खरे आहे वरच्या टॅगमधले बरेचसे. पुरेसे पुरावे दिले आहेत.
</वरच्या टॅगविषयी>

<रुममेटशी झालेला संवाद_परत>
यार, ‘तुमसा कोई प्यारा, कोई मासूम नही है’ ये गाना किस मूव्ही का है?
शोधायला पाहिजे, करिश्मा आहे त्यात एवढे आठवते.
ढूंढ ना यार, मेरे मशिनपे पंगा है.
ह्म्म.
हा बघ व्हिडीओ, खुद्दार पिक्चर - अजून बरीच गाणी आहेत तिची इथे.
कुछ भी बोल साला, करिश्माने राज कपूरपे रिव्हेंज लिया है ना पूरा? This is poetic justice.
शंभर टक्के !
</रुममेटशी झालेला संवाद_परत>

<आयुष्य_जीवन>
अजून काहीतरी लिहीणार होतो, पण अचानक रुममेटने एन्ट्र्या मारल्या आणि विसरलो आता. म्हणून शेवटच करतो.
एकुण जीवन असे असंबध्द आणि नॉर्मल आहे. महाकाव्यातल्या नायकांप्रमाणे काही महत्वाच्या टास्कस नाहीयेत. खरेतर, महानायक लहानपणापासूनच महानायक होणार हे कळते. लहानपणीच ते राक्षसांना मारतात, न्यायनिवाडा करतात etc etc. आजुबाजुच्या गुरुजनांना व वडिलधाऱ्यांना माहित असते की हे प्रकरण भारी आहे. नाव काढणार.
मी लहान असताना गुरुजन कन्फ्यूज होते. एक सर बाबांना बँकेत भेटले, ते म्हणाले ह्याला सायन्सला घाला पुढे, गणित बरे आहे याचे. भुगोलाच्या एक बाई आईला मंडईत भेटल्या, त्या म्हणाल्या, ह्याला डॉक्टर बिक्टर नका करु हो, झेपायचे नाही. घरमालक आजोबा म्हणायचे, काय कळत नाही मला याचे. म्हणजे I was never destined to be a mahanayak.

त्यामुळे सारांश काय? आणि आयुष्य_जीवन टॅग सुरु केल्याचे कारण काय? तर, एकदा कळाले माणसाला की आपल्याच्याने काही भारी होणार नाहीये की ते नीट लक्षात ठेवावे. मग कशाचेच वैषम्य वाटत नाही. आणि जीवन सुखी होते. झेपेल ते, हळू हळू करत रहायचे मग.
</आयुष्य_जीवन>

</सुरुवात> <!-- इथे गोची आहे, <शेवट> असे पण चालेल >


***

Wednesday, June 3, 2009

...

धो धो पाउस पडतोय. पाउस पडला की पब्लिक रोमॅंटिक होतं. सगळेजण म्हणतात भजी आणि चहा पाहिजे. लोक म्हणतात चांगली गाणी लावा. मग गाणी लावली की पब्लिक पाउस आहे म्हणून शांत गाणी लावा म्हणते. शांत गाणी बरेचदा उदास असतात. गझल फिजल. गझली हा प्रकारच उध्वस्त. संस्कृतात सगळीकडे सज्जन, दुर्जन , चंदन, गुलाब तर उर्दूत सगळ्यांचे प्रेमभंग आणि दारु. पावसात, चिकचिकीत कुठे जायचा कंटाळा येतो म्हणून नखरे सुचतात असले.
प्रेम, देशभक्ती आणि थेअरी ऑफ रेलेटिव्हिटी हे पूर्णपणे कळाले आहेत का कुणाला? मागचे लिहिले तेवढे सेंटी वाक्य मी लिहीले आहे याच्यावर विश्वासच बसत नाहिये. प्रेम म्हणजे किल-बिल मधले बिल आणि बेट्रिक्सचे प्रेम, तेच खरे. देशभक्ती म्हणजे, मागच्याच्या मागच्या वाक्यात देशभक्ती शब्द टाकायलाच नको होता, उदाहरण आठवत नाही लगेच.

लाईफमधे फंडे क्लिअर असणे फार महत्वाचे आहे. फंडे योग्य असोत किंवा अयोग्य, ते क्लिअर असणे महत्वाचे आहे. आपण बरोबर आहोत का चूक ते माहित असणेपण महत्वाचे आहे. बिलचे फंडे क्लिअर आहेत एकदम. तो म्हणतो - "बॅट्मॅन हा मूळात ब्रुस वेन आहे, स्पायडरमॅन हा मूळात पीटर पार्कर आहे. पार्कर, वेन यांना वेश चढवून स्पायडरमॅन, बॅटमॅन बनायला लागते. पण सुपरमॅन हा मूळातच सुपरमॅन आहे, त्याला वेश बदलून क्लॉर्क केंट बनायला लागते. हा महत्वाचा फरक आहे. तशी तू मूळातच नैसर्गिक असॅसीन आहेस..." आपल्या छोट्याश्या पोरीलापण मृत्यू समजावून ठेवला आहे बिलने. तडफडणारा मासा दाखवून.
कंपनीमधे मलिक म्हणतो, "मैं चंदू नही हूं", श्रीनिवासन नंतर म्हणतो, "मैं भी चंदू नही हूं".
हे सगळे असंबध्द आहे पण फंडे असे क्लिअर पाहिजेत माणसाचे.

मातीचा वास वगैरेपण येतो पाउस पडल्यावर. त्याचा परफ्यूम काढायला पाहिजे, लय पैसा मिळेल. पाउस पडतोय बेक्कार, एक जोडी गाडीवरून जाताना दाखवायची - टेबल लॅंडटाईप कुठेतरी. स्म्म्म्म करुन श्वास घेवून, मातीचा वास मला आवडतो म्हणणार हिरॉईन. मग हीरो आयलव्हयू म्हणणार, समोर लगेच आपला परफ्यूम. मुलगी, जिंगल आणि परफ्यूमचा आकार योग्य असेल तर चालेल परफ्यूम. असेलच असा एखादा परफ्यूम बाजारात.

पाणी बिळात भरते पावसाळ्यात म्हणून साप बाहेर येउन फिरत बसायचे चिपळूणला. इतकी वर्ष पाउस पडतोय, इतकी वर्षे बिळे बनतायत, सापांनी काहीतरी विचार केला असेल का? का अजुनपण चारपाच साप बुडुन मरतात?

पुस्तकांचा वासपण आवडतो लोकांना. नवीन पुस्तकांचा चांगला येतो. किंडल ई बूक रिडर घेतला तर तो वास येणार नाही. किंडलच्या प्लॅस्टिकचा वास आवडेल की नंतर. रेनकोट आणि छत्र्या पण येतात लगेच. काय अर्थ आहे वर्षानुवर्षे छत्र्या, रेनकोट वापरण्याला?
स्व-रुप पहा विश्वरुप नको, असा एक धडा होता विनोबांचा. त्यात एक राजपुत्र आणि राजा उन्हातून जात असतात. राजपुत्र म्हणतो चटके बसत आहेत पायाला, चामडे अंथरुया सगळ्या राज्यात जमिनीवर. राजा म्हणतो वेड्या त्यापेक्षा तु तुझ्या पायात चपला घाल. स्व-रुप पहा.
राजपुत्र जे म्हणाला तेच जर एडिसन, आईनस्टाईन किंवा गांधीजी म्हणाले असते तर.
त्याच धड्यात होते का हे?

पावसाळ्यात सर्दी होते लगेच लोकांना. सर्दीचे एक आहे, कुठल्याही ऋतुमधे पन्नास टक्के लोकांना गाठतेच ती. इतके वर्षे सर्दी होत आहे माणसाला. कुत्रीपण शिंकतात कधी कधी. इतकी प्रगती झाली, एक साधी गोळी नसावी की जी घेतल्या घेतल्या घसा खवखवायचा बंद होईल, सर्दी जाईल पाचेक मिनीटांत. काहीपण घ्या ३-४ दिवस असतेच.

पाउस बरा असतो, पिकांना पाणी , पोरांना होड्या etc. पावसाला लाच द्या. बेईमानी का धंदापण ईमानदारीत नाही. पैसा झाला खोटा !
*

हे लिहायची काही गरज नव्हती खरे तर. नाव योग्य आहे ब्लॉगचे.
***