Monday, June 28, 2010

अ‍ॅ’स्ट्रॉफी


उदाहरणार्थ, गरज ही शोधाची जननी आहे असे सर्वप्रथम म्हणणारा मनुष्य भलताच सद्‌गृहस्थ असावा. मी ही म्हण पहिल्यांदा ऐकली तेव्हा मनात विचार आला की, काहीतरी चुकते आहे - गरज ही तर चोरीची जननी आहे.
आमचे असे मत आहे की, समाज लहान मुलांच्या फ्री विलचा आदर करत नाही ‘व्हाईल’ मोठ्या माणसांच्या फ्री विलचा मात्र उदो उदो.
उदाहरणार्थ, शाळेच्या आवारात सगळीकडे - "शांतता राखा", सिगरेटच्या पाकिटावर - "धूम्रपान आरोग्यास हानीकारक असते" एवढेच. लिहा की रेटून "धूम्रपान आरोग्यास हानीकारक असते, कृपया बिड्या फुंकू नका." काय बिघडते?

असो. समाजाच्या अलिखित नियमाचा योग्य तो मान ठेवून मी २ ओळी मांडू इच्छितो -
गरजेपोटी चोरी आणि गरजेपोटीच शोध
ज्याचा त्याने, घ्यावा योग्य तो बोध.
*
या पोस्टमधे एक शोध मांडायचा आहे, हा शोध विरामचिह्नविषयक आहे, मागील पोस्टसुद्धा ‘तसले’च असल्याने प्रारंभी बोर करण्याचा एक प्रामाणिक(व स्तुत्य) प्रयत्न करण्यात आला. अन्यथा वाचकांना सुरुवातीलाच 
"Same old song, just a drop of water in an endless sea" या ओळी आठवल्या असत्या.
*
ईंग्लिशमधे अ‍ॅपोस्ट्रॉफीचा वापर अनेक कारणांसाठी होतो. मला त्याचा संक्षिप्तीकरणासाठी केलेला वापर भयानक आवडतो. मला फटाक्यांचा आणि स्पिरीटचा वासही भयानक आवडतो. असतात एकेकाच्या आवडी. तर मला आवडणारा वापर म्हणजे -
I will चे I'll, It is चे It's
Catch'em young वगैरे वगैरे.

वाक्ये/शब्द संक्षिप्त करण्यासाठी या अ‍ॅपोस्ट्रॉफीला देवनागरीत आणले पाहिजे. उपयोगी पडेल आपल्याला. आपल्या परिचयाच्या म्हणी, वाक्‌प्रचार लिहायचे असतील तेव्हा सढळ हस्ते वापर करता येईल त्याचा.
अती’माती
चोराच्या’चांदणे
सुरस आणि चम’कारीक

आम्ही सुचवलेला देवनागरीमधे अ‍ॅपोस्ट्रोफीचा वापर हा संदर्भासहीतच होतो. म्हणी/वाक्प्रचार इथे तुम्ही अ‍ॅपोस्ट्रोफी चिह्न बेधडक वापरु शकता. यामागचे गृहितक हे आहे की म्हणी तुम्हाला पूर्वीपासूनच माहित आहेत, एखादा त्या लिहीतो तेव्हा फक्त त्यांचे स्मरण करुन देणार. आता याच न्यायाने मी एखादा शब्द मागील दोन परिच्छेदात वापरला असेल आणि त्या शब्दाच्या प्रारंभीचे अक्षर वा अक्षरगट इतर अक्षरगटांपेक्षा सहजगत्या वेगळे ओळखू येत असतील तर तिथे आपण बेधडक अ‍ॅपोस्ट्रोफी वापरु शकतो. मूळ गृहितक अबाधित आहे की ज्याला तुम्ही अ‍ॅपोस्ट्रोफी लावला त्या अक्षरसमूहाचा संदर्भ वाचकाला आहे.
इथपर्यंत वाचणारे बोर झाले असतील, मला शाळेत आल्यासारखे वाटत आहे.

काय गरज आहे अ‍ॅ’चिह्नाला देवनागरीत आणायची? दप्तराचे ओझे आणखी कशाला वाढवा? "ईंग्लिशमधून का आता चिह्ने उचलायची आपण, कसले रे हे भि’डोहाळे?" असे आक्षेप उपस्थित करण्यात आल्यास आमच्याकडे काहीही उत्तर नाही.
मनात प्रामाणिकपणे काही आल्यास मांडून मोकळे व्हावे असं आमचं एक म्हणणं आहे आपलं.

बरे, आमचे विशेष काही नियम सुद्धा नाहीत. मगाशी गृहितक सांगितले की वाचकांना संदर्भ लागला पाहिजे. आता मूळ तत्त्व सांगतो. मूळ तत्त्व आहे "कंटाळा". आयुष्यात जमेल त्या गोष्टीचा परवडेल तेवढा कंटाळा करावा. एखादा जेव्हा "अती तेथे माती" असे लिहीतो तेंव्हा "अती तेथे" हे दोन शब्द वाचून वाचकाला लगेच पुढे माती शब्द येणार आहे हे आपोआप कळतेच, मग कशाला ना पूर्ण लिहून श्रम वाया घालवा?
संदर्भ गृहितक लक्षात ठेवून आणि मुलभूत तत्त्व पाळून हवा तसा अ‍ॅ’चिह्नाचा वापर करा. आमचा काही कॉ’राईट नाही.
आता हे वरचेच उदाहरण बघा मित्रांनो - extreme उदाहरण आहे, पोस्टमधे ‘कॉपीराईट’ शब्द पहिल्यांदाच आला तरीपण कॉ’राईट म्हणाल्यावर कळाला ना? मंग लेका?

आणि एक म्हणजे अ‍ॅ’चिह्नानंतर पुरेसे शब्द वापरा. अतिआळस नको.
"या चिह्नाच्या वापरावर आमचा काही कॉ’राईट/हक्क नाही" - बरोबर
"या चिह्नाच्या वापरावर आमचा काही कॉ’ट/हक्क नाही" - साफ चूक
जमेल सरावाने.

अधिक काय ते मागणे? 
अ‍ॅ’चिह्न नियमित वापरायला लागल्यापासून "हल्ली महिनाखेरीस बरेच कोरे कागद शिल्लक असतात म्हणलं" अशी लटकी तक्रार गृहिणींनी केल्यास किंवा मुलांनी "आमच्या पेनाची रिफील तुमच्या रिफीलीपेक्षा जास्त टिकते" असे त्यांच्या सोबत्यांना चिडवल्यास माझी आठवण काढून एकवार मान डोलवा म्हणजे झालं.

**

त’टीपा

१. हिंदूच्या स्वागताप्रीत्यर्थ यॉनिंग डॉगचे शुभेच्छा जेस्चर

२. या ओळीचे मालक - "कंसास बँड" यांचे आभार मानून, लेखक लगेचच या मंचावर एक नवी थिअरी मांडू इच्छितो -
बँडचे नाव म्हणून शहर अथवा राज्याचे नाव निवडल्यास त्यांचे एकच गाणे सुपरहीट होते बाकी गाणी सोसो.
पुरावे:
Kansas - Dust in the wind
Boston - More than a feeling
Chicago - If you leave me now
Nazareth - Love hurts (नजरथला पुष्टीसाठी बळेच घुसडण्यात आलेले आहे, जाणकारांनी इग्नोअर तर अजाणकारांनी सबळ पुरावा मानावे)
तेंव्हा असे वन हिट वंडर व्हायचे नसल्यास उगवत्या संगीतकारांनी कृपया आपल्या बँड/ ऑर्केस्ट्रासाठी पुणे, सातारा, छत्तीसगड, भुसावळ, चिखली अशी नावे निवडायचे टाळा.

३. ऊप्सचे फंडे लावून सांगायचे झाले तर, अ‍ॅपोस्ट्रॉफी चिह्न "Operator overloading/polymorphism" ला मेज्जर बळी पडले आहे.

***