Thursday, December 17, 2009

बाकी काय?

बाकी काय?

बाकी पाण्याची टाकी
तीही कोरडी, ठणठणीत
नावातच पाणी

बाकी केवळ सिमेंट
उन्हाच्या खपल्या मिरवणारं
दगडी रंगाचं सिमेंट

बाकी आत एक प्लॅस्टिकचा फुटबॉल
एककाळ गर्द शेवाळलेला
आता हवेतच तरंगणारा
गोळे आलेला, पांढरे पांढरे तंतू लोंबवणारा

बाकी शेजारी एक झाकण,
एककाळ रडतखडत गंजणारं
आता अक्राळ टोकं पारजणारं

बाकी आत बारकी मुलं
गच्चीवर जाण्यासाठी फटकावलेली
आता आतमधे लपंडावणारी

बाकी एक पाईपलाईन,
सुतळ्यांच्या बुशिंगची, भिंतीला चिकटवलेली
आता अँटिने लावलेली

बाकी खालीपण एक टाकी,
खालीपण खालीच
जाळीतल्या लालहिरव्या बटणाकडे
एकटक बघणारी

बाकी काय?
बाकी सगळीच टंचाई

*

आज बाकी काय प्रश्न विचारणाऱ्या व पूर्वी अनेकदा बाकी काय विचारणाऱ्या सर्व व्यक्तिंचे आभार.
***

Saturday, October 17, 2009

शुभ दीपावली


<बालिश>
दिवाळीवर दहा मुद्दे - 
१. दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे - सर्वात म्हणजे, सर्वात म्हणजे, सगळ्यात जास्त आवडणारा सण, गणेशोत्सवापेक्षापण जास्त
२. दिवाळीच्या पहिल्या दिवशी चकल्यालाडू खाताना मला "सारखं तेच तेच खाऊन कंटाळा आलाय" अशी तक्रार करायला आवडते. परंतु फराळाचे पदार्थ मला दिवाळीआधी आणि दिवाळीनंतर खायला आवडतात.
३.  माझे आवडते फटाके - चिमणी, कावळे, सुतळी बाँब, लक्ष्मीबाँब, रंगीत काड्यापेट्या, फुलबाज्या, झाड [याला काही लोक अनार म्हणतात - I ain't judging anybody here ;) ]
याशिवाय आपला पोपट करणारे सर्व  फुसके फटाके - लहानपणी एक झाड बराच वेळ का उडत नाही ते बघायला गेलो मी आणि डोक्यातच उडाले की ते. डाव्या बाजूचे केस जे जळाले ते परत आलेच नाहीत, लोकांना वाटतं की टक्कल पडायला लागले आहे, तसे नाहीय पण.
४. माझे नावडते फटाके - असे काही बाण असतात की ते उडविल्यावर त्यातून पॅराशूट खाली पडते. तसले फटाके मला आवडत नाहीत कारण ते महाग असायचे, सध्या माहीत नाही काय किंमत आहे.
५. दिवाळीचे आवडते साबण - मोती मोती मोती, उटणे टोचते पण चालायचंच तेवढं आता.
६. दिवाळीतील आवडते वाचन - वर्तमानपत्रातले सुट्टीचे पान, हे मोठे झाल्यावर आवडायला लागले, लहानपणी बोर व्हायचे.
७. मला किल्ले बनवायला फार आवडते, प्रत्येक किल्ल्याला २ बुरुज व आत ४ गुहा असणे कंपल्सरी आहे, नंतर या गुहांचा वापर किल्ला उध्वस्त करण्यासाठी होतो
८. आपल्याला पत्र्याच्या आत मेण घालून केलेल्या छपरी पणत्या आवडत नाहीत, मातीच्याच चांगल्या, त्यापण एकएकट्या सुट्या. पन्नास पणत्या एकत्र करुन काहीतरी नंदादीपटाईप वगैरे बनविलेले पण विशेष आवडत नाही आम्हाला. आमची मर्जी.
९, १०. दिवाळी, दिवाळी, दिवाळी.
</बालिश> 

<शुभेच्छा> 
ही दिवाळी सर्वांना आनंदाची व सुखासमृद्धीची जावो.
</शुभेच्छा> 

<उपदेश> 
सर्व छोटीमोठी दु:ख तेवढ्यापुरती विसरुन ही दिवाळी आनंदात साजरी करा.
</उपदेश>  


<बाष्कळ कविता>  

नकोत वेदनांचे फुत्कार अन्‌ भावनांचे हुंकार,
वर्णू नका प्रेमाचे आणि हृदयाचे जुगार
आठवणी, ओलावा, चाहूल हे शब्दच साले सुमार,
बोहाराणीला द्या तुमचे असले लेडीज रुमाल
अंतरंगाचे पापुद्रे सोलण्याचे धंदे लेको तुमचे,
अश्रूंच्या टाक्या आणि  आणाभाकांच्या नळकांड्या
हट्‌ रे हट्‌, नकोच नको हे सगळे,
त्यापेक्षा फटाके उडवा फटाके
धडामधुडुम ऐकून, रोषणाई बघून,
कुत्र्यामांजरांच्या शेपट्यांना लवंगी बांधून
 चिल्ल्यापिल्ल्यांच्या फुलबाज्या पळवून
हसा फिदीफिदी,
आसुरी तर आसुरी, पण हसा फिदीफिदी

नंतर आहेच सगळं,
फटाक्याची  राख पाहून, ढासळलेले किल्ले बघून
चुकचुकणं
ओसरलेला उत्साह पाहून, फिसकटलेल्या रांगोळ्या पाहून
चुकचुकणं
त्यावरुन आणि परत दु:खाची पिलावळ प्रसवणं

पण तोवर च्यायला,
लावा हजाराची माळ आणि काढा रंगीत सापांचा जाळ
संपवून टाका फुलबाजीची काडीन्‌काडी,
शुभदीपावली अन्‌ एन्जॉयमाडी
हा हा हा.

</बाष्कळ कविता>  

॥शुभ दीपावली॥

***

Monday, September 28, 2009

सात विषय

उगाच उठून काहीही निरर्थक खरडणे आता मला बोर झाले आहे, म्हणजे सध्या थोडे दिवस. आता मी एक एक विषय घेवून त्या विषयानुसार लिहिणारे. खालचे सगळे विषय म्हणजे प्रकार वाटतील पण माझ्यासाठी ते विषयच आहेत.

विषय १: वादावादी - ऑफिसमधून घरी जाताना मॉनिटर बंद करणे गरजेचे आहे का?
अ: तू मॉनिटर कधीच बंद करत नाहीस घरी जाताना, करत जा ना बाबा.
ब: मी करणार नाही, इथिकली चूकीचे वाटते मला, माझ्या तत्त्वात बसत नाही.
अ: What? Are you kidding? विसरतो मी, कंटाळा येतो मला वगैरे कारणे ऐकली होती, तत्त्वात बसत नाही? महान आत्म्या, ह्यात काय चूक आहे? उर्जा वाचेल, ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल.
ब: एकतर मूळातच मला उर्जा वाचवणे वगैरे यात काडीचाही रस नाही. आपण उगाच कष्ट घेऊन उर्जा-बिर्जा वाचवा, काही गरज नाहीये, काही क्रायसिस नाहीयेत. बाकी कोणी वाचवत नाहीये इथे काही, F1, लास वेगासचा, मॉल्सचा झगमगाट पाहा.
अ: अरे, सगळ्यांनीच असे म्हणले तर कसे चालेले, दुसरा वाईट काम करतो म्हणून आपणपण करायचे का?
ब: मी काही वाईट करत नाहीये रे मित्रा, बोलण्याच्या गोष्टी वेगळ्या, थेंबे थेंबे तळ साचते का खरंच? तुम्हा लोकांना कळत नाही रे, साधे लॉजिक आहे. जर खरेच मोठ्ठा प्रॉब्लेम असता तर मोठ्ठ्या प्रमाणावर जी पेट्रोल आणि उर्जेची नासाडी होते ती बंद झाली असती, नव्हे करायलाच लागली असती. उदाहरणार्थ, मी ईयत्ता चौथीत असल्यापासून ऐकतो आहे पेट्रोल संपणार लवकरच म्हणून, संपले का?
अ: ठीके. मी करत जाईन रोज बंद तुझा मॉनिटर
ब: माझ्या मॉनिटरला हात लावायचे काम नाही, मी करणार उर्जेची नासाडी. काय म्हणणे आहे - काहीही होणार नाहीये, वेळे येईल तेव्हा शास्त्रज्ञ योग्य ते शोध लावतील व सगळे सुरळीत होईल. किंवा असे शोध लागलेही असतील आत्ताच, अमेरीका/युरोप सांगत नाहीत जगाला. हायड्रोजनवर चालणारी कार ७० मधेच तयार होती, फोर्डने दाबले ते संशोधन.
अ: ए भाउ, अमेरीका, युरोप राहूदे, खेडोपाड्यात वीज नसते, त्याचातरी विचार कर.
ब: आपली कंपनी कुठे आहे देशी आहे? देउदेत की पैसे लाईटबिलाचे, इतके लोक थकवितात MSEB चे पैसे, आपल्या कंपनीकडून जरा जास्त जावूदेत. आणि खेडोपाड्याचे फंडे मला नको देवूस, मी खेड्यातलाच आहे. भारतातल्या समस्त सॉफ्ट्वेअर ईंजिनीयर्सनी असले टुकार मॉनिटर बंद करुन वीज वाचवली तर त्यामुळे एका गावात दिवसभरसुध्दा दिवे लागायचे नाहीत. असले काहीतरी सांगून तुम्ही लोक मूळ प्रश्नाकडे दूर्लक्ष करता. खेड्यातल्या वीजेचा प्रश्न सोडविण्यास जादा वीजनिर्मिती पाहिजे. १०० मेगावॅट गरज असताना, ४० मेगावॅट वीज निर्मिती करुन त्यात बचत करण्यापेक्षा, सरळ ११० मेगावॅट वीज निर्माण करणे योग्य.
अ: तू युस्लेस आहेस रे, देशाचे पैसे जातात सबसिडीवर.
ब: देशाचे पैसे कशावर जात नाहीत? शिवाय तुम्हा लोकांसारखे खोट्या बिलांची लफडी नाही करत मी टॅक्स भरताना. जोवर हे बेकायदेशीर नाही तोवर मला माझा मॉनिटर सुरु ठेवण्याचा नक्कीच अधिकार आहे.
अ: नशीब, म्हणजे कायदा झाला असा काही तर तो तरी पाळशील, का त्यावेळी काही नवे कारण?
ब: कायदा होउ नये म्हणून आंदोलन करीन, जीवाचे रान करीन. पण झालाच तर इमानेइतबारे पाळीन, तुम्हां लोकांपेक्षा जास्त कसोशीने पाळीन.
अ: मुद्दामून आडमुठी भूमिका घेतो आहेस यार तू. बाकी राहूदे, निसर्गासाठी तरी कर एवढे निदान.
ब: निसर्गाच्या पोटातूनच कोळसा, क्रूड ऑईल काढतो की आपण. निसर्ग स्वच्छ होतो. गंमत नाहीये, ज्वालामुखीमुळे प्रदूषण होतेच ना? निसर्ग स्वत: किडे करतोच की. राहता राहीला माणसाला होणारा प्रदूषणाचा त्रास तर you deserve it, you know, तुमची लायकीच ती आहे लेको. You know human species is the only species...
अ: साहेब बास्स, आता मानवजातीचा उद्धार नको, नका करु बंद मॉनिटर.
ब: नाहीच करणार मग.

विषय २: लघुकथा
बरेच दिवस एक लघुकथा लिहायची होती, लघु म्हणजे लघुच अगदी, ३-४ परिच्छेदात संपणारी. जमत नाही म्हणून काय झाले, प्रयत्न केले पाहिजेत हो माणसाने, ब्लॉग लिहायला काय पैसे पडतात का?
गोष्टीचे नाव: रघूचे पातेले - वरवर साधी वाटणारी पण लहान मुलांच्या निरागस भावविश्वाचे चित्रण करणारी छोटीशी अतिफालतू गोष्ट.
एका दुपारी(उन्हाळ्याची सुट्टी सुरु आहे) रघू घरी एकटाच असतो, त्याची आई भिशीला गेली असते. तेव्हा शेजारच्या काकू येतात(त्या भिशीत नसतात) आणि रघूला विरजणाला थेंबभर ताक* मागतात. रघू दानशूर आणि नको तिथे डोके चालविणारा. तो म्हणतो काकूंना, "हे छोटे भांडेच घ्या". काकूंना ते भांडे बघून वाटते की मागच्या वेळी आपण वाटली डाळ घालून दिलेले भांडे ते हेच. [रघूच्या आईच्या मते, वाटली डाळ दिलेले भांडे तिने गोळ्याच्या आमटीच्यावेळी परत केले आहे आधीच].
तीनचार दिवसांनंतर रघूची आई, काकूंकडे विरजणाचे भांडे परत मागायाला जाते तेव्हा काकू म्हणतात, "कुठलं भांड वहिनी? माझ्याच भांड्यातून विरजण घेउन गेले मी, म्हणला नाही का रघू?"
"रघू तर म्हणाला, आमच्या भांड्यातूनच दिले त्याने" - रघूची आई.
"हाहा, तुमचा रघू तसा वात्रटच आहे हां, गंमत केली असेल त्याने तुमची, लहान मुले आणि त्यांच्या थापा एकेक" - काकू.
रघूची आई विषय बदलते आणि भाजीमंडईचे काहीतरी बोलून परत जाते घरी. रघू खूप गोष्टीवेल्हाळ असतो आणि गोष्टी सांगायच्या नादात कधीकधी काहीही थापा मारत असतो. शिवाय "रघू ना आमचा. काहीतरी बोलतो, लहान मुले आणि त्यांच्या थापा एकेक" हे वाक्य रघूच्या आईने पूर्ण बिल्डिंगभर केले होते. यावेळी त्याने थाप मारली नाही हे तिला माहित असते त्यामुळे घरी गेल्यावर रघूच्या आईची जाम चिडचिड होते.
नंतर एकदा रघूचे आणि शेजारच्या पमीचे कडाक्याचे भांडण होते तेंव्हा रघू पमीची वेणी ओढतो. पमी हिसका देवून पळून जाते आणि जाताना ओरडते, "थापाड्या तो थापाड्या, आणि वर मुलींचे केस ओढतो". रघू चक्रावतोच. दोघांची दोन तीन तासांनी परत बट्टी झाल्यावर तो पमीला मगाशी थापाड्या का म्हणालीस ते विचारतो. मग त्याला कळते की काकूंनी भांडे परत दिलेच नाही, पण त्याला जास्त राग काकूंनी त्याला थापाड्या म्हंटल्याचा येतो. तो लक्षातच ठेवतो काकूंचे वागणे.
एक दिवस पेपरवाला पेपरचे बिल घ्यायला येतो तेव्हा पमीचे बाबा त्याला उद्या ये म्हणतात. पुढे पेपरवाला रघूच्या घरी येतो. तो येवून गेल्यावर रघू पमीला सांगतो की, "पेपरवाले काका म्हणाले की तुम्ही कधी वेळेवर पैसे देत नाही, पेपर मात्र रोज सहाला पाहिजे". हे कळाल्यावर पमीची आई पेपरवाल्याशी कडाक्याचे भांडते. थोड्या वेळाने काकू आणि पमीबरोबर गॅसचा नंबर लावायला जाताना रघू सांगतो की त्याने थाप मारली होती. पेपरवाले काका असे काही म्हणालेच नव्हते. मोठेपणी रघू पमीच्या धाकट्या बहिणीशी लव्ह मॅरेज करतो.
*विरजणाला दूध आणि ताक दोन्ही लागते परंतु ताक कमी लागते असे काहीतरी आहे, ताक चुकीचे असले तर - तर काय? चूक तर चूक पण शेवट ताक, दही, लोणी सगळे दूग्धजन्यच.
**निरागस भावविश्वाची कथा लिहीता लिहीता चुकून सूडकथाच झाली.

विषय ३: नाटक
पास.

विषय ४: भावनिक लेखन
मला बरेच दिवस झाले काहीतरी भावनिक लिहायचे आहे. इतके प्रामाणिकपणे भावनिक लिहायचे आहे की मी मगासच्या वाक्यात मला ‘सेंटी’ लिहायचे आहे असे नाही म्हणालो. आत्ता मागचे पोस्ट आठवले त्यात पण असेच मला भावनिक विचार करायचा होता पण जमले नाही. नातेसंबंधांवर नेहमी भावनिक सुचते लोकांना. मला नाही सुचले पण. मी विचार करायला लागलो तर मला खालील ओळी सुचल्या, ज्या कुठल्याही अँगलनी भावनिक निघाल्या नाहीत -
"मित्र निवडता येतात, नातेवाईक नाही. नातेवाईक निवडता आले असते तरी आम्ही निवडले नसते. नातेवाईकांचे ढोबळमानाने दोन प्रकार असतात - आईकडचे नातेवाईक आणि बाबांकडचे नातेवाईक. कधी कधी काहीतरी दूरदूरचे नाते लागून सामाईक नातेवाईकपण असतात. पण अशा सामाईक नातेवाईकांचेसुद्धा नकळत आईकडचे किंवा बाबांकडचे असे वर्गीकरण होते(दोन्हीबाजूच्या नात्यांच्या लांबीनुसार). लहानपणी नातेवाईकांना भेटायण्यासाठी सुट्ट्यांचा(Holidays holidays, चिल्लर नव्हे) वापर व्हायचा. माणूस जसे मोठे होतो तसतसे त्याच्यामागचे उपद्व्याप वाढत जातात आणि नात्यांची वीणपण क्षीण होते जाते"
नातेसंबंध कॅन्सल.
-
निवडुंगाच्या काट्यात अडकून राहीला होता तो पावसाचा थेंब एकटाच. सर ओसरुन गेली. ढग आपल्या वाटेने निघून गेले, पुढे कुठेतरी आपली काळी गोठडी रिकामे करतील, न करतील. सगळे थेंब जमिनीत जिरुन निर्माण झालेला मृद्‌गंधपण आता ओसरु लागला होता. एखाद्‌दुसरा झाडाच्या पानांवर रेंगाळणारा थेंबसुद्धा आता मातीच्या मायेला भुलून गेला होता. पूर्ण परिसरात एकच निवडुंग होते ते आणि त्याच्या अगणित काट्यांमधल्या एका काट्यावरचा तो एक थंब. तो काटाही इतरांसारखाच पांढरट टोकदार, विशेष काही फरक नाही. थेंबही इतर पावसाच्या थेंबांसारखाच पारदर्शक, सभोवतालचे प्रतिबिंब म्हणजे स्वत:चे अस्तित्व समजणारा. इतरांना टोचणारा तो काटा या थेंबासाठी मात्र नाजूक झोका होता. काट्यासाठी तो थेंब काय होता? कित्येक जलबिंदू त्याला ओलावून गेले. सगळे निरीच्छेनेच त्याच्यावर बरसले, "मलापण लांबरुंद पिंपळाच्या पानावरुन घसरून मातीत झेपावायला मिळाले असते तर, पण आमच्या नशिबी हा काटा" असे म्हणत म्हणत, कर्तव्य म्हणोन काट्याला ओले करत गेले. पण हा मात्र झोके घेतोय ! प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की, आईच्ची जय, काय रद्दडे. संपले भावनिक.

विषय ५: भाषांतर
भाषांतर म्हणजे एका भाषेची वाट लावतो ती पुरेशी न वाटल्याने अजून एक भाषा आपल्या सुमार बुद्धिमत्तेच्या दावणीला बांधायची.
मला Led Zepppelin चे टँजरीन गाणे भयानक आवडते त्याचा स्वैर अनुवाद टाकू आपण.



Measuring a summers day,

I only finds it slips away to grey,

The hours, they bring me pain.

*Tangerine, tangerine,

Living reflection from a dream;

I was her love, she was my queen,

And now a thousand years between.

Thinking how it used to be,

Does she still remember

times like these?

To think of us again?

And I do



ग्रीष्मातले रुक्ष दिवस
कंठण्यातला फोलपणा,
संथ क्षण अन्‌ स्तब्ध निमिषे
वेदनांची केवळ निमित्ते

टॅंजरीन, टॅंजरीन...
हळव्या गोड स्वप्नांचा,
छोटासाच कवडसा
पण आभास चेतनांचा

होती माझी स्वामिनी
अन्‌ मी तिचा श्वास,
आता अंतरलली मने
अन् आठवणी खग्रास

व्याकुळते का तीपण
त्या ग्रीष्मआठवणींनी ?
आठवतात का अजूनही
तिला माझ्या उ:श्वासछाया ?

**
विषय ६: दीर्घकथा
पास. दुसरा पास झाला हा. पास नावाची गोष्ट किवा नाटक लिहिले पाहिजे एकदा.

विषय ७: निरर्थकपणा
खरे तर वरील सर्व निरर्थकपणाच आहे त्यामुळे वेगळे लिहीण्यात काही पॉईंट नाही पण आता शीर्षक टाकलेच आहे तर लिही चार ओळी. समोर एक गाणे चालू आहे vh1वर. काही मनात येईल ते दाखवितात ईंग्लिश गाण्यांच्या व्हिडिओजमधे. एक माणूस रस्त्याकडेला उभा होता त्याने आकाशाकडे पाहिले आणि मग डायरेक्ट वाळवंटात जाउन नाचू गाउ लागला. काहीतरी अर्थ असेल म्हणा पण मला काही झेपला नाही. एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की, बाकी जवळजवळ सर्व धर्मात माणसाला पुरतात(मेल्यावर), पारश्यांच्यात विहिरीत टाकतात (का असे च काहीतरी). फक्त हिंदूंच्यातच जाळतात. परवा फार्मव्हिला खेळताना मला उत्तर सापडले - हिंदूंचा समाज पूर्वापारपासून कृषिप्रधान आहे, बाकीचे नव्हते एवढी शेती करत. आपल्याकडे पुरले आणि नंतर कोणीतरी नांगरताना घोळ झाला म्हणजे बसा. म्हणजे बाकीपण काही शास्त्रीय कारणे असतील पण हेसुद्धा असायला पाहिजे. इन्ग्लोरियस बास्टर्डस भन्नाट आहे, मला अचंबा वाटतो की माणसं दहा-दहा वर्ष विषय डोक्यात ठेवून सिनेमा बनवतात. मला गेले पाच वर्ष झाले पाचसहा जेनेरीक युटीलीटी प्रोग्रॅम्स लिहायचे आहेत, एका आठवड्याच्या वर नाही लागणार वेळ त्यांना, पण अजून मुहूर्त नाही लागला माझ्याच्याने. दरवेळेला काहीतरी नवीनच खुस्पट निघते, मधे मधे मी वेड्यासारखे सिनेमे बघायचो, मग नंतर फार्मव्हिलाचा नाद लागला आता परत सिनेमे. ओबामा टीव्हीवर काहीतरी बोलतो आहे. हा मनुष्य कशावरही सगळे माहित असल्यासारखे बोलतो राव. एक नंबर बोलबच्चन. उद्या त्याला कुणी विचारले -Sun चे UNIX Servers, आमच्या कंपनीने काढून त्याऐवजी HP चे घेतले हे योग्य वाटते का? तर तो दहापानी उत्तर दईल. बरेच जण असतात तसे, कशावरही मत व्यक्त करु शकतात. मीपण तसाच आहे म्हणा. २०१२ पिक्चरचे ट्रेलर पाहिल्यापासून मला दिवसरात्र जग खरेच संपले तर काय मज्जा येईल असे विचार येत आहेत. हॉलिवूडवालेपण लेकाचे मागेच लागले असतात, येनेकेनमार्गाने त्यांना संकट आणायचेच असते आणि काहीतरी भयंकर उपाय त्याच्यावर. उद्या एखादे असे मोठे संकट आले तर शास्त्रज्ञांकडे जाण्यापेक्षा सर्वप्रथम हॉलिवूडमधल्या दहा डायरेक्टरांना फोन लावावेत, भारी उपाय सापडतील. आत्ता असले काही सुचते आहे, तेव्हा फाटेल. बास करावे, बोर झाले.

***

Monday, August 17, 2009

निरर्थक - Nth

हे फार भंगार आहे, ब्लॉगवर टाकू नये असे वाटले होते एकदा, पण आपल्याला काय?
*
जाताना/जायच्या(गावाला) आधी लिहायचं म्हणून हे निरर्थकच्या लायनीमधले नथ(nth) पोस्ट. यावेळीपण एअरपोर्टवर नोंदी लिहून ठेवतो, मागच्याखेपेला वेळ चांगला गेला होता. आज चौदा ऑगस्ट आहे, पाकचा स्वातंत्र्यदिन, उद्या आपला. लहानपणी शाळेत जिलबी द्यायचे. शाळा अव्वाच्या सव्वा फी वसूल करुन आपल्याला लुटते हे मनात ठसले असल्याने आम्ही दोन जिलब्या खायला चारेक तास तरी उन्हात उभे रहायचो. मी एकदा दायना दर्शक होतो परेडमधे, नक्की आठवत नाही काय करायचे असते ते, बहुतेक सगळी जनता सलाम ठोकताना पाहुण्यांकडे बघते, दायन्या दर्शकाने गपचूप समोर बघायचे असते, असे काहीतरी. एकुण शाळेतल्या आठवणी हा भागच भारी असतो, परवा आमचे सर्व रुममेट्‌सचे दुर्मिळ एकमत झाले की, बालपणीचा काळ सुखाचा वगैरे बोलण्याच्या गोष्टी असतात. आमच्यापैकी कुणालाही परत शाळेत जावेसे, ते दिवस परत यावेत etc. काही वाटत नाही. आत्ताचाच काळ सुखाचा आहे, लहानपणी साध्या साध्या गोष्टींची जाम टेन्शन्स असतात. छोट्या अडचणीसुध्दा प्रचंड मोठ्या वाटतात. शिवाय सतत काही ना काहीतरी लफडी चालू असतात, त्यात तो अभ्यास आणि गृहपाठ. आता कशाचेच काही वाटत नाही, सगळे बरे आहे, कामाचेपण टेन्शन नाही, आपोआप होते ते, अभ्यास नाही व्हायचा आपोआप. एकदा सर गृहपाठ तपासत होते, माझ्या शेजारी बसलेल्या हिरोने केला नव्हता.
सर म्हणाले, "का नाही केला?"
"सर, विसरलो, उद्या नक्की दाखवतो सर."
"विसरलो? असा कसा विसरलास? जेवायचे विसरतोस का?", असे म्हणून सरांनी दिली एक ठेवून त्याला. तेव्हाच मला हे उत्तर सुचले होते की, "जेवायला भूक लागते सर, अभ्यासाची भूक नाही लागत." असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते त्याने, एवीतेवी मार खायचाच होता, जास्त खावा लागला असता पण. टाईममशिन मधून जावून एकदा असे सगळे बोलून आले पाहिजे. एक सर बळंच, वर्गात काही संबंध नसताना मी मूर्तिपूजक नाही वगैरे सांगत सुटायचे, त्यांच्या घरी बाहेरच्या खोलीत भिंतीवर असंख्य देवदेवतांचे फोटो लावले होते, मला नेहमी म्हणावेसे वाटायचे, सर मग सगळे फोटो काढून टाका की भिंतीवरचे. चांगले असतात तसे शिक्षक पण त्यांना काहीतरी विचित्र काव्यशास्त्रविनोद करुन मुलांची खेचण्यात प्रचंड मजा वाटते. काही लोक तर वर्गात हाणून गप नाही बसायचे, घरच्यांनापण सांगणार नंतर. म्हणजे घरी परत ओरडा खावा.
तसा मी बऱ्यापैकी उलट बोलायचो. एकदा मात्र बाबा खूश झाले होते माझ्या उलट बोलण्यावर. उन्हाळ्याची सुट्टी सुरु होती आणि शनिवारी मी बाबांच्या बँकेत गेलो होतो, काहीतरी स्वत:हून आपले खाते उघडा त्यात दहा रुपये टाका वगैरे आईचे विचार इंप्लिमेंट करायला. बँक छोटीच होती, मी पटापट खाते उघडून, लोकांकडून फुकटचे कौतुक करुन घेत बसलो होतो. अगदी सगळेच काही कौतुक करायचे नाहीत. बँकेत एकजण होते, ते नेहमी लहान पोरांना पकडून एक कोडे घालायचे - "१ किलो कापूस आणि १ किलो लोखंड यात कशाचे वजन जास्त?" मुलं आपली लोखंड लोखंड म्हणायची, मग ते समजावून सांगायचे आणि हसायचे सातमजली. मी नंतर एकाला हे सांगितले होते, मग तो पूर्वतयारी करुन गेला होता - बरोबर उत्तर देउन आलाच शिवाय वजन आणि वस्तुमान असले काहीतरे फंडे देउन आला तो त्यांना.
तर मूळ कथा, उन्हाळ्याच्या सुट्टीत मी बँकेत गेलो होतो तिथे एक सर आले आमचे, पैसे काढले त्यांनी बँकेतून, मोजले दोनदा. मग त्यांना मी दिसलो. काउंटरच्या आतल्या बाजूला माझे चालू असलेले कौतुक बघवले नसावे त्यांना. बाहेरून मला म्हणाले, इकडे ये रे. मी गेलो तर म्हणाले, "हे पैसे मोजून सांग बरोबर हजार आहेत का?" आता काय संबंध? एकतर हे महाराज इतिहास शिकवायचे, शिवाय शाळेला सुट्टी. मी न मोजताच म्हणालो, "सर, २ नोटा कमी आहेत". आणि बँकेतली जनता प्रचंड हसली. सर पुढे काहीतरी थातुरमातुर म्हणाले पण पोपट झाला होताच. नंतर एकदा बाबा म्हणाले, का रे असं का म्हणालास? मी म्हणालो, मला आत्ता काय गरज होती असे पैसे मोजायचे काम सांगायची? शाळा सुरु नाहीये ना, आम्ही जातो का सुट्टीत त्यांना काही शंका विचारायला. बाबा लय खूश झाले होते उत्तरावर, पण मला म्हणाले, पुढच्या वर्षी हाणणार लेका तुला हे सर. मला मोजून तीन चार शिक्षक आवडले असतील आजतागायत, चिपळूणच्या देवधर बाई. ह्या बाईपण उन्हाळ्याच्या सुट्टीत भेटल्या होत्या बँकेत, त्यांनी वरील सरांप्रमाणे आगाउपणा केला नाही, त्या म्हणाल्या, वा सुट्टीत बाबांना मदत करतोस वाटतं?[बाबांना हा आगाउपणा वाटला का ते विचारायला हवे]. मग त्यांनी मला खाउला आठाणे दिले आणि म्हणाल्या, उन्हातान्हाचे खेळत जावू नका, सावलीत खेळा.
एक वाईट शिक्षक झाले की दुसरे चांगले, पोलिटीकली करेक्ट रहायची सवय लागलीय. आमचा न्हावी कायम पोलिटीकली करेक्ट असतो, भारताविषयी काही बोलायचे असले तरी तो आधी दहा स्पष्टिकरणे देणार, Not that it's bad or anything, but you guys eat a lot of spicy food. बळंच नॉट दॅट बॅड वगैरे.
हल्ली शाळेत मारत नाहीत म्हणे, एक छोटा मुलगा होता, भारतात गेलो होतो तेव्हा भेटला होता. मी कुणाकडे काहीतरी निरोप द्यायला गेलो होतो, ते येईपर्यँत वाट बघत बसावे लागले. हे ध्यान एकटंच होतं. लहान मुलांना तसा मी घाबरुनच असतो, उगाच चार लोकात शोभा करतात, विचित्र काहीतरी बोलून. सगळ्या भिंती निरखून, शोपीस पारखून झाल्यावर मी त्याला विचारले, "मारतात का रे शाळेत तुला?". तर म्हणाला नाही. मी विचारले मराठी मिडीयमला नाहीस का, तर म्हणाला, मराठी माध्यामाच्या शाळेतच जातो. आश्चर्यच वाटले. करावं लागायचे आमच्या वेळच्या शिक्षकांनापण. ते तरी काय करणार, पोरं असली मंद. मनात म्हणत सुध्दा असतील ते, "Its only business, nothing personal" वगैरे. काहीही बरळत आहे मी.
परवा मला भारी जोक सुचला. पुलंच्या नावावर खपवला असता मी तर सुपरफेमसच झाला असता.
जोक -
मराठीचा सहामाही पेपर सुरु आहे, निबंधाला एकच विषय यावेळी, चार ऑप्शन्स नाहीत. हां तर विषय होता, "मी पंतप्रधान झालो तर". मी उत्तर लिहीले - "सिलॅबसबाहेरचा प्रश्न आहे, मी मराठी आहे".
मी ज्यांना ज्यांना सांगितला त्यातले पन्नास टक्के लोकच हसले. गडद विनोद (dark humour) ची जाण नाही हो, दुसरं काय?
शाळा हा विषय भारी आहे पण, माझा निबंध एकदा वर्गात वाचून दाखवला होता. तेवढं एकच यश शालेय जीवनातले. रीपीटेशन - एकूण बालपणीचा काळ सुखाचा वगैरे नसतो, मोठेपणी बरे असते, मनाला यील ते करा, हवे तेवढे सिनेमे बघा, हवा तो टीपी करा, कामाचे पण विशेष काही नाही नंतर नंतर ते आपोआप स्वत:हूनच होते.
*
गेले २-३ मिनिटं मी शाळेविषयी भावनिक विचार करायचा प्रयत्न करत होतो, पण जमेचना. समोर एक बाळ बसले आहे. भारी आहे हा मुलगा, त्याने स्वत:साठी एवढ्या लहान वयातच खेळ शोधला आहे. स्वत:चीच लाळ मुद्दामून ओठातून बाहेर काढायची आणि आता पडणार म्हणल्यावर खालचा ओठ दुमडून ती गिळायचा प्रयत्न करायचा. आणि जमल्यावर खिदळायचे. हुशार आहे राव. असले काय काय एअरपोर्टवरचे लिहायला लागला माणूस म्हणजे संपलच. मला आजकाल असे वाटते आहे की हल्ली मला गाण्यातले थोडे थोडे कळायला लागले आहे. म्हणजे मला एखादे रेडिओवरचे गाणे आवडले आणि मी घरी येउन ते शोधून पाहीले की बरेचदा प्रसिध्द निघते. कदाचित रेडिओवर सगळी प्रसिध्द गाणीच लावत असतील. असो.
शाळा, सरलोक, बाईलोक यांचा विषय डोक्यातून जातच नाहीये. ईचलकरंजीला तीन शाळा होत्या गंगामाई, गोविदराव आणि व्यंकटराव अशा नावाच्या. ही तिघं राजघराण्यातली भावंड होती असे मला नेहमी वाटायचं, खरंखोटं देव जाणे. बॅटरी मरत आली.
**
मगाशी भावनिक विचार करायचा प्रयत्न केला, आत्ता आत्ता काहीतरी सुचायला लागले.
बॅटरी संपली म्हणून डोक्यात विचार यायचे थोडेच थांबणारेत. शाळा संपली म्हणून शिक्षण थोडीच थांबते. कुणी लिहीले नाही म्हणून शब्द...काही जमत नाही पुढे.
***

Sunday, July 19, 2009

वेळापत्रक

आयुष्यात आळस आणि अव्यवस्थितपणा भरुन राहिला आहे असे लक्षात आले आहे. आळसपण असा मुरायला लागतो अंगात - ह्ह्या, नाही, असे काही नसते मुरणे बिरणे, माणूस जन्माला येतानाच तो आळशी आहे का अन-आळशी ते ठरलेले असते. आळश्यांचे प्रमाण कमी असावे एकुण जगात. बरेच जण आळशी असल्याचे नाटक करतात पण मनातून खरेतर आळशी नसतात.
आलसस्य कुतो विद्या? आळशी कुत्र्याला विद्या भेटत नाय. म्हणूनच एकुण आळस झटकला पाहिजे आणि शिवाय रोजचा वेळ सत्कारणी लावता आला तर उत्तम, दुधात साखर, सोने पे सुहागा, दुष्काळात तेरावा वगैरे.
(पूर्ण पोस्ट थोडक्यात आटोपायचे आहे - १२८०*८०० नियम)

आत्ताचे वेळापत्रक:

सोमवार ते शुक्रवार (साधारण दिवस, खूप काम नसलेला)
१. उठणे - (सव्वानउ)
उठायचे. इकडे तिकडे बघायचे, ५ मिनिटे बसायचे तसेच अर्धोन्लोळित अवस्थेत. नंतर झोपताना तसेच चालू राहिलेले दिवे बंद करायचे. गॅलरीत जावून उभे रहायचे ३-४ मिनिटे आणि जबडा ऍडजस्ट करायचा. लॅपटॉप सुरु करुन मेल बघणे. कुणी मिळाले ऑनलाईन तर पिळवणूक सुरु करायची. बरोबर फीड्‌स वाचायच्या.
२. आवरणे - (पावणेदहा)
आवरायचे. अंघोळ करताना जे गाणे आठवले असेल त्याच्यावर अंघोळ झाल्यावर रीसर्च, ते बघणे. कालचेच उदाहरण - सुलतन्स ऑफ स्विंगज गाणे बीबीसीवर दाखवायचे नाहीत सुरुवातीला, युएसमधे प्रसिध्द झाल्यावर दाखवायला लागले. सुन्या सुन्या महफिलीतमधे असला भंगार चष्मा असूनपण स्मिता पाटील भारी दिसते.
तर आवरायचे एकुण कसेतरी रडतखडत
३. ऑफिस - (सव्वादहा/दहावीस)
चहा, कॉफी, बारा-साडेबारापर्यंत पाट्या टाकणे. नंतर असाच युट्युब, विकी, गूगल इमेजेस सर्च, चॅट यावर वेळ घालवणे. दुपारचे जेवण. काम, चहा, लोकांशी गप्पा. सोबत काहीतरी दिवास्वप्न किंवा कल्पनाविलास - आपण असू त्या विमानात अतिरेकी घुसले तर, जॅक्सनचे ते भूत खरेच असले तर, कोथरुडमधे कॅसिनो काढला तर, ओबामा हुकुमशहा झाला तर, डायानासोर सापडले कुठे सामोई-बिमोई बेटावर तर. असा टाईमपास.
३.५. खेळ - बरेच लोक मिळाले व सर्वांचीच खेळायची इच्छा असेल तर खेळ
४. घर - (साडेआठ-नउ)
कंपनीतल्या महत्वाच्या माहितीची देवाणघेवाण. मग वाद-विवाद. परत देवाणघेवाण, वाद-विवाद. स्वयपाक/ऑर्डर. हादडणे.
५. पोस्ट्जेवण टाईमपास - (अकरा-साडेअकरा)
एका खोलीत टिव्ही लावून दुसऱ्या खोलीत लॅपटॉपवर टाईमपास.
६. झोप - कधीतरी झोपणे असे मधेच.

खरेतर वरचे वेळापत्रक आत्ता वाचल्यावर तितकासा आळशीपणा केलेला जाणवला नाही. पण आजूबाजूला घराची दुरावस्था पाहून तो जाणवतो.
एक प्लॅस्टीकची पिशवी दिसते आहे जी कित्येक दिवस आहे त्या कोपऱ्यात, काय आहे त्यात देव जाणे. स्टीलचे एक भांडे दिसते आहे, ते मी मागं एकदा पाणी पिता पिता खिडकीत ठेवले होते तिथेच आहे अजून. मागच्या महिन्यात एक जुना एमपीथ्री प्लेयर आतून कसा दिसतो ते बघायला स्क्रू ड्रायव्हर सेट आणला होता, तो आणि खोललेला प्लेयर दिसत आहेत टेबलावर.
हे सगळे आळशीपणामुळेच आहे असे, नीट जागेवर ठेवले पाहिजे.

नवीन वेळापत्रक:
१. उठणे - नउला उठायचे रोज, सव्वानउ वगैरे लाड नाही चालणार.
२. आवरणे - पटापटा आवरायचे साडेनउच्या आत.
३. खोली आवरणे - पुढची १० मिनीटे खोली आवरायची रोजच्या रोज. जागच्या जागी गेले पाहिजे सगळे. जिथल्या तिथे, नीटनेटके.
३. ऑफिस - दहाला ऑफिसला पोचायचे आणि तिथेच दिवसात पहिल्यांदा ईमेल-बिमेल चेक करायचे.

नंतर सगळे तसेच पूर्वीसारखेच ऍक्च्युअली, आवरणे फक्त नवीन, बाकी ठीके.

काहीही झाले आहे हे. पण असे लिहीलेले बरे असते छोटे छोटे, आत्मपरिक्षण वगैरे होते आपोआप.

****

Sunday, July 5, 2009

लेजंड ऑफ प्रिन्स धृमण - धृमणाची धर्वणाश्रम भेट

राजपुत्र धृमण मनातल्या मनात कंटिन्युअसली शिव्या घालत होता. त्या निबीड धुंग अरण्यातून केवळ चालणे हेपण मोठ्या धाडसाचे काम होते.

"बाबांनापण ना, नस्ते उद्योग लागतात. काय गरज आहे च्यायला त्या यडचाप राजर्षिंचे ऐकायची? पाऊस काय यज्ञाने पडणारे? चार दिवस थांबायचे, पडेल की, जातोय कुठे?
बरं करा हो यज्ञ, आमच्या बापाचे काय जातेय? म्हणजे जातंय आमच्याच बापाचे पण जे राज्यात मिळतंय ते सामान वापरा ना.
ह्यांना त्या यज्ञासाठी धुंगारण्यात रहाणाऱ्या धर्वण ऋषिंनी दिलेले गंध हवे !
वर राजर्षि म्हणतात, आपले शूर कुमार सहजी करतील हे काम.
आयला, एक दिवस यांच्या आश्रमातल्या मुलींना तलवार दाखवत होतो तेव्हा म्हणाले, कोण आपण, काय काम आहे इथे?
आता आपले शूर कुमार म्हणे ! आईची कटकट"

असे बडबडत राजपुत्र आपल्याच तंद्रीत चालला होता, तेवढ्यात अचानक त्याच्या पोटऱ्यांवर एक चाबकाचा फटका बसला - पूर्वीसारखाच. तो जोरात ओरडला "आsssव". मागे वळून पाहिले तर कुणीच नव्हते. तो अजूनच वैतागला.

"मायला काय फटके बसत आहेत मगापासून, पाय हुळहुळला. म्हणून मी म्हणतो कायम चंद्याला, ही अरण्ये आहेत ना, जाळली पाहिजेत खांडववनासारखी दण्णादण्ण.
काय पोच नाही हो, कोवळा म्हणून नाही, राजपुत्र म्हणून नाही. हाणतायत आपले मगापासून. पकडायचे तरी कुणाला?"

अजुन किती चालायचे असा विचार करत असतानाच त्याला राजर्षिंनी निघायच्या आधी दोन सूचना दिल्या होत्या तो प्रसंग आठवला -

"आग्नेय दिशेने निरलसपणे चालत रहायचे, ह्या अरण्यात अश्वारुढ न होता गेलेलेच उत्तम" राजर्षि म्हणाले.
"हॅहॅहॅ, बोंबला, इथे पूर्वेकडे तोंड केल्यावर उजव्या हाताला दक्षिण एवढेच माहिते. त्यात परत डाव्याउजव्याचा गोंधळ आणि हे महाराज म्हणताहेत आग्नेय दिशेला. शिवाय चालत जायचे ! अश्वमेधासाठी राखून ठेवा सगळे अश्व"
हे विचार मनातच ठेवून राजपुत्र केवेळा गंभीर चर्येने मान डोलावली.
राजर्षिंना धृमण एक गहन कोडेच वाटायचा. त्याने यापूर्वी अनेक खडतर आव्हाने पार पाडून राज्याला संकटातून बाहेर काढले होते. स्वत:हून कुठलेही साहसी कार्य करण्यास तो उद्युक्त होत नसे, पण एकदा कार्यारंभ केल्यास यशस्वी होत असे. याउलट त्यांना अनेक साहसी तरुण आठवले जे पराक्रमी सदैव साहस करण्यास उत्सुक असूनही बहुतेकदा अयशस्वी परत येत. धृमणची अनुत्सुकता हेच त्याचे अमोघ अस्त्र आहे असे त्यांना क्षणभर वाटले.

राजर्षि पुढे म्हणाले, "चालत गेल्यावर काही दिवसांनी एक सरोवर येईल. तिथे तुमची खडतर कसोटी आहे, योग्य निर्णय घेतल्यास तिथूनच तुम्हाला धर्वण ऋषिंच्या आश्रमाकडे जायचे मार्गदर्शन उपलब्ध होईल"
"धन्य आहे या बाबाची - कसली कसोटी ते सांगता येत नाही? एकतर सरोवर, हिंस्त्र जनावरं पाणी प्यायला येणार तिथे. मगरीबिगरीसुध्दा असतील कदाचित त्यात, पोहायची कसोटी घेतली नाही म्हणजे झालं.
आणि वर योग्य निर्णय घेतल्यास मार्गदर्शन मिळेल, सगळीच संदिग्धता ! वेळीच योग्य निर्णय घेवून दादाबरोबर युध्दाला गेलो असतो तर बरे झाले असते", धृमणाचा संभ्रमित चेहरा पाहून राजर्षिं हसून म्हणाले,
"कसोटीचे स्वरुप तर मलाही माहित नाही. कुमार, धर्वण ऋषिंच्या कुठल्याही आज्ञेचे उल्लंघन करु नका, यशस्वी भव"

परत एकदा धृमणाच्या पोटऱ्यांवर चाबकाचा फटका बसला आणि तो भानावर आला. एव्हाना त्याला फटक्यांची सवय झाली होती. धुंगारण्यात खायला फळे व कंदमुळे पुष्कळ प्रमाणात असल्याने या एकाबाबतीत धृमण आनंदी होता. चांगल्या चवीचे एखादे फळ मिळाल्यावर तो भूक असो व नसो, ते फळ खाउ लागे व त्याचा सगळा वैताग निघून जाई. असेच एक फळ मिळाल्यावर मार्गक्रमण करता करता तो आनंदाने गुणगुणु लागला -
धुंगारण्यात धुंद मी, खातो गोड कंद मी,
फटके खातो, पण गंधासाठी भटकतो मी...ओ हो हो, ला, ल्ला ल्ल्ल्ला...ऊ...हो ह्हो.(झांज)

<गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>
काही होतच नाहीये यात. म्हणजे खूप चालला धृमण, आता त्याने शौर्य तरी दाखवावे किंवा दया, त्याग सारखा एखादा गुण. हा टॅग म्हणजे ब्रेकींग फोर्थ वॉल आहे. बोस्टन लीगल मधे असायचे तसे. एका एपिसोडमधे डॅनी आणि ऍलन डायरेक्ट शेवटच्या सीनमधे भेटतात. डॅनी म्हणतो, अरे कुठे होतास पूर्ण एपिसोडभर पाहिले नाही मी तुला. असले माहीत असते आपल्याला, फोर्थ वॉल-बिल, बौध्दिक चर्चेला उपयोगी पडते.
"हं मला आवडते स्क्रब्ज सिरीयल. Mainly because even though, they don't break fourth wall in conventional manner, it always seems to me that at start of each episode they break fourth wall once and for all"
असे मी एकदा म्हणालो होतो. लोक येडेच झाले.
कंटिन्यू - दया दाखवावी. माझे टॅग लिहीणारे थ्रेड एवढ्या उशीरा का जागे झाले, अशाने सरळसोट गोष्टच झाली असती की ही.
</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>

गाण्याच्या ठेक्यात थोडेसे बागडतच चालला होता धृमण, त्या लाल प्राण्यावर पाय पडणार एवढ्यात त्याने स्वत:ला सावरले. नीट गुडघ्यावर टेकून पाहिले तर लाल ससा होता तो. त्याचे डोळे किलकिले होते आणि फारच कष्टी दिसत होता तो. त्याने हळुवारपणे सशाच्या पाठीवरुन हात फिरवून त्याला विचारले,
"सशा सशा, लाल सशा, झाले तरी काय तुला, घे थोडे पाणी आणि खा हे फळ"
ससा म्हणाला,
"नको मला पाणी आणि नको मला फळ. मला फक्त हवी वेळ"
धृमणाला काहीच कळाले नाही, तो म्हणाला गद्यात सांग बुवा, झेपलं नाही.
ससा म्हणाला -
हो ना यार, मरताना कुठे यमक जुळवतोस. राजकुमारा मला वेळ पाहिजे, माझा अत:काल जवळ आला आहे. आम्हा लाल सशांना वर आहे - आम्ही ज्या दिवशी मरणार त्याच्या आदल्या दिवशी सुर्यास्तालाच कळते आम्हाला की उद्या मरणार आपण. मग पुढच्या दिवसभरात मरणाची वेळ आम्हाला इच्छेनुसार निवडता येते. न निवडल्यास दुसऱ्या दिवशी सुर्यास्ताला मरण येते. आज माझा मरणदिन आहे, माझी लाल सशी मला सोडून आधीच निघून गेली. काल रात्री तिने माझ्या स्वप्नात येउन सांगितले,
"माझ्या प्रिय सशुल्या, उद्या तू सकाळीच एखाद्या उंच झाडावर चढून बस. दुपारी एक सोनेरी गरुड आकाशात दोन घिरट्या घालेल, त्याच वेळी तू म्हण गरुडा गरुडा, नेलेस माझ्या सशीला, तसेच ने मला त्या गरुडाने तुला खाल्ल्यास तू आणि मी अनंतकालासाठी एकमेकाचे होउ"
परंतु राजकुमारा काय सांगू दुर्दैव माझे, मी झाडावर चढताना पडलो आणि पायाला दुखापत झाली, आता मी माझ्या सशीला कधीच नाही भेटणार कारण मला वेळच नाही कळणार गरुड कधी येणारे त्याची - आणि इथून खालून गरुडापर्यंत माझा मंद आवाज कधीच पोचणार नाही.
धृमण म्हणाला, "अरेच्या एवढेच ना ससुकल्या, अजुन तर दुपार नाही झाली, मी आत्ताच या उंच वृक्षावर चढतो, तुला वेळ तर सांगतोच पण तुझ्या वाटचे ओरडतोसुध्दा" एवढे वाक्य पूर्ण करुन धृमण सरसर वृक्षावर चढलाही. वृक्षमाथ्यावर येताक्षणीच त्याने आग्नेय दिशेला पाहिले आणि आनंदला, एका विशाल सरोवराचे पाणी उन्हात चमकत होते. सरोवराच्या अलिकडे एक ठळक काळी रेषा दिसली त्याला. ती कसली रेषा असेल हा विचार करत तीकडे टक लावून बघत बसला तो. शेवट असेल कडेला जमा झालेला गाळ म्हणून सोडून दिला विषय त्याने.
थोड्या वेळाने अचानक त्याच्या दक्षिणेकडची झाडे सळसळली, चीं चीं असा उच्चारव करत एक सुवर्णकांतीचे गरुड उडाले आणि क्षितिजाकडे झेपावले. धृमणाची नजर त्याचा पाठलाग करत होती, क्षितिजाला शिवल्यासारखे करुन गरुड आपल्या दीर्घ कक्षेतून परतले. आणि पुनश्च एकवार क्षितिजाकडे चालले. धृमणाची खात्री पटली, तो जोरात ओरडला.
"गरुडा गरुडा, नेलेस ह्याच्या सशीला, तसेच ने ह्याला"...
नंतर हळूच पुटपुटला, त्याच्या पायाला लागलय म्हणून मी ओरडतो आहे, चालले पाहिजे. गरुडाने क्षणार्धात दिशा बदलली व तो सशाकडे झेपावला.

आपल्याकडे येणाऱ्या गरुडाला पाहून ससा आनंदाने म्हणाला,
"राजपुत्रा तू मला मुक्ती दिलीस, धुंगारण्यातल्या प्रवासात तु कुठे अडखळलास तर फक्त म्हण - लाल सशाला दिली मी वेळ, पण आता कसा सोडवू हा खेळ".
ध्रुमणाने ओलावल्या नेत्रांनी शेवटचे त्याच्याकडे पाहिले आणि झाडावरुन खाली उतरला.

<गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>
This is decision box in my Dhruman story flowchart. अजुन किती लांबवायची? असे सशासारखे १०-१५ प्रसंग टाकता येतील. आत्ता तो झाडावरुन उतरतो आहे तेव्हाच एखाद्या खारीला दुष्ट मांजरीपासून वगैरे वाचवू शकेल. पुढे १०-१५ संकटे पण टाकता येतील मग ओघाने. खूप लांबड लागेल. अजून बरीच गोष्ट राहीली आहे - सरोवरापाशीपण काहीतरी घडवायला पाहिजे. खरे तर ब्लॉगच्या बाबतीत एक नियम करायला पाहिजे, १०२४*७६८ रीजोल्युशनमधे नोटपॅड फुल स्क्रीनमधे उघडायचे, मग विना स्क्रोलबार जेवढे मावेल तेवढेच एक पोस्ट पाहिजे. सध्या एकच प्रसंग पुरे, धृमण दीर्घायुषी होता, अजून एखादी गोष्ट लिहू वाटल्यास.
फॉर्म्युला सही आहे पण, जेवढ्या मदती तेवढी संकटे, एकदाच विचार करायचा * कंटेंट मिळते गोष्टीसाठी.
च्यायला, मेल्यावर मी स्वर्गात जाईन का? सशाला मारुन टाकले बिचाऱ्या.
</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>

झाडावरुन उतरल्यावर धृमणाने चालण्याचा वेग वाढवला, आता सरोवर एकदा बघितल्यामुळे त्याला हुरुप आला होता. त्याच्या अंदाजानुसार अजुन एका प्रहरात तो सरोवरापाशी पोहोचला असता. झपाझप पावले टाकत तो जात होता, अधेमधे पोटऱ्यांवर फटके पडतच होते. जसाजसा तो जवळ जात होता तसा तसा अंधार दाटून येत होता. अजुन सुर्यास्ताला बराच अवकाश असताना अंधार का दाटतो आहे अशा विचारात तो चालला होता. हळू हळू आजूबाजूचे व समोरील वृक्षवेलीही कमी होत गेले आणि एक विस्तीर्ण समतल भूभाग सुरु झाला जेथे क्षुल्लक तृणांकुरांशिवाय जीवनाचे काही अस्तित्व दिसत नव्हते. समोर नीट पाहिले तर त्याच्या लक्षात आले, उंचावरुन दिसणारी ती गडद रेषा म्हणजे एक ऊंचच उंच काळीकभिन्न भिंत होती. कुठवर ही भिंत पसरली आहे ते पाहण्यासाठी त्याने डावी-उजवीकडे नजर टाकली तर भिंतीला काही अंतच नव्हता.
विषुववृत्त म्हणतात ते हेच काय असा प्रश्न पडला त्याला क्षणभर. भिंतीला स्पर्श करण्यासाठी उत्सुकतेने तो धावतच जवळ गेला. अतिशय नितळ, गुळगुळीत भिंत होती ती.
पलिकडे सरोवर आहे हे माहित नसते तर त्याने भिंत ओलांडायचा विचारही केला नसता.
धृमण जोरात हसला व म्हणाला,
"ह्या भिंतीच्या माथ्यावर गेल्यावर गंधाची तरी काय गरज आहे, ढगांना उचलूनच घेवून जावू राज्यात. राजपुत्रा, चढ बाबा ही भिंत, बापाला तुझ्या राज्य चालवायचे आहे".

भिंत चढायचा एकच मार्ग होता, आपल्या बाणांचा एक सेतुसोपान तयार करणे व चढून जाणे. अंदाजाने तो मागे चालत गेला. खांद्यावरुन आपले धनुष्य काढून दोन्ही हातात समोर धरले. डोळे बंद करुन हळुवारपणे त्यावर माथा टेकवत तो म्हणाला "जमदग्नये नमः"
एकवार आकाश भेदणारा टणत्कार करुन त्याने प्रत्यंचा खेचली व त्या कृष्णकड्याच्या दिशेने बाण सोडला. त्याच्या मनात क्षणभरही विचार आला नव्हता की, धृमणाचा बाण वाया जाउ शकतो...भिंतीवर बाण धडकून ठिणग्या उडाल्या तर खऱ्या परंतु बाण रुतला नाही.
हे असे प्रथमच झाले होते. तो पुटपुटला "ज्या धृमणाच्या बाणांनी कुब्रपुरीचा हीरकपर्वत भेदून जलस्त्रोत निर्माण केले होते त्याच धृमणाच्या बाणाचा एका सामन्य भिंतीने अवरोध करावा ?". हे प्रकरण मायावी असल्याने याचा उलगडा झाल्याशिवाय पुढचे मार्गाक्रमण अशक्य आहे हे त्याला कळून चुकले.
वर बघत धृमणाने एक गगनभेदी आरोळी ठोकली, "लाल सशाला दिली मी वेळ, पण आता कसा सोडवू हा खेळ".

आता काय होईल याची कल्पना नसल्याने सर्व ईंद्रिये सज्ज ठेवली. आकाशवाणी झाली तर कानात प्राण करुन ऐकायल तो तयार होताच त्याचवेळी गरुडाच्या नजरेने आजुबाजूचे निरीक्षण करु लागला. निमिषार्धातच काळ्या भिंतीच्या दोन्ही बाजूंना दोन लाल रेषा उमटल्या, भिंतीच्या मध्यावर येऊन त्या दोन रेषा एक झाल्या व एकच आरक्त रेषा त्याच्या दिशेने वेगाने धावू लागली. त्या जवळ येताच त्याला कळाले, एखाद्या चपळ घोडदळाप्रमाणे असंख्य लाल ससे त्याच्याकडे धावत येत होत. तो काही बोलणार इतक्यात अग्रभागी असलेला लाल ससा म्हणाला,
"राजपुत्रा आम्हाला काही प्रश्न विचारु नकोस, ह्या भिंतीच्या खालून सरोवरापाशी पोहोचवाणारे भुयार तयार करुन हवे असेल तर फक्त म्हण - शशकेंद्रासाठी गेलो मी वर, माझ्यासाठी खणा चर".

ध्रुमणाने तसे म्हणताच, विद्युल्लतेच्या वेगाने सशांची रांग भिंतीकडे गेली आणि थेट जमिनीत घुसली, थोडयाच वेळात नाहीशी झाली. ध्रुमण पळत पळत भिंतीकडे गेला तर एकावेळी चार माणसे जातील असे रुंद भुयार तयार होते. काही विचार न करता तो त्यात शिरला व धावतच राहीला. उतार संपला आणि चढ सुरु झाला तसे आल्हाददायक रविकिरण चमकू लागले. आणि वाऱ्याच्या थंड झुळका वाहू लागल्या. बाहेर पडल्यावरचे दृष्य विहंगम होते, धृमण जोरात ओरडला,
"मायला ! राजर्षिंचा विजय असो, हे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी मी चालत काय रांगतपण आलो असतो !". समोर अथांग पसरलेले नीळेशार सरोवर, चोहूबाजूला पिवळी फुले, उगाचच उंच उड्या मारत कस्तुरीगंध पसरवणारे मृग आणि मंद कुजन करणारे पक्षी.
धृमण बराच वेळ वेड्यासारखा हसला आणि म्हणाला,
"येथे कसली कसोटी? अशा रम्य जागी हिंस्त्र श्वापदांशी युध्द जरी केले तरी त्यात रंभेसह प्रणयाचा गोडवा असेल". आपले विचार भरकटायला लागले हे लक्षात येऊन तो एकदम भानावर आला व कसोटीचा विचार करु लागला. सरोवराचे पाणी प्यायला जायचे नाही हे त्याने आधीच ठरविले होते. ते मनात पक्के केल्यासारखे तो म्हणाला
"या अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात हो. माहीत नाही तर कशाला प्या नं पाणी. मायावी बियावी असतंय हे असलं. खाण्याचे ठीक आहे पण आपलं आपलं आणलेले पाणी प्यावे माणसाने"

<गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>
या पॉईंट्ला मी थकलो आहे. एक भिंत ओलांडली भुसनळ्याने आणि शंभर ओळी त्याच्यावर. आत्तापर्यंत कसोटी होउन गोष्ट संपायला पाहिजे होती. आणि जमिनीत बाण मारुन भुयार खणायची कल्पना धृमणाला सुचली होती पण वेळ गेला असता त्याने, आठवडाभरात गंध घेवून परत जावून यज्ञ करुन पाउस पाडायचा आहे.
बोर लिहीतो राव मी जाम. असुदे. भिंत ओलांडायला खरं अजुन एक ऑप्शन होता, भिंतीला दरवाजा असणार आणि मंगलसिंग गार्ड असणार अशीही कल्पना मनात आली होती. मग त्याला हरवायला ससे कसेतरी मदत करणार. म्हणजे मंगलसिंगला या गोष्टीत टाकले असते ना तर जब्बरी बॅकरेफरन्स झाला असता. टॅरँटिनोसारखं. पण नको, आधीच एक लिंक आली आहे आधीच्या पोस्टची.
शिवाय "मी गेलो वर, मला खणा चर" हा यमक आवडला माझा मलाच. इथे युध्द नको टाकायला, रम्य प्रदेशाचे मातेरं होईल. धृमण शूर आहे पण शक्यतो सामोपचाराने घेतो तो. मागे त्याने कुब्रपुरीचा हीरकपर्वत भेदला तेव्हा केले होते त्याने विकट, फीअर्स असे युध्द.
एका बैठकीत हे सर्व कोणी वाचू शकेल का? नाही, हे सर्व कोणी वाचू शकेल का?
टॅग लिहीण्यातपण वेळ जातो यार. पुढे, आता लवकर संपवूया राव.
</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>

राजपुत्र आता आजूबाजूला कुठे आश्रम दिसतो का ते पाहू लागला पण कुठेही आश्रमाचे चिह्न नव्हते की कुणा मनुष्याची चाहूल नव्हती. त्याच्या कानांनी वेगळाच आवाज टिपला, गोड आवाज होता तो पण पक्ष्यांचा निश्चितच नव्हता. सरोवराच्या शांत निळ्या पाण्यात अरंख्य जलतरंग उमटले...व एक आकृति प्रकटली. धृमणाने त्या ललनेकडे पाहिले. आधीच त्याला ह्या प्रदेशाचे सौंदर्य सहन होत नव्हते त्यात ही आता. साक्षात सौंदर्यच त्याच्यासमोर उभे होते. केशरी, पिवळ्या फुलांचा माळा घालून श्वेत वस्त्र ल्यालेले सौंदर्य !
आपसुकच तो म्हणाला.
"ओह...फक". (धृमणाला भावना अनावर झाल्या की तो विचित्र अगम्य भाषेत काहीतरी बरळू लागे)
सावरुन तो म्हणाला, "सादर वंदन...आपण कुठल्या देवी, क्षमा करा मी ओळखले नाही"
मंजुळ आवाजात खळखळून हसत ती युवती म्हणाली,
"राजकुमार, मी कोणी देवी नाही, धर्वणआश्रमात प्रवेश करण्याआधी मी प्रत्येकाची परिक्षा घेते. यात उत्तीर्ण होणाऱ्यांनाच आश्रमात प्रवेश मिळतो"
कसली परिक्षा आता, हे धृमणाच्या मुद्रेवरचे भाव वाचून ती म्हणाली - "राजकुमार मी तुम्हाला तीन प्रश्न विचारीन त्यातल्या दोन प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे दिलीत तरच तुम्हाला धर्वणऋषिंचे दर्शन लाभेल, लक्षात घ्या कुमार, बरोबर किंवा चूक उत्तराची अपेक्षा नाही. तुमच्या अंतर्मनातील प्रामाणिक उत्तर द्याल तरच तुम्हाला प्रवेश मिळेल."
धृमणाने विचार केला, हे बरं आहे राव कटकट नाही, नाहीतर काहीजणांना जाम अवघड कसोट्या द्याव्या लागतात. आपण आपले मनात येईल ते सांगायचे. वा. धर्वण चांगला आहे बुवा माणूस. विचार थांबवून तो म्हणाला,
"विचारा प्रश्न"
हलकेच हसत ती युवती म्हणाली, "विचारते पण अजून एक, कृपया मला समजेल अशा शुध्द भाषेत उत्तर द्या, मगाशी काहीतरी अगम्यच..." धृमणाने हसत मान डोलावली, व मनातल्या मनात इष्टदेवतेचे स्मरण केले.

"पहिला प्रश्न, जीवनात सर्वात वाईट व्यसन कोणते?"

धृमण आत्मविश्वासाने बोलू लागला,
"मद्य, वारांगना, द्यूत अथवा तत्सम्‌ व्यसने धरतीच्या कानाकोपऱ्यात पसरली आहेत व ती स्वाभाविकपणे वाईटच आहेत. परंतु माझ्या मते जीवनात सर्वात वाईट व्यसन अध्यात्माचे, आपले काम सोडून अविरत भक्तिमाहात्म्य आळवण्याचे.
जेव्हा मनुष्य विवेक विसरुन कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करतो तेव्हा ते व्यसन म्हणून गणले जाते. प्रत्येक व्यसनाने मनुष्य कर्तव्यच्युत होतोच. मद्य वा द्युत याप्रकारच्या व्यसनांनी पोखरलेल्या मनुष्याला जाणीव असते की तो वाममार्गाला लागला आहे परंतु अध्यात्माचे व्यसन भल्या भल्यांना कर्तव्याचा विसर पाडते. ह्या व्यसनाने आजवर भूतलावर अनेक राज्ये, साम्राज्ये लय पावली आहेत.
कर्म करुन ईश्वरसाधना करणाऱ्या सजीवासारखा पुण्यवान जीव नाही आणि ऐहिक कर्तव्ये टाळून, भक्तिचा अतिरेक करुनही स्वत:स पुण्यवान समजणाऱ्यासारखा दुर्दैवी जीव नाही.
ते सर्वात वाईट याकरिता कारण ज्याला हे व्यसन जडले आहे तो मनुष्य स्वत:स व्यसनी तर समजत नाहीच पण समाजही अध्यात्माच्या व्यसनाला, व्यसन समजत नाही. इतरप्रकारच्या व्यसनी लोकांना समज देण्यात येते, त्यांची हेटाळणी होते परंतु अध्यात्मापायी आपले कर्तव्य टाकून पळालेल्या लोकांचे समाज गुणगान गातो.
साक्षात भगवंतांनी कर्माचे महत्व विषद करुन अर्जुनास युध्दास भाग पाडले. भगवंताचा कर्माचा उपदेश अंगी बाणविताना यश, अपयश प्राप्त करणाऱ्यांच्या कर्माची व वर्तणुकीची विश्लेषणे होतात. तर केवळ त्या उपदेशाचे नि:हेतुक पाठ करुन उपदेश करणाऱ्यांवर अविमृष्य श्रध्दा ठेवली जाते !
जर बाह्यसाधनांनी क्षणभर मन निर्विकार करुन आनंद शोधणाऱ्यांचा तिरस्कार केला जातो तर अनंतकाळ च्या सुखाच्या अनुभुतीच्या मागे लागाणरे, मोक्षासाठी सर्व विधित कर्तव्ये विसरुन, झटणारे सुध्दा तीव्र तिरस्कारास पात्र नाहीत का?
देवी, अध्यात्माचे व्यसन वैयक्तिक पातळीवर क्षती तर पोहोचवतेच, शिवाय ते पूर्ण समाजपतनासही कारणीभूत ठरते"
धृमणाने क्षणभर श्वास घेतला व म्हणाला,
"देवी क्षमा असावी, उत्तर योग्य असेल वा अयोग्य. प्रामाणिक उत्तर द्यायचे आहे म्हणून मी हे उत्तर दिले. राजर्षि, धर्वण व या धरेच्या भल्यासाठी झटणाऱ्या असंख्य कर्मयोगी ऋषिगणांच्या प्रति मला अतीव आदर आहे"

धृमण असे म्हणल्यावर युवतीची गंभीर मुद्रा बदलली व ती म्हणाली, "कुमार पुढच्यावेळी थोडक्यात उत्तर दिले तरी चालेल"

"दुसरा प्रश्न, सौंदर्य श्रेष्ठ का बुध्दिमत्ता?"

धृमण पूर्वीच्याच आत्मविश्वासाने बोलू लागला,
"दोन्ही समसमान हे साहजिक उत्तर आहे. किंबहुना बुध्दिमत्तेला नेहमीच श्रेष्ठ समजले जाते. पण देवी माझ्या मते, सौंदर्य हेच बुध्दिमत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे. एखाद्या व्यक्तिला परिश्रमाने ज्ञान ग्रहण करता येते पण सौंदर्य आणि बुध्दिमत्ता इश्वरदत्तच असते. दोन्हीही धारण करणाऱ्यांना ते मिळविण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत. बुध्दिमत्ता मरेपर्यंत सोबत असते तर सौंदर्य हे केवळ तारुण्यात. याकारणाने सौंदर्याला नेहमीच हिणवले जाते व बुध्दिमान लोकांना आदर दिला जातो. ह्याच अन्यायामुळे माझा कल सौंदर्याकडे आहे. त्यामुळे आयुष्यभर आपल्या पुंजीतले केवळे अंश पुरवणाऱ्या बुध्दिमत्तेपेक्षा तारुण्यात आपले सर्वस्व उधळून देणारे सौंदर्यच श्रेष्ठ."

युवती किंचीत संभ्रमित झाली होती, धृमणाचे विचार मनापासून न पटल्याचे तिच्या चर्येवर स्पष्ट दिसत होते. पण निमिषार्धातच पूर्ववत स्मित देवून ती म्हणाली.
"राजपुत्र धृमण, आपली उत्तरे प्रामाणिक आहेत व तुम्हाला धर्वणाश्रमात आदराने प्रवेश मिळेल, तिसरा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही परंतु आपली इच्छा असल्यास मी तो विचारीन."

धृमण त्वरेने म्हणाला, "नको नको देवी, शक्यतो काम टाळणे व तरीही मिळालेच तर मनापासून करणे असा माझा स्वभाव आहे. तेव्हा आपण लवकरात लवकर गुरुजींकडे जावून गंध घेउ. मंडळी खोळंबली आहेत घरी"
त्याच्या या बालिश उत्तरावर खळखळून हसत युवती म्हणाली,
"राजकुमार प्रामाणिकपणे उत्तरे द्यायची कसोटी संपली आता. मला आता धवलिका म्हणा आणि चला लवकर आश्रमाकडे, बाबा वाट पाहत असतील".
ती पाण्यातून पूर्णपणे बाहेर आली, आपला हात पुढे करुन म्हणाली, "डोळे मिटून माझा हात धरा"
धृमणाच्या मनात आले, हात तर पकडीन गं बाई, पण जातेस कुठे? पुढे पाणी, मागे काळी भिंत आणि भुयार. त्याला असे विचारात थांबलेले पाहून धवलिका म्हणाली,
"काळजी करु नका, मी सुखरुप आश्रमात घेउन जाईन तुम्हाला"
धृमणाने तिचा हात धरला व डोळे मिटले. डोळे उघडले तेव्हा तो एका स्वच्छ कुटीत होता. पुढे सरोवर तसेच होते तर मागे काळ्या भिंतीच्या इथे लांबलचक काळीभोर जमीन होती.

<गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>
संपली आहे आयडीयली गोष्ट आता, पण मनात आहे ते सगळे उतरावे, सगळीकडे का मन मारा. फक शब्द मधे घालणे गरजेचे नाहीये पण योग्य आहे तो शब्द तिथे. आटपतोच आता १०-१५ वाक्यात.
बोर आहे, its more of a kissing sort of scene towards the end of the story
</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>

प्रसन्न मुद्रेने बसलेल्या धर्वणांना राजपुत्राने साष्टांग प्रणाम केला. राजपुत्राला गंध लावून ऋषि त्याच्याकडे सस्मित मुद्रेने पाहू लागले.
धृमण उतावीळपणाने म्हणाला, "गुरुजी, आणि मला राज्यात न्यायला गंध ?"
ऋषि म्हणाले, "धृमणा, तुझ्या राज्यात पर्जन्यवृष्टी सुरु झाला रे आधीच."
तेवढ्यात धवलिकेने कुटीत प्रवेश केला व म्हणाली "बाबा, झाली सर्व व्यवस्था". प्रवेशद्वारापाशीच ती संकोचून उभी होती.
धृमणाने तिच्याकडे पाहिले तेव्हा त्याला प्रश्न पडला, काही क्षणापूर्वी आपली कसोटी घेणारी ती हीच का?

"तू आता सरोवरी स्नान करुन घे, मग थोडेसे अन्नग्रहण करुन याच कुटीत निद्रा घे. प्रात:समयी मी समोरच्या त्या ध्यानकुटीत असेन. जा, सरोवराचे पाणी कोमट केले आहे"
धृमणाने परत प्रणाम केला व तो उठला, जाताना त्याने धवलिकेकडे पाहिले तर ती तशीच संकोचून पायाच्या अंगठ्यांनी माती उकरत उभी होती.

दुसऱ्या दिवशी पहाटे जाग आल्यावर धृमणाने स्नान आटोपले व तो ध्यानकुटीकडे गेला. त्याला बसायला खूण करुन ऋषि म्हणाले,
"धृमणा, तू इथवर प्रवास करुन आलास, आम्ही कसोटी घेतली तर आम्हाला अधिकार न विचारता नम्रपणे प्रामाणिक उत्तरे दिलीस, आमच्या मनात आपण तुझ्या उपयोगी पडावे असे आहे, तुझ्या मनातला वर माग"
धृमण म्हणाला,
"पण गुरुजी, आपणांमुळे तर पर्जन्यवृष्टी सुरु झाली आहेच माझ्या राज्यात, मी ज्याच्यासाठी आलो ते कर्तव्य पार पडले मला आणिक काही वर नको"
धर्वण हसून म्हणाले, "पर्जन्यवृष्टी तर निसर्गाने केली. असो. तुझ्याविषयी ऐकले ते खरे आहे म्हणजे. तू मागितला नाहीस म्हणून आम्ही वर देवू नये असे नाही".
आपल्या कमंडलूमधले पाणी त्याच्या माथ्यावर शिंपडत ते पुढे म्हणाले, "वत्सा, तुझ्या हातून सुटलेला बाण कुठ्ल्याही इच्छित गोष्टीला भेदू शकेल, ती गोष्ट मायावी असल्यास बाण माया भेदेल"
"कूल", धृमणाला आपला आनंद लपविता आला नाही, त्याने ऋषिंना साष्टांग नमस्कार केला.

"वत्सा, एक इच्छा आहे माझी, तुला शक्य असल्यास होय म्हण", ऋषिंचे वाक्य पूर्ण होण्याआधीच धृमण म्हणाला "आपली इच्छा ही मजप्रत आज्ञा आहे गुरुजी"
"धवलिकेने तुमच्या राजर्षिंच्या आश्रमात यापुढील अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे, तुला शक्य असल्यास तू तिला राजर्षिंच्या आश्रमात पोहोचते करशील का?"
धृमणाने शक्य तेवढ्या निर्विकार चेहऱ्याने होकार दिला.

निघण्यापूर्वी धर्वणांनी राजपुत्राला दोन अबलख अश्व दिले, धवलिकेच्या डोळ्यातले पाणी पुसून ते म्हणाले, "मुलांनो या अश्वांना केवळ टाच मारा, सुर्यास्ताच्या आत तुम्ही राजर्षिंच्या आश्रमापाशी पोहोचाल", धवलिकेकडे बघून ते पुढे म्हणाले, "वाटेत काही संकटे आली तर राजकुमार समर्थ आहेतच"

दोघांनीही धर्वणांना पुनश्च एकवार वंदन केले व ते प्रस्थान करणार एवढ्यात धृमण म्हणाला,
"गुरुजी एक विचारायचे राहिले, इथले ससे लाल कसे, फारच गूढ आहेत ते"
धर्वण म्हणाले, "अरे, जाताना धवलिकेशी काहीतरी बोलशील का नाही, बघ किती उदास दिसते ती, तिला विचार नंतर याचे उत्तर"
या अनपेक्षित उत्तराने थोडासा गांगरुन धृमण पुढे म्हणाला, "आणि धुंगारण्यातून येताना सतत मला पोटऱ्यांवर मार बसत होता तो काय प्रकार आहे?"
धर्वण परत हसून म्हणाले, "आता निघतोस का नाही, सुर्यास्ताच्या आत पोहोचायचे आहे ना? परत धवलिकेला माझ्याकडे सोडायला येशील तू, कदाचित नंतरही येशील वारंवार तेव्हा कधीतरी एकदा तुलाच उकलेल ते गूढ"


<गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>
च्यायला संपली एकदाची. डोक्याला ताप. शेवटच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आहेत माझ्याकडे, काहीतरी फिलॉसॉफिकल लिंका जुळवायच्या आपल्या. पण अशी उत्तरे गोष्टीत सांगितली नाहीत की भारी वाटते एकदम. हे पोस्ट करण्यापूर्वी परत एकदा वाचणे म्हणजे शिक्षा आहे. गोष्ट नको पण टॅग आवर.
टॅग गाळले, फक, कूल गाळले तर कसे होईल. नको तसे.
मधेच धृमणाला मारुन टाकावे, असे मनात आले होते, झाडावरुन उतरताना पडून मरतो तो असे. तिकडे त्याचा भाउ पण मरतो युध्दात. मग धवलिका गंध घेऊन जाते त्याच्या राज्यात आणि राज्य करते. असे सगळे मनात आले होते पण लयच इनसेन्सिटीव्ह झाले असते.

होल्सेल मधे झाले हे पोस्ट एकदम.
</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>

***

Sunday, June 28, 2009

बोधकथा-३

माझ्या पूर्वीच्या बोधकथा फारच लांबड्या आणि रद्दड होत्या असे मला जाणवले. मी परत वाचून नाही बघितल्या पण मला आतून जाणवले तसे. ही पण रद्दडच होईल.
*

ही मन्याची गोष्ट आहे. मन्या एक साधा, सरळमार्गी, पापभिरू-बापूबिरु मुलगा होता.
पापभिरू-बापुबिरु टर्म बद्दल स्पष्टिकरण गरजेचे आहे. मुळात बापुबिरु वाटेगावकर हा एक चांगला रॉबिनहूडसदृश मनुष्य होता असे खटाव तालुक्यातील व आसपासच्या भागातले लोक मानतात. मीपण तसेच मानतो (बरेच लोक तसे मानत नाहीत)
पापभिरू-बापुबिरु म्हणजे, जो शक्यतो पापभिरु असतो पण त्याच्याबाबत कुणी काही अन्याय/पाप केले की चिडतो आणि मग त्रास देतो. म्हणजे ज्याला वाईट लोकांशी वाईट वागावे लागते तेपण वाईटांनी खोडी काढल्यावर असा मनुष्य. मग तो वाहवत जाउन पर्मनंट वाईट बनतो. मूळचा मनाचा चांगलाच असतो तो पण.

तर मन्या तसा होता, म्हणजे अन्याय झाल्यावर डायरेक्ट हिंसाबिंसा नाही, आपल्यावर अन्याय करणाऱ्यांचा जमेल तसा कॉन्फरन्स ब्रिजवर जाहीर अपमान करणे किंवा ५० एक लोक असतील अशा महत्वाच्या ईमेल-चेन मधे अशा लोकांचे अज्ञान दाखवून त्यांचा पोपट करणे ही त्याची मोडस ऑपरेंडी. असो, तर गोष्ट सुरु.

मन्याच्या आयुष्यात अशी फेज आली की त्याला वाटले, खूप झाले वाईट वागणे. व्यवहारात असेच करावे लागते म्हणून किती दिवस करायचे? आपण आता एकदम चांगले वागायचे.
मन्या प्रचंड मेथोडिकल प्राणी.
रोज आपण सर्वात जास्त वाईट वागतो त्या क्षेत्रात चांगले वागणे जमले तरच खरे. म्हणून त्याने नोकरीत चांगले वागायचे ठरवले. तो प्रोफेशनल होताच पण चांगले वागण्यात नक्कीच कमी पडायचा.
आपण काय करतोय त्याबबतीत फंडे क्लिअर असावेत म्हणून त्याने "चांगले वागायचे" म्हणजे कसे याचे नियम ठरवले -
१. वाईट लोकांशी शक्यतो वाईट वागायचे नाही. वाईट कोण वगैरेची व्याख्या त्याला गरजेची नाही वाटली. ज्याचे त्याला कळत असते कोण वाईट आहे ते.
२. कुठल्याही मेलमधे किंवा कॉलवर "टू द पॉईंट" उत्तरे द्यायची, वैयक्तिक पूर्वग्रह प्रदर्शित करायचे नाहीत.
३. स्वत:वरही अन्याय होउ द्यायचा नाही. स्वत:वर अन्याय होत आहे असे वाटल्यास करणाऱ्यांना सरळ सांगायचे - हे चूक आहे. बदला म्हणून आपण काही चूक वागायचे नाही.
मन्याच्या मते तिसरा पॉईंट महत्वाचा होता, बरेच संत लोक स्वत:वरच्या अन्यायाची दखल घेत नाहीत, जे चूक आहे असे त्याला वाटायचे.
असे एकुण ग्रॉउंडवर्क झाल्यावर त्याला वाटले आपल्याला हे जमू शकते कारण वागणुकीत जास्त काही बदल नाहीयेत. फक्त स्वत:हून कुणाची खोडी काढायची नाही, आणि कुणी आपली खोडी काढली तर तिसऱ्या नियमानुसार वागायचे.

त्याने तसे वागायला सुरु केले. दिवस चालले होते, साधारण महिना झाला तरी कोणी काही दखलच घेईना. म्हणजे कुणी दखल घ्यावी म्हणून त्याने असे वागणे सुरु केले नव्हते, पण लोकांना इन जनरल कळायला पाहिजे की हा किती चांगला वागतोय ते. लोक दखल घेत नाहीयेत हे बरेच आहे असे म्हणून त्याने चांगले वागणे सुरुच ठेवले.

दिवस तसे वाईट होते, मंदीचे होते. त्याच्या ऑफिसला कळून चुकले आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, ऑफिसने मोहिम हाती घेतली - सगळीकडे आपला प्रेजेन्स दाखवायचा. ईतरांनी म्हणले पाहिजे, हे लोक नसतील तर शक्य नाही बुवा क्लायेंटला सांभाळणे.

मन्यालाही ऑर्डर्स मिळाल्या की, दुसऱ्या सेंटरमधल्या कुणालाही अनॉफिशीयली मदत करायची नाही.

मग एक स्कँडल झाले. स्कँडल शब्दासारखे भयानक असे स्कँडल नाही, मन्याच्या मनातले स्कँडल - त्याला संभ्रमात टाकणाऱ्या दोन घटना -
१. दुसऱ्या सेंटरमधे एक अतिमहत्वाचा ईश्यू झाला, ज्यात फक्त मन्याच मदत करु शकणार होता. मन्याने आपल्या सर्व जुन्या मित्रमैत्रिणींच्या छोट्याश्या मदतीच्या याचना कठोर हृदयाने ठोकारल्या. मग ऑफिशियली त्याच्या स्वत:च्या सेंटरकडून आदेश आल्यावर त्याने एका फटक्यात सगळ्यांना मदत करुन ईश्यू संपवला.
मन्याच्या व त्याच्या सेंटरच्या स्तुतीचे मेल वाहू लागले. आपल्या चांगले वागण्याच्या निग्रहानुसार त्यानेपण लिहून टाकले- मी योग्य मार्गदर्शन केले तसेच इतरांनीपण मोलाचे काम केले. हे वाचून त्याची मदत घेणारे इतरेजनपण खूश झाले.

२. काही दिवसांनी दुसऱ्या सेंटरमधे परत तसा़च एक अतिमहत्वाचा फक्तमन्या ईश्यू झाला. मन्याच्या सेंटरमधे त्या इश्यूची विशेष कल्पना नव्हती तोवर त्याने आपल्या मित्रमैत्रिणींना कटकट नको म्हणून फटकन ऑफलाईन मदत केली.
जास्त लांबड न लागता सर्व रामायण संपले म्हणून तो शांत झोपी गेला. सकाळी उठून बघतो तर काय - ज्यांना मदत केली त्यांनी उगाचच जगभराला एक मेल केला की, "काल असे असे झाले व आम्ही सगळे आमचे आम्ही निस्तरले." एकुण मन्याची, तुमच्या सेंटरची गरज नाही आम्ही स्वावलंबी आहोत असा उग्र दर्प होता त्यात.
आता "चांगले वागणे"च्या तिसऱ्या नियमानुसार तुम्ही माझ्यावर अन्याय करत आहात असे तरी कसे सांगणार मन्या, तसे म्हणाला असता तर त्याला आपल्या साहेबांचे जोडे बसणार.
मग मन्याने ज्या मनुष्याला ऑफलाईन मदत केली त्यालाच ऑफलाईन जाब विचारला तर त्याला उत्तर मिळाले - एक ओशाळवाणा स्मायली.

हे सर्व काही स्कँडल वाटत नाही पण मन्याच्या मनात याने मोठ्ठे मंथन वगैरे झाले. पहिल्यावेळेला आपण बरोबर वागलो, दुसऱ्या वेळेला अगदीच आदेशाचे उल्लंघन नाही केले, बरोबरच वागलो. आपल्यावर बारीकसा का होईना अन्याय झालाच शिवाय तिसरा नियमपण पाळता येत नव्हता, सगळे फंडे गारद.
पूर्वी अशी काही कॉम्प्लिकेशन्स नव्हती हे जाणवले त्याला. तातडीने त्याने बोध घेतला व पूर्वीसारखे वागू लागला. नंतर एकदा दुसऱ्या घटनेचा त्याने बदलासुध्दा घेतला (पापभिरु- पध्दतीने)

अधेमधे मन्या सेंटी होतो व सगळ्या स्कँडलबाबत चिंतन करुन आढ्याला(नियतीला) प्रश्न विचारतो की, असे का वागावे लोकांनी?
गाण्याचा मूळ अर्थ सोडून गाण्याला आपल्या जीवनाशी रीलेट करण्याची मन्याची जुनी सवय. एक दिवस तो नुसरत आणि एडीची गाणी ऐकत होता.
फेस ऑफ लव्ह लागले, ओळी होत्या -
जिना कैसा प्यार बिना
इस दुनियामें आये हो तो
एक दुजेसे प्यार करो
मन्याला एकदम आठवले. "हो हो, असेच वाटले होते दुसऱ्या घटनेच्या आधी अनऑफिशीयली मदत करताना. काहीही होवो यार, आपण चांगले वागणे सोडून द्यायला नको होते राव"

पण त्यानंतर लगेच द लाँग रोड लागले -
And the wind keeps roaring
And the sky keeps turning gray
And the sun is set
The sun will rise another day...

We all walk the long road. Cannot stay...

लगेच मन्या स्वत:वर खूश झाला. पुढे कधीतरी वागू चांगले, सध्या तरी बरोबरच केले आपण च्यायला, असे म्हणाला. पुढे लाँग रोडच ऐकतच बसला लूपमधे.
**

तात्पर्य/बोध:
कसला आलाय डोंबलाचा बोध, बोर झालो मीच इथे. मागच्या कुत्र्यामांजरीच्या बोधकथा बऱ्या म्हणायची पाळी आली. तरीपण तात्पर्य हे लिहीलेच पाहिजे.

१. सगळ्यांशीच चांगले वागायला गेलात तर आपलेच वाईट होते.
२. संतलोक खरंच संत असतात, एकदा चांगले वागायचे ठरविले की पहिला बोध लक्षात ठेवायचा आणि तरीही चांगलेच वागायचे.

***

Sunday, June 21, 2009

उल्लेखनीय डायलॉग्स

आमच्या अपार्टमेंटमधला सर्वात मोठा(वयाने व ज्ञानाने) मित्र काही डायलॉग वापरुन, वेळोवेळी आम्हा उर्वरीत दोघांना योग्य ती समज देत असतो. आम्ही सर्वार्थाने लहान असल्याने व कसे वागावे याची काही पोच नसल्याने त्यांच्यावर अशी समज देण्याची पाळी वारंवार येते (बरेच डायलॉग हे एकाच अर्थाचे पण फक्त वेगळ्या शब्दात असतात)
खालील डायलॉग्स दिवसातून एकदाही ऐकायला मिळाले नाहीत तर कसेतरी होते -

१. मार्केट मे शरम नाम का एक सामान मिलता है, वो खरीद लेना सौ रुपये का खुद के लिये.

२. अता पता तो कुछ है नाही, आगये जबान लडाने हमसे.

३. कर दी देसी-पंती? खुदका कल्चर तो बिगाड दिया, गोरोंको भी बिगाड के छोडोगे तुम.

४. तुम्हारे गांव में कभी किसीने ऐसा किया था?

५. जाके अपने गांव में बोतल बनानेका कारखाना डालो, आगये सॉफ्ट्वेअर बनाने.

६. व्हिसा किसने दिया तुम्हे? / व्हिसा कब एक्सपायर होगा तुम्हारा?

७. एक खीच के दूंगा, चेहरे पे महाराष्ट्र/एम. पी. का नक्षा निकलेगा. (दोषी व्यक्तिनुसार राज्य बदलते) - हा लेटेस्ट डायलॉग, हल्ली हल्लीच पेपरमधे वाचला त्यांनी.

८. बद्तमिज इन्सान, तुम्हे देखके तो बद्तमिजी भी शरमा जायेगी.

९. सिव्हिलायझेशन के बारे मे तो सुनाही नही होगा तुमने.

१०.
(ऑफिसमधून उशीरा घरी आल्यास)
१०.१ एक बार पता चल गया, दिमाग नही है अपने पास, तो ऍक्सेप्ट करलो, क्यों हमेशा ट्राय करते बैठते हो?
१०.२ आगये रंगरैलिया मनाके? खालो अब चार निवाले, बरतन चमकने चाहिये.

११. जनमदिन कब है तुम्हारा, प्रशाद चढाके आवूंगा भगवानको तुम्हारे लिये.

१२. Are you out of your holy smoking, hippe freaking mind? (SNL मधे हा डायलॉग ऐकल्यापासून त्यांनी आपलासा केला आहे)

१३. (जेवताना)
यार, रोज खाना खाते हो, कभी भगवान का शुकर मानते हो? अकल के हिसाब से खाना मिलने लगा तो सालभर में एकाद रोटी के भी लाले पड जायेंगे तुम्हारे.

१४. मैं लायब्ररी जा रहा हूं, आ रहे हो? ओ सॉरी सॉरी, मैनेभी किससे पूछा.

१५. आज ऑफिसमें तुम्हारी बहोत याद आ रही थी फिर मैने डस्टबिनकी तर्फ देखा.

१६.
कॅज्युअल विचारपूस
काय झाला? बाळ रडत होता? - हा माझ्यासाठी राखीव.
कैसन छोटे ठाकूर? लूट ली इज्जते? - हा दुसऱ्यासाठी राखीव.

हे सर्व अपमानास्पद वाटू शकते पण ते अतीव प्रमापोटी आमच्याशी असे वागतात. म्हणूनच मी त्यांच्या आज्ञेनुसार हे लिहीले आहे.
आमची स्तुती करणारे ३-४ डायलॉगपण आहेत पण ते लिहीण्यास परवानगी नाही.

***