Sunday, May 31, 2009

नवीन म्हण

नवीन म्हण

"आई आजारी, बाप पुजारी"

शब्दार्थ - आई आजारी पडली असताना तिची शुश्रुषा करण्याचे महत्वाचे काम सोडून, बाप देवाची पूजा करत बसला आहे.
भावार्थ - सर्वांच्या दृष्टीने महत्वाचे व तातडीचे काम करणे सोडून आपलेच काहीतरी कमी महत्वाचे काम करत बसणे.

ही म्हण वापरता येईल असे बरेच प्रसंग असतात. दोनचार उदाहरणे बघू.

उदाहरण १.
सुरेश आणि रमेश आपले सामान नवीन घरी नेत होते. दोघांनी सोफा उचलायला हात लावला, अचानक रमेशने हात काढला आणि म्हणाला,
"सोफ्याच्या लेदरवर डाग कसले पडलेत? सुरेश थांब, तू धर सोफा असाच, मी लांबून बघतो जरा, हे डाग किती ठळक आहेत ते"
यावर सुरेश म्हणाला, "रम्या लेका, एकट्याने एवढा जड सोफा धरला आहे मी, आता धड खालीपण ठेवता येत नाही, तुला आत्ता या क्षणी, टोचतायत का ते डाग? तुझे म्हणजे, आई आजारी आणि बाप पुजारी"

उदाहरण २.
"महाराज, गुप्तहरांनी वार्ता आणली आहे की, वायव्यदिशेने सम्राट पश्तुनकेतू सात अक्षौहिणी सैन्यासह आपल्या राज्यावर चालून येत आहे", प्रधानजी त्वरेने बोलत होते.
"ह्म्म, बरं एक सांगा प्रधानजी, वसंतोत्सवाची सर्व तयारी झाली ना?", महाराज वदले.
"होय महाराज, सर्व तयारी झाली आहे, आज्ञा असावी, निघतो आम्ही", प्रधानजी चरफडतच राजमहालाबाहेर आले व मनात म्हणाले, "आई आजारी, बाप पुजारी"

तिसऱ्या उदाहरणाची खरेतर काही गरज नाहीये, पण असुदे, आमच्या क्षेत्रातले आहे.
उदाहरण ३.
काहीतरी गडबड झाली असल्याने सर्व इंटरनॅशनल कॉल्स फुकट जात होते, त्यामुळे कस्टमरने इंटरनॅशनल कॉल सुविधा बंद केली होती. गणेशने दोन तास खपून यावरचा फिक्स प्रॉडक्शनमधे पाठवला. फिक्स टेस्ट करायला प्री-प्रॉडक्शन टीम इतका वेळ का घेते आहे याची चौकशी करता त्याला कळाले की टेस्टर आपली टाईमशीट भरण्यात व्यस्त आहे. गणेश त्याला म्हणाला, "गाढवा आधी हे टेस्ट कर, नंतर भरा तुम्ही किती तास काम केले ते, अवघड आहे कंपनीचं आपल्या, इथे आई आजारी अन्‌ बाप पुजारी"

***

Thursday, May 28, 2009

टर्मिनेटर सॅल्व्हेशन

टर्मिनेटर सॅल्व्हेशन

प: "पुढची १५ मिनीटे, हे गाढव येणाऱ्या पिक्चरांच्या जाहिराती दाखवणार. आमच्यासारखे महागाढव त्या बघुन परत नवीन पिक्चरला येणार"

फ: "ईंग्लिश पिक्चरमधे मध्यांतर का नसते? नेहमीची कारणे नकोत - लांबी कमी असते, लिंक तुटता कामा नये"

ब्रुस विलीसच्यासरोगेटसपिक्चरची जाहिरात. फारच भारी जाहिरात एकुण.

प: "वॉचमनच्या वेळेस आपण वूल्व्हरीनची जाहिरात पाहिली, वूल्व्हरीन बघायला आलो तेव्हा टर्मिनेटरची पाहिली. आता टर्मिनेटरच्यावेळी सरोगेटस. धिस इज एंडलेस, थांबवले पाहिजे हे आपण"

फ: "काहीतरी कॉन्स्पिरसी थेअरी आहे याच्यामागे - आपल्याकडे मध्यांतर असते"

ब: प आणि फ, साल्यांनो, एकाने तरी हात काढा की खुर्चीच्या हॅंडरेस्टवरचा. सगळीकडे तेच, गाडीत, विमानात, थिएटरमधे. "handrests are supposed to be shared by passengers, आपापल्या हद्दीत हात ठेवला पाहिजे, तुम्ही लोक..."

प + फ: ओ मास्तर, चुकले आमचं. भाषण बंद करा पण.

प: पण सिरीयसली यार, आपण हे थांबवले पाहिजे, दर वेळेला नवीन प्रोमो, नवीन प्लॅन्स. पुढच्या वेळेला व्यवस्थित रीव्ह्यू बघूनच यायचे.

ब: वॉचमन, वूल्व्हरीन, टर्मिनेटर, सरोगेटस. एक लक्षात घेतलेस का आपण ग्राफिकल नॉव्हेल वरचे पिक्चर बघतो सगळे शक्यतो.

फ: ग्राफिकल नॉव्हेल म्हणजे काय?

टर्मि. सॅ.च्या पाट्या सुरु. ताठ बसतो.

प: गपा रे, पिक्चर सुरु होतोय.

फ: अरे येड्या, तु कशाला सावरुन बसलास? तुला काय पिक्चरमधे काम नाही करायचय आत्ता. शूटिंग झाले त्यांचे आधीच.

ब: हा, हा, हा. शूsssश... खरंच सुरु झाला आता.

प: डायरेक्टेड बाय McG.हा काय प्रकार आहे. फ नेटवर बघ, McG कोण आहे.

फ: आत्ता लगेच?

प: डेटा प्लॅन कशाला घेतलास मग मोबाईलवर?

ब: मोबाईलशी खुडबुड नको रे आत्ता, McG नाव आहे त्या डायरेक्टरचे. चार्लीज अँजेल्स वाला. शांत बसा आणि बघा.
**

आता महत्वाचे काहीतरी लिहायला पाहिजे, सीरीयस एकदम. झंडू बाम नको.
***

Wednesday, May 27, 2009

निरर्थक -३

निरर्थक -३, दिवसेंदिवस निरर्थकचे शेपूट वाढतच आहे.
*
देव आणि आठवणी या दोन विषयांवर बरीच पोस्टस वाचली मी मधे. लगेच आपला शहाणपणा दाखवायला मला "भूत आणि भविष्य" अशा सामाईक विरुद्ध विषयावर पोस्ट लिहावेसे वाटले.
पण भूत शब्दाचा अर्थ स्केअरी घोस्ट असा न घेता भूतकाळ असा किंवा भूतदया मधला भूत असापण घेतला जाउ शकतो. मग माझे टायटल ‘पूर्ण’ विरुद्धार्थी होणार नाही. भूत शब्द मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर की शिकार है.
"दानव आणि भविष्य" पण नको कारण दानव हेच बऱ्याच लोकांना देव वाटतात.
सगळा गोमकाला झाला, मेंदूमधे अशी धड्डाधड्ड validation exceptions येत गेली आणि अल्गोरिदमच गंडले फुल्ल मग असला काही आचरटपणा करण्याचा विचार मी सोडून दिला.
*

तर एकुण मला आठवणीच कमी असल्याने असे उलटे काहीतरी लिहायची इच्छा झाली असा मी निष्कर्ष काढला. तशा मोठमोठ्ठ्या आठवणी चिक्कार असतात प्रत्येकाला. पण सूक्ष्म म्हणावे असे काहीतरी आठवले पाहिजे. पूर्वी कसे आवडते शब्द लिहीले होते तसे बाकी पण सटरफटर काय काय आवडते ते लिहायला पाहिजे. भविष्यात सूक्ष्म आठवणी कमी पडू नयेत म्हणून आत्ताच पाउले उचलणे गरजेचे आहे. भविष्यासाठी तजवीज करणे मला फार आवडते. मी नोकरी करतो.
*

आवडती आडनावे
देवधर, पाटील, ढसाळ, ठाकरे, स्मिथ, पेज, पटाटा, ज्ञानसागर.

आवडती नावे
एप्रिल, समर(युध्द, वॉर, तबाही नव्हे - उन्हाळा), टँजरीन, केतकी, शंकर, अण्णा, काका, बापू, मन्या.
[अण्णा, काका, बापू ही नावे नाहीत सर्व/विशेष नामे आहेत असा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे - ही सगळी नावं पण असतात प्रगतिपुस्तकात. अण्णा का आण्णा ? ]

आवडते चौक
जुना संगम ब्रिज आणि आरटीओ रस्ता, नळस्टॉप, बिनखांबी गणेश मंदिराचा चौक, विंडसर आणि नीलचा चौक, मंडईतल्या दत्तमंदिराचा चौक - हा तर जीवनाचे कटू सत्य वगैरे सांगणारा चौक आहे, देव आहे, भाजी आहे, मिठाई आहे, ...

आवडते रस्ते
सिंहगड रस्ता, वाडिया कॉलेजच्या इथून ब्ल्यू डायमंडकडे जायचा रस्ता, ओंकारेश्वराचा पूल - हापण डेडली आहे, इकडे कार्यालय तिकडे स्मशान - लढा !

आवडत्या ओळी:
As we wind on down the road, our shadows taller than our soul
(Stairway to heaven)

बोर झाल्या सूक्ष्म आठवणी.

देव राहिलेच की यार. माईल्ड धार्मिक लोकांवर फार अन्याय होतो या जगात. माईल्ड सायन्सवाल्यांवरपण होतो. माईल्डपणावरच अन्याय होतो इन जनरल.
**

सौम्यस्मरणी

निबीड चकवणी
वेताळी आडवळणी,
वाट गारठवणी,
खर्ज घुबडगाणी
भूतांच्या आठवणी
काळजाची ठारचाळणी
रुधिराची साखळवणी
पापाची धमकावणी
पुण्याची चाचपणी
देवांची आळवणी
आर्त विनवणी
राउळाची ओळखणी
ज्योतीची तेजळणी
घंटेची किणकिणी
शक्तिची उजळणी
धाकधुक थांबवणी
मनाची शांतवणी
सौम्यस्मरणी

अरेरेरे, सरस्वतीदेवी कधी भेटली तर दोन कानसुलात देईल मला आणि म्हणेल - "शब्दांची नासवणी, काय ही फळकवणी".
असो. मीपण माईल्ड धार्मिक आहे, अंधाऱ्या निर्मनुष्य रस्त्याने मी एकटा चाललो असलो तर येडं लागते मला, मग मी एकदम मनापासून धार्मिक वागतो - पुढचे २-४ दिवस शिव्या देत नाही.
**

देवधर्म ज्यांना आठवला ते -
संवेद, मेघना (ह्या बिचाऱ्यांनी धर्मावर लिहिले आहे पण चालतयं की वो)

आठवणींवर लिहिणारी देवमाणसे -
भाग्यश्री, राज, अनिकेत
***

Sunday, May 17, 2009

वाईट जाहिरात

एका जाहिरातीचा मी तिरस्कार करतो. भयानक तिरस्कार ! एकदम "I hate it like a ..." प्रकारचा ईंग्लिश तिरस्कार.

कुठल्यातरी डास का झुरळ मारण्याच्या स्प्रेची जाहिरात होती ती. जाहिरातीत ती बाई कुठे कुठे कानाकोपऱ्यात स्प्रे मारायची आणि नंतर शेवटी एकदम कॅमेरासमोर उभे राहून डासांना असे काहीतरी म्हणायची - "यहाँ न आना....घर मेरा है". आणि ती हे म्हणते तो शॉट, लो-अँगल घेतला होता, मग स्प्रेची बाटली पकडलेला तिचा हात मोठ्ठाआ दिसायचा. त्यामुळे तर मला जास्तच राग यायचा. यायचा नाय, अजूनपण आठवून आठवून येतो. ती स्प्रेची कंपनी बंद पडूदे, दिवाळं वाजूदे त्यांचं. नको कुणीतरी टेकओव्हर करा.

मूळ मुद्दा ते विधान. माझा आक्षेप आहे तो भाग - "घर मेरा है"
यापुढचे माझे मत बऱ्याच लोकांना विनोदी, फालतू, मूर्खपणाचे वाटते, पण माझे ते "गंभीर" मत आहे. त्याच्यावर जास्त वाद घातल्यास मी मैत्री तोडण्याचा निर्णय घेवू शकतो. तशाच वॉर्निंगापण दिल्या मी बऱ्याच लोकांना, तेव्हा ते ताळ्यावर आले.

"घर मेरा है"
काय संबंध? ती बाई हे वाक्य आपल्या नणदेला, सासूला, वाटल्यास भावजयीला सुनावू शकते आमची काही ना नाही. नवरापोरांना पण ऐकव तशीच वेळ आली तर. वसुली अधिकाऱ्यांना पण ऐकवू शकता. म्हणजे घर खरंच तुमचे असो नसो तुम्हाला हे उच्चारायची परवानगी आहे. कारण कायदेशीररीत्या चुकीचे वाटले तरी बोलण्यात काहीतरी तथ्य असू शकते.

उदाहरणार्थ,
भाउबंदकीतले नवऱ्याचे वडिलोपार्जित घर असेल आणि दीर/चुलता अचानक हक्क मागायला आला, त्याचा घरावर कायदेशीर अधिकार असला तरी एखादी खमकी बाई म्हणू शकते -
"तुम्ही होतात परदेशी उंडारत, अधेमधे विचारपूस करायची राहिलीच, कधी सणासुदीचा एक फोन नाही.
सासूबाईंची तब्बेत एवढी बिघडली होती, पगार व्हायचा होता म्हणून एक हजार मागितले तर हा बाबा म्हणतोय...वहिनींच्या माहेरून आणा तात्पुरते !
बाहेर संडास बांधला, झालचं तर नवी टाकी, एवढी डागडुजी केली नियमित...खस्ता खाल्ल्यात या घरासाठी.
आता आलेत हक्क सांगायला, वडिलोपार्जित घर आहे म्हणे...काही मिळणार नाही हक्क - पोलिसात जा नाहीतर कोर्टात जा.
घर माझं आहे"
आता वरील उदाहरणात, घर नक्की कुणाचे आहे ह्या समस्येला अनेक पैलू, आयाम, अँगल वगैरे आहेत. त्यामुळे "घर माझं आहे" हे विधान चालून जातं. पण लक्षात घ्या, हा भावाभावातला वाद आहे.
[परदेशी राहणाऱ्या भावा, मला माफ कर. तुझी बाजू नाही मांडली. तूपण कदाचित भावच्या शिक्षणासाठी वगैरे खस्ता काढल्या असतील, पैशांवरुन वहिनीच्या माहेरुन कधीतरी तुझा अपमान झाला असेल etc etc,
पण आत्ता आपला मुद्दा तो नाहिये. त्याहून महत्वाचे आहे आपले.]

सारांश काय, तर माणसांमाणसात असे विधान कधीही करा, माझी काही हरकत नाही. कायदेशीर, नैतिक, सामाजिक दृष्ट्या चुकीचे असले तरी करा हे विधान, बघु कोण अडवतोय ते?
पण
प्राणीपक्षी, किटक यांना कुठल्या अधिकाराने तुम्ही म्हणता की "घर मेरा है"? घराचे जे काय सेलडीड झाले ते दोन माणसांच्यात झाले आहे, का आजुबाजुच्या चिमण्या, कावळे झुरळंपण चार सह्या ठोकून गेले? आपले वाद, आपला व्यवहार आपल्या जगात. त्यांच्या विश्वात तुमची का घुसखोरी? असे त्यांना खडसावणे चूक आहे. त्यांच्या जगात त्यांनीपण कदाचित विकत घेतले असेल ते घर. मूर्खासारखे त्यांना काय सांगता "मेरा है" म्हणून.
त्यांना मारता ते मारा, स्वच्छतेसाठी वगैरे मारायला लागते. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, जीवो जीवस्य समथिंग. पण हे असले असंबध्द, ऍक्रॉस द स्पेसीज हक्क गाजवणारे काहीतरी बरळू नका. स्वत:ला ज्ञानी समजणाऱ्या माणसाकडून असे बोलणे अपेक्षित नाही - जाहिरातीतसुध्दा !
*
लोकांना हे पटत नाही, पण प्राण्यापक्ष्यांना हे मनापासून पटते म्हणून ते मला न घाबरता बेधडक दिवाळी साजरी करायला येतात माझ्याबरोबर.**

बास आता, या आठवड्यात जरा जास्तच झाले, आता महिना, दोन महिने ब्लॉग नाही.
***

Friday, May 15, 2009

काही नोंदी

आज दांडी मारली आहे आणि दांडीफोन करुन १०-१५ मिनिटे झाली नाहीत तर लगेच कंटाळा आला.

एकाला विचारले काय करु? तो म्हणाला, mba कर. त्याला ‘आत्ता’ काय करु हा प्रश्न कळाला नाही असे नव्हे, पण तो दूरदर्शी आहे.
दुसऱ्याला विचारले काय करु? तो म्हणाला, माझे पैसे परत कर.
तिसऱ्या एकीला विचारले काय करु? ती म्हणाली, ब्लॉग लिही...पण मला रायटिंगला काय सब्जेक्ट्च नाय गावला.

<बालिश> <!--बोबडे बोल नसणारेत-->
काहीच करायला नव्हतं की. मला फारच कंटाळा आला होता. मग नां, मग नां, मी माझा हरविलेला सॉक्स शोधायचे ठरविले. सॉक्स तर बाबा काय मिळालाच नाही. पण दुसरीच एक गम्माडी जंमत झाली, मला नां सॅकमधे एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी म्हणजे, सांगू का? मी एरपोर्ट्वर असताना मज्जाच मज्जा बघितलेली, कंटाळा आल्यावर ती सग्गळी सग्गळी म्हणून त्या कागदावर लिहीली होती. आहे किनई खर्रच गंमत !
आई म्हणते तस्सेच झाले आगदी, "काखेत कळसा गावाला वळसा" चुक आहे वाटतं. हां "आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी". हेपण चुकलं वाटतं, मी पळतो विटी दांडू खेळायला तुम्ही बसा लिहीत.
</बालिश>

तर कंटिन्यू, मला रायटिंगला काय सब्जेक्ट्च नाय गावला पण लगेच लक्षात आले, ब्लॉगवर आपण जे काय लिहीतो ते सगळे सब्जेक्टिव्ह असतेच मग निराळ्या सब्जेक्ट्ची गरज ती काय, आं?
*
कसले मस्त, श्रीमंत असल्यासारखे वाटले खालचे हेडिंग लिहीताना

फ्रॅंकफर्ट विमानतळावरच्या नोंदी, दिनांक २७ मार्च २००९

१. सगळी वेगवेगळी, चित्रविचित्र माणसं, एअरपोर्टवर नाव-गाव-फळ-फूल खेळायला मजा येईल

२. काय भारी कोपरा पकडला आहे या बाईने, शेजारी खिडकी, मागे भिंत, खाली चार्जिंगसाठी सॉकेट. उठा हो काकू, विमान सुटेल.

३. ग्रॅंड परदेशी कुटुंब म्हणतात ते हेच ! नाही, ही तर ट्रॅव्हल कंपनीबरोबर आलेली माणसे आहेत. हा काय एजंट/मॅनेजर यांचा. एजंट तो एजंटच, जगात कुठेही जावा.

४. एअरपोर्टवर, टेडिबेअरचा मुका घेत फोटो काढण्यात काय पॉईंट आहे?

५. उठावे इथून, टूरवाली मंडळी लय कलकल करतायत.

६. कुठल्याही प्रकारचे जाकीट, जर्कीन घातलेले नाहिये असा एक मनुष्य दाखवा मला टर्मिनलवर !

७. धन्य झालो. बाकड्यांवर उड्या मारणाऱ्या मुलाला खाली ये सांगायला त्याची आई म्हणाली - "कम कम, फॉल डाउन".

८. पेन्सिलमागचे रबर दातांवर घासले तर दात स्वच्छ होतील का? व्हायला पाहिजेत, विज्ञान आहे भाऊ.

९. भांडण झाले आहे, तरी एकत्र चाललेत आपले, गावाला जायचे म्हणून. संसार म्हणजे तडजोडच हो.
*

नऊ, नऊच नोंदी ! दहा तरी करायच्या, मनसेला एक तरी जागा मिळणार.
***


Thursday, May 14, 2009

निरर्थक-२

स्पीडोमीटरचा काटा कनफ्यूज झाला होता. १२० अणि १२५ - दोन्हीच्या खुणा त्याला आपल्याकडे ओढत होत्या. जीप धड्डाधड ३-४ फूट उंच उड्या मारतच पुढे जात होती. गोळ्यांचे सूं सूं आवाज जीपच्या भसाड्या आवाजालासुध्दा चिरुन जात होते. मेंदूच्या सूचनांबरहुकुम मी अधे मधे खाली वाकत होतो. नेमके तेव्हाच मागून येणारी एखादी गोळी जीपच्या आधीच फुटलेल्या समोरच्या काचेतून आरपार जात होती. मागे एक नजर टाकली पण धूळीत नीट काहीच दिसत नव्हते, साधारण १०-१५ गाड्या तरी मागावर असाव्यात. वाळवंटात रस्ता असा नसल्याने, दूरचा तो अंधुक पांढरा ठिपका नजरेआड न होउ देता त्यादिशेने मी जीप पळवत होतो. गोळ्या चुकवण्यासाठी अधेमधे वेडीवाकडी वळ्णे घेत होतो.

मी ह्या भानगडीत कसा काय सापडलो? हे लोक माझ्या मागे का लागले आहेत? मला सगळे नीट आठवत का नाहीये? ह्या सगळ्या विचारांच्या गर्दीने डोके फुटेल का काय असे वाटत होते. घामाने चिंब ओले झालेल्या तरीही तापलेल्या खांद्याला अचानक हळुवार स्पर्श झाला. ती कण्हत म्हणाली, "एवढा...एवढा विचार करु नकोस आत्ता, एकदा फकीरगढला पोचलो की सगळे आठवेल तुला", कशीबशी मान उंचावून पांढऱ्या ठिपक्याकडे एक नजर टाकून काळजीयुक्त स्वरात पुढे म्हणाली "...सहीसलामत पोचलो तर". मी उगाचच तिच्यावर खेकसलो, "बाकी काहीच मला समजत आणि आठवत नाहीये, फक्त एवढेच कळते आहे की, आत्ता मी थांबलो तर मागचे ते हरामखोर आपल्याला क्षणार्धात संपवतील".

ती काहीच बोलली नाही. तिच्या रक्ताने भरलेल्या कुडत्याकडे बघताना मनात विचार आला - अजून तासाभरात उपचार नाही झाले तर ही तशीही मरेलच. तेवढ्यात अंदाजाने मी पटकन खाली वाकलो, एका हाताने तिचेही डोके खाली चेपले, एकामागोमाग एक तीन-चार गोळ्या वरुन गेल्या आणि पुढे कुठेतरी हरवल्या. माझ्या मनातला मगासचा विचार ओळखल्यासारखे ती म्हणाली, "ह्याच वेगाने जात राहिलो तर...तर अर्ध्या तासात पोहोचू आपण...मग मी कदाचित जगेन". मी वरमलो. मला दिलासा देण्यासाठी का कोण जाणे पण ती पुढे म्हणाली, "नाहीतरी, तू वाचवले नसतेस तर तिथेच मेले असते मी, शिवाय या पाण्याच्या बाटल्या पण त्यांच्या हातात पडल्या असत्या".

पाच सहा मिनीटे झाली असतील, गोळ्या चुकवत जीप पळतच होती. आता तो ठिपका जरा मोठ्ठा झाला होता, रेषाच. लांबवर पांढऱ्या भिंतीत छोटी कमान दिसत होती. बराच वेळा झाला, पाठलाग आणि गोळ्या चालूच होत्या. तिची काहीच हालचाल नव्हती, कण्हण्याचाही जास्त आवाज येत नव्हता पण मधेच ती मंद स्वरात "पाणी पाणी" असे पुटपुटत होती. गियरपाशी पाण्याच्या त्या २ बाटल्या होत्या. एका हाताने गाडी सावरत मी एका बाटलीचे टोपण काढणार तोच ती दचकून म्हणाली, "नाही, नको, त्या शेवटच्या २ पाण्याच्या बाटल्या आहेत, ते पाणी वाया नको घालवूस". मी परत खेकसलो, "अरे, पण जगातल्या शेवटच्या आहेत का या बाटल्या?" "तसंच काहीसं आहे, नाहीतर २ बाटल्यांसाठी कोण जीवावर...", तिने वाक्य पूर्णच केले नाही.

मी जमेल तेवढ्या सौम्य आवाजात म्हणालो, "हे बघ, आत्ता तू जर पाणी प्याली नाहीस तर..., आणि मी जवळ पाणी असताना स्वत:च्या डोळ्यादेखत कुणाला मरु देणार नाही", तिचा निश्चय माझ्या बोलण्याने अचानक डळमळीत झाला असावा, तिने मंद आवाजात विचारले "खरंच, थोडे पिउ का पाणी". तिला काही कळायच्या आत मी बाटलीचे टोपण उघडले आणि तिच्या तोंडावर पाणी ओतायला सुरुवात केली. साता जन्माची तहानलेली असल्यासारखी ती गटागटा पाणी पित होती.

त्याचक्षणी मला फकीरगढच्या कमानीतून १५-२० गाड्या भरधाव वेगाने येताना दिसल्या आणि माझ्या लक्षात आले की, पाठलाग गोळ्या पूर्णपणे थांबल्या होत्या. आता ही मुलगी वाचणार अशी माझी खात्री पटली.

पाणी पिणे सुरु असतानाच तिने माझ्याकडे मलूल पण आनंदी डोळ्यांनी बघितले, प्रथमच मला ती अत्यंत सुंदर आहे याची जाणीव झाली.
**

आता एखाद्याने एवढे सगळे रामायण सांगितल्यावर जर का, "हे स्वप्न होते" असे मला सांगितले आणि सांगणारा मनुष्य माझ्याहूनही अशक्त निघाला तर मी त्याला तुफान फटकावीन. पण मलाच स्वप्न पडले तर काय करा. आज मी जो उठलो तोच स्टन्‌ड होउन. पाच मिनिटे गादीवर बसून शांतपणे विचार केला - एकदम व्यवस्थित सिनेमास्कोप चित्र, सुंदर काल्पनिक नटी शेजारी आणि सिंदबादी धाडस. गाडीसुध्दा काय हाणत होतो मी - एकदम ट्रान्सपोर्टर मधला जेसन स्टॅथम(गरिबांचा ब्रुस विलीस).
असे सगळे आखीव-रेखीव स्वप्न का पडावे बाबा? मग आदल्या दिवशीच्या घटना आठवल्यावर सगळा उलगडा झाला.
**
१ दिवस आधी

दुपार
आम्ही तिघे, दुपारची कॉफी पित उभे होतो तळ्याशेजारी.
मित्र -: लय काम आहे आज.
मी: हो मलापण लय.

मित्र -: आत्ता या तळ्यात कुणी बुडायला लागले तर वाचवाल का?
मी + मित्र -: मुलगी असेल तर वाचवीन.
मी + मित्र -: सह्हीच, सेम विचार केला आपण.

मित्र -: ह्म्म, हातात अंगठी बघुन उडी घ्याल का तशीच?
मी: अंगठी बघुन शक्यतो. प्रश्न बास आता पण.
मित्र -: हो ना साला, आम्ही काय व्हिलन वाटलो का?
प्रश्न विचारत सुटलायस, "कॉफी विथ करण"ला आलोय का इथे?
आमचे सोड, तू तर लेका उडी घ्यायचा विचारपण नाही करायचास.
मित्र -: उडी घेईन ना मी, पण गोरी पोरगी बुडत असली तरच मी उडी घेईन.
देसी असेल तर काय सांगता येत नाही.
मी: ऍक्च्युअली भारतात तसे करीन मी, अमेरिकेत उलटे करीन.
नाही, शक्यतो उडी घेईनच.
मित्र -: ह्म्म, कोणीही असले तरी, मी उडी घेईनच असे काही नाही.
मी + मित्र -: बोर झाला रे टॉपिक, बदलूया.

मित्र -: सार्‌कॅस्टिक शब्दामधे पूर्वी सायलेंट पी असणार.
कुणीतरी एकजण विसरला आणि मग सगळेच चुकीचे स्पेलिंग लिहायला लागले.
*

रात्र
मित्र -: अर्रे, सहीच पिक्चर लागलाय. ती ‘सहारा’ पिक्चरमधली नटी कोण ती?
मी: पेनेलप क्रुझ
मित्र -: हां हां, पेनेलोप, तिचाच लागला आहे.
मी: कुठला?
मित्र -: सहारा.
मित्र -: नको तो पिक्चर. ती दरिद्री, एकच काळा टी-शर्ट घालून फिरते पिक्चररभर.
मित्र -: मंद आहेस रे तू च्यायला, चला बघुया.
*

सकाळ
परके साहेब -: गेला का फिक्स प्रॉडक्शनला?
मी: पाठवला आहे, प्री-प्रॉड टेस्टिंगमधे आहे

५ मिनिटांनी
परके साहेब -: अरे, तो तुमच्या मॉड्युलचा एक अर्जंट फिक्स होता म्हणे. गेला का प्रॉडक्शनला?
मी: माझ्या मॉड्युलचा नाहीये तो. पण मी फिक्स पाठवला आहे, प्री-प्रॉड टेस्टिंगमधे आहे.

१० मिनिटांनी
परके साहेब -: ...
मी: ...

शेजारचा: बंदूका घेवूनच तुझ्या मागे लागले आहेत रे सगळे आज
मी: हां ना राव, आमचा इश्यूपण नाहिये तो, लोकांची खरकटी काढण्यातच जन्म जाणार आमचा.
*

संध्याकाळ
आमचे साहेब: ऑं, चार चार पेनं, एक घेवू का?
मी: घे की बाबा, कशी काय आली माझ्या डेस्कवर एवढी पेनं, देव जाणे.
बायदवे, तुला कशाला पेन लागतं, सगळी कामे तर मी करतो.
आमचे साहेब: तुझ्या पगाराच्या चेकवर सही करायला.
**

यावेळी जरा महा-लांबडे व अति-निरर्थकच झाले. जावूदे, तसे मी लिहितो ते सगळेच पाल्हाळीक आणि निरर्थक असते.
***

Monday, May 11, 2009

अप्रतिम चित्र - चित्र ऑफ द मंथ

"मिशन कंटाळा ब्लॉग रीव्हँप" अंतर्गत, कंटाळलेल्या आणि सुस्त माणसाचे चित्र शोधत होतो. आणि हे चित्र मिळाले! मिळाले म्हणजे काय, बघताक्षणी मुलगी जशी क्लिक झाली म्हणतात ना तसे क्लिकच झाले.
मी भित्रट असल्याने व कोणी कॉपीराईट इश्यू काढायला नको म्हणून परंपरेप्रमाणे लगेच त्याची एक कॉपी केली(वाट लावली).

कंटाळ्याच्या हेडरवर ते ताणले गेल्याने पूर्ण दिसत नाहिये म्हणून इथे टाकून ठेवतो कारण चित्राचा कागद आठवड्याच्या आत हरवणार हे निश्चित. लॅपटॉपवरचा फोटो चुकुन डिलीट होणार किंवा महिनाभरात लॅपटॉपच गंडणार etc etc.


काय सुंदर चित्र आहे, म्हणजे मी काढलेले चित्र नव्हे. छान आहे ती चित्रातली कल्पना -
सेंट्रल थीम, मध्यवर्ती कल्पना, बुनियादी खयाल, κεντρικός θέμα !
बघुन डोळ्यात पाणी यायचे बाकी होते अक्षरश:

साधा वाटतो चित्रातला माणूस - पण मूर्तिमंत कंटाळा आणि आळस आहे हा मनुष्य.

निरखून बघितल्यास लक्षात येईल की तो काहीच करत नाहीये या क्षणी.
१. पुस्तक आहे: वाचत नाहिये.
२. सिगारेट आहे: ओढत नाहिये, बोटात अडकली आहे नुस्ती म्हणून आहे.
३. पाणी/ज्युस/दारु आहे: नुसता ग्लास आहे बाजुला, पीत नाहिये.
४. समोर टिव्ही नाहीये.
५. झोपला नाहीये, डोळे उघडे आहेत, शून्यात नजर आहे.
श्वासोच्छवास चालू आहे म्हणून जिवंत आहे म्हणायचे. [त्याचा काहीतरी विचारपण चालू असेल आणि तंद्री लागली असेल असे वाटल्यास ते साफ चूक आहे. तंद्री बिंद्री असले काय नसते, या चित्रात तरी नाही ऍट लीस्ट]

म्हणजे इन शॉर्ट, ‘नुसते बसलाय’ हा मनुष्य.
पी.ल. मधे, दुपारी आई जेव्हा हाक मारायची आणि विचारायची की, लोळतोयस का आणि काय करतोयस? तेव्हा "नाही गं लोळत नाहीये, बसलोय आपला" असे उत्तर द्यायचो मी.
हेच ते बसणे.
***