Sunday, November 23, 2008

थाप

बाकी काही न बघता, लोकांना ते केवळ खोटं किती बोलले या हिशोबाने स्वर्ग-नरकात पाठवायचे ठरविल्यास मी नरकातला सेलिब्रिटी म्हणून ओळखला जाईन.
मी एक अट्ट्ल ‘कंपल्सिव लायर’आहे. [हे वाक्यच डेड्ली आहे, खरे म्हणा खोटे म्हणा, भावार्थ असा निघतो की लिहिणारा माणूस खोटारडा आहे]

असो. आत्ता हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे, आत्ताच एक ताजी गरम थाप मारली आणि तासाभराने मनात विचार आला - आयला, आपण आत्ता का खोटे बोललो ?
एका ओळखीच्या मुलीने(मैत्रिण नाही म्हणता येणार) फोन केला, घरी येते म्हणाली. मी म्हणालो, नको आत्ता नको येवूस थोड्या वेळाने ये, आत्ता मी बाहेर आहे, घराची ड्युप्लिकेट किल्ली बनवतोय. असेही नाही की मला तिला कटवायचे होते, थोड्या वेळाने मी गपगुमान फोन केला, ती आली etc etc.

पण विनाकारण मी तिला ड्युप्लिकेट किल्लीची थाप का मारली हे माझे मलापण ठाऊक नाही. तिला पण थाप पटली होती राव :S ‘थाप मारणे चालु आहे’ हे स्वतःलाच माहित नसेल तर दुसऱ्याला काय संशय येणार ?

George एकदा Seinfeld ला म्हणतो - "Jerry, just remember, it's not a lie if you believe it"

***


Friday, November 21, 2008

...

साडेआठ हजारावर आला सेनसेक्स तेव्हा गुंतवायला एक दमडीपण नाही. २१ हजाराच्या आसपास होता तेव्हा म्हणजे, कुठुनपण अचानक पैसा मिळायचा - जुन्या नोकरीतले पीएफचे पैसे ११ महिन्यांनी नेमके सेनसेक्सने २० ओलांडले आणि मिळाले.
आता काय घेऊ आणि काय नको असे झाले आहे आणि पैशाची बोंब ! सेनसेक्स १० च्या आत आहे, दुसरे एक पीएफ खाते पहिल्याच्यापण आधी बंद केले होते, जवळजवळ दिड वर्ष झाले - अजुन एक पैसा नाही मिळाला.

कुणाचेतरी लॉज् होते - तुम्ही ज्या रांगेत आहात ती दुसऱ्या रांगेपेक्षा जास्तच हळू पुढे सरकेल वगैरे- खरे आहे बाबा अगदी :(

***


Thursday, November 20, 2008

पुणेरी रग्बी

लाखो कारणे आहेत पुण्याचा अभिमान बाळगण्याची, त्यात अजून एकाची भर !

"पुण्यातल्या मुलींच्या रग्बी संघाला हॉंगकॉंगहून आमंत्रण"

ही बातमी ऐकूनच भरुन आले, डोळे डबडबले, छाती फुलली, शेवट नाकातला जो सायनस का काय असतो तो, घशात ढकलून "घ्र्का घ्र्का..स्म्म्म्म...sssss" असे केल्यावर सावरलो मी कसाबसा.

आता हा संघ तिकडे जावो, न जावो, जिंको, हरो आमाला कायबी फरक नाय पडुचा...आमंत्रण आले काय कमी आहे का आणि चेष्टाय का रग्बी खेळायची म्हणजे?

अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले, परदेशी खेळांची कसली कौतुके, रग्बी कसली खेळता कबड्डी खेळा, असे अकलेचे तारे कुणाला तोडायचे असतील तर त्यांनी भले तोडावेत, आम्ही काही थांबवले नाही.
लोकशाही आहे - तुमची अक्कल, तुमचा हात, तुमचे तारे, पोतंभर तोडा आणि तुळशीबागेत जावून विकून या, आम्हाला काय घेणं आहे.

एकदा ‘याचि देहा, याचि डोळा’ रग्बी पाहिली म्हणजे कळेल हा काय भारी प्रकार आहे मग पुण्याचा जाज्ज्वल्य अभिमान असा शँपेनसारखा फसफसत वर नाही आला तरच नवल.

***

Wednesday, November 19, 2008

...

सकाळपासून डिप पर्पलच्या ‘Perfect Strangers’ गाण्याने डोक्याचा भुगा केला होता. झोपेतून पूर्ण जागा व्हायच्या आधीपासून जवळजवळ तासभर गाणे डोक्यात वाजायला लागले होते. असली परिस्थिती सगळ्यात वाईट राव, एक तर झोप पूर्ण झाली नसते, मेंदूचा निम्मा भाग गाणे वाजवण्यात व्यस्त असतो उर्वरित भाग ते बंद करुन झोपण्याचा प्रयत्न करत असतो. शेवट एकदा उठून ते लावले तेव्हा कुठे जिवाला शांती मिळाली.
एक तर ह्या गाण्याच्या ओळी असल्या तूफान आहेत...

And if you hear me talking on the wind
You’ve got to understand
We must remain Perfect strangers...

डिप पर्पल रॉक्स यार...

दिवसभर मनात बॅकग्रॉउंड्ला हे गाणे सतत चालूच होते - आज कळाले पार्श्वगायन शब्द कसा आला असावा.
वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल कोर्टात उभा होतो तेव्हा पण हेच गुणगुणत होतो, जज्ज बाईपण म्हणाल्या - ‘Young man, if you have any concerns, open up, don't murmur’
मग जरा चपापलो मी, पण त्या यंग म्हणाल्या तेव्हा जर बरे वाटले. उगाच नाही म्हणत लोक, अमेरिकेत माणसाची कदर होते म्हणून :)


***


Saturday, November 15, 2008

...

‘Greetings, carbon-based bipeds!'- लायब्ररीतल्या जुन्या पुस्तकांच्या दुकानात, १ डॉलरमधे आर्थर क्लार्कचे निबंधांचे हे पुस्तक मिळाले आज. १ डॉलरमधे मी ‘कोथरुड परिसर’ची २०० पाने पण घेईन आणि इथे तर सर आर्थर सी क्लार्कचे ५०० पानी निबंध मिळाले. २००८ मधे प्रकाशित झाले नाही म्हणून जुने म्हणावे अशी कोरी करकरीत कॉपी आहे.

आल्यावर ४-५ निबंध चाळले, त्यातला एक अल्टिमेट होता. माणूस आणि मशिन्स ह्या नेहमीच्या विषयावरचा, काय फाडू लिहिले आहे पण. त्यातल्या एका कल्पनाविलासात ट्युरिंग थिअरीविषयी जाम इंटरेस्टिंग चर्चा केली आहे.

जे इंजिनियर नाहीत किंवा आमच्यासारखे छपरी इंजिनियर आहेत त्यांच्यासाठी हा ‘काढा’-
ट्युरिंग थिअरी, मशिन स्वतंत्र विचार करु शकते का नाही हे ठरवते. एक हुशार मानव आणि एक मशिन अप्रत्यक्ष संवाद साधतात, अप्रत्यक्ष म्हणजे बोलणे सोडून कसाही चॅट, चिठ्ठ्याचपाट्या, दुभाषी वाट्टेल ते. जर १०-१५ दिवसांनंतर माणसाला आपण मशिनशी बोलत होतो का दुसऱ्या माणसाशी हे सांगता आले नाही तर मशिन विचार करु शकते. (दि एंड ऑफ थिअरी ! असल्या अजून ४-५ टिपी थिअरीज शिकल्या की झालात कॉम्प्युटर इंजिनियर)

तर क्लार्कंनी लय भारी विश्लेषण केले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि जेव्हा मशिन पूर्णपणे स्वतंत्र विचार करायला लागतील तेव्हा आपल्याला ही थिअरी टेस्ट करणेच अवघड होउन बसणारे कारण मशिनला प्रॉप्पर माहित असेल की ते विचार करु शकते पण माणूस मशिनला सरावला असेल, (माणूस+मशिन) हे प्रचंड कॉमन झाले असेल त्यामुळे बऱ्यापैकी हुशार माणूसपण ओळखू शकणार नाही आपण मशिनशी बोलतोय का, माणसाशी ते ! मॅट्रिक्समधल्याटाईप, पब्लिकला कळणार पण नाही काय चालू आहे आसपास

आता हे सर्व जर कुणाला अतिफालतू वाटले तर त्याला आमचे लिखाण कारणीभूत आहे - एक तर मूळ निबंधात सविस्तर चर्चा आहे आणि ती क्लार्कसाहेबांनी केली आहे.जरा अतिशयोक्ति आहे पण अगदीच अशक्य नाही, शिवाय क्लार्क यांचे असल्या भाकितांचे रेकॉर्ड लक्षात घेता हे खरे होण्याची दाट शक्यता आहे.

ह्या माणसाने ६० साली लिहिलेले अजून मला झेपत नाही म्हणजे मी महामंद का ते जरा प्रमाणाबाहेर हुशार?

Friday, November 14, 2008

॥अजी म्यां गरूड पाहिला॥

आज साक्षात गरुड पाहिला तो पण ५-६ फूटाच्या अंतरावरुन !
दुपारी तळ्याजवळच्या बाकड्यावर बसून आम्ही एकमेकाच्या मॅनेजर्सची मापे काढत होतो. चॉकलेटी रंगाचे २,३ ससे पण चिल मारत होते जवळच. आमच्या मेंदूला काय कुठुन ट्रिगर मिळाला देव जाणे, तिघांच्या पण माना एकदम ऑटोमॅटीक सश्यांच्या दिशेला वळाल्या. २ ससे बोल्ट्च्या वेगाने पळत होते आणि उर्वरित एक ससा जिवाच्या आंकांताने पळत होता - गरुडाने थेट त्याच्या पाठीवर असले स्मूथ लॅंडिंग केले कि हा ससा(कै.) गेली चार वर्षे त्याच जागी पडिक आहे असे वाटावे.

ह्या असल्या प्राण्याला(पक्षी नाहीये तो, पंख असलेला प्राणी आहे) ते पण शिकार करताना लाईव्ह पहाणे म्हणजे काय यार...च्यायला, मेकॅनिक्स पहिल्या अटेम्प्टमधे सुटल्यावर पण एवढा भारावून गेलो नव्ह्तो मी.

त्याचे पाय तर आरामात माझ्या मनगटाएवढे असतील, चोच म्हणजे लिटरली धारदार आकडा, एकेका पंखात पन्नास एक चिमण्या सहज मावतील. वर बापाची बाग असल्यागत माजात होता.
एकुण हा ईयत्ता ५ वीतला निबंध होतोय याची कल्पना आहे मला पण cann't help, आख्खा दिवस काम नाही करु शकलो मी.

एकाची सुध्दा मोबाईल त्याच्याकडे रोखून फोटो काढायची हिंमत नाही झाली, तो ससा समोर दिसत होता अजून :S त्याला मनसोक्त बघून झाल्यावर गपगुमान जागेवर आलो आणि रोज मॅनेजर्सची मापे काढणे कसे अत्यावश्यक आहे ते कळाले.

चिऱ्याचा मॅनेजर म्हणाला, "अरे घ्यायचा की एक स्नॅप, गरुड भित्रे असतात"

***


Thursday, November 13, 2008

बादरायण संबंध, पण संबंध

स्विझर्लंड्मधे ‘मॉरिस बॅव्हॉड’ला सन्मानित करण्यात येणार आहे. त्या काळी जर्मनीमधे राहणाऱ्या या स्विस विद्यार्थ्याने हिटलरचा खून करायचा प्रयत्न केला होता - ‘वध’खरे तर, पण तो प्रयत्न फसला. हिटलरने मग काय केले सांगायची गरज नाही.
तर अशा मुलाचा सन्मान करायला माझी काहीच ना नाही, मला तिकिट पाठवले तर, मैं भी आंके ईस समारोह का लुब्ध उठावूंगा, आमच्या मते तो गोरा चाफेकरच !

पण ह्या मुलाचा सन्मान करणे हे स्विस(बहुतांशी युरोपच्या) धोरणाशी विसंगत आहे असे मला वाटते, कारणमीमांसा ऐका -

स्विझर्लंड्मधे कॅपिटल पनिशमेंट बेकायदेशीर आहे. एखादा माणूस कितीही वाईट, क्रूरकर्मा, साक्षात सैतान असली तरी त्याला फाशी देण्यात येत नाही, कारण प्रत्येकाला जीवनाचा अधिकार आहे. ‘Right to life’ हे युरोपिअन युनिअनच्या घटनेतले एक कलम आहे. [मला काही देधडक बेधडक युरोपची घटना पाठ नाही, युरोपिअन्स अमेरिकेला कायम ह्याच्यवरुन हिणवतात त्यामुळे माहित इतकेच] दस्तुरखुद्द हिटलरलासुध्दा युरोपने फाशी दिली असती का नाही शंकाच आहे.

पॉईंट हा आहे कि, जर तुम्हाला एखाद्या मनुष्याला कुठल्याही परिस्थितीत मारणे पटत नाही, तर मनुष्याला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सन्मानित करणे घटनाबाह्य नाही का ठरत? तो प्रयत्न होता आणि हिटलर त्यात मेला नाही हे काही अर्ग्युमेंट होउ शकत नाही.

मॉरिस बॅव्हॉडचा सन्मान करणे अतिशय योग्य आहे आणि कुठल्याही शहाण्या माणसाला पटण्यासारखे आहे [केवळ politically correct रहायचे म्हणून नाही म्हणत, खरोखर] पण माझ्या मते हा युरोपिअन युनिअनचा छोटासा का होईना एक घटनात्मक पेच आहे.
त्यांनी सत्कार भले करावा परंतु त्याचबरोबर ऍक्नॉलेज सुध्दा करावे कि, हे अंशतः घटनाबाह्य आहे.

***
शेवट cnbc वाले जसे स्वतःच्या गुंतवणुकीविषयी स्टेट्मेंट देतात तसे ‘कॅपिटल पनिशमेंट’ विषयी माझे मत देणे मला सयुक्तिक वाटते:

आमचे स्वतःचे ‘कॅपिटल पनिशमेंट’ विषयी काही ठाम मत नाही आहे, आमचे मत परिस्थितीजन्य असते - ओर्कुट्वर आमचा ‘पोलिटिकल व्ह्यु’ पण ‘डिपेंड्स’ असा आहे. तसेच चुकुन माकुन अस्मादिकांना कॅपिटल पनिशमेंट ठोठावण्यात आल्यास तिचा प्रखर विरोध होईल !
***

कुणाला ‘कॅपिटल पनिशमेंट’ ला मराठीत योग्य संज्ञा माहिती आहे का?
फाशी, शिरच्छेद शब्द फिट्ट बसत नाही...‘जीवघेणी शिक्षा’ योग्य आहे पण ती विनोदी वाटते.

***

Wednesday, November 12, 2008

ब्रेक ऑन थ्रू

दिवसभर डोके फोडूनसुद्धा जर प्रोब्लेम सुटला नाही की संध्याकाळी घरी निघून येताना आईशप्पथ उदास वाटते - शेतकरी किंवा सावकार झालो असतो तर बरे झाले असते असे वाटते - एकदा चुकुन घरी असे बोललो होतो आणि शेतकऱ्यांची हेटाळणी करतोय म्हणून बाबा सुपर भडकले, उदास मनाचा निरुपद्रवी हुंकार समजून सांत्वन करणे वगैरे राहिले बाजूला !

अशा देवदास परिस्थितीमधे माणसाने "जिम मॉरिसन" ला ऐकावे. मूड चांगला होतो असे काही नाही, पण माझे तरी मन एकदम शांत होते. त्याचा आवाज, ऐकताना तो समोर उभा आहे आणि फक्त माझ्या एकट्यासाठी एवढ्या आर्ततेने गात आहे असे वाटते, हि कवितापण त्याने पूर्वी कधी लिहिली नव्हती आत्ताच हे शब्द पहिल्यांदा एकत्र आलेत असे वाटते. आज एकदाच, परत नाही ! जादुगाराच्या पुंगीचे सूर कसे सगळया मुलांना संमोहित करत गेले तसे त्याच्या कवितेमधले शब्द मला आपल्याकडे ओढतायत असे वाटते.(हो तो कविताच गातो, गाणी नाही)
'व्हेन द म्युझिक इज ओव्हर' च्या सुरुवातीला जेव्हा 'कम ऑन' म्हणून तो एक आवाज टाकतो तेव्हा किंवा 'दि एंड' संपल्यावर पूर्ण ब्लॅंक होतो मी. 'क्रिस्टल शिप' 'वेटिंग फॉर सन' 'शामन्स ब्ल्यूज' 'ब्रेक ऑन थ्रू' 'लाईट माय फायर' ऐकले की तर बास, सगळे अचानक निर्जीव झाले आहे असे वाटते, माझा आणि जगाचा संबंध संपतो.

जिम मॉरिसन च्या बाबतीत एक तर अप्रतिम किंवा महाफालतू - तळ्यात मळ्यात नाही. तो असंबध्द लिहितो, बेसूर गातो, कविता नसून ड्रग्जच्या नशेत खरडलेले शब्द आहेत असे समजणारे लोक तर पोत्याने मिळतील. प्रत्येक अन प्रत्येक ओळीचा अर्थ लावत, शब्दांची संगती लावत अन सूर पारखत बसतात आणि मग फडतूस आहेत म्हणतात.
फारच सेंटि झाले आहे हे सर्व

Tuesday, November 11, 2008

सौरवदादाची वही

निधड्या छातीचा आमचा सौरव दादा निवृत्त झाला, तेव्हा हळहळलो, त्याच्याविषयीची एक जुनी दुर्मिळ आठवण ताजी झाली.
गांगुलीचे साम्राज्य अजुन स्थापन व्हायचे होते ते दिवस...नुकताच सचिनबरोबर ओपनिंगला यायला लागला होता तो. मला आवडायचा कारण स्पिनरला डेड्ली सिक्स मारायचा, पण त्याने बऱ्यापैकी फटकेबाजी सुरु केली आणि त्याच्या शतकांचा वेग जसा वाढत गेला, तशी माझ्या मनात धाकधूक - कायमच सचिनपेक्षा चांगला तर नाही ना खेळायचा हा गडी, सचिनपेक्षा जास्त शतके काढली तर ? तशातच तो कर्णधार पण झाला !

अन एक दिवस माझ्या एका मित्राने गौप्यस्फोट केला -
मित्र: पश्या, तुला माहितेत का गांगुलीचे धंदे?
मी: आयला, कसले धंदे ?
मित्र: त्याने परवा एका प्रेस कॉन्फरन्स मधे सांगितले, माझ्यात आणि सचिनमधे हेल्दि कॉम्पिटिशन आहे
मी: काय बोल्तोस काय? सरळ म्हणाला का उघड, उघड?
मित्र: मग काय, ४ सिक्सा काय मारल्या आणि सचिनशी बरोबरी करतो, पण यार तुला माहिते का
मित्र: ...मागच्या १० मॅचेस मधे त्याचे ऍव्हरेज सचिनपेक्षा जास्त आहे !
मी: सध्या नवीन आहे रे, बॉलर्सना सवय नाही त्याची, ऍव्हरेज वगैर जास्त दिवस टिकत नाही, आणि एकदा बॅड पॅच येवूदे मग बघ बाहेर पडता पडता कशी वाट लागेल
मित्र: मग जाईल सचिनकडेच सल्ला मागायला...
(सातमजली कुत्सित हास्य)
मित्र: पण बॉस, मेन खबर सांगितलीच नाही तुला
मी: ?
मित्र: गांगुलीने एक वही ठेवली आहे, प्रत्येक वन डे नंतर त्यात तो स्वत:च्या आणि सचिनच्या रन्स लिहितो...प्रत्येक मॅचनंतर सचिनला गाठायला किती रन्स पाहिजेत ते पण लिहीतो
मित्र: आणि सचिन शून्यावर गेल्यावर लाल शाईत लिहितो...
मी: ....(सावरायला १ मिनीट तरी लागले असावे)
मी: काय रे, पण सचिनला माहिते का ह्या वहीबाबत ?
मित्र: कुत्र्यापेक्षा बेक्कार हसला, गुड्घ्यावर पडलायस का, तुला माहिते आणि त्याला माहित नसणार होय ?

त्यानंतर कधीपण गांगुली सचिनपेक्षा कमी रन्स काढून आउट झाला तर मी चेकाळून ओरडायचो...
अरे, जा रे लिही ना आता तुझ्या वहीत, का आता संपली रिफील ?
***
असो, पण गांगुलीचा करिअर ग्राफ आणि माझे वय हळू हळू वाढले...त्याने लॉर्ड्सवर शर्ट काढून त्या चार अक्षरी दिव्य ईंग्लिश शब्दाचा गजर केला आणि मी त्याची वही विसरलो ते आजतागायत !

Monday, November 10, 2008

गाजरवाणे प्रकार

फक्त मिथुन, बाळकृष्णा किंवा रजनीकांतच महाफालतु स्टंट्स करतात असे समजण्याचे कारण नाही...

"shoot'em up" पिक्चर पहा - त्यात हिरो सदैव गाजर खात असतो, प्रत्येक मारामारीच्या सीन मधे न चुकता गाजराचा वापर करतो, त्याच्या अंधाऱ्या घरात गाजराचे छोटेसे शेत पण आहे, "गाजरची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली" ही म्हण जगतोय तो अक्षरश:
एका दृष्यात तर हाईट आहे - हिरोच्या हातातून पिस्तूल पडते आणि गुंड त्याच्यावर एकदम जवळून पिस्तूल रोखतो...आपल्या हिरोने काय करावे - गुंडाच्या तोंडात तो आडवे गाजर घालून जोरदार दणका देतो...गाजर गुंडाच्या तोंडातून आरपार जावून डोक्याच्या मागून बाहेर !

मला तर वाटते, डायरेक्टरने नेत्रविकार होउ नयेत म्हणून गाजराला नवस बोलला असावा, तसे असेल तर गाजरच्या वतीने मी सांगतो, त्यालाच काय त्याच्या पुढच्या ७ पिढ्यांना कधीही दूरचा नंबर पण लागणार नाही।

shoot'em up मधले ए टू झेड सगळे गाजरवाणे प्रकार:
http://www.youtube.com/watch?v=hbeiQaISGA4

जिवाला घोर

माझा रूममेट अल्टिमेट घोरतो...परवा रात्री १२।३० च्या सुमारास तो नेहमीप्रमाणे एका लयीत घोरत होता आणी मी नेहमीप्रमाणे निरुद्देश नेट सर्फ़ींग करत जागा होतो। पुढे काय घडले ते जाम थरारक आहे - अचानक त्याच्य घोरण्याच्या आवाजाची फ़्रीक्वेन्सी बदलली[बीट्ल्स गात असताना एकदम मेटॅलीका सुरु व्हावे तसे] - ३०/४० सेकन्द असे टीपेला पोचलेले घोरणे अचानक थांबले, क्षणभरातच एकामागोमाग एक २ उचक्यांचा आवाज आला

अन मग भयाण शांतता - घोरणे नॉट कन्टिन्यूड !

मी जाम हादरलो, एका मिनीटात आयला, मायला, ॥ची जय, अशा सगळ्या सेमी शिव्या दिल्या मी...मला वाटले संपलाच हा - केवढा चांगला स्वयंपाक करायचा, असा विचारपण आला मनात। काही विचार बाजूला तर काही विचार लांबणीवर टाकून, मी तडकाफडकी गादीवरून धडपडत उठून त्याच्या खोलीत जायला निघालो - तेवढयात हळूच परत घोरण्याचा आवाज आला,

मोठा होत गेला...अहाहा...आयुष्यात पहिल्यांदा घोरणे ऐकून शांत झोप लागली.

न घोरताच जिवाला घोर लावला पोराने !

Sunday, November 9, 2008

विश्वामित्र

हिंदू मायथालॉजी मधे माझी सगळ्यात आवडती व्यक्ती म्हणजे - विश्वामित्र
सगळ्या साधुंमधे मॅ़क्स तप त्यांनी केले होते, स्वत:च्या कर्माने ब्रह्मर्षि झाले, डायरेक्ट प्रतिसृष्टी बनवायला निघाले - नुसते निघालेच नाहीत तर सगळे पुण्य त्या कामी खर्च केले - प्रत्येक गोष्ट मनापासून केली राव त्यांनी, परिक्षा घ्यायची म्हणल्यावर पण हरिश्चंद्राची कसली डेडली परिक्षा घेतली...सगळ्यात एक नंबर Must appreciate passion of this man !पुराणातल्या गोष्टी काल्पनिक मानल्या तरी, त्या लिहिणाऱ्य़ांचे कौतुक आहे यार - कॅरॅक्टर डेव्हलेपमेंट काय कन्सिस्टंट आहे.

Saturday, November 8, 2008

तुला काय घेणं आहे

सकाळी ९.३० ची वेळ, मी ऑफ़िस पॅन्ट्री मधे -
टोस्टर मधे २ स्लाईस टाकून, चहा बनवत होतो. एक मुलगी घाईघाईत आली,२ ब्रेड स्लाईस घेतल्या आणी टोस्टरमधे टाकणार तेवढ्यात आधीच्या २ स्लाईस बघून मला विचारले की, ह्या स्लाईस तू टाकल्या आहेस का ?
मी हो म्हणाल्यावर मला म्हणाली, लवकर काढ, जास्त भाजल्या जातील...अजून २५ सेकंद पण झाली नाहीत आणी काढ म्हणे, मी कसेबसे माझे शब्द रोखले -
तुला काय घेणं आहे? [खरेतर ईंग्लिश मधे पटकन भाषांतर जमले नाही :)]

आता ६ स्लॉट्सचा टोस्टर आहे...माणसाने आपले काम करावे आणी गपचूप जावे ना.
आमची आयजी ना बायजी, अन आमच्या टोस्टची काळजी !

Friday, November 7, 2008

लेडी इन ब्लॅक

युराआ हीपचे <लेडी इन ब्लॅक> हे गाणे सही आहे - वेड लावले आहे, ह्या गाण्याने सकाळपासून मला - २७व्यांदा ऐकतो आहे आत्ता मी !

बडबडीची सुरुवात

आता, नावच बाष्कळ बडबड असल्याने, हा ब्लॉग का सुरु केला वगैरे जास्त काही टीपी लिहीण्यात अर्थ नाही.मला ओळखणाऱ्या ९० ट्क्के लोकान्च्या मते [त्यात आमचे पालक आघाडीवर] मी फ़ालतू बडबड फ़ार करतो... फ़ालतू असले तरी काय झाले, माझ्या मते हे अमूल्य विचार लिहीणे आवश्यक आहे. मोठया माणसान्चे असेच असते हो - ते एकदम वेळेच्या पुढे असतात. वर्तमानाला नाही, भविष्याला त्यान्ची कींमत कळते.