Thursday, May 18, 2017

महाराज विशालग्रीवांच्या समस्येचे निराकरण

दिवसभर पेंटिंग सुरू होते, टिव्ही नाही, ऑफिस नाही, एंटरनेट नाही, सगळं सामान कुलुपात बंद, एक लॅपटॉप आणि एक मी, करायचे काय?
*****

महाराज विशालग्रीवांच्या समस्येचे निराकरण.

"एप्रिल, तू निरागस नाहीस व पूर्णधूर्तही नाहीस. थोडीशी चतुर आणिक बरीचशी प्रेमळ आहेस, सिंहासनाशी निष्ठावान आणि अनुरक्त तर नक्कीच आहेस. आमच्या प्रजाजनांसारखी. आमच्याच नव्हे तर तुमच्या आणि या चक्रतलावरील सर्व साम्राज्यांतील बहुसंख्य प्रजा असते तशी. प्रजेची कारणे निराळी असतील पण त्यांनाही तुझ्यासारखे निष्ठावान असणे आधी महत्वाचे वाटते, कारणे त्यानुसुरून नंतर शोधतात. 
महत्वाचे म्हणजे तू राजकन्या असूनही तुझी प्रवृत्ती अशी आहे. हाच तुझ्या आणि माझ्यातील मुख्य भेद आहे, तुझा प्रस्ताव, विनवणी मला मान्य होणे कदापि शक्य नाही. कोणे एके काळी मी चुकून वा मुद्दामून तुला काही सहाय्यता केली होती तिच्या भाराखाली तू स्वत:ला गुंतवले आहेस आणि त्यात आता अडकून पडली आहेस. तू ज्या संकटातून मला वाचवू पाहतेस ते माझ्यासाठी संकट नसून सुवर्णसंधी आहे.
असो. तुझ्याच भल्यासाठी सांगते, एप्रिले, बल्कराष्ट्राची भावी नववधू, भावी सम्राज्ञी आहेस तू. शक्य होईल तेवढ्या लवकर तुझी वृत्ति बदल, विद्याभ्यास संपला आहे, आता कूटप्रश्नाचे उत्तर चुकले तर ते प्राणांवरचे संकट असेल."
एप्रिलने ग्रीवनारची राजकन्या धनुर्भूवीकडे एक कटाक्ष टाकला. तिच्या नजरेतील करुण आणि क्रोधयुक्त संमिश्र भाव बघून धनुर्भूवी, हसत म्हणाली - चल, आता जायच्याक्षणापर्यंत आपले वाद नकोत. पुढच्या बहराला नक्की परत ये, दूताकरवी निरोप पोहोचेलच तुला.
*

"महाराज विशालग्रीव यांचे आगमन होत आहे". रक्षकाचे बोलणे संपताच बभ्रुबाहू तडक उभा राहिला, तशाच ढम्म बसलेल्या प्रखरमित्राला त्याने जोरात टप्पल मारली आणि म्हणाला - "बधिर आहेस का? आणि जरा नीट उभा रहा". प्रखरमित्र अनिच्छेनेच उभा राहून पुटपुटला, "महाराज आता मुख्यद्वारापाशी असणार, ते येथे पोहोचेस्तोवर अजून बराच अवधी आहे, तोपर्यंत तू उभा राहू शकतोस, तू सैनिक आहेस, मला का उगाच त्रास?". बभ्रुबाहूने हसून प्रखरमित्राचे खांदे मागून दाबले. 
प्रखरमित्र म्हणाला, "बभ्रू, भविष्यात अशी काही सुविधा करता येईल की, आपण एखादे उपकरण कायम जवळ बाळगायचे. ते आपण दिवसभर कितीवेळ उभे राहिलो, किती चाललो, किती धावलो त्याची नोंद करेल, तुम्हा सैनिकांना तर खूपच उपयुक्त ठरेल ते." 
बभ्रुबाहू कक्षाच्या प्रवेशद्वाराकडे बघत म्हणाला, "किती झोपलो याची नोंदसुद्धा ठेवावी त्या उपकरणाने, तुमच्यासारख्या लिपीकवर्गासाठी चांगलेच उपयुक्त...महाराज येत आहेत, कृपया माझ्यावर उपकार करुन, महाराजांशी बोलताना मधेच असंबद्ध कल्पना काढू नकोस, विषयाला धरुनच बोल, कृपया..."
रक्षकाने द्वार बंद केल्यावर महाराजांनी नजरेनेच दोघांना बसायची खूण केली. बभ्रूबाहूने उभे राहून महाराजांना पुनश्च अभिवादन केले आणि म्हणाला, "महाराज, हे ग्रीवनारच्या मुख्यकोषागारातील अभिलेखापाल व मुख्यविश्लेषक, प्रखरमित्र. प्रखरमित्र हे सारकुलीन आहेत. हे माझे बालमित्र आहेत, वेळोवेळी त्यांनी मला विविध समस्यांचे निराकरण करण्यास सहाय्य केले आहे. अधिकृतरित्या जरी ते लेखापाल असले तरी, सर्वच क्षेत्रात ते पारंगत आहेत. आपण सांगितलेले कार्य चोख पार पडतील."
महाराजांनी प्रखरमित्राकडे नजर टाकली तेव्हा प्रखरमित्राने उभे राहून त्यांना अभिवादन केले. 
महाराज म्हणाले, "प्रखरमित्र. खरेतर याकामी सेनापती शारबाहूंची मदत घेता आली असती पण, बरेचदा सेनापतींपेक्षा त्यांच्या सुपुत्रांकडून विशिष्ट प्रकारची कार्य जास्त सुलभरित्या पार पडतात. बभ्रूने तुम्हाला आणले आहे म्हणजे निष्ठेचा आणि विश्वासाचा प्रश्नच येत नाही...". महाराजांचे बोलणे सुरू असतानाच प्रखरमित्र अचानक वळला आणि किंचितसा असा झुकला की, महाराजांना त्याच्या मानेची बाजू स्पष्ट दिसेल. महाराजांनी त्याच्याकडे नीट पाहून घेतले - ग्रीवनारच्यामानाने बुटका, शिडशिडीत बांध्याच्या तरुण. त्याच्या बारीक पिचपिच्या डोळ्यांनी महाराजांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे पातळ ओठ हळूच हलल्यासारखे वाटले.
बभ्रूबाहू रागाने काही बोलणार तेवढ्यात महाराज म्हणाले - "वा, प्रखरमित्र नाव अगदी सयुक्तिक आहे, बसा. प्रत्येक सोमवारी आम्ही सुरभिवनात वनभोजनासाठी जातो. तुम्हाला माहित नसल्यास, सुरभिवन म्हणजे ग्रीवनार राज्याची वायव्यसीमा, मणिनारला जिथे मिळते तेथील वन. राजप्रासादातून वनात पोचायला अर्धा प्रहर लागतो. प्रत्येक सोमवारी सूर्योदयाच्या थोडे आधीच आम्ही, महाराणी तनुग्रीवा, सेनापती शारबाहू, देवी तनुबाहू, आमचे अंगरक्षक दल, अश्वपाल तुरंगरंग, आपले मुख्यबल्लवाचार्य, असे सर्व जण सुरभिवनात जातो. साधारण वीस माणसे, तीन रथ, लागतील तेवढे अश्व असा लवाजमा असतो. आणि हो, विद्याभ्यास संपवून ग्रीवनारमधे परत आल्यापासून राजकन्या धनुग्रीवाही आमच्यासह येतात. आम्ही तिथे पोचलो की, महाराणी, त्यांच्या दासी व सर्व सैनिक मिळून मंडप उभारणी करतात. तोपर्यंत आम्ही व शारबाहू जवळच भोजनाच्या व्यवस्थेसाठी मृगयेला जातो. राजकन्या मात्र वनात पोहोचल्यावर लगेच नेहमीच अश्वारुढ होवून त्यांच्या सखीसमवेत रपेट मारुन येतात." महाराजांनी मधेच क्षणभर उसंत घेतली, बभ्रूबाहूने आश्वस्त मान डोलावली तेव्हा परत बोलू लागले - "बरेचदा, म्हणजे नेहमीच त्या सीमेजवळच्या शिवालयात दर्शन घेवून येतात, दर्शनच नाही त तिथे साधारण तासभर ध्यानही करतात. प्रखर तुम्हाला-तुला वेगळे सांगायची गरज नाही तरीपण, हे संभाषण या कक्षापुरतेच. महाराणी, शारबाहू, आणि आता आपण दोघे यांशिवाय कुणालाही हे माहित नाही. महाराणींना अर्थातच हे मान्य नाही, अशा आचरणाने समस्त ग्रीवनारदेशातील स्त्रिया पुन्हा धर्मरत होतील अशी त्यांची आशंका आहे पण राजकन्या ग्रीवकुलाचे नावही लावत नाहीत त्यापुढे हे बंड काहीच नाही. असो. आपण भरकटलो". प्रखर अचानकच जोरात म्हणाला - "वावा, जे भरकटते तेच खरे संभाषण."  
"मूळ प्रश्नाकडे परत वळू", महाराज त्रासिक स्वरात पुढे सांगू लागले - "मृगयेनंतर आम्ही व शारबाहू, बल्ल्वाचार्यांच्या मदतीने मृगांचे विविध पदार्थ बनवितो आणि सर्वजण मिळून खातो. बरेचदा सोमरस ही सोबत असतो, परंतु अगदी कमी. त्यानंतर जलक्रीडा, कधी रासक्रिडा किंवा मंडपात विश्रांती घेतो. बरेचदा सोमवारी मणिनारचे महाराज पंगमणि व त्यांचे राजपुत्र पिंगमणीशी व राजकन्या मणीपुष्या हे शिवालयात येतात, ते आल्याची वार्ता असेल तर आम्ही व शारबाहू शिवालयानजीक त्यांची अनौपचारिक भेट घेवून येतो आणि तद्नंतर आम्ही सर्वजण राजप्रासादाकडे परत यायला निघतो. आता तुम्हाला येथे बोलावले कारण - मागील सोमवारी, सुरभिवनातून परत आल्यापासून आम्ही अस्वस्थ आहोत. आम्हाला सारखे मनातून असे वाटते आहे की, काहितरी बरोबर नाहीये, काहीतरी चुकते आहे. खरेतर काय वाटते आहे तेही सांगता येत नाही. आम्हाला काय म्हणायचे आहे ते कदाचित आम्ही नीट सांगू शकत नाहीये. पण आज शुक्रवार आला तरी मनातून ही भावना जात नाही आहे. राजाचे असे वागणे सर्वांना हास्यास्पद वाटेल, अर्थातच बभ्रूला नाही वाटणार याची खात्री आहे आम्हाला." मधेच बभ्रू म्हणाला - "महाराज, प्रखरने याआधीही माझ्यासाठी अशा समस्या सोडवल्या आहेत. ज्यांत प्रश्न काय आहे हेच उत्तर शोधण्याआधी शोधावे लागते अशा समस्यांचे निराकरण करण्यात तो वाकबगार आहे." महाराज परत बोलू लागले - "तर प्रखर, ही आहे आमची समस्या. त्यादिवशी आम्हास नक्की असे का वाटले हे तुम्हास शोधायचे आहे. प्रात:समयी मी याविषयी बभ्रूशी सविस्तर चर्चा केली आहे, त्या दिवसाविषयीच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे आहे. एव्हाना तुम्हाला कळालेच असेल, ही बाब आपल्या तिघांनाच माहिती आहे, तशीच रहावी. आमच्या समस्येचे निराकरण करावयाचा तुम्ही जो काही प्रयत्न कराल तो करताना समस्या मात्र कुणाला कळता कामा नये, महाराणींनासुद्धा. आम्ही मंगळवारीच शारबाहूंना आदेश देवून सुरभिवनाच्या परिसरात सैनिकांची संख्या थोडी वाढवली आहे, अगदी कोण्याच्या लक्षात न येण्याजोगी. ". प्रखरमित्राने महाराजांकडे हसत एकवार नजर टाकली - थोडासा स्थूल पण कमवलेला देह, मुकुट नसलेले केशविरहीत मस्तक, तलवाराकृती मिशा, मोठे गोल डोळे, गरुडासारखे नाक, भक्कम मान व शरीराच्या मानाने दीर्घ हात." प्रखरमित्र उभे राहून म्हणाला, "महाराज माझ्याच्याने शक्य होईल ते सर्व मी करीनच...". महाराज कक्षातून निघाले, जाताना परत वळून म्हणाले - "आणि हो, अर्थव्ययाची चिंता नको, मला समाधानकारक स्पष्टीकरण मिळाल्यास तुझी अर्थार्जनाची चिंता तर कायमची नष्ट होईल." प्रखरच्या चेहर्‍यावर एवढे मोठे हसू त्यांनी भेटल्यापासून प्रथमच पाहीले आणि ते त्वरेने निघूने गेले.

"शक्य तेवढ्या लवकर आपल्याला महाराजांना या विवंचनेतून सोडवले पाहिजे", राजप्रासादातून बाहेर पडताना बभ्रूबाहूने चिंताक्रांत मुद्रेने प्रखरमित्राला सांगितले. प्रखरमित्र म्हणाला, "बंधू, सध्या या राजप्रासादी भाषेतून बाहेर पडलो हे बरे झाले, हाहाहा". बभ्रूबाहूने हसल्यासारखे केले. गंभीर मुद्रा करत प्रखरमित्र म्हणाला - "बभ्रू, तुला काय सुचित करायचे आहे ते मला कळते आहे, पण तुला पूर्वानुभव आहेच, मध्यप्रहरानंतर मला पुरेशी निद्रा मिळाली नाही तर आजचा पूर्णच दिवस वाय जाईल. तू तुझे दैनंदिन कामकाज संपवून संध्याकाळी माझ्या घरीच ये, मी कोषागारात जातो, माझे आटपेलच तासाभरात". बभ्रूबाहूने घोड्याला टाच मारली आणि धुरळा उडवत निघून गेला.
*

"बभ्रू, आपण खूपवेळ बोलणार आहोत तेव्हा, बाहेरच ओंडक्यावर पडून बोलू." बभ्रूबाहूने एकवार दारापाशी जावून आपल्या घोड्याला गोंजारले, त्याच्याशी काहीतरे पुटपुटून तो प्रखरच्या समोर बसला. त्याची ती रुबाबदार आणि उंच आकृती आणि समोर बुटकासा प्रखर बघून हे दोघे परममित्र आहेत याच्यावर कुणाचा विश्वास बसला नसता. "सर्वप्रथम, तुला झोप आली, किंवा कंटाळा आला तर तसे स्पष्ट सांग, प्रखर. तू यांत्रिकपणे हूं हूं म्हणतोस आणि मीही गोष्टी सांगायच्या नादात असतो मला कळत नाही तू पेंगत आहेस ते." प्रखरने मान डोलावली. बभ्रूबाहू एकाग्रचित्ताने काही सांगू लागला की त्याच्या कपाळावरील मधली शीर तट्ट फुगायची, ते दृष्य प्रखरमित्राला फारच आवडे. "महाराजांनी ढोबळ कार्यक्रम सांगितलाच आहे, प्रात:समयी जेव्हा आमचे बोलणे झाले तेव्हा मी खूप तपशीलवार चौकशी केली की मागील सोमवारी नक्की काय कार्यक्रम झाला. आणि तो नेहमीप्रमाणेच होता का काही वेगळा. सोमवारी कार्यक्रमात काहीच बदल नव्हता, त्यांनी सोमवारी जलक्रीडा केली, त्यांच्याबरोबर कोणीही नवीन व्यक्ती नव्हती, भोजनात कुठलाही वेगळा पदार्थ नव्हता, जाण्यायेण्याची वेळही साधारण नेहमीप्रमाणेच होती."
प्रखरमित्राने दोन्ही पंजे हवेत पुढे करुन थांब सांगितले आणि म्हणाला - "असे नको, तेच तेच बोलले तर कुठल्याही विषयाचा कंटाळा येतो, अपवाद धन आणि स्त्री...कधीकधी पुरुषही. तर आपण असे करू, मी प्रश्न विचारतो तू उत्तरे दे, मग माझे प्रश्न संपले आणि तरी तुझ्याकडे काही माहिती असली तर ती शेवट सांग. 
ठीक - महाराजांना नक्की कधी काहीतरी चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागले?" 
"माझ्या मनात आलेला पहिला प्रश्न हाच होता. त्यांना नेमका क्षण आठवत नाही पण दिवसभर त्यांना काही वेगळे वाटत नव्हते. परत येताना मात्र त्यांना अशी जाणीव होवू लागली".
प्रखरमित्र - त्यादिवशी भोजनात काही बदल?
बभ्रूबाहू - नाही, नेहमीचेच, मृग, तरस, रानडुक्कर वगैरेंचे मांस, मसाला नेहमीचाच, स्वयंपाक करणारे लोकही नेहमीचेच, बल्लवाचार्य, महाराज, बाबा ईत्यादी. भोजनाची वेळ पण नेहमीसारखीच, जेवणानंतर कोणाला काही त्रासही झाला नाही.
प्रखरमित्र - एखादे नवीन वाहन, नवीन रथ, नवीन अश्व?
बभ्रूबाहू - नाही.
प्रखरमित्र - ठीक मग नेहमीपेक्षा वेगळ्या म्हणता येतील अशा काही बाबी?
बभ्रूबाहू - लक्षात घे, ही माहिती मला महाराजांकडून मिळाली आहे, त्यांच्या दृष्टिने सोमवारी वेगळे काहीच नाही घडले. तेथे असणार्‍या इतर लोकांबरोबर वार्तालाप केल्यास आपणांस अधिक माहिती मिळेल. पण महाराजांच्या आज्ञेत रहायचे असल्याकारणाने आपल्याला लोकांशी याविषयावर बोलता येणार नाही.
प्रखरमित्र - अर्थातच, महाराजांच्या आज्ञेत राहूनच या प्रकरणाचा शोध घ्यायचा आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण लोकांशी सोमवारबद्दल बोलू शकत नाही. सोमवारी सेनापती शारबाहू यांच्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ सुरभिवनात हरवली आहे, सेनापतींना ती माळ अतीव प्रिय आहे त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे - सेनापतींना काय सांगायचे ते तू पाहूने घेशीलच.
बभ्रूबाहू - ठीक आहे, उद्या आपण बल्लवाचार्य, महाराजांचे अंगरक्षक दलप्रमुख धैर्यदत्त, राजकन्या धनुची सखी केतकी, मुख्यसारथी शतांगनाथ यांच्याशी बोलू. बाबा आणि आईशी बोलताबोलता मी सोमवारविषयी बोललो आहे, त्यांच्या आणि महाराजांच्या माहितीत काही विशेष फरक नाही. आईशी बोललो आहे त्यामुळे, महाराणींशी बोलण्याची काही आवश्यकता नाही.
प्रखरमित्र - वावा. महत्वाचे म्हणजे...
बभ्रूबाहू - अरे मूर्खा, महाराजांशी बोलतानाही तू तुझे ते चिघळविंथ का खात होतास? मी तुला आधीच सांगितले होते.
प्रखरमित्र - अरे आता विषयांतर कोण करत आहे? महाराजांना कळालेही नाही मी काही खात होतो ते, ग्रीवनारच्या कोणालाच कळणे शक्य नाही चिघळविंथाविषयी.
बभ्रूबाहू - महाराजांना चांगलेच कळाले, त्यांनी मला हा पदार्थ मागितला आहे, जाताना मला दे...असो, तू काय म्हणत होतास?
प्रखरमित्र - आपण उद्या सर्वांशी वार्तालाप करुच पण आधी आपण या समस्येचे थोडे विश्लेषण केले पाहिजे तरच आपल्याला सर्वांना योग्य प्रश्न विचारता येतील. काहीतरी चुकल्यासारखे वाटणे म्हणजे नक्की काय? तुला असे कधी होते का? होते तेव्हा नक्की काय वाटते.
बभ्रूबाहू - मी उत्तर देणे अपेक्षित आहे का तुझ्या दीर्घ भाषणाचा भाग आहे हा?
प्रखरमित्र - आपली पंचेंद्रीये आपल्याला सभोवतालचे भान देतात. जेव्हा आपल्याला जाणवते आहे ते नेहमीपेक्षा वेगळे असते तेव्हा आपला मेंदू नेहमीपेक्षा वेगळी कृती करायचा भाग पाडतो. बरेचदा आपले ईंद्रिय योग्य माहिती पुरवते पण मेंदू तिचा योग्य वापर करु शकत नाही कारण ती माहिती नेहमीपेक्षा वेगळी असली तरी खूप जास्त वेगळी नसत त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष होते. कळाले? वावा. उदाहरणार्थ, तू रोज संचलन व युद्ध सराव घेतोस, तुझ्या तुकडीमधे सैनिकाऐवजी अचानक एखादा सिंह उभा असलेला दिसला तर तुझ्या लगेच लक्षात येवून तू योग्य ती कृती करशील. म्हणजे पळून जाशील. अरे रागावू नकोस. बर दुसरे उदाहरणा घेवू, समजा तुझ्या तुकडीमधे अचानक केतकी आली तर लगेच तुझ्या ते लक्षात येवून तू योग्य ती कृती करशील. का अयोग्य रे?
बभ्रूबाहू उठू लागला. 
प्रखरमित्र - नाही नाही, आता पुन्हा नाही, मुद्दा ऐक. समजा संचलनावेळी तुझ्या तुकडीतील सैनिकांनी उभे राहताना एकमेकांपासून नेहमीपेक्षा दोन वीत जास्त अंतर ठेवले तर तर तुझे डोळे ते टिपतील पण कदाचित मेंदू ही माहिती तात्काळ वेगळी आहे असे वर्गीकरण करणार नाही. तू पुरेसा हुशार असशील तर नंतर मात्र तुला रोजच्यापेक्षा काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटेल. कदाचित तुला असे का झाले याचे कारण नंतर उमगेलही. पण तोपर्यंत अस्वस्थ वाटेल. हो का नाही. हाच प्रकार आवाजाच्या, स्पर्शाच्या, वासाच्या आणि चवीच्या बाबतीतही होवू शकतो. उद्या आपल्याला सर्वांशी बोलताना याचे भान ठेवायचे आहे. महाराजांच्या ईंद्रियांना नक्कीच काहीतरी जाणवले आहे पण नक्की काय ते मेंदूने नोंदविले नाही. असे एखादे उपकरण की जे आपल्याला समोर दिसते आहे त्याचे तात्काळ चित्र...
बभ्रूबाहू - तुझे विश्लेषण मान्य आहे. एक लक्षात ठेव, आपल्याला फार काळजीपूर्वक वार्तालाप केला पाहिजे कारणा सध्या राजकीय पटलावरील परिस्थिती नाजूक आहे, आपण कशाचा शोध घेतो आहे असे कुणाला कळाले तर एका प्रहरात महाराज भ्रमिष्ट झाले आहेत अशी अफवा पसरायला वेळ लागणार नाही.
प्रखरमित्र - राजकीय पटलावरील परिस्थिती कायमच नाजूक असते.
बभ्रूबाहू - नाही मित्रा, ग्रीवनार आणि मणिनारमधील पस्तीस वर्षांपूर्वीच्या शांतता कराराचे नूतनीकरण, राजकुमारी धनुचे स्वयंवर, हे येत्या दोन महिन्यातच पार पडणार आहे. शिवाय बल्कराष्ट्राने सर्वांवर नाविकशुल्क लादले आहे त्याविरोधाचे ग्रीवनारने नेतृत्त्व करावे असा महाराजांवर मित्रराष्ट्रांचा दबाव आहे. एकूण राजगादी उलथविण्यासाठी एकदम योग्य वेळ आहे. कदाचित यासर्वांमुळेही महाराज जर जास्त सतर्क आहेत.
प्रखरमित्र - ह्म्म, शक्य आहे. तसेही वर्तमानातल्या सर्व घटना एकमेकांशी निगडीत असतात असा माझा फार पूर्वीपासूनचा सिद्धांत आहे.
दोघांनी उठून हलकेच एकमेकाच्या पाठीवर थाप मारली तेवढ्यात प्रखरमित्र पटकन आत गेला आणि आल्यावत म्हणाला - "हे घे, महाराजांना आवडले तर अजून पाठवेन. उद्या सकाळी भेटू."
बभ्रूबाहू घोड्याला टाच मारणार तेवढ्यात प्रखर ओरडला - "बभ्रू, महत्वाचे राहिलेच, मी सुरभिवनात जास्त गेलो नाहीये, दोन महिन्यांपूर्वी गेलो होतो, ग्रीवनार आणि मणिनारमधील लेखापालांचे संयुक्त संमेलन होते तेव्हा. तेव्हाच्या आठवणीनुसार तर तिथे मायेचा प्रभाव असलेले कुठलेही क्षेत्र नाहीये, पण तुझे काय मत"
बभ्रूबाहू म्हणाला - "ग्रीवनारमधे मायेला स्थान नाही. उद्या बोलू" आणि भरधाव निघून गेला.
*

"कल्लोळ, केवळ क.ल्लो.ळ. दिवसभर आपल्याला कायकाय माहिती मिळाली आहे ती मी मांडतो, मग एकत्र विश्लेषण करु", प्रखरमित्राने जाहीर केले, आणि तडक आत गेला. येताना त्याने दोन द्रोणभरुन चुरमुरे, कांदा आणि मसाला आणला. बभ्रूबाहू जोरात हसून म्हणाला, "अरे ही वेळ सोमपानाची आहे पण तुला कोण सांगणार, बालका". त्याच्याकडे दुर्लक्ष करुन कांदा चिरता चिरता प्रखरमित्र बोलू लागला - 
एक. आपल्याकडे प्रचंड माहिती आहे
दोन. ती सुसूत्र मांडली पाहिजे, आणि माझ्यावर पूर्वी हसला असलास तरी हे विशालभूर्जपत्र आता या मांडणीसाठी उपयोगी पडणार आहे, त्याला आपण असे उभे करू.
"तीन. अंगरक्षक दलप्रमुख धैर्यदत्त माळ शोधायला उद्या सुरभिवनात स्वत:चे एक दल पाठवू म्हणतात, त्यांना तू अर्थातच थांबविले असशील. त्यानांही रुद्राक्षाची माळ कुठे पडली ते ठावूक नाही त्यांच्या वावरातला परिसर जरा जास्त आहे - मंडप, जलाशय, वालय, शिवालयाचा रस्ता, हरणे आणि रानडुक्कर मारले तो भाग. त्यांना सोमवारी एक बदल जाणवला होता, परत येताना त्यांच्याबरोबरचे श्वान नेहमीपेक्षा जास्त उत्साही वा आनंदी वाटत होते. हे महत्वाचे आहे. सध्या. शेवट ते म्हणाले कदाचित भ्रमही 

असेल, बाकी सैनिकांना तसे जाणवले नाही. हे महत्वाचे नाही.
चार. बल्लवाचार्यांना काही रुद्राक्षाची माळ कुठे पडली ते ठावूक नाही अर्थातच, त्यांच्या वावरातला परिसर म्हणजे - मंडप आणि समोरचे जलाशय. आपल्या प्रश्नातील सोमवार आणि त्याच्याआधीचा सोमवार यातील वाणसामानात एक महत्वाचा फरक म्हणजे या सोमवारचा मांसाला लावला जाणारा मसाला बल्कराष्ट्रातून आला होता, पूर्वी तो मणिनारमधून असायचा. आणि भावी सेनापती बभ्रूबाहू, चौकशीच्या वेळी बल्लवाचार्यांनी जेव्हा विचारले - याचा हरवलेल्या माळेशी काय संबंध, तेव्हा झटकन उत्तर न देता तुम्ही थोडा कालापव्यय केला तसे परत केलेत तर भविष्यात कठीण परिस्थिती निर्माण होईल"
बभ्रूबाहू - "तू प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारलास त्यामुळे बल्लवाचार्यांना असा प्रतिप्रश्न पडला, पुढे"
"पाच. केतकीला वाटेत कुठेच माळ दिसली नाही आणि तिच्या मते आपण वेगळीच काही माहिती काढू इच्छित होतो. तिच्या वावरातला परिसर साधारण धैर्यदत्त यांच्याएवढाच, फक्त वेळ वेगळी, ती शिवालयात राजकन्येबरोबर गेली होती. तिला जाणवलेला बदल म्हणजे शिवालयाजवळ तिला क्षणभर मंदसा फुलांचा वास जाणवला. बहराचे दिवस पूर्ण सरले नाहीत त्यामुळे हे साहजिकच आह. हे महत्वाचे आहे का नाही ते ठरवावे लागेल. आणि एक...भावी सेनापतींचा वेळ महत्वाचा असतो हे समजून घेवून त्यांनी काम झाल्यावर संभाषण संपवायची सवय लावावी."
बभ्रूबाहू हसला.
"सहा - तुरंगरंग यांना ताप आला होता, त्यांनाही माळ कुठे गहाळ झाली असेल काही कल्पना नाही, पण त्यांनाही माळ शोधण्यात रस आहे. बभ्रू, पुनश्च एकवार - धैर्यदत्त आणि तुरंगरंग यांना माळेच्या शोधकार्यापासून परावृत्त करायचे महत्त्वाचे काम तुझ्याकडे आहे. तुरंगरंग महाराजांच्या रथा पुढील रथाचे सारथ्य करत होते. सुरभिवनात त्यांचा वावरही जवळपास महाराजांसारखाच होता, तेव्हा त्यांना काही विशेष निराळे आढळले नाही. पण त्यांनी सांगितलेली महत्वाची गोष्ट म्हणजे सोमवारी परतताना त्यांना त्यांचा रथ दोलायमान वाटत होता, म्हणून त्यांनी प्रवास सुरु करायच्या आधी एकदा नीट पाहून घेतला. नगरीत परत आल्यावर त्यांनी रथशालेत याची कल्पना दिली होती.
सात - मुख्यसारथी शतांगनाथ यांच्याकडून शून्य माहिती मिळाली, ते या महिनाखेरीस कार्यमुक्त होणार आहेत त्यामुळे कदाचित अनुत्साही असावेत. मी त्यांच्याविषयक कागदपत्रे तपासली असता माझ्या ध्यानात आलेली एक बाब म्हणजे, त्यांचे मणिनारच्या व्यापार्‍यांशी खूपच चांगले संबंध आहेत. हेही महत्वाचे आहे.
बभ्रू, बभ्रू..."
बभ्रूबाहूची तंद्री लागली होती, दुसर्‍या हाकेने तो भानावर आला आणि तो जवळपास ओरडलाच - "मला वाटते, महाराजांना हे सर्व विसरण्यास सांगावे, आपण आपला, म्हणजे मुख्यत्वे मी माझा मौल्यवान वेळ वाया घालवत आहे. कदाचित महाराजांना उगाच तसे वाटले असेल थोडेफार थकव्याने." प्रखरमित्राने त्याचे पिचपिचे डोळे अजूनच पिचपिचे केले व त्याच्या गरुडासारख्या नाकात बोट पटकन घालून काढल्यासारखे करून म्हणाला, "तुझे म्हणणे मला मान्य आहे, पण अशीही एक शक्यता आहे की, दिवसभराच्या शीणाने तुझ्य मनात आत्ता हे असे विचार येत आहेत. असो. एकूणात तीन गोष्टी निराळ्या होत्या - बल्कराष्ट्रातील नवीन मसाला, केतकीला जाणवलेला मंद सुवास, परत येताना उत्साही वाटलेले श्वान. एकेक बघू.
एक - बल्कराष्ट्रातील मसाला.
महाराज, महाराणी यांची प्रकृती कशी आहे? काही जाणवेल असा बदल? चार दिवस नक्कीच झाले, आज शनिवार आहे"
प्रखरमित्राच्या या प्रश्नाने बभ्रूबाहूला जणू पुन:उत्साह आला, तो म्हणाला - "महाराज, पिताजी, सर्वांची प्रकृती उत्तम आहे, त्या मसाल्याचा तसा काही अनिष्ट परिणाम झाला नसावा, मी लागलीच बल्लवाचार्यांवर पाळत ठेवायला हेर नेमतो."
"बभ्रू, बभ्रू थांब, लेखापाल असल्याने मी बर्‍याच अशा गोष्टी करु शकतो ज्या बसल्याबसल्या बरीच माहिती देतात, मी भोजनशालेचे गेल्या दोन वर्षातील सर्व क्रयविक्रय नोंदी तपासल्या आहेत आणि मला त्यात काही संशयास्पद आढळले नाही. एकूणच बल्ल्वाचार्य दर दोनेक महिन्यांनी विविध देशातील नवनवीन गोष्टी मागवत असतात आणि महाराजांना नवनवीन पदार्थ खाऊ घालतात. आजपावेतो या चक्रतलावरील सर्व देशातून त्यांनी विविध सामान मागविले आहे, महाराजांची खाण्याची आवड लक्षात घेता त्यांना अजून चिघळविंथ माहित नव्हते हे एक आश्चर्यच. पण बल्लवाचार्य़ आणि नवीन मसाला या गोष्टींचा या प्रकरणाशी संबंध नाही. मी आपले निश्चितीसाठी सर्वांच्या प्रकृतीची विचारणा केली." प्रखरमित्राचे बोलणे ऐकून बभ्रूबाहूचा तात्कालिक उत्साह मावळला.
दोन - मंद सु.."
"केतकीला जाणवलेला मंद सुवास" - प्रखरमित्राचे बोलणे संपायच्याआतच बभ्रूबाहू घाईत म्हणाला. "हो केतकीला जाणवलेला मंद सुवास, मुळात या तरुणीचे नावच केतकी आहे, त्यामुळे तिला जाणवणारा प्रत्येक गंध सुवासच असणार, हाहाहा" - प्रखरमित्र असे बोलून जोरजोरात हसू लागला.
"तुझ्या त्या उपकरणांच्या यादीत असेही उपकरणा शोधायची नोंद कर की, स्वत:च असा एखादा कंकर विनोद करुन हसणार्‍याचे मुख पुढील तासभर बंदच रहावे", बभ्रू चिडून म्हणाला.
"बर, बर, बर...आपण मूळ मुद्द्याकडे वळू...आपल्याला मिळालेली माहिती अजिबातच पुरेशी नाही, शिवालयापाशी महाराज नसताना केतकीला मंद सुवास आला असेल तर त्याचा महाराजांवर काही परिणाम होणे अशक्य आहे. मला तर वाटते आहे की, केतकी केवळे तुझ्याशी संभाषण लांबविण्यासाठी काहीबाही आठवून सांगत होती. पण तरुणी प्रामाणिक वाटली, तूर्तास आपण ही माहिती बाजूला ठेवू." प्रखरमित्राचे बोलणे बभ्रूबाहूला पटत होते, खरेतर त्याला या प्रकरणाचा कंटाळा आला होता, एकतर सर्वांची नीट मोकळी अशी चौकशी करता येत नव्हती, त्याला महाराजांनी परवानगी दिली असती तर त्याने सैनिकी खाक्या दाखवून एका प्रहरात प्रकरण संपविले असते.
"वावा, तुझे लक्षच नाहीये, केतकीविषयी बोलत असूनही. वावा.
तीन - तुरंगरंगांचा रथ. महाराजांच्या अस्वस्थतेचा याच्याशी असा संबंध असू शकतो, की महारजांचा रथही असाच दोलायमान झाला असेल, पण रथशालेतून मिळालेल्या माहितीनुसार, महाराजांच्या रथ व्यवस्थित होता. तुरंगरंगांविषयकच्या नोंदीतही काही विशेष वेगळे सापडले नाही.
चार - मुख्यसारथी शतांगनाथ. 
शतांगनाथ यांच्या सर्व नोंदी मी तपासल्या आणि मला क्षमा कर बभ्रू पण त्यांचे सर्व व्यवहार संशयास्पद आहेत. महाराजांच्या एवढ्या नित्यसहवासातील व्यक्ती, फार मोठा धोका आहे हा, तुमचे गुप्तहेर खाते खूपच..." - प्रखरमित्र काही बोलणार तेवढ्यात बभ्रूबाहू म्हणाला - "शतांगनाथ हे मणिनारचे हेर आहेत, गेली दहा वर्षं"
"ओ ओ ओ, आता कळाले मला, साक्षात बभ्रूबाहू हे एवढ्या शांतपणे सांगत आहेत त्याअर्थी, शतांगनाथ हे मणिनारचे हेर आहेत, असा मणिनारचा समज करवून देण्यात आला आहे., वावा". प्रखरमित्राच्या या कौतुकावर बभ्रूबाहूने स्मितहास्य केले व म्हणाला - 
"मला आशंका आली होतीच की तुझ्यासमोर ते जास्त माहिती देणार नाहीत म्हणून मी त्यांची परत भेट घेतली. तेव्हा त्यांच्याशी सविस्तर बोलणे झाले. त्यात मला विशेष काही नवीन माहिती मिळाली नाही. शतांगनाथ काहितरी लपवत आहेत हे नक्की, माझ्या प्रश्नांना उत्तरे देताना मला त्यांची द्विधा मनस्थिती जाणवली, कदाचित ते ठरवू शकत नाहीयेत की आपल्याला अधिक माहिती द्यावी का नाही याबाबत"
दोघेही थोडावेळ शांत बसले, बभ्रूबाहू उठला आणि त्याच्या घोड्यावर चढला.
"उद्या पहाटेच आपण सुरभिवनात जावू" - दोघेही एकदम म्हणाले, आणि त्यांचे चेहरे आनंदले, त्यांना समस्येची उकल झाली नव्हती पण दोघांचे पुढील विचार एकच असल्याने उगाचच आपण लवकरच हे कोडे सोडवू असा आत्मविश्वास आला. 
*

बुटक्या प्रखरमित्राने एक उंच उडी मारून आपल्या काळ्याशार घोड्यावर मांड ठोकली व भरधाव वेगात वायव्येकडे जावू लागला, बभ्रूबाहूच्या शीळेला त्याने हात वर करून उत्तर दिले. अर्ध्या प्रहरापेक्षा कमी वेळेतच ते सुरभिवनाच्या सीमाप्रवेशद्वारापाशी पोहोचले. असे अचानक बभ्रूबाहूला पाहून प्रवेशद्वाराजवळील रक्षक गडबडले. बभ्रूबाहूने त्यांच्याकडे तीव्र कटाक्ष टाकला आणि म्हणाला - प्रखर तो हो पुढेच, आलोच आहे तर जर येथील सुरक्षेचे नीट सर्वेक्षण करतो. प्रखरमित्राने जलाशयापाशी घोड्यावरुन खाली उडी मारली, त्याला गवतापाशी सोडून जलाशयापाशी तो हातपाय धुवून पाणी पिऊ लागला. बभ्रूबाहू आल्यावर त्यानी प्रवेशद्वाराजवळील रक्षकांबरोबरील संवाद प्रखरमित्राला वनरक्षकांकडून त्याला बरीच उपयुक्त माहिती मिळाली होती. थोड्याच वेळापूर्वी राजकन्येची परमसखी केतकीला त्वरेने जाताना पाहिले होते. सुरभिवनाच्या विरुद्ध बाजूला मणिनारच्या सीमेजवळील सैन्यात जाणवण्याइतपत वाढ झाली होती, सीमेजवळील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात डागडुजी करण्यात येत होती. पण मणिनारसह सर्वच राष्ट्रे बल्कराष्ट्राच्या वाढत्या दहशतीपायी सैन्यसज्जतेत वाढ करत होती, त्यामुळे यात नवल काहीच नव्हते. बभ्रूबाहू आणि सैनिक यांच्यात याविषयीही बरीच जास्त चर्चा झाली होती. 
"बभ्रू, तू मनमोकळेपणाने सामान्य सैनिकांशी अशा विषयांवर संवाद साधतोस हे मला खूप आवडते" - प्रखरमित्राकडून ही प्रशंसा ऐकून बभ्रूने स्मितहास्य केले. दोघांनी एकत्र भोजन केले व आजूबाजूच्या भागाची पाहणी करु लागले, वनासारखे वन होते, खूपच नयनरम्य परिसर होता. येथील निरिक्षण संपले अशाअर्थी एकमेकाकडे बघून, माना डोलवून दोघे शिवालयाच्या रस्त्याने टेहळणी करत करत निघाले. शिवालयापाशी परत घोड्यावरून उतरून आजूबाजूला फिरू लागले. प्रखरमित्र शिवालयाच्या गाभार्‍यात जावू लागला. जाता जाता शिवालयाबाहेरच उभ्या असलेल्या बभ्रूबाहूकडे बघून जोरात ओरडला  - "मातेची आठवण येते आहे का बालकाला?" आणि हसत हसत आत गेला. अर्धी प्रदक्षिणा घालून परतताना प्रखरमित्राने बभ्रूला जोरात हाक मारूनच सांगितले की तो थोडा दूरवर जावून येत आही. तो मागे न वळता मणिनार सीमेच्या दिशेने तसाच थोडा पुढे गेला. बराच वेळा जमिनीवर काळजीपूर्वक वेगळॆ काही सापडते आहे का ते शोधल्यायावर त्याला काचेचा एक मणी मिळाला. त्याने असा असाधारण मणी आजवर पाहिला नव्हता, तो जणू एक स्फटीकाचा तुकडाच होता, प्रकाशात धरला तर प्रकाश असा आरपार जात होता की जणू तो मणी अस्तित्वातच नसावा. समोर पाहिले तर, बभ्रू आणि त्याचा घोडा तिथे आनंदात गवतात फिरत होते. मणी झेलत तो परत आला. त्याला बघून बभ्रूबाहू म्हणाला - "मित्रा, पूर्ण प्रदक्षिणा घालून अपमान करण्यापेक्षा प्रदक्षिणा न घातलेलीच बरी". प्रखरमित्राने बभ्रूबाहूला मणी दाखविला. बभ्रूबाहूने मण्याचे पूर्ण निरीक्षण केले, वरखाली बघून, उंच प्रकाशाच्या दिशेने धरून पाहिला, व अखेर उत्तरला - "काही अंदाज बांधता येत नाही कसला मणी आहे त्याबाबत. 
बर...प्रखर तू मणी शोधत होतास तेव्हा मला शिवालयाजवळ शतांगनाथ दिसले, त्यांच्याएकूण वावरावरून ते गुप्तरित्या येथे आले होते असे दिसते. त्यांच्या हातात एक करडे पीस दिसले मला. शतांगनाथांचे असंख्य पक्षी हेरगिरीचे काम करतात, श्यामकिर तर बरेचदा मला त्यांचे सांकेतिक भाषेतील निरोप पोहचोवतो. शतांगनाथ नक्कीच काहितरी लपवत आहेत. कदाचित त्यांना सेनापतींनी आपल्यासारखेच काही शोधायला पाठविले असेल, कदाचित...". बभ्रूबाहूने शून्यात नजर लावली होती आणि डोळे एवढे छोटे केले होते की ते कदाचित प्रखरमित्राच्या पिचपिच्या डोळ्यापेक्षाही छोटे झाले असतील.
प्रखरमित्र म्हणाला - "एकाच सप्ताहात केतकी, तुरंगरंग, शतांगनाथ, आपण सर्वजण सुरभिवनात काहितरी शोधत आलो याचा अर्थ प्रकरण गंभीर आहे हे निश्चित."
थोडावेळ तिथे अजून काही वेगळे दिसते का याचा शोध घेवून ते परत नगराच्या दिशेने दिसू लागले.
प्रखरमित्र - "शिवालयाच्या पुढे आपले किती रक्षक आहेत"
बभ्रूबाहू - "जास्त नाहीत, साधारण दहा ते बारा. यापुढे बरेचसे निबीड अरण्य आहे. शिवालयापाशी आपण आलो तो चिंचोळा मार्ग ग्रीवनारमधून येतो आणि असाच पुढे मणिनारमधे जातो. थोडेसे पुढे गेल्यावर जवळच आपले व मणिनारचे संयुक्त सेनालय आहे. मणिनारचेही साधारण दहा सैनिक असतील."
प्रखरमित्र - "बभ्रू, मी दोन महिन्यांपूर्वी संयुक्त परिषदेच्या निमित्ताने सुरभिवनात आलो होतो मला मणिनारचे सीमेजवळील रस्ते उत्तम स्थितीत आढळले होते. मला वेगळीच शंका येते आहे. तुला प्रतिशत खात्री आहे का की सुरभिवनात मायेचा प्रभाव नाही. कितीही झाले तरी मी ग्रीवनारमचे परत येवून वर्षभरसुद्धा झाले नाही."
बभ्रूबाहू - "शिवायलाच्या जवळ माया असली तरी ती सिद्ध होवू शकत नाही. आणि पूर्ण ग्रीवनारच्या सीमेअंतर्गत माया नाही हे मी निश्चित सांगू शकतो. पण मणिनारने हळूहळू त्यांच्या प्रदेशात माया सिद्ध करायला अनुमति देणे सुरू केले आहे, बल्क राष्ट्राच्या दहशतीला हेच एक उत्तर आहे असे महाराज पंगमणि यांना वाटते. बाबांबी मला बरेचदा ओझरते सांगितले आहे की शिवालयाजवळील अनौपचारिक भेटीत पंगमणि आणि महाराजांनी यावर बरेचदा वार्तालाप केला आहे. मणिनार व आपण यांच्या शांतता कराराच्या नूतनीकरणात हाच महत्वाचा मुद्दा असणार आहे. तुला कल्पना असेलच मायेचे मूळ आपल्या दोन देशातच आहे. बाहेर कितीही दाखविले तरी ग्रीवनार माया विसरणार नाही, आणि तशी वेळा आलीच तर महा देवी अभिधर्वा...असो."
प्रखरमित्र - "ह्म्म....आपल्याला मिळालेल्या या नवीन माहितीचा, सापडलेल्या मण्याचा आणि महाराजांच्या समस्येचा काही संबंध आहे का नाही ते कळणे अवघड आहे पण आपल्याकडे आत्ता तरी काही उत्तर नाही. उद्या परत सोमवार आहे, महाराज..."
बभ्रूबाहू - "नक्कीच नियमीत येतात तसे ते येणार, चल आपल्याला लवकर नगरीत पोहोचले पाहिजे, उद्या साप्ताहिक विश्राम असल्याने आज मला नगरातील सर्व व्यवस्थेचे नीट बघितले पाहिजे."
प्रखरमित्र - "ठीक. मी हा मणी सध्या
 माझ्याजवळ ठेवतो, नगरीत कोषागारातील विशेषज्ञांकडून हा नैसर्गिक आहे का कृत्रिम, कुठे बनविला असेल, कशासाठी असेल वगैरे सर्व माहिती घेतो, आज आपण संध्याकाळीच माझ्या घरी भेटू"
*

सुरभिवनातून आल्यावर प्रखरमित्र मणी घेवून ताबडतोब कोषागारात त्याचा मित्र सूर्यपैलूकडे गेला. "मी तुला खात्रीने सांगू शकतो की हा मणी मौल्यवान अजिबात नाही, तो निव्वळ काचेचा आणि कृत्रिमरित्या बनविलेला आहे पण यावरची कारागिरी अतुलनीय आहे, याचा नकीच काहीतरी उपयोग आहे, पण काय ते लक्षात येत नाहिये." - सूर्यपैलूचे वाक्य पूर्ण होता होता, प्रखरमित्राने जवळजवळ त्याच्या हातातून मणी हिसकावला आणि म्हणाला - "कुठे बनवला असेल हा?".  याच्यावरच्या पैलूंवरून मी खात्रीने सांगू शकतो की हा एकतर बल्कराष्ट्रात तयार करण्यात आला आहे किंवा, बल्कराष्ट्रातील कोणीतरी तयार केला आहे". प्रखरमित्र मणी घेवून लगबगीने त्याच्या कार्यालयात गेला आणि त्याने बल्कराष्ट्राबरोबर केलेल्या सर्व व्यवहारांच्या नोंदी आणयला सांगितल्या. मुळात बल्कराष्ट्राशी चक्रतलावरील दोन वा तीन राष्ट्रेच व्यापार करत. ग्रीवनार अन्नधान्याच्या बदल्यात त्यांच्याकडून सुवर्णमुद्राच घेत असे. हीच माहिती नोंदीवरुन अधोरेखित झाली. बभ्रूच्या विचारांची शृंखला आता पटपट पुढे सरकू लागली होती - "हा एक सामन्य मणी चोरुन ग्रीवनारमधे आणण्यात आला आहे. एकच पर्याय आहे - हे सर्वश्रुत आहे की राजकन्येची सखी बल्कराष्ट्राची भावीवधू आहे, कदाचित तिच्याकरवी हा मणी येथे आणण्यात आला असेल. केतकीची भेट घेतली पाहिजे पण ती भेटणार कशी, राजप्रासादात असे अचानक जाणे योग्य नाही." प्रखरमित्र हा विचार करत होता तोपर्यंत त्याला मधुर आवाज ऐकू आला - " बभ्रूबाहू, सेनालयात नाहीत व त्यांच्याघरीही नाहीत, ते कोठे भेटू शकतील?". केतकीला बघून प्रखरमित्राला बभ्रूबाहूपेक्षाही जास्त आनंद झाला. तो म्हणाला - "सप्ताहाखेरीस ते कामकाजात खूपच व्यस्त असतात, काही विशेष काम असले तर मला भेटतील तेव्हा मी त्यांना निरोप देवू शकतो". केतकीने क्षणभर इकडेतिकडे पाहिले व म्हणाली - "सोमवारी...अं म्हणजे....उद्या सायंकाळी ते मला संध्यासमयी भेटू शकतील का विचारायचे होते, काम नव्हते काही, तुम्ही नाही दिला तरी चालेल निरोप." प्रखरमित्र हसत म्हणाला - "नक्कीच भेटतील, मी त्यांना निरोप देतो, निश्चिंत असा, बर..मला आपल्याला दोन गोष्टी विचारयच्या होत्या...". प्रखरमित्राने त्यांना एप्रिलविषयी विचारले. केतकीने खात्रीने व प्राणाशप्पथ सांगितले की - जाणते वा अजाणतेपणी देवी एप्रिल ग्रीवनारमधे वाममार्गाने काही वस्तू आणणार नाहीत. देवी एप्रिल, आपल्या राजकन्येच्या अक्षरश: भक्त आहेत. प्रखरमित्राने केतकीला तिच्या सुरभिवनातील भेटीविषयी विचारले तेव्हा तिने - "वनरक्षकांना भास झाला असेल" असे उत्तर दिले व तातडीने निघून गेली. केतकी आली तशी पटकन निघून गेली. प्रखरमित्र विचार करू लागला - हा मणी ग्रीवनारमधे आला कुठून. कदाचित तो शिवालयापाशी वर्षानुवर्षे पडून असेल असे म्हणावे तर तो एवढा स्वच्छ आहे की तो नक्कीच त्या जागी जास्त दिवस नसावा. याचा उपयोग काय?" तो गहन विचारात गढला, आणि आपसुकच करंगळीचे नख खावू लागला. हे प्रकरण नक्कीच गहन आहे प्रथमपासूनची सर्व माहिती सुसूत्र मांडू, सत्य लक्षात यायला वेळ लागणार नाही. मण्याशी खेळता खेळता त्याने तो डेर्‍यातील पाण्यात टाकला, तर आश्चर्य म्हणजे त्यातून बुडबुडे येवू लागले, त्याने मणी प्रकाशात धरून पाहिला तरी कोठे छिद्र दिसेना. त्याने विचार केला - छिद्र खूपच सूक्ष्म असावे, अगदी मुद्दामून केल्यासारखे. अर्ध्या तासाने तो खाडकन जागीच उभा राहिला - "ओहोहोहो, काय सोप्पा प्रकार आहे सगळा. हा मणी नाही ही तर कुपी आहे, यात सीमेलगत रस्ते नाहीत ते तर प्रसव्यमार्ग आहेत, केतकीला आलेला मंद सुवास, असे प्रशिक्षण एकच व्यक्ति देवू शकते...म्हणजे काय अर्थातच. आणि काय काळजीपूर्वक योजना आखली आहे, वावा". त्याने डेर्‍यातले दोन भांडी पाणी गटागटा प्यायले आणि घोड्यावर बसून भरधाव निघाला. संध्याकाळ झाली होती, त्याने थेट आपले घर गाठले, प्रवेशद्वारापाशी त्याला कोणाचीतरी चाहूल लागली आणि तो सावध झाला. त्याने हळूच मागील द्वाराने प्रवेश करायचे ठरविले, पण क्षणभरातच त्याच्या मानेच्या दिशेने एक तीर आला, त्याने झपक्क्न खाली बसून तो चुकवला, तोपर्यंत समोरून दोन करड्या वेषातील सैनिक येताना दिसले. मुख्य द्वारापाशी दोन, इथे दोन, आणि दूरवर एक धनुर्धारी  - प्रखरमित्राला निकराची लढाई लढायला लागणार हे लक्षात आले. त्याने पटकन झाडावर उडी मारली आणि पटपट झाडात गुप्त झाला. त्याची आणि बभ्रूबाहूची लढायची ही आवडती निती होती. त्या झाडाच्या फांद्यावरुन तो थेट घरात उतरला. स्वत:च्या घरात आल्यावर तो युद्धात जरी तो हरला तरी सहजी हरणार नव्हता. सहा शत्रू सैनिकांनी घरात धाव घेतली. प्रखरमित्राने चापल्या दाखवत धावणे सुरू केले आणि बरोबर वेळा साधून एकेक सैनिकावर 
वार केले. चार शत्रूसैनिक जायबंदी झाले, कदाचित ते मरणही पावले असतील परंतु शेवट प्रखरमित्र अंगणातील कोपर्‍यात अडकला आणि उर्वरीत दोन सैनिक त्याच्यावर वार करून धावून आले. त्याने एका सैनिकाच्या वर्मी घाव केला पण तोवर उरलेल्या शत्रूसैनिकाच्या तलवारीच्या घावाने त्याची करंगळी तुटली. त्याला प्रमाणाबाहेर वेदना झाल्या, दुसर्‍या हाताने मूठ घट्ट आवळून तो कोलमडला, त्याला उरलेला एक सैनिक आणि शतांगनाथांचा चेहरा दिसला आणि त्याची शुद्ध हरपली.
*

सप्ताहाखेरीसचे सर्व व्यवस्थापन संपवून संध्यासमयी बभ्रूबाहू, सुरभिवनातील प्रकरणाचा विचार करत सेनालयाबाहेर उभा होता तेव्हा त्याला समोरील झाडावर निळा पोपट दिसला. श्यामकीर आत्ता? त्याने शीळ वाजवून श्यामकीरला जवळ बोलावले. त्याच्या पायाला बांधलेला पांढरा दोरा सोडवला आणि अश्वारुढ होवून तो भरधाव चंद्रवाटीकेकडे निघाला. थोड्याच वेळात तो चंद्रवाटीकेतील नेहमीच्या वृक्षापाशी जावून त्याने शतांगनाथ दिसतात का ते पाहिले पण तिथे कोणीच नव्हते. आजूबाजूला नीट बघता बभ्रूबाहूला झाडाच्या खोडावर तलवारीने कोरलेले "X१X" असे चिन्ह दिसले, आणि त्याखाली रक्ताचे डाग. बभ्रूबाहू क्षणभर दचकला, पण लगेच सावरुन तो स्वत:शीच पुट्पुटला - आता एक पळभरही उशीर करुन चालणार नाही, महाराजांच्या जीवाला धोका? सर्वप्रथम बाबांना आणि सैन्याला सचेत केले पाहिजे, आणि शतांगनाथ?". कमरेच्या शंखाला हात जातो तोवर त्याच्यावर चारीदिशांनी बाणाचा वर्षाव सुरु झाला, त्याच्या उजव्या मनगटाला घासून एक बाण गेला पण त्याच्या शंखाचा चक्काचूर झाला. त्याच्या ड्याच्या मानेत सप्पकन तीनचार बाण एकदम घुसले. झाडाचा आडोसा सोडून पळणे म्हणजे जीवावर पाणी सोडण्यायोग्यच होते, पण त्याला काहितरी करणे भागच होते. श्यामकीर ! विचार करायचा अवकाश आणि श्यामकीरची आर्त शीळ ऐकू आली. अश्रू आणि श्वास रोखून बभ्रूबाहूने पटकन कमरेचा धूम्रकोष जमिनीवर आदळला, निर्माण झालेल्या धूराच्या लोटातच तो धावू लागला. सूर्यास्ताचा फायदा घेवून तू धनुर्धारी शत्रूला चुकवून लगेचच राजप्रासादापाशी पोचला असता. पण नगरीच्या दिशेला वाटेत पूर्ण करड्या वेषात, काळ्या अश्वावर तलवारधारी सहा सैनिक शांतपणे त्याची वाट बघत उभे होते. बभ्रूबाहूने झटकन परिस्थितीचे संपूर्ण आकलन केले - वाटिकेतून बाहेर पडायच्या सर्व वाटा अडवल्या गेल्या आहेत, बाहेर पडायचे म्हणले तर सैनिकांशी सामना अटळ आहे, तो कितीही शूर असला तरी एकावेळी जास्तीत जास्त दोन जणांशीच लढू शकला असता. चंद्रवाटीकेतून बाहेर पडणारे सर्व मार्ग चांगलेच रुंद होते. वाटिकेच्या आतच थांबायचे म्हणले तर त्याला सहज शक्य होते. दाट वृक्षांचा आधार घेवून त्याला शत्रूशी लढता येणारं होतं. शिवाय सुर्योदय होताच शत्रूला पलायनाची तयारी करणं भाग होतं. जेव्हा शतप्रतिशत मरण अटळ आहे तेव्हा दुसर्‍या पर्यायाचाच विचार केला पाहिजे असे ठरवून त्याने वाटिकेत लपून लढायचा निर्धार केला व तो क्षणार्धात वाटीकेत लुप्त झाला. हानि एकच होवू शकली असती ती म्हणजे रात्रीतच महाराजांच्या जीवाला काही बरे-वाईट झाले तर, पण राजप्रसादाच्या सुरक्षेची जबाबदारी सेनापती शारबाहूंवर होती त्यामुळे त्याबबतीत तो निश्चिंत होता. तो पटकन एका झाडावर चढला आणि शांतपणे विचार करत बसला. लगेच प्रतिहल्ला करण्यात काही अर्थ नव्हता, थोडा वेळ गेल्यावर अचानक हल्ला करणे जास्त लाभदायक होते. तासाभर शांतपणे थांबल्यावर त्याला सर्व प्रकरण हळूहळू लक्षात आले - महाराजांच्या जीवाला धोका होता पण तो सुरभिवनात. महाराज प्रात:समयीच सुरभिवनासाठी प्रस्थान करणार होते आणि बाहेरील करड्या वेषधारी सैनिकांचा उद्देश बभ्रूबाहूला महाराजांपर्यंत पोहोचू न देणे हा होता. बभ्रूबाहू सूर्योदयाची आतुरतेने वाट बघत होता. त्याला प्रखरमित्राची, त्याहीपेक्षा त्याच्या एकमेकाला संदेश पोहोचवता येतील अशा उपकरणाच्या कल्पनेची जास्त आठवण येत होती.
*

सोमवारचा सूर्योदय झाला, प्रखरमित्राला जाग आली तेव्हा नुकताच सूर्योदय झाला होता. आश्चर्यकारकरित्या त्याचा हात दुखत नव्हता. त्याने नीट डोळे उघडून पाहीले तर त्याच्या हाताला नीट औषध व श्वेतवल्कले लावली होती. त्याने निकराने स्वत:ला उठविले, शेजारी शतांगनाथ कण्हत होते, त्यांचे दोन्ही हात व पाय जखमेने भरले होते, त्यांच्याच शेजारी रात्रीचा करड्या पोषाखातील शत्रूसैनिक धारातीर्थी पडला होता. प्रखरमित्राने त्यांना पाणी पाजले व घाईत म्हणाला - "मी तुमच्यासाठी मदत पाठवतो पण मी थांबू शकत नाही मला आत्ता बभ्रूबाहूबरोबर सुरभिवनात गेले पाहिजे...", त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच शतांगनाथांनी त्याला खुणेने जवळ बोलावले आणि म्हणाले - "बभ्रूबाहू चंद्रवाटीकेत अडकला असेल, त्याला वाचव, आणि सुरभिवनात...". प्रखरमित्राने त्यांचे बोलणे थांबविले आणि म्हणाला- "चिंता करू नका, सुरभिवनात काय होणार आहे याची मला चांगलीच कल्पना आली आहे, मी बभ्रूला सोडवायला जातो.". प्रखरमित्र चंद्रवाटीकेकडे भरधाव निघाला, वाटीकेच्या द्वाराशीच त्याला रक्ताने माखलेला पणा चेहर्‍यावर हलकेसे हसू असलेला बभ्रूबाहू दिसला, तो जोरातच म्हणाला - "वेळेवर आलास, मला तुझा घोडा दे, मला सुरभिवनात जायचे आहे, महाराजांचा जीव धोक्यात आहे".
"नाही बभ्रू, महाराजांचा जीव नाही, राजकन्येचे अपहरण होणार आहे, माझ्यापेक्षा तू खचितच लवकर पोहोचशील, हे घे..." घोड्यावरून उतरतच प्रखरमित्र म्हणाला - "बभ्रू, सविस्तर सांगायला वेळ नाही, सुरभिवनात पोहोचताच दोन गोष्टी लक्षात ठेव, एक: तुरंगरंगाला शोधून जिवंत किंवा मृत कसेही पकडावे. दोन: राजकन्येला शिवायलात जाण्यापासून थांबवावे, तू पोचेपर्यंत त्या शिवालयात पोचल्या असतील तर कुठल्याही परिस्थितीत त्यांना घोड्यावर बसू देवू नकोस तशी वेळ आल्यास त्यांच्या घोड्याची हत्या कर." 
दुसरे वाक्य पूर्ण होताक्षणीच, बभ्रूबाहू कोसभर दूर पोहोचला होता. 
बभ्रूबाहू वीजेच्या वेगाने सुरभिवनात पोहोचला, महाराज व शारबाहू मृगयेला निघालेच होते. बभ्रूबाहूने सेनापतींना पहिल्या दोन सूचना जवळजवळ आदेशाच्या सुरातच केल्या, व शिवालयाकडे भरधाव निघाले. शिवालयापाशी राजकन्या प्रदक्षिणा पूर्ण करून त्यांच्या घोड्यावर बसत होत्या तेवढ्यात बभ्रूबाहूने "धनू, अश्वारुढ होवू नकोस..." अशी आरोळी ठोकली आणि त्याच्या तीराने घोड्याच्या कंठाचा वेध घेतला. बभ्रूबाहूला काही समजायच्या आतच त्याच्या दिशेने एक तीर आला, तो बाजूला झाला पण त्याच्या खांद्यात तीर घुसलाच. तो कोसळायच्या आतच राजकन्या व केतकीने त्यांच्या समोरील झाडीत बाण सोड्ले, आणि तिथून तुरंगरंगाचे कण्हणे ऐकू येवू लागले.  
*

महाराज विशालग्रीव यांनी सोमवारी दुपारी मणिनारबरोबरचा पस्तीस वर्षे जुना शांतताकरार एकतर्फी रद्द केला आणि मणिनारलगच्या सर्व सीमा बंद केल्या.
*

मंगळवारी प्रात:समयीच महाराज, महाराणी, राजकन्या, व पंचप्रधानमंडळ असे राजसभेत उपस्थित होते. महाराजांचे भाषण संपल्यावर, महाराणींनी, प्रखरमित्र व बभ्रूबाहू यांचा विशेष सन्मान केला. महाराजांनी एकवार पुंगमणींकडून आलेल्या क्षमापत्रांवर नजर टाकली नंतर बभ्रूबाहूच्या खांद्याकडे आणि प्रखरमित्राच्या करंगळी नसलेल्या हाताकडे बघून ते म्हणाले - "प्रखरमित्र, बभ्रूबाहू, शतांगनाथ यांनी दाखविलेल्या बुद्धिमत्तेला आणि पराक्रमाला तोड नाही. शतांगनाथ वज्र आहेत, एखाद्या पंधरवड्यातच ते धडधाकट बरे होवून सेवेत रुजू होतील असा आम्हाला विश्वास आहे. प्रखरमित्र, आज या विशेषसभेत सर्व उपस्थितांच्या मनात अनेक शंकाकुशंका आहेत तेव्हा माझ्या भेटीपासूनचा, कालच्या घटनेपर्यंत सर्व वृत्तांत आपण सांगितला तर सर्व शंकाचे निरसन होईल आणि पुढील निर्णय घ्यायला राज्यसभेतील प्रत्येकाकडे पुरेशी माहिती असेल. मला अर्थातच तुमचे विश्लेषण माहित तथा मान्य आहे, आपल्या राजदूतांनी व हेरांनीही त्याला पुष्टि दिली आहेच." प्रखरमित्र सर्वांना अभिवादन करून उभा राहिला. मागून बभ्रूबाहूचा बारीकसा आवाज आला- "कल्पना, भरकटणे नको". प्रखरमित्र घसा खाकरून बोलू लागला - 
"थोडक्यातच सांगतो, कुणाला काही शंका असल्यास कृपया माझे निवेदन झाल्यावर विचारा. राजकन्येच्या अपहरणाच्या प्रयत्नाला अनेक गोष्टींची पार्श्वभूमी आहे, ती आधी पाहू मग अपहरणाचा प्रत्यत्न नक्की कसा झाला ते पाहू. अनेक गोष्टी एकत्र आल्या, माझे मित्र बभ्रूबाहू म्हणतात तशी चक्रतलाच्या राजकीय पटलावरील परिस्थिती अतिशय नाजूक आहे. मणिनारला ग्रीवनारकडून कायमच सन्मानजनक वागणूक मिळाली आहे. परंतु पस्तीस वर्षांपूर्वीचा पराभव त्यांच्या अजूनही जिव्हारी लागला आहे हे निश्चित. माझ्या अल्पमतीप्रमाणे त्यांची योजना अशी होती की, राजकन्या धनुग्रीवा यांचे स्वयंवराआधीच अपहरण करुन त्यांना राजपुत्र पिंगमणी यांच्याशी विवाह करणे भाग पाडायचे. तसेच याचा वापर शांतताकराराच्या नूतनीकरणावेळी ग्रीवनारवर दबाव टाकून जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी करायचा - माझ्यमते ग्रीवनार गिळंकृत करण्याच्या योजनेतील पहिली पायरी. दुसरीकडे बल्कराष्ट्राशी मैत्रीची बोलणी करून त्यांच्यातर्फे आपल्या इतर मित्रराष्ट्रांस शह द्यायचा. हा अंदाज बांधला होता स्वत: बभ्रूबाहू यांनी, राजदूतांनी व आपल्या हेरांनी त्यास पुष्टि दिली आहे."
प्रखरमित्राने, महाराजांकडे एकवार नजर टाकली तर त्यांचे ओठ हलकेसे हलत होते, प्रखरमित्राला आनंद झाला व त्यांनी प्रखरमित्राकडे बघून स्मितहास्य दिले. "आता अपहरणाच्या प्रयत्नाविषयी - कालच्या सोमवारच्या आधीच्या सोमवारी, महाराज नित्यक्रमाप्रमाणे सुरभिवनात गेले. राजकन्या धनुग्रीवा वनात त्यांच्या सखीसह घोड्यावरून रपेट मारायला गेल्या. काही अंतरावर त्यांनी घोड्याला सोडून त्या केतकीसमवेत वार्तालाप करत एका ठिकाणी थांबल्या, नित्याप्रमाणे साधारण अर्धा तास. अश्वपाल तुरंगरंग यांना कार्यक्रमाची चांगलीच माहिती होती. ते या अपहरणासाठी बराच काल तयारी करत होते. प्रथमश्व पूर्णपणे त्यांच्या ताब्यात असल्या कारणाने, त्यांना काय प्रशिक्षण द्यायचे ते सर्वस्वी त्यांच्यावर होते. तुरंगरंग यांनी अतिदुर्मिळ अशा हयगंधा वनस्पतिचा अर्क असलेल्या अनेक कुपी बल्कराष्ट्रातून मिळवल्या होत्या, अर्थात तस्करीने. अश्वांच्या प्रशिक्षणासाठी विविध गंधांचा वापर करतात हे आपणां सर्वांना माहितच आहे. हयगंधा वनस्पतीचा गुणधर्म असा की ती अश्वास पूर्ण संमोहित करते, हयगंधाच्या गंधामागे अश्व खेचला जातो, आपले स्वामी, परिस्थिती कशाचीही पर्वा न करता. परंतु तुरंगरंग यांच्यासारखे निष्णात प्रशिक्षक हयगंधाच्या योग्य वापर करून त्यांना एखादे काम व्यवस्थित पार पाडण्यास प्रशिक्षित करू शकतात. हयगंधाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या एका कणानेही श्वानाला प्रफुल्लित वाटते. अपहरणासाठी निश्चित झालेल्या सोमवारच्या आधीच्या सोमवारी तुरंगरंग यांनी अंतिम सराव करण्याचे योजले होते. अश्व राजकन्येच्या नजरेआड होताच त्यांनी दोन गोष्टी केल्या - एक: अपहरणाच्या दिवशी राजकन्येने भरधाव अश्वावरून उडी मारायचा प्रयत्न केला तरी त्या अश्वावरून पडू नयेत म्हणून क्षणार्धात त्याचे पधान बदलले. दोन: अश्वाला हयगंधेच्या मदतीने सीमेजवळ नेले इथपर्यंत त्यांचा सराव व्यवस्थित पार पडला. पण सराव संपल्यावर सीमेजवळाच त्यांना अश्वाला जुने पधान लावायला सुरु केले आणि तेव्हाच त्यांच्यावर कुणीतरी हल्ला केला त्या नादात त्यांच्या हातून हयगंधेची कुपी पडली. काल शतांगानाथांकडून मला कळाले की, सोमवारी सुरभिवनात राजपरिवार असताना त्यांचा प्रशिक्षित गरुड, पिंगलश्येन घिरट्या घालून सुरक्षेवर नजर ठेवत असे. सीमेजवळ राजकन्येच्या अश्वाची पधान बदलताना बघून त्याने तुरंगरंगांवर हल्ला केला. तुरंगरंगांनी एकाच वारात त्याची हत्या केली पण त्याआधी पिंगलश्येनने त्यांच्या पायाला नखाने मोठी जखम केली होती. तुरंगरंगांकडे पिगलश्येनचा देह नष्ट करायला साधारण अर्धा तास तरी होता. त्यांनी नक्की काय केले हे आपल्याला ज्ञात नाही. माझा एक सिद्धांत आहे पण अजून निश्चिती झाली नाही, सायंसमयीपर्यंत महादेवी अभिधर्वा तो बरोबर आहे का चूक सांगतील."
प्रखरमित्राने अभिधर्वांचे नाव घेताक्षणीच सर्वजाण सावरून बसले, सर्वांनी एकमेकाकडे कटाक्ष टाकून प्रतिक्रीयांचा अंदाज घेतला. "वेळेअभावी कुपी शोधायचा प्रयत्न न करता ते मंडपाजवळ परतले. माझा अंदाज आहे की ऐनेवेळेला त्यांच्या पायातून रक्त आल्याने त्यांनी रथ दोलायमान झाल्याचे कारण सांगून खाली वाकून ते पुसले किंवा तिथे काहीतरी बांधले असावे. तुरंगरंगानी प्रचंड वेदना सहन केल्यापण ते नगरीत कुणालाही काही कळू न देता पोचले. पिंगलश्येनच्या नियमित अंतराने सर्व ठीक असलेले सांगणार्‍या शीळा ऐकू न आल्याने शतांगनाथ अस्वस्थ होते, त्यांना तुरंगरंगांची कृती जरा विचित्र वाटली पण त्यांना तुरंगरंगांवर त्याक्षणी तरी काही संशय आला नव्हता. सोमवारपासून शतांगनाथ पिंगलश्येनचा अथक शोध घेत होते, त्यांना पिंगलश्येनचे एक पीस मिळाले तेही मणिनारमधून. शतांगनाथांना काहितरी कारस्थान योजिले जात आहे याची कल्पना आली होतीच. आम्ही शनिवारी त्यांच्याशी वार्तालाप केल्यावर तर त्यांची खात्रीच पटली. शनिवारी सर्वांशी बोलून बभ्रूबाहू आणि मला माहिती मिळाली होती पण त्याच्या विश्लेषणातून प्रकरणाचा अंदाज येत नव्हता. खरेतर आम्ही सर्वांशी शनिवारी वार्तालाप केला आणि कारस्थानाच्या यशासाठी आणि अपयशासाठी चक्रे वेगाने फिरू लागली. पुढील सोमवारची योजना धोक्यात येवू नये तुरंगरंग यांनी सुरभिवनात आल्यापासून तापाच्या कारणाने विश्रांती घेतली होती. पण आमच्याशी बोलल्यावर त्यांना अंदाज आला की त्यांची योजना धोक्यात येवू शकते म्हणून त्यांनी लागलीच सुरभिवनात जावून मणिनारला तसा संदेश पोहोचवला. आमच्याशी बोलल्यावर देवी केतकींनाही संशय आला होता त्यामुळे रविवारी त्याही सुरभिवनात गेल्या, पण वाटेत त्यांना तुरंगरंग दिसले आणि मग त्यांनी तुरंगरंगांचा पाठलाग केला. तुरंगरंगांना त्याची चाहूल लागली, त्यांनी हुशारीने आपला संदेश पोहोचवला आणि देवी केतकींना चकवून परतले. तुरंगरंगांच्या निरोपानंतर काही कालावधीतच मणिनारचे करडे वेषधारी अनेक योद्धे ग्रीवनारमधे आले. साधारण पंधरा योद्धे. हे योद्धे कोठून आले त्याचाही सिद्धांत बरोबर का चूक याचा महादेवी अभिधर्वा शोध घेत आहेत. त्यांचे काम एवढेच होते की बभ्रूबाहू व मला काही केल्या सोमवारचा महाराजांच्या सुरभिवनाचा कार्यक्रम बदलू द्यायचा नाही. रविवारी सुरभिमवनातून परतल्यावर मला तो मणी म्हणजे हयगंधेची कुपी आहे हे समजायला थोडासा अवधी गेला. खरेतर आधी लक्षात आली पाहिजे होते. शतांगनाथांना त्यांच्या मणिनारमधील हेरांकडून सोमवारी काहितरी महत्वाचे घडणार असल्याची वार्ता मिळाली व त्यांनी ती सेनापती व बभ्रूबाहूंना द्यायला पीतकीर व श्यामकीर या त्यांच्या पक्षीदूतां पाठविले. राजप्रसादातील रस्त्यांकडे मणिनारच्या योद्ध्यांचे लक्ष होते व त्यांनी पीतकीरला वाटेतच मारले. सुदैवाने श्यामकीरचा निरोप बभ्रूबाहू यांना मिळाला व ते चंद्रवाटीकेकडे निघाले. थोड्याच अवधीत श्यामकीरचाही जीव गेलाच. शतांगनाथ चंद्रवाटीकेत वाट पाहत उभे असतानाच त्यांच्यावर मणिनारच्या योद्ध्यांच्या पहिल्या तुकडीने हल्ला केला. त्यांनी घाईघाईतच बभ्रूबाहूंना वृक्षावर सांकेतिक निरोप ठेवला व योद्ध्यांना चकवून माझ्या घरी अगदी योग्य वेळी आले - म्हणून माझ्या प्राणांचे करंगळीवर निभावले. एव्हाना ढोबळ कारस्थान माझ्या व बभ्रूच्या लक्षात आले होते मग पुढे सोमवारी काय घडले ते आपण सर्वजण जाणताच."
प्रखरमित्राने क्षण्भर विश्रांती घेतली, महाराजांनी खूणेनेच एक तबक प्रखरमित्रापुढे केले, त्याने आनंदाने त्यातील चिघळविंथ तोंडात घातले. क्षणभराच्या शांततेनंतर पंचप्रधानातील एक प्रधान, देवी दग्धकेशांनी प्रश्न विचारला - "प्रखरमित्र खरच, आपल्या तिघांचे कर्तृत्त्व अद्भुत आहे, मला एका प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही - महाराजांना अस्वस्थ का वाटत होते.?". महाराज, बभ्रूबाहू आणि प्रखरमित्र हसू लागले. महाराज म्हणाले - "बभ्रूबाहूचे आणि आमचे याबाबत एकमत नाही आहे. प्रखरमित्र यांनी कालचा पूर्ण दिवस याचे उत्तर शोधाण्यात घालवला. परत येताना तुरंगरंग यांचा रथ नेहमी आमच्या रथापुढे असतो आणि माझ्या आसनावरून मला त्यांच्या रथाचे अश्व दिसत. त्यांच्या रथाला नेहमी सलग दोन श्वेत आणि मग दोन कृष्ण अश्व असे बांधले असत. तुरंगरंगांनी त्यादिवशी गडबडीत किंवा वेदनेमुळे म्हणा एक श्वेत आणि एक कृष्ण अश्व असे लावले होते त्यामुळे आमच्या नजरेत नेहमीपेक्षा वेगळे दृष्य आले, तेव्हाच लक्षात आले पाहिजे होते आम्हांस. त्याशिवाय नियमित अंतराने पिंगलश्येमची शीळ ऐकू येत नव्हती, त्यामुळे एकूणात आम्हाला आजा काहितरी वेगळे आहे असे वाटू लागले"
सर्वांचे समाधान झाल्यासारखे वाटलं, 
प्रधान नीलकंठ म्हणाले - " पण महाराज पंगमणि असे करू शकतात याच्यावर अजून विश्वास बसत नाही"
महाराज म्हणाले - "महाराज पंगमणि नाही तर राजपुत्र पिंगमणी म्हणा. मणिनारचे काय करायचे हे आपण संध्याकाळच्या सभेत ठरवू, आत्ता बभ्रूबाहू व प्रखरमित्र यांना विश्रांती देणे श्रेयस्कर".२ 
"क्षमा करा महाराज, त्याआधी एक अंतिम प्रश्न", प्रधान नीलकंठ म्हणाले - "राजकन्या धनुग्रीवा यांचे अपहरण करुन सुरभिवनाच्या सीमेपलिकडे त्यांना जरी नेले असते तरी पुढे मणिनारच्या नगरीपर्यंत पोचताना, सुरभिवन संपल्यावर वाटेत सीमेवर अनेक छेदमार्ग असे आहेत जिथून आपल्या सैन्याने हल्ला करून सहजच देवींना सोडवले असते."
महाराज म्हणाले - "प्रखरमित्रांनी याचा शोध घेतला आहे, सुरभिवनालगत मणिनारने प्रसव्यमार्ग१ बांधले आहेत." भयचकित अवस्थेतच पंचप्रधान उठून उभे राहिले.
*

प्रखरमित्राने राजकन्येस अभिवादने केले - "नमस्कार देवी धनुग्रीवा"
राजकन्याने हसून त्यांना बसावयास सांगितले - "प्रखरमित्र, खरेतर आपले धन्यवाद द्यायला मलाच आपली भेट घ्यायला यायचे होते, पण केतकीकडून तुमची भेटायची ईच्छा आहे हे समजले म्हणून आपणांसच बोलावले"
प्रखरमित्र हसला - "क्षमा असावी देवी, अपहरणाबाबत आपणास काही प्रश्न विचारले तर आपण क्रोधित तर नाही होणार ना"
धनुग्रीवा - "प्रश्नांवर अवलंबून आहे ते"
प्रखरमित्र - "देवी आपण रविवारी सुरभिवनात का गेला होता?"
धनुग्रीवा - "प्रसव्यमार्ग मणिनारमधे कुठे निघतात ते बघावयास. प्रखरमित्र, प्रखर म्हणाले तर चालेल ना? आपल्याला लेखापालपद सोडून आमच्यासाठी पूर्णवेळ विश्लेषक म्हणून कार्य करण्यास आवडेल का?"
प्रखरमित्र - "देवी तुमचे ऋद्धिगोत्र कळाल्याशिवाय मी हा निर्णय घेवू शकत नाही"
धनुग्रीवा - "आणि ते आम्ही कोणास कळू देवू शकत नाही"
प्रखरमित्र - "पण देवी तुम्हाला आधीच सर्व माहित होते तर आपण सोमवारपर्यंत हे सर्व का होवू दिले"
धनुग्रीवा - "मला माझे अपहरण होवू द्यायचे नव्हते असे का वाटते आपणा सर्वांना?"
प्रखरमित्र - "ओ, म्हणजे राजपुत्र पिंगमणींच्या योजनेत तुम्ही सामील होता?"
धनुग्रीवा - "पिंगमणी, हा हा हा, तो काय असल्या योजना रचणार. तो तेवढा शूरही नाही आणि बुद्धिमानही नाही. पिंगमणीशी विवाह करायला मला नक्कीच आवडेल. मणिनारवर ताबा मिळवायचा तोच एक मार्ग आहे आणि जोपर्यंत मणीपुष्याने मला पूर्णापणे 

ओळखले नाही तोपर्यंतच वेळ आहे माझ्याकडे"
प्रखरमित्र - "देवी..."
धनुग्रीवा - "तुम्ही मला धनुर्भूवी म्हणालात तरी चालेल. तुम्हाला ज्याक्षणी वाटेल त्याक्षणी तुम्ही कार्यमुक्त होवू शकता अशी अनुज्ञा दिली तर माझ्यासाठी विश्लेषक बनाल?"
प्रखरमित्र - "नाही देवी, धनुर्भूवी"
धनुग्रीवा - "हात दाखवा तुमचा"
प्रखरमित्र - "देवी...."
धनुग्रीवा - "बभ्रूला यातील काही कळू देवू नका आणि मणिनार व ग्रीवनार सोडून कोठेही जावू शकता तुम्ही"
प्रखरमित्र - "अर्थातच"
***

१. प्रसव्यमार्ग - "reverse proxy" हे या कल्पनेचे मूळ आहे.(https://www.nginx.com/resources/admin-guide/reverse-proxy/) एकाच सर्व्रर/पोर्टवरील ट्रॅफिक आपण आपल्या नियमांनुसार वेगवेगळ्या अपस्ट्रीम सर्वर/पोर्टवर पाठवू शकतो तसा प्रकार. 
प्रसव्यमार्ग आणि भुयारात साम्य असले तरी प्रसव्य मार्ग हे मायावी असतात. प्रसव्यमार्ग ठरवताना प्रथम बद्धबिंदू ठरविला जातो. आणि नंतर एक किंवा अधिक विसर्गबिंदू. मायेचे अधिकारी बद्धबिंदूपाशी मायेने आणि उपलब्ध भौतिक साधनांने (उदाहरणार्थ, त्या बिंदूपाशील चौकोनातील हवा, माती) बंधनमिती तयार करतात. साध्य डोळ्यांना ही मिती दिसत नाही. बंधनमिती कायम सुरु नसते, ती activate कधी करायची ते मिती बांधतानाच्या नियमानुसार ठरते किंवा मिती बांधणारी अधिकारी तिला पाहिजे तेव्हा मिती activate करू शकते. बंधनमिती एकदा activate केली कि तिच्या हद्दीत येणारे सारे प्राणी, पक्षी, वस्तू तिच्या अवकाशात अडकतात. बघणार्‍यास जणू वाटावे की त्या बिंदूपाशी जावून लुप्त झाल्या. प्रत्यक्षात त्या वस्तू त्याच ठिकाणी मात्र वेगळ्या space-time मधे असतात. बंधनमितीच्या क्षमतेनुसार त्यात पाच ते दहा तास तरी वस्तूंना अडकवून ठेवता येवू शकते. बंधनमितीप्रमाणेच प्रत्येक विसर्गबिंदूपाशी विसर्गमिती बांधली जाते, बंधनमितीमधे अडकावलेल्या वस्तू निर्धारीत नियमांनुसार किंवा परत अधिकार्‍याच्या मर्जीनुसार कुठल्याही एका विसर्गमितीतून सोडवता येतात. मायेची उच्चकोटीची अधिकारी व्यक्ती, विसर्गमितीतून बंधनमितीतही उलटे येवू शकते.
मणिनारने सुरभिवनातून त्यांच्या सीमेनजीक लगेच एक बंधनमिती बांधली होती, तिला मणिनारच्या राजधानीत अनेक विसर्गमिती होत्या. राजकन्येला धनुग्रीवाला, राजकन्या मणीपुष्या यांच्या महालाजवळील वाटिकेतील विसर्गमितीतून बाहेर आणायाचे ठरले होते.
पिंगलश्येन प्रसव्यमार्गतूनच लुप्त झाला तर मणिनारचे कडवे सैनिक प्रसव्यमार्गतूनच ग्रीवनारमधे शिरले.

२. संध्याकाळाच्या सभेत "पश्चातदर्शी बोध आकलन" करण्यात आले. प्रखरमित्राने त्यासाठी सादर केलेल्या अवहालातील महत्वाचे मसुदे खालीलप्रमाणे (जे आता प्रखरनिती मधे संकलित आहेत)
अ. राजाने कुठलाही कार्यक्रम नियमित ठेवता कामा नये
ब. राजाच्या नित्य सहवासातील लोक, दुसर्‍या राजाच्या नित्य सहवासात येता कामा नयेत. (तुरंगरंग का फितले?)
क. राजाने इतर मित्र वा शत्री राजांशी अनौपचारीक भेट घेवू नये
ड. अधिकृतरित्या कोणत्याही राज्याने त्या राज्याकडून माया प्रथम वापरण्यात येणार नाही असे धोरण ठरवू नये.
इ. राजाच्या नित्यकार्यांसाठी लागणार्‍या सेवकांची कामे वरचेवर बदलण्यात यावीत.