Sunday, December 12, 2010

ठकठक

जब्बरी महत्त्वाकांक्षा असलेल्यांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना बाकी सर्वांनीच महत्त्वाकांक्षी असावे असे वाटते. सर्वांनीच कायम उराशी मोठ्ठी स्वप्ने वगैरे बाळगावीत असे या लोकांना वाटते. एखाद्याने पूर्वी अशी उराशी स्वप्ने बाळगली असतील परंतु नंतर अपरिहार्य कारणामुळे त्या स्वप्नांच्या वळकट्या बांधून माळ्यावर टाकून दिल्या असतील हे महत्त्वाकांक्षी असलेल्या लोकांच्या गावीही नसते किंवा एखाद्याला महत्वाकांक्षा बाळगण्यात इंटरेस्टच नसेल हेही त्यांना पटत नाही.
*मधेच आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे - 
वरील दोन वाक्यात वाचकांना निराशावाद, सामान्याकरण(जनरलायझेशन) दिसले असेल. 
निराशावाद - पर्याय नाही. शंभरातली नव्वद लोकं आशा दाखवत असतात, एखाद्याने तरी "प्रयत्न करा यश मिळेलच असे नाही", "असे आहे भाऊ, जगायचे आहे तर रेटा गाडी" असे सांगणे गरजेचे आहे. 
Sometimes there is no light at the end of the tunnel - it's only tunnel paint changing from black to white at one point. इंपॉसिबल शब्द नसलेल्या डिक्शनऱ्या विकत घेणाऱ्या लोकांना कुणीतरी - बॉस दोन मिनीटे थांबून रेनचेक घ्या असे सांगणे हा निराशावाद नाही समंजसपणा आहे.
मोठी स्व्पने/ब्विप्ने - कलामांनंतर याला भलताच भाव आला.
असो.
आम्हाला काय त्रास नाहीये लोकांनी महत्त्वाकांक्षी असण्याचा किंवा स्प्वप्ने बाळगण्याचा वगैरे, पण आमच्यावर का बळजबरी? गेल्या काही दिवसात अशा महास्वप्नील लोकांनी जजमेंटल प्रश्न विचारल्याने मी व्यथित झालो आहे. 
स्वत:ची सॉफ्ट्वेअर कंपनी सुरु नाही का करायची? धंदा केला पाहिजे, माणसाने कायम मोठ्ठे लक्ष्य ठेवले पाहीजे असे प्रश्न/उपदेश करणारे सर्वचजण महाउद्योगी असल्याने मी जनरलायझेशन केले.
छोटी स्वप्न बघणे गुन्हा वगैरे वाक्य आपल्या तोंडावर मारल्यावर राग नाही का यायचा? त्यात वेळा सत्कारणी लावला पाहिजे असे सांगणारे पण असतात.

मी खालील उदाहरणे दिल्याने माझा महत्त्वाकांक्षी लोकांकडून पाणउतारा झाला होता -
१. 
कायम चारचाकी गाड्यांचे ट्यांव, ट्यांव असे चोरीवाले अलार्म चुकुन वाजत असतात. - मला एखाद्या गाडीची चोरी होत असताना असला अलार्म वाजलेला लाईव्ह ऐकायचा आणि बघायचा आहे - स्वप्न आहे माझे ते.
त्यासाठी काय करता आपण - कुठल्या भागात चारचाकीचोरीचे प्रमाण जास्त आहे हे इंटरनेटवर पाहून आठवड्यातून एकदा त्या भागात मी चक्कर टाकतो.(पहाटे दोनतीनला)
२.
घर ते मुख्य रस्ता हा अर्धा किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे खड्ड्याखड्ड्यांचा. तुफान पाउस पडल्यावर सगळा चिखल-चिखल-व-चिखलच. लोकं रस्ता बदलतात. मला याच चिखलातून मोटरसायकलीवरुन खाली एकदाही पाय न टेकता मुख्य रस्त्याला लागयचे आहे.
या पावसाळ्यात नाही जमले.
३.
महत्त्वाकांक्षा - पेनस्पिनींगची ऍड्व्हान्स लेव्हल पार करायची आहे. 
इथे तर मी, मला महद्प्रयत्नांनंतर जमणाऱ्या बेसिक पेन स्पिनींगचे प्रात्यक्षिकही दाखविले होते.

सगळ्यांनीच आयुष्यात भारी काहीतरी केले तर नॉर्मल कोण जगणार? 

मुद्दा जनरलायझेशनचा. जनरलायझेशन करणे हे वाईट आहे असा एक प्रवाह आहे. मुळात "जनरलायझेशन करणे हे वाईट आहे" हेच एक जनरलायझेशन आहे. हे मला भयानक विनोदी वाटते. जे काही विनोदी वाटते ते मला पटते.

एवढेच लिहायचे होते मला. पण एवढ्या लांब पासवर्ड आठवून आठवून आलोच आहे तर सांगून टाकतो, ऐका - 
सामन्य माणूस ही संकल्पना ओव्हररेटेड आहे. प्रत्येक जण आपआपल्या कुवतीनुसार चुकीचे वागतो. सामान्य माणासाच्या चूका पब्लिक होत नाहीत एवढेच.

***