Monday, February 23, 2009

डिकॅफ आणि मी...स्कोप आहे का?

ह्याला बाणेदारपणा म्हणावा का फुकटचा शहाणापणा दाखवणे का आणि काय ते कळत नाही. मी जेव्हा जेव्हा म्हणून जरा बऱ्यापैकी ३/५ स्टार हॉटेलमधे उतरतो तेव्हा माझे हटकून तिथे भांडण होते [तु मध्यमवर्गीय असल्याने तुला श्रीमंत लोकांचा सुप्त तिरस्कार आहे असे माझा श्रीमंत मित्र म्हणतो - असू शकेल, काय सांगता येत नाही]
छपरी रेटमधे छपरी हॉटेल मिळाले असेल आणि तिथे गरम पाणी आले नाही तर मी चकार शब्दसुध्दा नाही काढणार. पण मॅरिऑटमधे नळ सुरु करुन ३० सेकंदाच्या आत गरम पाणी आले नाही तर मला जमदग्नीचा अवतार धारण करावासा वाटतो. असो. यावेळेला मात्र मी भांडणे गरजेचे होते असे अजूनही वाटते आहे मला. अजूनही तसे वाटणे महत्वाचे आहे कारण बरेचदा भांडण झाल्यावर अर्ध्याअधिक तासाने मला माझी चूक कळून येते आणि मंग लय वंगाळ वाटतुया.

झाले असे की, तिसरा/चौथा दिवस होता हॉटेलमधला आणि मी संध्याकाळी आलो तेव्हा हॉटेलवाले खोली मस्त स्वच्छ करुन गेले होते पण त्यांनी कॉफीमशिनजवळ फक्त डिकॅफचे पाकिट ठेवले होते - मला डिकॅफिनेटेड एकपण पेय आवडत नाही. काय अर्थ असतो का डिकॅफिनेटेड चहा/कॉफीमधे? शिवाय अमेरिकेत डिकॅफिनेटेड कॉफी पिणे म्हणजे ऍमस्टरडॅमला जावून पाईपमधून ‘तंबाखु’ ओढण्यासारखे आहे. [खरेतर हे असे एकेरी अवतरण चिन्हे टाकणाऱ्यांचा मला प्रचंड राग येतो, का आम्हा वाचणाऱ्यांना ह्या चिन्हांशिवाय कळत नाही का त्या शब्दावरचा स्ट्रेस आणि त्याचे महत्व, सगळे काय तुम्हालाच कळते का? पण लिहिण्याच्या ओघात माणूस टाकतो असली चिन्हे आणि मीपण असे एकदा केले होते याचा पुरावा म्हणून ठेवतो तसेच हे वाक्य]

मूळ राहिलेच बाजुला -
तर मी लॉबीमधे खाली गेलो तेव्हा कॉउंटरवरच्या मनुष्याला माझ्या खोलीमधे कॉफीचे पाकिट पाठवायला सांगितले. असे नाही की नवीन मागणी आहे, रोज कॅफिनेटेडे/डिकॅफिनेटेडे दोन्हीपण प्रकारची पाकिटे ठेवायचे ते. शांतपणे हो म्हणेल आणि पाठवेल की नाही तर पठ्ठ्या म्हणाला, "आज एक दिवस डिकॅफिनेटेडे प्या !" मला एकदम सुपरफाश्ट राग आला आणि येतानाच प्रचंड प्रमाणात आला, एवढा की माझ्या कपाळावर उठून दिसणारी शीर असती तर ती टण्‌टण्‌ उडाली असती त्या वेळेला. त्याला म्हणालो की, पाठवणार का नाही ते सांगा फक्त, मी काय प्यावे, काय नाही हे सांगु नका. त्यावर तो मनुष्य म्हणाला, मी असेच म्हणालो एवढे चिडण्यासारखे काय आहे
...etc etc लांबड लागली, शेवट त्या मनुष्याने आटपते घेतले नाहीतर मी आपला रामबाण उपाय काढणारच होतो, मॅनेजरला बोलवा, त्याच्याशीच बोलीन मी आता :)

ईंग्लिशमधे भांडणे खूप अवघड असते राव, थेट पिक्चरमधल्यासारखी वाक्ये येतात तोंडात, त्यात फक वगैरेचा जोरदार वापर असल्याने दैनंदिन भांडणात निरुपयोगी आहेत ती. आपल्याला ईंग्लिशमधे भांडण करणे खूप जड जाते हे माहित असूनही केवळ कॉफीच्या विशुध्द प्रेमाखातर निग्रहाने भांडलो मी. बाकी कुणाला नाही तरी at least कॉफीप्रेमी अमेरिकन पब्लिकला तरी माझा अभिमान वाटायला पाहिजे.

Monday, February 16, 2009

निरर्थक


जनता इकडे तिकडे भटकायला निघून गेलीय, ऑन कॉल असल्यामुळे मी घरात अडकून पडलोय आणि परमप्रिय टिव्हि अचानक सगळी चॅनेल्स निळ्यापिवळ्या रंगात दाखवायला लागल्याने काय करावे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे काहीपण खरडणार आहे मनात यील ते, वाट्टेल ते. बाकी सर्व कामे संपली असतील, अगदीच महाबोर झाला असलात, पर्मनंट रिकामटेकडे किंवा मिळेल ते वाचणारे वाचक असाल तरच वाचा. आमचे आजोबा असेच मिळेल ते काहीपण वाचायचे, पुड्या बांधलेले कागद, मासिकांचे पहिले डावे पान जिथे रजिस्टर्ड ऑफिसचा पत्ता लिहिलो असतो ते पण वाचायचे म्हणे. मी अगदीच सगळे रद्दड काहीपण वाचू शकत नाही पण मिळेल तो पिक्चर पूर्ण बघण्यात माझा कोणी हात धरणार नाही.
आजोबांपेक्षा वडिलांकडून आला असावा तो गुण - झी सिनेमा एक काळ अतीमंद(इतरांच्या मते) सिनेमे दाखवायचा. सध्या काय परिस्थिती आही माहित नाही मी बघायचो तेव्हा दक्षिणेतले पडेल चित्रपट डब करुन दाखवायचे. मला ते सगळे पिक्चर आवडायचे. अशाच एका पिकचरमधे नागार्जुन शिवभक्त होता आणि त्याच्यावर प्रचंड जबाबदाऱ्या होत्या - महाशिवरात्रीला एक सर्वशक्तिमान असे शिवलिंग दुष्टांच्या हातात पडण्यापासून वाचावायचे, जंगलातल्या मुलीवर प्रेम करायचे, जमल्यास अनाथ मुलांना वाचवायचे अशा एक ना अनेक पण सगळे करतो तो लेकाचा हसतहसत. इंडियाना जोन्स च्या जॉनरमधला तो चित्रपट सगळ्या जोन्सपिक्चरपेक्षा
मस्त होता.

बी ग्रेड पिक्चरची आवड जन्मजात असावी लागते - मला टॅरँटिनो एवढा त्यामुळेच आवडत असावा. पण बी ग्रेड असेल तर त्या पिक्चरने जाहीरपणे प्रत्येक फ्रेममधे तसे न घाबरता जाहीर केले पाहिजे. पूर्ण पिक्चरभर तसे ऍटिट्यूड असावे - This is a 'B Grade' movie but who cares - we love it anyways. तरच तो खरा बी ग्रेड पिक्चर. थर्ड क्लास पिकचर बनवून तो क्लासिक आहे असे दर्शविण्याचा प्रयत्न त्या पिक्चरमधे जाणवला तर डोक्यात जातो तो पिक्चर. कुठल्यातरी पुस्तकात वाचलेले एक डेडली वाक्य होते, "प्रच्छन्नपणे काटे बाळगणाऱ्या गुलाबापेक्षा उघड काटे मिरवणारा निवडुंग बरा". तशातला प्रकार. जोहर/चोप्रांचे असतात असे पिक्चर. च्यायला, ज्या काळात माझे परदेशात राहून मनापासून पैसे वाचवण्याचे प्रयत्न चालू होते तेव्हा ४० डॉलर घालून सलाम नमस्ते पाहिला होता - भेंडी कॅनेडीयन डॉलर त्याकाळी ऑल टाईम हाय होता आणि हा पिकचर ! जांवदेल, बी ग्रेड पिक्चर कॉमिक्ससारखे असतात त्यांचे स्वत:चे वेगळे विश्व असते - परत तुलना म्हणजे जोहर टाईप लोकांच्या पिक्चर्सचे पण असते स्वत:चे विश्व, पण ते पिक्चरभर सांगत असतात " हे खरेच असे असते बरं का".

जावूदे...न संपणारा विषय आहे हा, आमच्या अपार्टंमेंटमधे रोज जेवताना असे न संपणारे वाद घालत बसतो आम्ही - नाही तिथे डोके चालवत बसायचे. अशातलाच एक भाग म्हणजे स्क्रॅबलमधले शब्द... हा खेळ कुणीपण न भांडता खेळून दाखवावा, साक्षात बुध्दाचा अवतार मानीन मी त्या व्यक्तीला. आम्ही डिक्शनरी, विकी सर्व उघडून बसतो, पण प्रत्येक डावात मिनीमम दोन-तीनदा तरी हमरीतुमरीवर येतो [हमरीतुमरी शब्द हिंदीतून आला असावा - हमारीतुम्हारी ही ही हा हा मी लावलेला अजुन एक शोध].
खेळायच्या सुरुवातीला कितीही नवीन नियम ठरवले तरी दर वेळेला अशी नवीन काहीतरी परिस्थिती येते की भांडाभांडी सुरु. एकदा‘बायबल’ शब्द ज्याने लावला
तोच हिरो ‘गीता’ शब्द लावायला विरोध करायला लागला तर दोन-अडीच तास वाद झडला पार भाजप, कॉंग्रेस, पु. ना. ओकांपर्यंत विषय आला तेव्हा आवरते घेतले- शेवट गीतावाला गीता शब्द न लावतासुध्दा जिंकत होता त्यामुळे प्रश्न आला नाही. त्याच्यानंतर आम्ही नियम केला की कुठलाही धर्मग्रंथ चालणार नाही.
नावे चालणार नाहीत असा नियम आधीच झाल्याने पुढचा डाव शांततेत पार पडेल असे वाटले होते. पण पुढच्या डावात अशी वेळ आली की माझ्याकडे ‘ओ’ आणि ‘आर’ अक्षरे राहीली होती. ‘pray’ आणि ‘nun’ शब्द मस्त जागांवर होते. पण अशा पवित्र शब्दांच्या मधे पॉर्न शब्द बनवणे महाअनैतिक आहे असे बाकीच्यांचे म्हणणे पडले, पहिल्यांदा मला वाटले गंमत चालू आहे पण पार मारामारीची वेळ आली. मला जिंकू तर दिले नाहीच वर केवळ जिंकण्यासाठी असा शब्द बनवण्याचा विचार केल्यामुळे मी चर्चमधे जावून क्न्फेशन घेवून यावे असे सुचवले. नैतिकता/अनैतिकता खेळात आणायची नाही म्हणल्यावर अर्ध्या तासाने हरभजन/सायमंड्‌सवर गाडी आली होती. शेवट शब्दांकडे केवळ शब्द म्हणून बघायचे असे ठरले.
पुढच्या वेळेला सर्व सुरळीत होईल अशी आशा होती, पण नाय नो नेव्हर...शांग्रीला हे कल्पित जागेचे नाव असल्याने चालणार नाही असे म्हणल्यावर दुसरा म्हणाला मग मागच्या वेळेला झिऑन कसे चालले. तर त्याच्यावर कडी म्हणजे तिसऱ्याने केपॅक्स शब्द लावला. एकुण मजा येते, ह्या वेळेला कशावरुन भांडण होईल याचीच आता उत्सुकता असते.
खरेतर आपल्याला स्पेलिंग जुळवायचा खेळ आवडतो या विचारानेच प्रचंड लाज वाटते. बास झाले राव, बोर झाले टायपिंग
*

Tuesday, February 10, 2009

प्लांट झिंदाबाद !

रॉबर्ट प्लांट आणि ऍलिसन क्रॉसला ग्रॅमी मिळाल्याने मी जाम खूश आहे. क्रॉसचा मी काही विशेष फॅन नाही पण ती प्लांटबरोबर गायली आणि आपली गाववाली आहे त्यामुळे ती बाय डिफॉल्ट सही आहे. प्लांट हा माणूस अजुनपण कसला गातो...म्हातारा होतोय तसा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. तो किंवा मी मरायच्या आधी एकदा मला त्याच्या आवाजात ‘ती गेली तेव्हा’ ऐकायची इच्छा आहे.

असो. ‘रेजिंग सॅंड’अल्बमच सही आहे. मला काय झेपत नाही गाण्यावर बिण्यावर लिहायला जास्त पण ७० सालचे टँजरीन/डाउन बाय द सी साईड ऐका आणि आज रेजिंग सॅंड मधले पॉली कम होम, प्लीज रीड द लेटर ऐका...अजूनपण हवे ते करु शकतो तो, गोड तर गोड गावू शकतो, मस्त जोरदार चीत्कार फेकायचा म्हणला तर तेपण करु शकतो - २००७ च्या लेड झेप रीयुनियनमधे कश्मीर कसले म्हणले त्याने.

जास्त शहाणपणाची अशी विधाने करणाऱ्यांचा मला लय राग येतो पण आज अशा भावना उचंबळून आल्या आहेत, cann't help - "लेड झेपलीन प्लांटशिवाय असली सुंदर गाणी देवू शकला नसता". जावूदे काय बडबड करायची जास्त. एकदा बहुमूल्य असा वेळ काढून मला पेज, प्लांट, जेपीजे आणि बोन्हॅम, प्रत्येकावर एक एक आरती लिहायची आहे.

मित्र म्हणतो आहे, तुमच्या सारेगमपची एवढी चर्चा चालू आहे आणि तू कायतरी फालतू लिहीत बसला आहेस - खरा मराठी नाहीस etc etc. आपल्याल काय घेणे आहे.

आज आम्ही प्रतिज्ञा करत आहोत की, हा आठवडा आम्ही ‘प्लांट वीक’ म्हणून साजरा करु आणि ऑफिसमधल्या प्लांटने कितीही गाढवपणा केला तरी आख्खा आठवडा त्याच्याशी भांडण करणार नाही.
*