Monday, January 18, 2010

तात्कालिक स्वप्न

माणसाच्या स्वप्नात पँडोरा ग्रहावरच्या विलोभनीय सृष्टीपासून ते दोरीवर वाळत घातलेल्या खांद्यापाशी फाटलेल्या बनियनपर्यंत, काहीपण येवू शकते. कशाचा कशाला धरबंदच नाही.
मूळ मुद्दा वेगळा आहे पण,परंतु आपण जरा नमन करु -
आमच्या स्वप्नात एकदा खवल्या मांजर आल्याने मी त्याचे चित्र काढले होते - हे हटकून सांगावेच लागते दरवेळी.
प्राणीवर्गातून मधे एकदा एक वाघ आला होता स्वप्नात. मी अवतार सिनेमा पाहीला आणि त्या रात्री मला स्वप्न पडले की - मी ताथवडे उद्यानात झोका घेत आहे आणि मागे रांगेत आपल्या पाळीची वाट बघत एक वाघ उभा आहे. थोडा वेळ वाट बघून तो मला म्हणाला, "बराच वेळ झाला की मला दे ना आता", मी त्याला "ए चल हल्ल" असे झिडकारले (हड्‌ नाही हो, आम्हाला हड्‌ शब्द आवडत नाही, कारणे वैयक्तिक आहेत) तेव्हा वाघ रडावयास लागला. त्यामुळे मला दया आली आणि मी त्याला "रडू नकोस, बस. मी तुला झोका देतो" असे म्हणालो, मग तो छान हसला आणि ‘फिटे अंधाराचे जाळे’ गाणं म्हणंत म्हणंत झोका घेवू लागला.
तर हे आईशप्पथ खरं स्वप्न आहे. दुसऱ्या दिवशी उठून मी सर्वांना स्वप्न सांगितले वर हेही सांगितले की निसर्ग# व मानवाचे आज संबंध कसे आहेत, ते कसे असावयास पाहिजेत ह्याचे एक रुपक आहे माझे स्वप्न म्हणजे. आपण सामाजिकदृष्ट्या लय सेन्सिटीव्ह सोल आहोत ना त्यामुळे असली स्वप्न पडतात.
नमन जास्त काही तेलकट झालं नाही. सिनेमात मूळ गोष्टीतला सहभाग दाखविण्याआधी हिरो/व्हिलनचे कॅरॅक्टर बिल्डप करतात तसे आम्हाला आमच्या स्वप्नाचे कॅरॅक्टर बिल्ड करायचे होते.
*
काल माझ्या स्वप्नात शिक्षण आले होते. मी तसा अभ्यासात जरा कच्चाच असल्याने व पूर्वी शिक्षणाला कधी असे समोरासमोर पाहिले नसल्याने थोडावेळ मला झेपलं नाही की हे शिक्षणमहाराज आहेत.
माहीत असावं म्हणून सांगून ठेवतो - शिक्षण जे आहे, ते राष्ट्रवादीच्या जिल्हा लेव्हलच्या कार्यकर्त्यासारखं दिसतं; स्वच्छ पांढरा सदरा, खिशाला न गळणारं शाईपेन आणि हातात दोन फाईली. पँट. बुशपँट हा काय प्रकार आहे ते मला आजवर नाही कळाले. अनवाणी - पायात चपला नव्हत्या. खोटं कशाला बोला, आपल्याला तर स्वप्नातपण प्रश्न पडला की वाण्याने चपला नाही घातल्या तर त्याला अनवाणी तरी कसे म्हणणार? असो. शिक्षण सुशिक्षित असल्याने, त्याने पायातल्या वहाणा काढून कुणाला हाणले असण्याची शक्यता कमी आहे, देवळातंनं चोरीला गेल्या असतील बिचाऱ्याच्या. तर या अवतारातले शिक्षण आले आणि थेट रडू लागले. ओक्साबोक्शी नाही अगदी, मुसमुसणे का काय ते.
या पॉईंटला शिक्षण, त्याचे अपकमिंग मनोगत हे सर्व वाचून कोणाला लहानपणीचे निबंध आठवले, हा प्रकार बाळबोध वाटला, कोणी बोर झाले तर दोष माझा नाही, परिस्थितीचा आहे. (किंवा बोर झालेल्याचा असेल, आमचा नाही. बास्स.)
बरं. मी विचारले की, "का बाबा का रडत आहेस उगाच भरल्या घरात?"
ते म्हणाले की, "येड्या रडू नायतर काय करु? जनता लय पाठीमागे लागली आहे माझ्या. अर्थ नाही म्हणतात, मला स्टिरीओटाईप करतात, लोकं आईवरनं शिव्या देतायत की राव. तूपण शिव्या घालतोस मला"
"शिव्या द्यायलाच पाहिजेत लेका, त्रासच तसा देतोस तू. गृहपाठ काय, अभ्यास काय, दप्तराची ओझी काय, जनता ओरडेल नाहीतर काय?" असे वाक्य संपवायच्या आतच त्याने आपली गाडी रेटली,
"पण मी तुझ्याकडे हे विचारायला आलो की, साल्या तू तर अभ्यासाच्या नावाखाली काय केलेस ते माहिते मला, तसं बघायला गेलास तर खेळातपण काही तेंडुलकर नव्हतास, पालकांनी काही निर्णय लादले वगैरे नाहीत. लादायचेच असते तर पहिले तुला शाळेतून काढून पंतप्रधान रोजगारहमी योजनेला लावले असते. एकूण काय सामान्य मुलगा आहेस एक; तरीपण आज पोटापुरता खातोस, संध्याकाळी खेळतोस, नेटवर च्यायला नट्यांचे फोटो-बिटो बघतोस, मजा करतोस. माझा एकदम कमी सहवास लाभला तुला तरी मग तू का मला शिव्या देतोस? बाकी लोक देवू देत"
"मी सामान्य ईंजिनीयर राहीलो ना भाऊ" - असे मी स्पष्ट सांगितले एकदम, न लाजता, बाणेदार, उभी आठी घालून.
"मंग, तेच तर म्हणतोय ना? सगळ्यांनाच जेम्स बाँड व्हायचे आहे, एजन्सी कोट्यात सात नंबरचा बिल्ला एकच आहे की पण, माझा काय दोष?"

पुढे आमचे लय संभाषण झाले खाजगीत. आठवत नाही सगळे, मला असे तोंडावर कुणी सामान्य म्हणाले तर माझा मूडॉफच जातो.
एक होतं पोष्ट, संपली आमची गोष्ट.
**
इन जनरल पब्लिक आमच्या स्वप्नात येवून रडते व मग माझे मत बदलते असे एक लक्षात आले आहे माझ्या. समोरचा माणूस रडल्यास पर्स्युएबल आहे मी - Crysuable थोडक्यात.

***
#टाईप करताना ‘निसर्ग’ शब्दाचे चुकून ‘निसर्गा’ झाले - मुलीचे नाव म्हणून चांगले आहे की हो.
***

Friday, January 1, 2010

वर्ष खल्लास

दर एखाद्या अशा शुभेच्छेबल घटनेला नवीन पोस्ट टाकून आम्ही आमच्या ब्लॉगचे नळस्टॉपवरील एका राजकीय अभिनंदनफलकात रुपांतर केले आहे हे येथे मान्य करुन; आम्ही आज आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देवू इच्छितो.

माझ्या प्रिय चिंटू आणि मिनींनो,
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना चांगलं जावो. काल दारु प्याली असल्यास परत एकदा वाचा - "माझ्या प्रिय चिंटू आणि मिनींनो हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना चांगलं जावो". परत आम्हाला कुठे हॅप्पी नू ईअर केलेस तू असे म्हणतात हो लोक. आपण टून्न होता असे सांगितले तर स्वत:च्या पैशाने पितो-बितो लेक्चर ऐकायला लागायचे. असो. शुभेच्छांचा उत्तरार्ध - "तुमची प्रगती, भरभराट होवो, सुखसमृद्धी..."
काम संपलं.

३१ डिसेंबर साजरा करणे हे फॅड मी ईयत्ता पाचवीत असताना आमच्यापर्यंत आले. मध्यमवर्गीय जनतेला अचानक तीन चार कुटुंबानी एकत्र येउन भोंडलाटाईप काहीतरी करावे असे वाटू लागले. त्या नादात आमच्यासारख्या निरागस मुलांच्या कोमल मनावर खराखरा चरे पडले. सकाळी क्लासमधे ज्या मुलीला चिडवले तिच्या घरीच संध्याकाळी ३१ डिसेंबरचे पाहुणे म्हणून जावे लागणे, सायकल एका बाजूला कलती करुन सकाळी जिला स्टाईलमधे ओव्हरटेक केले तिच्याच दारात संध्याकाळी मोठ्ठे पितळी पातेले घेउन उभे राहायला लागणे असले प्रकार झाले हो. इमेज बिघडते ना, पालक लोकांना याचे गांभीर्य वाटत नाही. एकूण समाजात असा नियम केला पाहिजे की लहान मुलमुलींची मैत्री असेल तरच एकत्र सहकुटुंब भेटावे. मुली लय डांबरट असतात, असल्या एकत्र प्रसंगांचा गैरेफायदा घेवून मुलांना त्रास देतात. तुम्ही दोघे एकाच क्लासला ना म्हणल्यावर मुलीने उत्तर काय द्यावे? "होSSS, पण हा क्वचितच दिसतो मला". म्हणजे आईवडिलांना शंका येते की आपला मुलगा नियमित क्लासला जातो का परस्पर कुठे जावून आकडा लावतो, शिवाय आपले प्रगतिपुस्तक आहेच शक को यकीन मे तबदिल करने के लिये.
स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी. एकतीस डिसेंबर काय आपला सण आहे का? मी भात खावून झोपेन आपला असे दणदणीत सांगून मी सुटका करुन घेवू लागलो. मन उडाले माझे एकूण एकतीस डिसेंबरवरुन, नंतर कॉलेजमधे गेल्यावर मी उपचारापुरते नॉर्मल एकतीस डिसेंबरींग करु लागलो. टिव्हीवाले एवढे मन लावून काय काय कार्यक्रम बनवतात त्यामुळे सर्वात उत्तम म्हणजे टिव्ही बघणे पण लोक बघू देत नाहीत, कुठेतरी जाउचयात असा हट्ट करतात त्यामुळे जावे लागते.

संकल्प करणे मात्र मला मनापासून आवडते. काय संकल्प करावा याचा विचार मी फार उशीरा सुरु करतो त्यामुळे सहा-सात जानेवारी उगवतो माझ्या संकल्प्सना. आपण तसे मेहनतीने पाळलेपण आहेत हो काही संकल्प. बरेचदा माझा संकल्प असे की यावेळी आधीपासूनच अभ्यास करुन वार्षिक परिक्षेत चांगले गुण मिळवायचे. आधीपासून अभ्यास केल्याने नंतर सगळे विसरते असे लक्षात आल्याने मी तो संकल्प कटाप केला. नंतर एकदा संकल्प केला होता की नवीन वर्षापासून उतार आला की लुना बंद करायची, पेट्रोलचे पैसे वाचवायला. हा संकल्प मात्र चांगला चालला, लुनेला तो इतका आवडला की कधी कधी ती चढावरसुद्धा स्वत:हूनच बंद होउ लागली. यावर्षी दोन जॉबस्विच तरी मारायचेच असेपण ठरवले होते एकदा, ते नाही जमले. मागच्या वर्षीचा माझा संकल्प होता की रोज एक सिनेमा बघावा - कसोशीने पाळतो आहे तो मी अजूनही.
संकल्प बोर झाले. लोकं संकल्प नाव ठेवतात मुलाचे. थेंब पण नाव ठेवतात म्हणे लोक. थेंबे थेंबे तळे साचे म्हण ऐकल्यावर कसे वाटेल त्या चिमुकल्या जीवाला? हल्ली मी काही भूमितीमधली नावे पण ऐकली आहेत. आकृती. या मुलीला आकृती काढा प्रश्न जमत नसतील तर किती लाज? हे काही आज चालू नाही झालं. महाभारतापासून सुरु आहे , व्यास काय नी कर्ण काय. मला तर हातचा हे नाव फार आवडले आहे. त्याच्या मामाला मजा येईल - हा माझा भाच्चा, हातचा.
लोकांची मुलं, आपल्याला काये? आपण जावून एकतीस डिसेंबरींग करावे.
**

तळटिपा:
; - प्लिज नोट अर्धविराम आहे तो, किती लोकं वापरतात असा अर्धविराम आं, आं ? (आमचा अभ्यास असे सांगतो की "अर्धविराम" हा शब्द अर्धविराम चिह्नापेक्षा जास्त वापरला जातो, ही उपेक्षा व अन्याय दूर करण्याचा वसा मी घेतला आहे)
इच्छितो - अशा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद लुटूनच आयुष्य फुलवायचे असते हं.
क्लासमधे - क्लास म्हणजे वर्ग नव्हे, क्लास म्हणजे शाळेतल्या सरांच्या घरी जावून शिकण्याचे ठिकाण. क्लास आणि ट्यूशनमधे फरक हा की ट्यूशनवाले सर विद्यार्थ्याच्या घरी येतात आणि क्लासमधे उलटे. माहिती असलेले बरे असते.
आवडते - शक्य तेवढं नॉर्मल माणसासारखं वागावं हो, या समाजात राहायचे आहे ना आपल्याला?
लागली - मालक एवढं करतायत म्हणल्यावर I also need to go for that extra mile असे कुठल्याही वाहनाला वाटणं साहजिकच आहे

***