Monday, January 26, 2009

कोरिअन वेव्ह

कोरिअन वेव्ह विषयी नुसतेच ऐकुन होतो. पाश्चिमात्य देश, चीन, जपान आणि इतर बऱ्यापैकी प्रगत आशियाई देशांमधे आधीच कोरियन वेव्ह धडकली आहे. वेव्ह धडकणे म्हणजे तिथली जनता बऱ्यापैकी कोरिअन संस्कृतीमधे रस दाखवत आहे, कोरिअन उत्पादने, कोरिअन सिरियल्सने लोक प्रभावित होत आहेत etc etc.
असो. जास्त विश्लेषण करण्यात काही अर्थ नाही, माझी बौध्दिक दिवाळखोरी जगजाहीर होइल. तर आता माझ्यापर्यंत ही कोरिअन वेव्ह धडकली आहे आणि मी आनंदाने तिचे स्वागत करत आहे.
टाळ्या, शिट्ट्या, फेटे, झांजा, ढोल, ताशे.

गेले २-३ आठवडे मी नुसता भारावून गेलो आहे कोरिअन सिनेमे बघुन. ‘My sassy girl’, ‘My little bride’, ‘Classic’, ‘Too beautiful to lie’, ‘Welcome to Dongmakgol’...अनेक. खूप मोठी यादी आहे .

‘My sassy girl’ची तर पारायणे सुरु केली आहेत मी. ह्या सिनेमावर माझी परीक्षा घ्या हो, कुठलाही प्रश्न विचारा - एका वाक्यात उत्तरे, सविस्तर उत्तरे, जोड्या लावा, संदर्भासहित स्पष्टीकरण, काहीही विचारा, ८० टक्क्यांच्यावर मार्क नाही मिळाले ना तर गाड्यांच्या मागे भूंकत धावणे बंद करीन.
एकतर ए टू झी(झेड वगैरे ते भारतात राहणारे लोक म्हणतात, आम्ही झी म्हणतो) सगळ्या कोरिअन पोरी निरागस वाटतात आणि सगळे हिरो एकदम सज्जन दिसतात. सॅसी गर्ल मधे तर पोरगी दारु पिउन ओकते तरी निरागस वाटते - साधरण १०-११ सिनेमे पाहिले आत्तपर्यंत पण मनात क्षणभरसुध्दा वैषयिक विचार आले नाहीत, देवाशप्पथ.
आत्ता मोजुन १७ सिनेमे डाउनलोडला लावले आहेत.

जब तक सूरज चांद रहेगा, कोरिअन सिनेमाका नाम रहेगा .
एक दोन तीन चार, कोरिअन सिनेमाचा जयजकार.
तानी नानी नानी, इय्या इय्या, कोरिअन सिनेमा इय्या इय्या.
अर्रे आवाज कुणाचा....बास आता.

***

Wednesday, January 21, 2009

खवल्या

मनुष्याच्या स्वप्नात काय येईल याला काही धरबंद नाही. आनंदी स्वप्न वगैरे प्रकार दूरच माझ्या स्वप्नात कायम विचित्रच गोष्टी येतात -
'Compile Construction' दुसऱ्यांदापण सुटला नाही.
बारावीला PT च्या परिक्षेला जायला विसरलो त्यामुळे PCM मधे ९३ टक्के मिळुनसुध्दा नापास झालो.
ट्रकला ओव्हरटेक करताना लुना रिझर्व्हला आली.
पेपर परिक्षकांना परत करताना पुढच्याची पुरवणी मी लावली आणि माझी त्याने.
समूहगान बेसूर वाटत असल्याने बाईंनी प्रत्येकाला एक-एकटे गायला सांगितले आणि आमची शोभा झाली
एकुण काय, जेव्हा जेव्हा म्हणून फाटलीय नां ते सगळे प्रसंग हटकून येतात स्वप्नात, ते पण परतपरत. एक ना अनेक.

असो, तर प्वाईंट हा हाय की, काल माझ्या स्वप्नात ‘खवल्या मांजर’ आले. आले म्हणजे नुसतेच आले, काही सोबत घटना नाही की काय नाही - शाळेतल्या पुस्तकात जसे चित्र होते त्याचे तसेच्या तसे ते स्वप्नात आले. बास.
नंतर लक्षात आले की ईसकाळमधे बातमी वाचली होती, कराडमधे दुर्मिळ मांजर सापडले म्हणून. ते खरे तर वेगळ्या वर्गातले आहे कुठल्यातरी पण दुर्मिळ मांजर म्हणजे आमच्यासाठी ‘खवल्या मांजर’.

लगेच उत्साह आला आणि त्याचे चित्र काढले - गुगल फुकट सुविधा देत असल्याने आणि ‘हा काय आचरटपणा चालु आहे’ असे कुणी विचारायची शक्यता नसल्याने बिन्धास इथे लावून टाकतो.


खवल्या मांजर लय गलिच्छ दिसते राव, लहानपणी तरी त्याचे तसे इम्प्रेशन होते माझ्यावर. आणि मुंग्या खाते असेपण आठवते आहे, आणि त्याचे खवले एकदम तीक्ष्ण असतात, हल्याची शक्यता वाटल्यास ते अंगाचे वेटोळे करुन डोके शेपटीखाली घालते -
मग वर सगळे धारदार खवले, खवले, खवले, खवले, खवले, खवले, खवले, खवले, खवले, खवले
या मारा आता मला, है कोई माई का लाल?

पब्लिक स्वप्ने लिहिण्याचे डेडिकेटेड ब्लॉग्स ठेवतात, आम्ही तर नुसते स्वप्नातले चित्र लावले हो - छपरी असले म्हणून काय झाले?
***

Sunday, January 18, 2009

मी सांगतो काय भानगड आहे ते

आपल्याला लोक ‘येडपट’ म्हणोत, ‘मंद’ म्हणोत किंवा ‘वरचा मजला रिकामा’ म्हणोत, उलटसुलट विचार करुन आणि बादरायण संबंध जोडुन नवनवीन कॉन्स्पिरसी थेअरीज निर्माण करुन उनपे गौर करनेसे हमें बहुत संतोष प्राप्त होता है.

मला काय वाटते, हा राजु साफ खोट बोलतो आहे तीन-चार टक्क्यांपेक्षा नक्कीच जास्त असणार सत्यमचा नफा. ह्याने तो पैसा उडवला आहे - आता हे सगळ्यांनाच वाटते आहे पण मला पहिल्यांदा वाटले होते, झुप्पे म्हणायचे राहुन गेले. तर सर्वजण म्हणतात तसे राजुने सत्यमचा पैसा कुठेतरी टाकला होता, आणि सध्याच्या मंदीमुळे तो साफ गंडला आणि मग त्याने हे सर्व पत्र लिहिले वगैरे वगैरे.

असो तर मुळ मुद्दा - माझी थिअरी अशी आहे की, राजुने सत्यमचा साधारण पंधरा वीस टक्के नफा, बर्नार्ड मॅडॉफला दिला होता, आणि मॅडॉफकडुन रिटर्न्स मिळाल्यावर राजु तो उचलेला पैसा परत बॅंकेत टाकणार होता, थोडेसे व्याज वगैरे जोडुन. बाकी उरलेले पैसे राजु, बोर्डातले, माहिती असलेले ऑडिटर्स असे सर्व मिळुन घेणार होते. असे अनेक वर्ष चालले होते. मॅडॉफ सतत इतकी वर्षे पंधरा-वीस टक्के रिटर्न्स देत असल्याने असे करणे राजुला सहज शक्य होते. राजुला परस्पर पैसे काढणे शक्य नाहीये म्हणायचे कारण नाही कुणी, कॉमर्सवाल्यांनी डोके लढवून हे कसे शक्य आहे ते शोधुन काढावे.

पण आता मॅडॉफच गंडल्यामुळे राजु+गँगचा पोपट झाला आणि मग त्यांनी मायटीसचे नाटक केले, ते पण नाही जमून आले नाही तेव्हा मग राजीनामा, पत्र, रायडिंग टायगर वगैरे वगैरे.
घटनाक्रमसुध्दा विचार करण्याजोगा आहे - साधारण डिसेंबरच्या सुरुवातीला मॅडॉफला पकडले आणि मायटीसचे प्रकरण डिसेंबर मध्याला झाले होते. हे कालावधी नक्की माहित नाहीत, नेटवर शोधायची इच्छा नाहीये पण मला आमच्या खात्रीलायक सुत्रांनी[CNBC ची मारिया] सांगितल्याचे आठवते आहे.

पुढे मागे खरंच असे काही उघडकीस आल्यास, माझा नळस्टॉप, ताथवडे उद्यान किंवा कोथरुड स्टँड/डेपो येथे सत्कार करण्यात यावा. [चारही ठिकाणी केला तरी चालेल]

***

Friday, January 16, 2009

सत्यघटना

एकदम मन हेलावून टाकणारा वगैरे अनुभव - नॉन क्रॉनोलॉजिकल क्रमाने लिहिण्यात येइल, असा टॅरॅंटिनो इफेक्ट येण्यासाठी.
--
स्थळ: आमच्या घरासमोरची जागा, वेळ: घटनेपूर्वी २४ तास, म्हणजे साधारण काल सकाळाचे ११.००

आदल्या दिवसाचा अनुभव लक्षात होता, त्यामुळे अतिकाळजीपूर्वक आणि मन एकाग्र करुन स्केटिंग स्टाईल मारण्यात आली. [ऑफिसमधे गेल्यावर काय काय काम करायचे आहे, कुठल्या टिमवर कुठला इश्यु ढकलायचा आहे असल्या विचारांनी चित्त विचलित होउ दिले नाही]
आणि एकदम व्यवस्थित स्केटिंग करत गाडीपाशी पोहोचलो. कालच्या आजीबाय आजपण होत्या पायरीवर बसलेल्या, कुत्र्याशी खेळत. त्यांनी पाहिले आणि हसल्या, मीही हसलो आणि कटलो.
पण मला एक कळत नाही स्वत: एवढे कपडे घातले असतात, कुत्र्याला का कुड्कुडवतात?
*
स्थळ: आमच्या घरासमोरची जागा, वेळ: घटनेपूर्वी ४८ तास, म्हणजे साधारण परवाचे सकाळाचे ११.००

आमचे वय विसरुन नेहमीप्रमाणे उड्या मारीत आम्ही सक्काळ सक्काळ ऑफिसला चाललो होतो. तोंडानी झूSSम असा आवाज काढत बर्फावरुन स्केटिंग टाईप करत चाललो होतो आणि आता आपटणार एवढ्यात एका झाडाने आधार दिला आणि वाचलो. [लहानपणी बाबांबरोबर जावून एक झाड लावले होते २६ जानेवारीला, केलेले प्रेम झाड कधीच विसरत नाही]
आमच्या समोरच राहाणाऱ्या आजीबाई, एकदम म्हणजे एकदमच काळाजीच्या सुरात "Be careful" म्हणाल्या. आपल्या फजितीच्या त्या एकमेव साक्षीदाराला "I will" असे म्हणून आणि सभ्य हसू देवून मी गपचूप गाडीत बसलो आणि सटकलो.
*
स्थळ: आमच्या घरासमोरची जागा, वेळ: घटनेची ऍक्चुअल वेळ , म्हणजे आज सकाळाचे ११.००

काल स्केटिंग जमल्याने हालचालीत एकप्रकारची सहजता आली होती, झूम आवाज काढत स्केटिंग करत निघालो, तोल गेला, आधाराला झाड पाहिले तर त्याने पण आपल्या फांद्या झटकल्या.[ बाबांबरोबर जावून झाड तर लावले, पाणी कोण घालणार हो रोज त्याला? आं?]. असो. शेवट आपण आता १०० टक्के पडणार आहोत हे लक्षात आल्यावर टॉमसारखा चेहरा केला आणि दाण्णदिशी आपटलो...जास्त लागले नाही.
पायरीवर बसलेल्या आजीबाई पटकन उठल्या. आता खरी घटना सुरु होत आहे -

मी उठून उभा राहिस्तोवर, त्या जवळ आल्या आणि माझी दोन्ही खांदे पकडले, टिपिकल अमेरिकन आया मुलांना ओरडायला जसे जवळून त्यांच्या डोळ्यात डोळे घालतात तसे माझ्यावर डोळे रोखले आणि लय म्हणजे लय ओरडल्या,
"तुला काय झाले असते म्हणजे, गंमत वाटते का तुला? थोडक्यात वाचलात, हातपाय मोडले असते तर कितीला पडले असते? स्केटिंगच करायचे असेल तर स्केटिंग अरीना मधे जा, ही जागा नव्हे त्याची". मी तसाही घाबरलोच होतो पण असे सगळे ओरडल्यावर एकदमच खालच्या स्वरात मी सॉरी म्हणालो तर त्या म्हणाल्या "प्रॉमिस मी, यु वोन्ट डू धिस अगेन, इव्हन इफ ऍम नॉट वॉचिंग यु". प्रॉमिस दिले आणि सटकलो बाबा.
*

आईला सांगितले तर तिला मी आपटल्याचे जेवढे वाईट वाटले तेवढाच आज्जीबाई ओरडल्याचा आनंद झाला. त्यांना माझ्यातर्फे थॅंक्यु सांग म्हणे - वर नंतर फोन करुन विचारत होती, सांगितलेस का?
कायपण बोलतात कधीकधी आया, आता काय खरंच वेगळे जावून थॅंक्यु सांगायचे का काय त्यांना.
***

Tuesday, January 13, 2009

गवार

कविता अर्थातच रद्दड आहे, पण गवारीच्या प्रति व्यक्त केलेल्या भावना प्रामाणिक आहेत.
***

गवार

बारकुळी ती, हिरवी हिरवी,
छान कोवळी,
गवारशेंग मला हवी


कुटाबरोबर वाफवलेली,
छान रटरटीत शिजवलेली,
गवारशेंग मला हवी


भले कितीही गोड मटार,
फोलपटे बेचव त्याची,
पापुद्रयासहित दाण्यांची,
गवारशेंग मला हवी


आडदांड तो फ्लॉवर केवढा,
सात्विक तो श्रावण घेवडा,
दुध्याचा डौलदार आकडा
अहो घ्या ते शेकडा,
घ्या ते शेकडा,
पण गवारीचाच सडा
दारी माझ्या.
गवारीचाच सडा, दारी माझ्या


भरले वांगे
तुम्हीच चापा,
बटाट्याचे रस्से
अखंड ओरपा,
बेत असेल तुमचा तो खास,
मज नाही त्याची आंस


सडसडीत बांध्याची ती,
लवचिक साधीभोळी,
माझी गवार मला हवी


एक डाव खावूद्याना
एक डाव खावूद्याना
मला गवारीची भाजी

***

Thursday, January 8, 2009

राजु द टायगरस्वार

सत्यमची पार लागलीय राव आता...

सगळ्या गोमकाल्यात मला हास्यास्पद वाटलेली गोष्ट म्हणजे, राजुमहाराजांनी आपला राजीनामा कम पापांचा पाढा उतरवलेल्या पत्रामधे लिहिलेले एक वाक्य -
"It was like riding a tiger, not knowing how to get off without being eaten"

मायला काय म्हणून असे लिहिले असावे राव...आख्ख्या पत्राचा मजकूर म्हणजे - ही संख्या एवढी होती ती मी एवढी दाखवली, हे इतक्या वर्षापासून असे चालू होते, मी काय काय प्रयत्न केले वाचवायचे...वगैरे वगैरे.

आणि जाता जाता एकदम क्लिशे टाकला...अलंकारिक आणि मस्त ओळ. हे सगळे आपले उपद्‌व्याप लिहिता लिहिता त्याला वाटले असावे, आईशप्पथ एवढे काय काय किडे केले आपण...थोडासा अभिमान वाटला असेल अन्‌ मग आपसुकच असले फंडु वाक्य टाकले असावे. भारी असतात राव माणसे एक एक, बुडताना पण केसांची झुलपे मागे टाकणार आम्ही कायबी होवो पण स्टाईल मारणे नाय सोडाणार.

***

Monday, January 5, 2009

बोधकथा - २

क्रमांक एकची रटाळ आणि फालतू बोधकथा आहे ही - पण लिहिण्याशिवाय पर्याय नाही, जह्‌न में बात है तो हम बयॉं जरुर करेंगे. खरे तर माणूस असता तरी चालले असते या गोष्टीत पण मांजरे आहेत, मला मांजरे आवडत नाहीत तरीपण आहेत, माहित नाही का ते.



कथेचे नाव
विचारल्याने होत आहे रे

कथा

बन्या बोका नुकताच भारतात जुन्या ऑफिसमधे जावून परत अमेरीकेत आला आणि चम्या उत्सुकतेने त्याला हकिकती विचारत होता. फुटकळ घडामोडी सांगुन झाल्यावर बन्याने महत्त्वाच्या विषयाला हात घातला - तिथल्या प्रत्येक मांजरीची सविस्तर माहिती आणि सद्यपरिस्थिती सांगितली ( सद्यपरिस्थिती म्हणजे सध्या एकटी आहे, का बोक्याबरोबर चोरुन फिरते, का थेट लग्न करुन पूर्णपणे बोकील झाली आहे).
सगळ्या मांजऱ्या संपल्यावर बन्याने एक उसासा टाकला. बन्या आता कोणाची माहिती सांगणार हे चम्याला माहित होते आणि चम्या कुणाची माहिती ऐकायला एवढा आतुर आहे हे बन्याला माहित होते.
‘सुरु’
"सुरुचे अजुन लग्न झाले नाही आणि सध्या तिने कुठल्या बोक्याला वरलेले नाही, ही पक्की बातमी आहे", हे ऐकुन चम्याचा जीव २ लिटर दुध मावेल एवढ्या मोठ्या भांड्यात पडला. ज्याक्षणी तो पडला त्याचक्षणी चम्याचे मन भूतकाळात गेले - १ वर्ष मागे.
चम्या भारतात असतान तो आणि सुरु एकाच बसने ऑफिसला जायचे, सुरु त्याच्यानंतर ५-१० मिनीटांनी चढायची बसमधे. कधी ती एक बाक पुढे तर कधी एक बाक मागे, अगदी क्वचितच त्याच्याशेजारी - क्वचितच म्हणजे आख्ख्या वर्षात मोजुन दोनदा त्याच्याशेजारी बसली होती ती. चम्याला ती प्रचंड आवडायची - तिचे साधे दिसणे, कायम एखादे पुस्तक वाचणे, बसमधे असताना कायम फोनवर म्यांव म्यांव ‘न’ करणे, तिची प्रत्येक अन्‌ प्रत्येक गोष्ट चम्याला आवडायची. योगायोगाने ऑफिसच्या १० मजली इमारतीमधे सुरु नेमकी चम्याच्याच मजल्यावर बसायची - चम्या नेहमी वेळ साधुन ती असेल तेव्हाच दूध प्यायच्या खोलीत जायचा.
एकुण काय तर he adored her relentlessly and madly.
वर्ष सरले, फ्लॅशबॅकपण संपला. चम्याने हा भूतकाळ स्वतःच्या मनःपटलावर पाहिला असला तरी चम्याच्या हिरव्या डोळ्यांमधे बन्याने सिनेमास्कोप आवृत्ती पाहिली आणि संपल्यावर नेहमीचा प्रश्न विचारला - तु तिच्याशी साधी ओळख तरी का नाही करुन घेतलीस - संपूर्ण १ वर्ष होते तुझ्याकडे !

अजुनही बरेचदा चम्या तिचा विचार करायचा आणि जवळजवळ रोजच माउनेट वर तिचे प्रोफाइल बघायचा.
*
नाताळच्या सुट्टीमधे चम्या अमेरीकेतले प्रसिध्द असे एका भव्य नदीचे खोरे बघायला गेला - निसर्गाचे ते विराट आणि अद्‌भुत रुप पाहुन मार्जारकुळातल्या कोणाही सर्वसामान्य जीवाच्या मनात, निसर्गापुढे आपण किती छोटे आहोत वगैरे विचार आले असते. पण चम्याच्या मनात तसे काही आले नाही. त्याला वाटले, नुसते मनातल्या मनात लव-म्याव,लव-म्याव असे कुढत बसण्यात काय अर्थ आहे, घरी जावुन तडक सुरुला मैत्रीसाठी निरोप पाठवायचा आणि तिने स्वीकारल्यास थेट लग्नाचे विचारायचे.
घरी येउन त्याने माउनेट उघडले, तिला निरोप पाठवायला तिच्या प्रोफाइलवर गेला, पण...
प्रोफाइलवर तिचे स्टेटस ‘एकटी’ नव्हते. कोणीतरी बोक्याबरोबर तिचे लग्न ठरले होते.
चम्या म्हणाला "माउउची जय" आणि त्याने सुरुचा विषय कायमचा संपवला - फुल फ्लेड्ज्ड प्रेम नसल्याने त्याला फार त्रास नाही झाला पण खंत नक्कीच वाटली.

*
तात्पर्य
०. कल करे सो आज कर.
१. मुखदुर्बळपणा सोडावा.
२. पालकांनी आपापल्या मुलांना, फक्त मुलांच्या किंवा फक्त मुलींच्या शाळेत घालू नये. मुलामुलींच्या एकत्र शाळेत शिकल्यास एकमेकांशी बोलण्याचा आयुष्यभराचा संकोच कमी होतो.
३. वेळ असताना कामे करावीत उगाच पुढे ढकलू नयेत.
४. प्रेमाच्या बाबतीत जास्त दिवस लाजु नये, संधी कधी मिळेल याची वाट न पाहता संधी निर्माण करावी.
५. माणूसघाणे असु नये. चम्याची माई कायम सांगायची त्याला, वारंवार भेटणारी माणसे असल्यास ओळख असो वा नसो, स्मितहास्य द्यावे - सुरु कदाचित त्या स्मितहास्याचीच वाट पाहत पाहत वैतागली असेल.

***