Sunday, December 12, 2010

ठकठक

जब्बरी महत्त्वाकांक्षा असलेल्यांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना बाकी सर्वांनीच महत्त्वाकांक्षी असावे असे वाटते. सर्वांनीच कायम उराशी मोठ्ठी स्वप्ने वगैरे बाळगावीत असे या लोकांना वाटते. एखाद्याने पूर्वी अशी उराशी स्वप्ने बाळगली असतील परंतु नंतर अपरिहार्य कारणामुळे त्या स्वप्नांच्या वळकट्या बांधून माळ्यावर टाकून दिल्या असतील हे महत्त्वाकांक्षी असलेल्या लोकांच्या गावीही नसते किंवा एखाद्याला महत्वाकांक्षा बाळगण्यात इंटरेस्टच नसेल हेही त्यांना पटत नाही.
*मधेच आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे - 
वरील दोन वाक्यात वाचकांना निराशावाद, सामान्याकरण(जनरलायझेशन) दिसले असेल. 
निराशावाद - पर्याय नाही. शंभरातली नव्वद लोकं आशा दाखवत असतात, एखाद्याने तरी "प्रयत्न करा यश मिळेलच असे नाही", "असे आहे भाऊ, जगायचे आहे तर रेटा गाडी" असे सांगणे गरजेचे आहे. 
Sometimes there is no light at the end of the tunnel - it's only tunnel paint changing from black to white at one point. इंपॉसिबल शब्द नसलेल्या डिक्शनऱ्या विकत घेणाऱ्या लोकांना कुणीतरी - बॉस दोन मिनीटे थांबून रेनचेक घ्या असे सांगणे हा निराशावाद नाही समंजसपणा आहे.
मोठी स्व्पने/ब्विप्ने - कलामांनंतर याला भलताच भाव आला.
असो.
आम्हाला काय त्रास नाहीये लोकांनी महत्त्वाकांक्षी असण्याचा किंवा स्प्वप्ने बाळगण्याचा वगैरे, पण आमच्यावर का बळजबरी? गेल्या काही दिवसात अशा महास्वप्नील लोकांनी जजमेंटल प्रश्न विचारल्याने मी व्यथित झालो आहे. 
स्वत:ची सॉफ्ट्वेअर कंपनी सुरु नाही का करायची? धंदा केला पाहिजे, माणसाने कायम मोठ्ठे लक्ष्य ठेवले पाहीजे असे प्रश्न/उपदेश करणारे सर्वचजण महाउद्योगी असल्याने मी जनरलायझेशन केले.
छोटी स्वप्न बघणे गुन्हा वगैरे वाक्य आपल्या तोंडावर मारल्यावर राग नाही का यायचा? त्यात वेळा सत्कारणी लावला पाहिजे असे सांगणारे पण असतात.

मी खालील उदाहरणे दिल्याने माझा महत्त्वाकांक्षी लोकांकडून पाणउतारा झाला होता -
१. 
कायम चारचाकी गाड्यांचे ट्यांव, ट्यांव असे चोरीवाले अलार्म चुकुन वाजत असतात. - मला एखाद्या गाडीची चोरी होत असताना असला अलार्म वाजलेला लाईव्ह ऐकायचा आणि बघायचा आहे - स्वप्न आहे माझे ते.
त्यासाठी काय करता आपण - कुठल्या भागात चारचाकीचोरीचे प्रमाण जास्त आहे हे इंटरनेटवर पाहून आठवड्यातून एकदा त्या भागात मी चक्कर टाकतो.(पहाटे दोनतीनला)
२.
घर ते मुख्य रस्ता हा अर्धा किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे खड्ड्याखड्ड्यांचा. तुफान पाउस पडल्यावर सगळा चिखल-चिखल-व-चिखलच. लोकं रस्ता बदलतात. मला याच चिखलातून मोटरसायकलीवरुन खाली एकदाही पाय न टेकता मुख्य रस्त्याला लागयचे आहे.
या पावसाळ्यात नाही जमले.
३.
महत्त्वाकांक्षा - पेनस्पिनींगची ऍड्व्हान्स लेव्हल पार करायची आहे. 
इथे तर मी, मला महद्प्रयत्नांनंतर जमणाऱ्या बेसिक पेन स्पिनींगचे प्रात्यक्षिकही दाखविले होते.

सगळ्यांनीच आयुष्यात भारी काहीतरी केले तर नॉर्मल कोण जगणार? 

मुद्दा जनरलायझेशनचा. जनरलायझेशन करणे हे वाईट आहे असा एक प्रवाह आहे. मुळात "जनरलायझेशन करणे हे वाईट आहे" हेच एक जनरलायझेशन आहे. हे मला भयानक विनोदी वाटते. जे काही विनोदी वाटते ते मला पटते.

एवढेच लिहायचे होते मला. पण एवढ्या लांब पासवर्ड आठवून आठवून आलोच आहे तर सांगून टाकतो, ऐका - 
सामन्य माणूस ही संकल्पना ओव्हररेटेड आहे. प्रत्येक जण आपआपल्या कुवतीनुसार चुकीचे वागतो. सामान्य माणासाच्या चूका पब्लिक होत नाहीत एवढेच.

***

Sunday, July 25, 2010

Some lyrics died today, at least fatally wounded


दाढीवाला हॅरीसन...
I look at you all, see the love there that's sleeping
While my guitar gently weeps
या दोन ओळी ऐकल्यावर आपल्याला वाटते अग्गाई काय आर्त गाणे आहे, मग पुढची ओळ येते -
I look at the floor and I see it need sweeping

खल्लास. असला भंपकपणा करतात मेनस्ट्रीम रॉकवाले मधेच. वरील वाक्यातूनही तसा चांगला अर्थ निघू शकतो काढायचा झाल्यास पण सिरीयसनेस गेला की गेलाच. पिंक फ्लॉईड, डीप पर्पल, हू (कधी कधी बिटल्स) सारखे मोजके ग्रुप सोडता बाकी कुणाचे नाव घेतल्यास त्यांचे प्रसिद्ध गिटार सोलोज किंवा ट्यून्स आठवतात , कधी एखाद्या गाण्याचे बोल नाही आठवत.
पण अमेरीकन कंट्री आणि फोक संगीतकारांचे तसं नाही. त्यांची गाणी खणखणीत असतात. सुंदर गाणी, दमदार आवाज असा की आपल्या पोवाड्यांची आठवण यावी.
जॉनी कॅशचे "When the man comes around" ऐका एकदा. बाकी किथ अर्बन, ब्रॅड पेस्ली वगैरे आहेतच.

बॉब डिलनने एलेक्ट्रिक गिटार, ख्रिश्चन गाणी वगैरे प्रकार केले असले तरी तो कंट्री/फोक संगीतकार म्हणूनच ओळखला जातो.(आम्ही त्याला तसे ओळखतो, बाकीचे तसे ओळखत नसले तर गेले उडत).
बहुसंख्यांनी त्याला कवी मानले आहेच. श्रीलंकन पाठ्यपुस्तक समितीला तर त्याची महती इतकी पटली की शेक्सपिअरचा धडा काढून त्याऐवजी डिलनचे गाणे टाकले त्यांनी इंग्लिश पुस्तकात.
मेघनाने खो दिला तेव्हा, डोक्यात पहिले गाणे आले ते म्हणजे "Blowin' in the wind" आणि घात झाला, सेन मॅनने आधीच सुंदर अनुवाद केला. चांगल्या घरातला  मी असा एका क्षणात बेगाणा झालो.
मग एकापाठोपाठ एक डिलनची गाणी आठवली. Bear with me here, गाण्यांची जंत्री दिल्याशिवाय माझे समाधान होणार नाही.
"Tangled up in blues", "Mr. Tambourine Man", "Ballad of thin man", "All along the watchtower", "Hurricane", "Like a rolling stone", "Knocking on heaven's door", असंख्य, मी दमलो नाही पण जनता बोर व्हायची प्रमाणाबाहेर. ही गाणी आठवल्यावर त्यांचे अनुवाद करायचीपण अट आहे हे आठवले आणि मग सगळा पचका. डिलनच्या गाण्यांचे भाषांतर करणे मला झेपणारे नाही.
अशी गडबड झाल्याने माझ्याकडे माहेरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मी गपचूप आपल्या प्रिय लेड झेपलीनच्या गाण्याचा जुना रेडीमेड अनुवाद टाकायचे ठरविले.
‘खो’ला मान द्यायचा असल्याने पण त्याचवेळी आपल्या सुमार क्षमतेची पुरेपूर जाणही असल्याने उपाय हा की - अनुवाद पांढऱ्या शाईत.
वाचकांना विनंती आहे की -
१. त्यांनी प्रथम मूळ गाणे वाचावे, त्याने अस्टॉनीश/अचंबित व्हावे.
२. व्वा काय गाणे आहे ! असे म्हणावे.
३. नंतर रद्दी विकणे, कोडमधे कमेंट टाकणे असली कामे आटपून घ्या आणि मग अगदीच इच्छा झाली तर मी केलेला मराठी अनुवाद वाचा.(मजकून सिलेक्ट केल्यावर काळ्या शाईत दिसेल)
ही नम्रता नव्हे.


Down by the seaside (Page/Plant)

Down by the seaside.
See the boats go sailin'
Can the people hear,
What the little fish are sayin'

Oh, oh, people turned away. Oh, people turned away

Down in the city streets,
see all the folk go racin', racin'
No time left, to pass the time of day

People turned away. People turned away
So far away, so far away
See how they run, see how they run, see how they run, see how they run.

Do you still do the twist
Do you find you remember things that well
I wanna tell you... Some go twistin' every day
though sometimes it's awful hard to tell
Out in the country, hear the people singin'
Singin' 'bout their progress, knowin' where they're goin'

Oh, oh, oh, oh, people turned away
Yes, the people turned away

Sing loud for the sunshine,
pray hard for the rain
And show your love for Lady Nature.
And she will come back again
The people turned away
people turned away







दूर किनाऱ्यावरी, शीडे उभारली
नांगर उठवून, गलबते हाकरली,
कोणी ऐकता का, कुजबुज मासुळ्यांची
कोणी ऐकता का, हाक मासुळ्यांची

हरवलात तुम्ही सारे, विसरलात तुम्ही सारे

दूर त्या पेठांमध्ये अन्‌ गावठाण्यांत
बघा ते धावणारे, धाव धाव धावणारे
एकमेकाला गाठणारे, धाव धाव धावणारे

हरवलात तुम्ही सारे, विसरलात तुम्ही सारे

स्मरते का तुम्हाला, गोलगोल गिरकी
घेता का अजुनी, तशी स्वच्छंद गिरकी
नजर चुकवतात अजुनी काहीजण
आहे त्यांना अजुनी स्मरण
संकोचतात आणि लपवतात जरी
आहे त्यांना अजुन स्मरण

गाती गोडवे, प्रगतीचे सारे
गावोगावी जणू, चैतन्याचे झरे
प्रत्येकाला हवेत, बदलाचे वारे

हरवलात तुम्ही सारे, विसरलात तुम्ही सारे

गा सूर्यस्तोत्रे अन्‌ गा वर्षागान
करा सृष्टीदेवतेला प्रेमविनवणी
मिळेल अजुनही वरदान...

हरवलात तुम्ही सारे, विसरलात तुम्ही सारे







*

डिलनची वाट लावल्याशिवाय राहवत नाहीये, नाहीतरी म्हातारंच झालयं लेकाचं.
डिलननेच लिहिलेले पण जॅनिस जॉप्लिनच्या आवाजात ऐकलेले गाणे आठवले. सरळसाधे, सरधोपट म्हणतात तसे गाणे आहे.  गाणे साधे असले तरी नेहमीप्रमाणे जनतेने त्याचे अनेक अर्थ लावले आहेत.


Dear landlord


Dear landlord
Please don’t put a price on my soul
My burden is heavy
My dreams are beyond control
When that steamboat whistle blows
I’m gonna give you all I got to give
And I do hope you receive it well
Dependin’ on the way you feel that you live

Dear landlord
Please heed these words that I speak
I know you’ve suffered much
But in this you are not so unique
All of us, at times, we might work too hard
To have it too fast and too much
And anyone can fill his life up
With things he can see but he just cannot touch

Dear landlord
Please don’t dismiss my case
I’m not about to argue
I’m not about to move to no other place
Now, each of us has his own special gift
And you know this was meant to be true
And if you don’t underestimate me
I won’t underestimate you








घरमालक, ओ मालक,
माझ्यावर वॉरंट नका हो काढू
डोईवर हीss जबाबदारी आणि
उराशी स्वप्न हीss भलीथोरली
आमची तऱ्हाच अशी निराळी,
खरं सांगतो -
फेडेन देणी ऐपतीनुसार
मारली एकदा बेल कंडक्टरने की
फेडेन देणी तुमच्यामाझ्या ऐपतीनुसार

घरमालक, ओ मालक,
नीट लक्ष देवून ऐका, माझं म्हणणं
तुमच्याही माहीतेयत अडीअडचणी आणि व्यथा
ऐकलेत तुम्ही उपसलेले कष्टाचे डोंगर
चालायचंच, चिक्कार ऐकल्यात अशा कथा
राबराब राबून सगळेच तर जमवतात माया
कोरड्या सुखात कितीसे ते समाधान?

घरमालक, ओ मालक,
रागावू नका आणि मला एकदम झटकू नका
भांडत नाही हो मी आणि पळूनही चाललो नाय
ज्याची त्याची दैवी देणगी, ज्याने त्याने ओळखावी
माझी लक्षणं तर केव्हापासनं तुम्हाला ठावूक
ठेवा विश्वास थोडासा या पोरावर
मीही ठेवीन खूपसारा तुम्हावर




*



आता पिंक फ्लॉईड घेउ. घेउ म्हणजे घेवूच एकदम त्याला. पिंक फ्लॉईडच्या गाण्यांचे बोल जाम फिलॉसॉफिकल असतात. म्युझिक आणि शब्द दोन्ही मिळून गाण्याला स्वप्नील, मिस्टीक असे रंगरुप देण्यात हे लोक वाकबगार आहेत.(Green is the colour I like, Echos, Time). PF साठी गिल्मर, वॉटर आणि बॅरेट या तिघांनी गाणी लिहिली. पैकी सिद बॅरेट हा लगेच कटला. हा मनुष्य एक दुर्बोध आणि निराश, खिन्नटाईप व्यक्तिमत्व वाटायचा, तशीच त्याची गाणी. एक छोटंसं छान गाणं आहे त्याचे. काही लोकांचे म्हणणे आहे की हे गाणे म्हणजे त्याने स्वत:वर केलेली टीका आहे, काही लोक म्हणतात समाजावर केलेली कॉमेंट्री, काही जण म्हणतात कोकेनच्या अमलाखालील बडबड. मेज्जर Open to interpretation आहे हे गाणे. मी ऐकतो तेव्हा मला विदर्भातल्या आत्महत्यांचा प्रश्न आठवतो.
The Scarecrow

The black and green scarecrow as everyone knows
stood with a bird on his hat and swore
everywhere he didn't care
he stood in a field where barly grows
His head did no thinking, his arms didn't move
exept when the wind cut-a-pup and mice ran
around on the ground
he stood in a field where barley grows
The black and green scarecrow was sadder than me
but now he's resined to his fate 'cause life's not
unkind, he doesn't mind
he stood in a field where barley grows

बुजगावणं - आपलं नेहमीचं मळकट हिरवं
स्थितप्रज्ञासारखे शेतात राखण करत आहे,
डोक्यावर पाखंर बसलीयत !
कर्तव्यदक्ष बुजगावण्याला काय त्याची पर्वा?
बुजगावणं राखण करतयं

टळटळीत उन्हात ताठ
शाळूच्या शेतात आहे ते उभे,
हातापायाची हालचाल नाही
की डोक्यात काही खलबतं नाहीत
क्वचित वारा, कधी उंदीर खुडबुडे
तेव्हांच काय ते हेलकांडे
बुजगावणं राखण करतयं

शाळूच्या शेतातलं हे बुजगावणं
माझ्याहून जास्त उदास त्याच जीणं
पण हल्ली सवय झालीय त्याला
कुणालाही होईल
जीवन अगदीच काही क्रूर नाही
नशीबावर भरवसा ठेवून
बुजगावणं राखण करतयं
माझ्या शाळूच्या शेतात
*

आधी आपण विदर्भाचा संदर्भ दिलात मग शाळूच्या ऐवजी कापूस का नाही वापरला कवितेत? असे कुणी विचारु नका. आमच्या भागात कापूस होत नाही त्यामुळे त्याला आमच्या कवितेत (सध्या) स्थान नाही. लोकांचे देशीवाद, खान्देशीवाद असतात तसा आमचापण देशीवाद आहे हा.
**

भाषांतराच्या या प्रयत्नांवरून "Don't live a champagne life on beer income" ही म्हण आठवली. अंथरुण पाहून पाय पसरावे टाईप हो. हे मात्र मी काही मानलं नाही आज.
**

माझा खो विद्याधर (भिंतीवरला बाबा) आणि सोनल या दोघांना.

***

Monday, June 28, 2010

अ‍ॅ’स्ट्रॉफी


उदाहरणार्थ, गरज ही शोधाची जननी आहे असे सर्वप्रथम म्हणणारा मनुष्य भलताच सद्‌गृहस्थ असावा. मी ही म्हण पहिल्यांदा ऐकली तेव्हा मनात विचार आला की, काहीतरी चुकते आहे - गरज ही तर चोरीची जननी आहे.
आमचे असे मत आहे की, समाज लहान मुलांच्या फ्री विलचा आदर करत नाही ‘व्हाईल’ मोठ्या माणसांच्या फ्री विलचा मात्र उदो उदो.
उदाहरणार्थ, शाळेच्या आवारात सगळीकडे - "शांतता राखा", सिगरेटच्या पाकिटावर - "धूम्रपान आरोग्यास हानीकारक असते" एवढेच. लिहा की रेटून "धूम्रपान आरोग्यास हानीकारक असते, कृपया बिड्या फुंकू नका." काय बिघडते?

असो. समाजाच्या अलिखित नियमाचा योग्य तो मान ठेवून मी २ ओळी मांडू इच्छितो -
गरजेपोटी चोरी आणि गरजेपोटीच शोध
ज्याचा त्याने, घ्यावा योग्य तो बोध.
*
या पोस्टमधे एक शोध मांडायचा आहे, हा शोध विरामचिह्नविषयक आहे, मागील पोस्टसुद्धा ‘तसले’च असल्याने प्रारंभी बोर करण्याचा एक प्रामाणिक(व स्तुत्य) प्रयत्न करण्यात आला. अन्यथा वाचकांना सुरुवातीलाच 
"Same old song, just a drop of water in an endless sea" या ओळी आठवल्या असत्या.
*
ईंग्लिशमधे अ‍ॅपोस्ट्रॉफीचा वापर अनेक कारणांसाठी होतो. मला त्याचा संक्षिप्तीकरणासाठी केलेला वापर भयानक आवडतो. मला फटाक्यांचा आणि स्पिरीटचा वासही भयानक आवडतो. असतात एकेकाच्या आवडी. तर मला आवडणारा वापर म्हणजे -
I will चे I'll, It is चे It's
Catch'em young वगैरे वगैरे.

वाक्ये/शब्द संक्षिप्त करण्यासाठी या अ‍ॅपोस्ट्रॉफीला देवनागरीत आणले पाहिजे. उपयोगी पडेल आपल्याला. आपल्या परिचयाच्या म्हणी, वाक्‌प्रचार लिहायचे असतील तेव्हा सढळ हस्ते वापर करता येईल त्याचा.
अती’माती
चोराच्या’चांदणे
सुरस आणि चम’कारीक

आम्ही सुचवलेला देवनागरीमधे अ‍ॅपोस्ट्रोफीचा वापर हा संदर्भासहीतच होतो. म्हणी/वाक्प्रचार इथे तुम्ही अ‍ॅपोस्ट्रोफी चिह्न बेधडक वापरु शकता. यामागचे गृहितक हे आहे की म्हणी तुम्हाला पूर्वीपासूनच माहित आहेत, एखादा त्या लिहीतो तेव्हा फक्त त्यांचे स्मरण करुन देणार. आता याच न्यायाने मी एखादा शब्द मागील दोन परिच्छेदात वापरला असेल आणि त्या शब्दाच्या प्रारंभीचे अक्षर वा अक्षरगट इतर अक्षरगटांपेक्षा सहजगत्या वेगळे ओळखू येत असतील तर तिथे आपण बेधडक अ‍ॅपोस्ट्रोफी वापरु शकतो. मूळ गृहितक अबाधित आहे की ज्याला तुम्ही अ‍ॅपोस्ट्रोफी लावला त्या अक्षरसमूहाचा संदर्भ वाचकाला आहे.
इथपर्यंत वाचणारे बोर झाले असतील, मला शाळेत आल्यासारखे वाटत आहे.

काय गरज आहे अ‍ॅ’चिह्नाला देवनागरीत आणायची? दप्तराचे ओझे आणखी कशाला वाढवा? "ईंग्लिशमधून का आता चिह्ने उचलायची आपण, कसले रे हे भि’डोहाळे?" असे आक्षेप उपस्थित करण्यात आल्यास आमच्याकडे काहीही उत्तर नाही.
मनात प्रामाणिकपणे काही आल्यास मांडून मोकळे व्हावे असं आमचं एक म्हणणं आहे आपलं.

बरे, आमचे विशेष काही नियम सुद्धा नाहीत. मगाशी गृहितक सांगितले की वाचकांना संदर्भ लागला पाहिजे. आता मूळ तत्त्व सांगतो. मूळ तत्त्व आहे "कंटाळा". आयुष्यात जमेल त्या गोष्टीचा परवडेल तेवढा कंटाळा करावा. एखादा जेव्हा "अती तेथे माती" असे लिहीतो तेंव्हा "अती तेथे" हे दोन शब्द वाचून वाचकाला लगेच पुढे माती शब्द येणार आहे हे आपोआप कळतेच, मग कशाला ना पूर्ण लिहून श्रम वाया घालवा?
संदर्भ गृहितक लक्षात ठेवून आणि मुलभूत तत्त्व पाळून हवा तसा अ‍ॅ’चिह्नाचा वापर करा. आमचा काही कॉ’राईट नाही.
आता हे वरचेच उदाहरण बघा मित्रांनो - extreme उदाहरण आहे, पोस्टमधे ‘कॉपीराईट’ शब्द पहिल्यांदाच आला तरीपण कॉ’राईट म्हणाल्यावर कळाला ना? मंग लेका?

आणि एक म्हणजे अ‍ॅ’चिह्नानंतर पुरेसे शब्द वापरा. अतिआळस नको.
"या चिह्नाच्या वापरावर आमचा काही कॉ’राईट/हक्क नाही" - बरोबर
"या चिह्नाच्या वापरावर आमचा काही कॉ’ट/हक्क नाही" - साफ चूक
जमेल सरावाने.

अधिक काय ते मागणे? 
अ‍ॅ’चिह्न नियमित वापरायला लागल्यापासून "हल्ली महिनाखेरीस बरेच कोरे कागद शिल्लक असतात म्हणलं" अशी लटकी तक्रार गृहिणींनी केल्यास किंवा मुलांनी "आमच्या पेनाची रिफील तुमच्या रिफीलीपेक्षा जास्त टिकते" असे त्यांच्या सोबत्यांना चिडवल्यास माझी आठवण काढून एकवार मान डोलवा म्हणजे झालं.

**

त’टीपा

१. हिंदूच्या स्वागताप्रीत्यर्थ यॉनिंग डॉगचे शुभेच्छा जेस्चर

२. या ओळीचे मालक - "कंसास बँड" यांचे आभार मानून, लेखक लगेचच या मंचावर एक नवी थिअरी मांडू इच्छितो -
बँडचे नाव म्हणून शहर अथवा राज्याचे नाव निवडल्यास त्यांचे एकच गाणे सुपरहीट होते बाकी गाणी सोसो.
पुरावे:
Kansas - Dust in the wind
Boston - More than a feeling
Chicago - If you leave me now
Nazareth - Love hurts (नजरथला पुष्टीसाठी बळेच घुसडण्यात आलेले आहे, जाणकारांनी इग्नोअर तर अजाणकारांनी सबळ पुरावा मानावे)
तेंव्हा असे वन हिट वंडर व्हायचे नसल्यास उगवत्या संगीतकारांनी कृपया आपल्या बँड/ ऑर्केस्ट्रासाठी पुणे, सातारा, छत्तीसगड, भुसावळ, चिखली अशी नावे निवडायचे टाळा.

३. ऊप्सचे फंडे लावून सांगायचे झाले तर, अ‍ॅपोस्ट्रॉफी चिह्न "Operator overloading/polymorphism" ला मेज्जर बळी पडले आहे.

***

Wednesday, March 24, 2010

! . !

राज्यातील पोलिसांप्रमाणेच काही विरामचिह्नांवर पण ओव्हरताण आला आहे. विशेषत: चॅटींगफिटींग, ट्विटरफिटर, बझफझ, फेस्बुकफेस्बुक सुरु झाल्यापासून. 
आधी सगळ्या विरामचिह्नांचे उत्पादन सिंगलटन पॅटर्नमधे व्ह्यायचे. आता म्हणजे एका वट्ट्यात कमीत कमी चार तरी असतातच

पूर्वी -
उद्‍गारचिह्न.getInstance() काय परत करायचे
!
आता -
!!!!!!!!!!.
काही धरबंदच नाही.

me: Hi
xyz: Hi !!!!!!

म्हणजे एकावेळी शंभर ! वापरू नयेत असे नाही. तसेच प्रसंग असले तर वापरावेत. तसेच मीन्स त्या ग्रॅव्हिटीचे प्रसंग.

सेवक: देवकीचा आठवा मुलगा जिवंत आहे
कंस: काय? WTF !!!!!!!!!!
कंस: बातमी पक्की आहे का?
सेवक: हो महाराज.
कंस: dude, I'm totally screwed !!!!

अशावेळी ठीक आहे हो. रोजच्या हायबायला होलसेलमधे पन्नासदा !!!!! लिहीण्यात काय पॉईंट आहे?
आमचे एक निरीक्षण आहे की, असले प्रकार मुली जास्त करतात.

फ्लर्टींग टीप -
मुलगी: hi !!!
मुलगा: हाय हाय.
आजकाल ही टीप परीणामकारक आहे का नाही माहीत नाही. पूर्वी वापरायचो मी, सुरुवातीपासून मूड सेट करायला बरे जाते. (काहीच्या काही मवालीपणा आहे असे कुणाला वाटल्यास, जेनेरेशन गॅप आहे आपल्यात)

उद्‍गारवाचकचिह्न असे सुपरलोडेड अवस्थेत आहे तर तिकडे पूर्णविराम बेंचवर आहे. लोक देतच नाही पूर्णविराम. आयटीवाल्यांनी तर आपल्या कागदपत्रांमधे पूर्णविरामालाच पूर्णविराम देउन टाकला आहे. काल एक पन्नासपानी डॉक्युमेंट वाचले त्यात एकही पूर्णविराम नव्हता !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
एकेछप्पन मधून सोडल्यासारखे वाटते !
जनाची नाही मनाची म्हणून आख्खा निबंध संपल्यावर शेवटी तरी एक कॉमन टिंब टाकून द्यायचे की (मीठासारखे). वाचकांनी लागेल तसे शब्दानंतर, अक्षरांवर स्वत: टाकून घ्यावे. कटकट मिटली.
तर, एकही पूर्णविराम नव्हता. वाचून झाल्यावर मी डीप ईफेक्ट यावा म्हणून आढ्याकढे बघितले मग डोळे मिटले. ‘ती पन्नास पाने’ आणि ‘पूर्णविराम’ यांचे नाते, हे ‘महाराष्ट्र’ आणि ‘मराठी’ यांच्या नात्यापेक्षा काही वेगळे आहे का असा मनातल्या मनात खल केला आणि नंतर डोळे उघडून जोरात श्वास घेतला. विचार करत असतानापण मी एकेरी अवतरणचिह्नांसकटच विचार केला.

पूर्णविरामाची अशी उपेक्षा केली असताना याच डॉक्युमेंट्मधे एवढ्या आकृत्या होत्या की पार डॉक्युमेंट्‌री वाटावी. हव्या तिथे काढाव्यात की आकृत्या पण उगा दोन ओळीत समजेल त्यासाठी आकृती कशाला पाहिजे?
Step 3 - Customer provides his address details. पण नाही.
एक लंबवर्तुळ काढून त्यात मधे कस्टमर असे लिहायचे तिथून एक बाण जाणार एका चौकोनाकडे, त्या चौकोनात मधे ऍड्रेस डिटेल्स. बाणावर लिहिले आहे प्रोव्हाईडस. पुणे युनिव्हर्सिटीत ज्याने कुणी युएम्‌ल विषय सिलॅबसमधे टाकला त्याने असल्या आकृत्या पाहील्या तर जावून झाडाखाली रडत बसेल बिचारा.
फळा वापरणे, आकृत्या काढणे हे पक्के ठसले आहे सॉफ्टवेअर ईंजिनीअर लोकांच्या मनावर. "समजायला सोप्प जातं" हे एक आवडते वाक्य. बोंबला. सोप्प्या गोष्टीसुद्धा कशाला सोप्प्या करून सांगायला पाहिजेत.
एखाद्या वाक्यात आठपेक्षा जास्त शब्द असले आणि त्यात तीन टेक्निकल शब्द आले तर चोहूबाजूंनी आरोळ्या -
बोर्ड, बोर्ड
Use the board naa, it's easy that way
शो एन द डायग्रॅम रे.
या आकृत्या जीवशास्त्रात असल्या त्रास द्यायच्या. कसा मस्त सूड उगवतात लोक आता. भोग आहेत हो, काय करणार.

तांत्रिक माहितीवाली कागदपत्रे वाचणे कधीकधी मनोरंजक असते. आमच्या एका मित्राला कुठल्याही टेबलच्या कॉलमचे वर्णन लिहायचे म्हणजे घोर अपमान वाटायचा.
Why should I write the description? I'll create DB table, I'll create the column but description of the column? Give me a secretary then I'll give you detailed description. असे म्हणायचा तो कायम.
सेक्रेटरी मिळाली नाही पण वर्णनाशिवाय बिल्ड पास होईना तेव्हा त्याने एक सर्वसमावेशक सोल्यूशन तयार केले. नावाआधी ‘द’ लावायचा.
Column - Id
Description - The Id

असेच सुरू राहीले तर अजून पाचेक मिनीटांनी मी जावामधून जोक सांगेन एखादा.

लोकांचे चॅट्वरचे स्टेटस मेसेजेस हाही एक भारी विषय आहे. काही वाक्ये आठवून आठवून मला मधेच हसू येते. लोकं मनापासून काय काय लिहीतात त्याची चेष्टा करणे बरोबर नाही. पण कलियुग आहे हो.
"बास का?"
"महान"
"प्रेम, प्रेम, प्रेम...बस्स एकच शब्द"
"Don't run behind success...make it run behind you"
"I never lived so there's no question of leaving !!!!"
"हो मी वारा, मी पाऊस - अगं तारा, मीच तुझा मिकीमाउस"

बाकी महान लोकांची वाक्ये, फुटकळ विनोद, संदीप खरेच्या ओळी नियमित असतातच. कार्टूनमधल्या कॅरॅक्टरचे चित्र प्रोफाईल इमेज आणि त्याच्या तोंडची वाक्ये स्टेट्समधे टाकणारे महाभागही आहेत. मूळात सर्व कंपन्यांनी एकत्र येवून एक नियम केला पाहिजे की काय लिहावे तिथे आम्ही. कन्फ्यूजन आहे हो.
सुरुवातीला जेव्हा ही सोय झाली तेव्हा आम्ही लायब्ररीत जावून आईनस्टाईनची वाक्ये शोधून आणली होती. नंतर कळाले की आपल्याविषयी काहीतरी लिहायचे असते. त्याहीनंतर कळाले की आपल्या सध्याच्या अवस्थेविषयी काहीतरी लिहायचे असते. म्हणजे ‘मॅरीड विथ टू ब्यूटिफूल किडस’ नव्हे, मानसिक अवस्था.
तेव्हापासून वर्षभर मी पकलोय, Bored, च्यायला हेच स्टेटस मेसेजेस टाकायचो.

स्टेट्‌स मेसेज टीप:
कुठल्याही वाक्याला स्टेट्‌स मेसेज बनवायचे असल्यास त्याच्यानंतर तीन टींबे द्यावीत.
"Waiting for" हा स्टेट्‌स मेसेज नाही पण
"Waiting for..." हा आहे.
मंग लेका, लय आधीपासून माहीतेय आपल्याला.

चला, संमेलनानिमीत्त समारोप करु -
आज भाषा किती बदलते आहे. या जगात केवळ बदलच उनबदलेबल आहे. भाषेमुळे मनुष्यही बदलत आहे. हेच पाहा ना, २०१० साली केलेला एक अभ्यास असे दाखवितो की, पंधरा ते पस्तीस या वयोगटातील माणसे मनातल्या मनात हसायचे झाल्यास LOL म्हणतात. स्पृहणीय आहेत हे बदल, तुम्हीपण अंगीकारा, पण समतोल राखा, एकीकडे ! ला झिजेपर्यंत वापरायचे आणि पूर्णविरामाला वाळीत टाकायचे हे योग्य नाही. हे आम्ही विरामचिह्नांच्या भल्यासाठी नाही मानवजातीच्याच भल्यासाठीच सांगत आहोत. उदाहरणच द्यायचे झाले तर आज सारकॅजमचा वापर इतका पोचला आहे की, नुकतेच एका कंपनीने सारकॅजमच्या चिह्नाचे पेटंट घेतले. अधिक संशोधनाअंती असे लक्षात आले की एका इथिओपीन भाषेत सुरुवातीपासूनच हे चिह्न वापरले जायचे. यातून काय बोध घेता येईल? असे वापर विसरलात तर तुम्हालाच परत कष्ट करुन नव्याने जुन्या गोष्टी शोधायला लागतील. तेव्हा use them responsibly.

**

१. उदाहरण देण्यासाठी कंस या महाभारतकालीन राजाच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. त्याचा गोल, चौकटी अथवा महिरपी कंसाशी कसलाही संबंध नाही. सार्धम्य वाटल्यास...योगायोग...!!!

***

Monday, January 18, 2010

तात्कालिक स्वप्न

माणसाच्या स्वप्नात पँडोरा ग्रहावरच्या विलोभनीय सृष्टीपासून ते दोरीवर वाळत घातलेल्या खांद्यापाशी फाटलेल्या बनियनपर्यंत, काहीपण येवू शकते. कशाचा कशाला धरबंदच नाही.
मूळ मुद्दा वेगळा आहे पण,परंतु आपण जरा नमन करु -
आमच्या स्वप्नात एकदा खवल्या मांजर आल्याने मी त्याचे चित्र काढले होते - हे हटकून सांगावेच लागते दरवेळी.
प्राणीवर्गातून मधे एकदा एक वाघ आला होता स्वप्नात. मी अवतार सिनेमा पाहीला आणि त्या रात्री मला स्वप्न पडले की - मी ताथवडे उद्यानात झोका घेत आहे आणि मागे रांगेत आपल्या पाळीची वाट बघत एक वाघ उभा आहे. थोडा वेळ वाट बघून तो मला म्हणाला, "बराच वेळ झाला की मला दे ना आता", मी त्याला "ए चल हल्ल" असे झिडकारले (हड्‌ नाही हो, आम्हाला हड्‌ शब्द आवडत नाही, कारणे वैयक्तिक आहेत) तेव्हा वाघ रडावयास लागला. त्यामुळे मला दया आली आणि मी त्याला "रडू नकोस, बस. मी तुला झोका देतो" असे म्हणालो, मग तो छान हसला आणि ‘फिटे अंधाराचे जाळे’ गाणं म्हणंत म्हणंत झोका घेवू लागला.
तर हे आईशप्पथ खरं स्वप्न आहे. दुसऱ्या दिवशी उठून मी सर्वांना स्वप्न सांगितले वर हेही सांगितले की निसर्ग# व मानवाचे आज संबंध कसे आहेत, ते कसे असावयास पाहिजेत ह्याचे एक रुपक आहे माझे स्वप्न म्हणजे. आपण सामाजिकदृष्ट्या लय सेन्सिटीव्ह सोल आहोत ना त्यामुळे असली स्वप्न पडतात.
नमन जास्त काही तेलकट झालं नाही. सिनेमात मूळ गोष्टीतला सहभाग दाखविण्याआधी हिरो/व्हिलनचे कॅरॅक्टर बिल्डप करतात तसे आम्हाला आमच्या स्वप्नाचे कॅरॅक्टर बिल्ड करायचे होते.
*
काल माझ्या स्वप्नात शिक्षण आले होते. मी तसा अभ्यासात जरा कच्चाच असल्याने व पूर्वी शिक्षणाला कधी असे समोरासमोर पाहिले नसल्याने थोडावेळ मला झेपलं नाही की हे शिक्षणमहाराज आहेत.
माहीत असावं म्हणून सांगून ठेवतो - शिक्षण जे आहे, ते राष्ट्रवादीच्या जिल्हा लेव्हलच्या कार्यकर्त्यासारखं दिसतं; स्वच्छ पांढरा सदरा, खिशाला न गळणारं शाईपेन आणि हातात दोन फाईली. पँट. बुशपँट हा काय प्रकार आहे ते मला आजवर नाही कळाले. अनवाणी - पायात चपला नव्हत्या. खोटं कशाला बोला, आपल्याला तर स्वप्नातपण प्रश्न पडला की वाण्याने चपला नाही घातल्या तर त्याला अनवाणी तरी कसे म्हणणार? असो. शिक्षण सुशिक्षित असल्याने, त्याने पायातल्या वहाणा काढून कुणाला हाणले असण्याची शक्यता कमी आहे, देवळातंनं चोरीला गेल्या असतील बिचाऱ्याच्या. तर या अवतारातले शिक्षण आले आणि थेट रडू लागले. ओक्साबोक्शी नाही अगदी, मुसमुसणे का काय ते.
या पॉईंटला शिक्षण, त्याचे अपकमिंग मनोगत हे सर्व वाचून कोणाला लहानपणीचे निबंध आठवले, हा प्रकार बाळबोध वाटला, कोणी बोर झाले तर दोष माझा नाही, परिस्थितीचा आहे. (किंवा बोर झालेल्याचा असेल, आमचा नाही. बास्स.)
बरं. मी विचारले की, "का बाबा का रडत आहेस उगाच भरल्या घरात?"
ते म्हणाले की, "येड्या रडू नायतर काय करु? जनता लय पाठीमागे लागली आहे माझ्या. अर्थ नाही म्हणतात, मला स्टिरीओटाईप करतात, लोकं आईवरनं शिव्या देतायत की राव. तूपण शिव्या घालतोस मला"
"शिव्या द्यायलाच पाहिजेत लेका, त्रासच तसा देतोस तू. गृहपाठ काय, अभ्यास काय, दप्तराची ओझी काय, जनता ओरडेल नाहीतर काय?" असे वाक्य संपवायच्या आतच त्याने आपली गाडी रेटली,
"पण मी तुझ्याकडे हे विचारायला आलो की, साल्या तू तर अभ्यासाच्या नावाखाली काय केलेस ते माहिते मला, तसं बघायला गेलास तर खेळातपण काही तेंडुलकर नव्हतास, पालकांनी काही निर्णय लादले वगैरे नाहीत. लादायचेच असते तर पहिले तुला शाळेतून काढून पंतप्रधान रोजगारहमी योजनेला लावले असते. एकूण काय सामान्य मुलगा आहेस एक; तरीपण आज पोटापुरता खातोस, संध्याकाळी खेळतोस, नेटवर च्यायला नट्यांचे फोटो-बिटो बघतोस, मजा करतोस. माझा एकदम कमी सहवास लाभला तुला तरी मग तू का मला शिव्या देतोस? बाकी लोक देवू देत"
"मी सामान्य ईंजिनीयर राहीलो ना भाऊ" - असे मी स्पष्ट सांगितले एकदम, न लाजता, बाणेदार, उभी आठी घालून.
"मंग, तेच तर म्हणतोय ना? सगळ्यांनाच जेम्स बाँड व्हायचे आहे, एजन्सी कोट्यात सात नंबरचा बिल्ला एकच आहे की पण, माझा काय दोष?"

पुढे आमचे लय संभाषण झाले खाजगीत. आठवत नाही सगळे, मला असे तोंडावर कुणी सामान्य म्हणाले तर माझा मूडॉफच जातो.
एक होतं पोष्ट, संपली आमची गोष्ट.
**
इन जनरल पब्लिक आमच्या स्वप्नात येवून रडते व मग माझे मत बदलते असे एक लक्षात आले आहे माझ्या. समोरचा माणूस रडल्यास पर्स्युएबल आहे मी - Crysuable थोडक्यात.

***
#टाईप करताना ‘निसर्ग’ शब्दाचे चुकून ‘निसर्गा’ झाले - मुलीचे नाव म्हणून चांगले आहे की हो.
***

Friday, January 1, 2010

वर्ष खल्लास

दर एखाद्या अशा शुभेच्छेबल घटनेला नवीन पोस्ट टाकून आम्ही आमच्या ब्लॉगचे नळस्टॉपवरील एका राजकीय अभिनंदनफलकात रुपांतर केले आहे हे येथे मान्य करुन; आम्ही आज आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देवू इच्छितो.

माझ्या प्रिय चिंटू आणि मिनींनो,
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना चांगलं जावो. काल दारु प्याली असल्यास परत एकदा वाचा - "माझ्या प्रिय चिंटू आणि मिनींनो हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना चांगलं जावो". परत आम्हाला कुठे हॅप्पी नू ईअर केलेस तू असे म्हणतात हो लोक. आपण टून्न होता असे सांगितले तर स्वत:च्या पैशाने पितो-बितो लेक्चर ऐकायला लागायचे. असो. शुभेच्छांचा उत्तरार्ध - "तुमची प्रगती, भरभराट होवो, सुखसमृद्धी..."
काम संपलं.

३१ डिसेंबर साजरा करणे हे फॅड मी ईयत्ता पाचवीत असताना आमच्यापर्यंत आले. मध्यमवर्गीय जनतेला अचानक तीन चार कुटुंबानी एकत्र येउन भोंडलाटाईप काहीतरी करावे असे वाटू लागले. त्या नादात आमच्यासारख्या निरागस मुलांच्या कोमल मनावर खराखरा चरे पडले. सकाळी क्लासमधे ज्या मुलीला चिडवले तिच्या घरीच संध्याकाळी ३१ डिसेंबरचे पाहुणे म्हणून जावे लागणे, सायकल एका बाजूला कलती करुन सकाळी जिला स्टाईलमधे ओव्हरटेक केले तिच्याच दारात संध्याकाळी मोठ्ठे पितळी पातेले घेउन उभे राहायला लागणे असले प्रकार झाले हो. इमेज बिघडते ना, पालक लोकांना याचे गांभीर्य वाटत नाही. एकूण समाजात असा नियम केला पाहिजे की लहान मुलमुलींची मैत्री असेल तरच एकत्र सहकुटुंब भेटावे. मुली लय डांबरट असतात, असल्या एकत्र प्रसंगांचा गैरेफायदा घेवून मुलांना त्रास देतात. तुम्ही दोघे एकाच क्लासला ना म्हणल्यावर मुलीने उत्तर काय द्यावे? "होSSS, पण हा क्वचितच दिसतो मला". म्हणजे आईवडिलांना शंका येते की आपला मुलगा नियमित क्लासला जातो का परस्पर कुठे जावून आकडा लावतो, शिवाय आपले प्रगतिपुस्तक आहेच शक को यकीन मे तबदिल करने के लिये.
स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी. एकतीस डिसेंबर काय आपला सण आहे का? मी भात खावून झोपेन आपला असे दणदणीत सांगून मी सुटका करुन घेवू लागलो. मन उडाले माझे एकूण एकतीस डिसेंबरवरुन, नंतर कॉलेजमधे गेल्यावर मी उपचारापुरते नॉर्मल एकतीस डिसेंबरींग करु लागलो. टिव्हीवाले एवढे मन लावून काय काय कार्यक्रम बनवतात त्यामुळे सर्वात उत्तम म्हणजे टिव्ही बघणे पण लोक बघू देत नाहीत, कुठेतरी जाउचयात असा हट्ट करतात त्यामुळे जावे लागते.

संकल्प करणे मात्र मला मनापासून आवडते. काय संकल्प करावा याचा विचार मी फार उशीरा सुरु करतो त्यामुळे सहा-सात जानेवारी उगवतो माझ्या संकल्प्सना. आपण तसे मेहनतीने पाळलेपण आहेत हो काही संकल्प. बरेचदा माझा संकल्प असे की यावेळी आधीपासूनच अभ्यास करुन वार्षिक परिक्षेत चांगले गुण मिळवायचे. आधीपासून अभ्यास केल्याने नंतर सगळे विसरते असे लक्षात आल्याने मी तो संकल्प कटाप केला. नंतर एकदा संकल्प केला होता की नवीन वर्षापासून उतार आला की लुना बंद करायची, पेट्रोलचे पैसे वाचवायला. हा संकल्प मात्र चांगला चालला, लुनेला तो इतका आवडला की कधी कधी ती चढावरसुद्धा स्वत:हूनच बंद होउ लागली. यावर्षी दोन जॉबस्विच तरी मारायचेच असेपण ठरवले होते एकदा, ते नाही जमले. मागच्या वर्षीचा माझा संकल्प होता की रोज एक सिनेमा बघावा - कसोशीने पाळतो आहे तो मी अजूनही.
संकल्प बोर झाले. लोकं संकल्प नाव ठेवतात मुलाचे. थेंब पण नाव ठेवतात म्हणे लोक. थेंबे थेंबे तळे साचे म्हण ऐकल्यावर कसे वाटेल त्या चिमुकल्या जीवाला? हल्ली मी काही भूमितीमधली नावे पण ऐकली आहेत. आकृती. या मुलीला आकृती काढा प्रश्न जमत नसतील तर किती लाज? हे काही आज चालू नाही झालं. महाभारतापासून सुरु आहे , व्यास काय नी कर्ण काय. मला तर हातचा हे नाव फार आवडले आहे. त्याच्या मामाला मजा येईल - हा माझा भाच्चा, हातचा.
लोकांची मुलं, आपल्याला काये? आपण जावून एकतीस डिसेंबरींग करावे.
**

तळटिपा:
; - प्लिज नोट अर्धविराम आहे तो, किती लोकं वापरतात असा अर्धविराम आं, आं ? (आमचा अभ्यास असे सांगतो की "अर्धविराम" हा शब्द अर्धविराम चिह्नापेक्षा जास्त वापरला जातो, ही उपेक्षा व अन्याय दूर करण्याचा वसा मी घेतला आहे)
इच्छितो - अशा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद लुटूनच आयुष्य फुलवायचे असते हं.
क्लासमधे - क्लास म्हणजे वर्ग नव्हे, क्लास म्हणजे शाळेतल्या सरांच्या घरी जावून शिकण्याचे ठिकाण. क्लास आणि ट्यूशनमधे फरक हा की ट्यूशनवाले सर विद्यार्थ्याच्या घरी येतात आणि क्लासमधे उलटे. माहिती असलेले बरे असते.
आवडते - शक्य तेवढं नॉर्मल माणसासारखं वागावं हो, या समाजात राहायचे आहे ना आपल्याला?
लागली - मालक एवढं करतायत म्हणल्यावर I also need to go for that extra mile असे कुठल्याही वाहनाला वाटणं साहजिकच आहे

***