Sunday, April 26, 2009

च्युईंगम...

जड परिच्छेद
जीवनाच्या विविध स्थितींमधे प्रत्येक मनुष्यास एकतरी संतत-समस्या असते. उदाहरणार्थ -
बालावस्था : विविध आकारांच्या गोष्टी तोंडात पूर्णपणे घालता न येणे
कुमारावस्था : आवडती मुलगी जेव्हा जेव्हा बोलायाला येते तेव्हा गालावर पिवळीधम्मक तारुण्यपिटीका आलेली असणे
तारुण्यावस्था : वरिष्ठ अधिकारी बघतात तेव्हा नेमके युट्युब उघडे असणे आणि एरवी दिवसभर काम केले तरी त्यांनी चक्कर न टाकणे
वृद्धावस्था : रस्ता ओलंडायला सुरु करताच अचानक गाड्यांचा महापूर येणे
जड परिच्छेद समाप्त

बाल आणि कुमार वयातला मेज्जर प्रॉब्लेम म्हणजे च्युईंगम/बबलगमचा फुगा न करता येणे. शिट्टी वाजवता येणे आणि च्युईंगमचा फुगा करता येणे हे शालेय जीवनातले अतिशय महत्वाचे धडे आहेत, हे धडे ऑप्शनला टाकणे म्हणजे भूगोलाच्या पेपरमधे त्रिभुज प्रदेशांचा प्रश्न ऑप्शनला टाकण्यासारखे आहे.
पण बरेचदा योग्य मार्गदर्शनाअभावी मुले हे करु शकत नाहीत. मला चांगली शिट्टी वाजवता येते पण माझ्याहून दमदार शिट्टी वाजवणारे अनेक पाहिले आहेत मी, त्यामुळे मी हे शिकवू ईच्छित नाही. पण च्युईंगमचा फुगा [यापुढे: चिंफू] बनवण्यातला मी एक अग्रणी व स्वयंघोषित तज्ज्ञ आहे. मला माहित आहे माझे वय कमी आहे आणि एवढ्यातच मी स्वत:ला तज्ज्ञ म्हणतोय पण नजरथच्या ‘लव्ह हर्ट्स’ मधल्या ओळी(सोयिस्कर) येथे लागू होतात - "I’m young, I know - But even so - I know a thing or two..."

यापुढील लिखाणाची विभागणी विविध प्रकरणात केली आहे कारण विषय सविस्तरपणे मांडायचा प्रयत्न आहे. कुठलीही गोष्ट मूळापासून संपूर्ण शिकली आणि समजली की ती आयुष्यभर लक्षात राहते. ब्लॉगच्या मानाने महासविस्तर असले तरी विषयाच्या मानाने छोटेच आहे हे लिखाण.

अनुक्रमणिका
पूर्वसूचना
च्युईंग/चिंफू - नैतिक चौकट व काही अलिखीत नियम
चिंफु कधी बनवावा चिंफु कधी बनवू नये
चिंफु बनवण्याची प्रक्रिया(सचित्र)
पाठ १ पाठ २ पाठ ३ पाठ ४
पाठ ५ पाठ ६ पाठ ७ पाठ ८
मराठी प्रतिशब्द उपसंहार
शब्दसूची

*हे सर्व एका बैठकीत वाचाण्याचा प्रयत्न केल्यास होणाऱ्या परिणामांना मी जबाबदार नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------


पूर्वसूचना

१. च्युईंगम शरीराला हानिकारक असू शकते, आमचे सर म्हणायचे च्युईंगम खाल्ले की कॅन्सर होतो.
२. एकाच दिवसात अनेक च्युईंगम गिळल्यास ऑपरेशन काढून ती काढावी लागतात
३. प्रत्येकाने आपल्या वा आपापल्या पालकांच्या जबाबदारीवर च्युईंगम खावे
४. च्युईंगमचा उगम, पहिले च्युईंगम कोणी बनविले, पहिला चिंफू[च्युईंगमचा फुगा] कोणी बनविला, सर्वात मोठा चिंफु कुणी बनविला अशी माहिती येथे मिळणार नाही, विकी आहे त्यासाठी.
अनुक्रमणिका


च्युईंगम/च्युईंगमचा फुगा - नैतिक चौकट व काही अलिखीत नियम

सर्वच अलिखीत नियम लिखित स्वरुपात जतन केले पाहिजेत या मताचा आहे मी. त्याशिवाय एखाद्या बाबीच्या संदर्भातली नैतिक भूमिका कशी विषद करता येणार? बऱ्याच बाबतीत नीति अनीतिच्या सीमा धुसर असतात पण च्युईंगमबाबत तसे नसल्याने च्युईंगम खाण्याच्या व च्युईंगचा फुगा बनविण्याच्या प्रक्रियेची नैतिक चौकट समजावणे सोप्पे आहे. पुढे प्रत्येक अलिखित नियम व त्यामागची नैतिक भूमिका मांडली आहे -

१. एकावेळी एकच च्युईंगम खावे:
विविध आकाराची च्युईंगम बाजारात मिळत असल्याने कधी एखादे च्युईंगम छोटे वाटायची शक्यता आहे. अशावेळी २ छोटी च्युईंगमस्‌ एकत्र तोंडात टाकण्याचा मोह होईल पण तसे करणे म्हणजे हजर च्युईंगमचा अपमान आहे. याउलट, जर तुम्ही च्युईंगम तोंडात टाकणार त्यावेळेला कुणी मित्रमैत्रिण आले तर अर्धे च्युईंगम त्यांना देवू नये. च्युईंगम म्हणजे काही बर्फी/गोळ्या/तीळ नव्हेत वाटून खायला. प्रत्येक च्युईंगमची स्वत:ची फुगा बनविण्याची एक क्षमता असते तिंस अशा गोष्टींनी हानी पोहोचते.

२. च्युईंगम कचराकुंडी सोडून कुठेही फेकू/चिकटवू नये:
आज समाजात च्युईंगमची जी काही बदनामी झाली आहे ती मानवाच्या अशा निष्काळजी वृत्तीमुळेच. तुम्ही पर्यावरणप्रेमी असाल नसाल पण च्युईंगमला कचराकुंडीत टाकणे हे प्रत्येक सुजाण मनाचे कर्तव्य आहे. असे केले तरच त्याचा पुन्हा वापर होउन नवे च्युईंगम बनू शकते. कुणाचीतरी टिंगल करण्यासाठी, मजा करण्यासाठी म्हणून कधीही ते बाकावर/केसात/शर्टाला चिकटवू नये. कितीही चघळा, चावा, ताणा च्युईंगमला काही वाटत नाही. पण असे नाही तिथे चिकटवले की इट फीलस्‌ युज्ड ! त्याला गृहित धरुन त्याचा वापर केला आहे असे वाटून त्याच्या भावना दुखावतात. [कुणाच्या शर्टाला कुणी नाठाळाने च्युईंगम चिकटवले असल्यास उलट्या बाजुने ईस्त्री करा, निघुन पडेल ते - केस, बाक यांच्यावर नको हा प्रयोग]
आजकाल रयतेत जागरुकता वाढीस लागली असून जनता च्युईंगमला त्याच्या रॅपरमधे गुंडाळूनच त्याला कचराकुंडीत टाकते. इथे मला च्युईंगमद्वेषी लोकांना सांगावासे वाटते - "All that litters is not the chewing-gum"

३. कमीत कमी हाताळणी:
प्रथम तोंडात टाकताना, च्युईंगमचा तोंडावर चिकटलेला फुगा तोंडात ढकलताना आणि च्युईंगम फेकून देताना या तीन वेळा सोडल्या तर ईतर कधीही च्युईंगम हाताळू नये. फुगा काढण्यासाठी फक्त तोंडाच्या अवयवांचा वापर करावा. च्युईंगम तोंडात असताना कुणी काही खायला दिले आणि च्युईंगम टाकून द्यायची ईच्छा नसेल तर त्याला हातात घेवू नका. शेवटच्या दाढेमागे चिकटवून ठेवा, म्हणजे खाताना मधे मधे येणार नाही.

४. च्युईंगम चावण्याचा कमाल व किमान कालावधी:
च्युईंगम किमान दोन तास तरी खाल्लेच्च्च्च पाहिजे. च्युईंगममधला गोडवा संपल्यावर तातडीने ते टाकून देणे म्हणजे दूध देत नाही म्हणून गायीला खाटिकाकडे पाठविण्यासारखे आहे ! इथे मुद्दा क्रमांक २ मधील सर्व विवेचन लागू होते. पूर्ण रसास्वाद घेवून लगेच च्युईंगम फेकून देणारा एकतर कर्मदरिद्री किंवा करंटाच. तशाच अपवादात्मक परिस्थितीत लगेच च्युईंगम टाकून देणे नैतिक ठरते - थोर माणसे किंवा गुरुजन आल्यास.
कमाल कालावधी अनंत ! कितीही वेळ खावा.

थोडक्यात काय तर, खाणे/चावणे/फुगा काढणे/शेवट टाकून देणे ह्या साहजिक क्रिया सोडल्यास बाकी काहीही करताना मी माझ्या आवडत्या पुस्तकाला अशीच वागणूक देइन का असा विचार करावा.
अनुक्रमणिका


चिंफु कधी बनवावा

१. भांडण हमरीतुमरीवर आले असताना, समोरच्याने बिनतोड मुद्दा मांडला व आपल्याला काही उत्तर सुचले नाही तर एक फुगा बनवावा, आणि ट्टाप आवाजाने फोडून दुसरीकडे बघावे
२. "मग मी काय करु", "मला काय त्याचे", "हू केअर्स", "काय बोर मारतोय", "माहिते, लय मोठा बॉन्ड आहेस", "बरोबर आहे सगळे पण आपण काय करु शकतो आता?"
वरिलपैकी कुठलेही वाक्य म्हणायचा प्रसंग आला असताना चिंफू काढावे. बास. बथाव
३. काहितरी अफलातून सुचल्यावर
४. आयुष्यात अचानक नैराश्य आल्यास, आपण युजलेस आहोत असे वाटल्यास.
५. मॅच बघताना
६. एकटेच बसून कुणाची वाट बघत असल्यास
चिंगमचा फुगा बनवायचे प्रसंग लाखो असतात, ते ओळखायला शिकले पाहिजे - सरावाने जमेल. प्रत्येक प्रसंगात मोठ्ठा फुगा काढून तो तात्काळ फोडून, फाफेसारखा ट्टॉक्क आवाज काढणे महत्वाचे आहे.

चिंफु कधी बनवू नये
१. दिवाळीत पूजा सुरु असताना - बाबा रागावण्याची शक्यता असते.
२. शाळेत तास सुरु असताना - सर हाणणारच की.
३. मिटिंगमधे साहेब बोलत असताना - वार्षिक ऍप्रेजलवर वाईट परिणाम होउ शकतो, पर्यायाने कमी पैसा, पर्यायाने कमी च्युईंगम, कमी फुगे...
४. कुठलेही बिल भरायच्या रांगेत - बाकीची लोके वैतागतात, त्यांना वाटते की रांग पुढे सरकतच नाहिये बराच वेळ.
५. सिंगापूरमधे - तिथे च्युईंगमच खावे का नाही प्रश्न आहे, काहीतरी कायदा आहे म्हणे त्यांचा.
६. अस्मानी/सुल्तानी संकंटांच्या वेळी - च्युईंगम खाणे म्हणजे "टू ऍक्ट कूल" असे समजतात लोकं, त्यात चिंफु बनविणे म्हणजे तर महाकूल.
[ तुम्ही च्युईंगम खात असाल तेव्हा कुणी नदीत बुडत असेल तुम्हाला पोहता येत नसेल तर पहिल्यांदा च्युईंगम टाकून द्या. विमानाचे अपहरण झाले असल्यास दहशतवाद्यासमोर फुगा आज्जिबात काढू नका, लवकर मराल]
७. अंघोळ करताना - तोंडाला साबण लावताना फुगा साबणाला चिकटला तर ऑफिसला जायला उशीर होतो.
थोडक्यात, केव्हाही सारासार विचार करुनच चिंफू काढा. खेरीज ज्यांना समाजाचे नियम न जुमानता गौरी देशपांडेच्या नायिकांप्रमाणे रहायचे आहे त्यांनी कुठेही कधीही फुगे काढावेत, दे आर मोअर दॅन वेलकम.
अनुक्रमणिका


च्युईंगचा फुगा बनवण्याची प्रक्रिया(सचित्र)


पाठ १ योग्य च्युईंगम निवडणे
अतिशय सोप्पे आहे. बाजारात मिळणारे सर्वच च्युईंगमस्‌ साधारणपणे चांगले फुगे प्रसवू शकतात. फरक असतो तो स्वाद आणि चवीत. माझा अनुभव असा आहे की फारच नवीन कुठलातरी फ्लेव्हर असलेल्या च्युईंगमपासून मोठा फुगा होत नाही. [उदाहरणार्थ आल्याची चव, खसची चव] पण छोटा का होईन फुगा हा होतोच. अजुन एक निरिक्षण असे की आयताकृती लाद्या असलेले व प्रत्येक तुकड्याला स्वत:चे रॅपर असेल तर त्या च्युईंगमपासून मोठा फुगा होतो. औषधाच्या गोळ्या मिळतात तशा पाकिटात मिळणाऱ्या च्युईंगमचा तर फारच छोटा फुगा होतो. "आत च्युईंगम आणि वर गोळी" किंवा "आत कसलातरी गोळी आणि वर च्युईंगम" असला संकरित प्रकार पण शक्यतो टाळा. आजकाल दात स्वच्छ व पांढरे ठेवणारी च्युईंगमस्‌ मिळतात ती वापरली तर उत्तम !
असो. तुमच्या आवडीनुसार कुठल्याही च्युईंगमने सुरुवात करा. [मासे खायची चव जशी डेव्हेलप होत जाते तसे तुम्ही नंतर आपसुकच चांगली च्युईंगमस्‌ वापरायला लागाल]

पाठ २ च्युईंगम पूर्ण रसग्रहण
च्युईंगम तोंडात टाकल्यावर पहिली दहा मिनिटे त्याचा पूर्ण आस्वाद घ्या, फुगा करायचा प्रयत्नपण नको. यावेळी फुगा होतो पण मग च्युईंगमचा रसभंग होतो. थोड्या वेळाने तुम्हाला लक्षात येईल की तोंडात असलेला पदार्थ बेचव झाला आहे, हीच पाठ ३ ला जायची योग्य वेळ.
अनुक्रमणिका


पाठ ३
च्युईंगम सर्वंकषरीत्या चावणे
चिंफु बनविण्यात सर्वात मेहनतीचे काम. रसहरणापश्चात च्युईंगमला चाव चाव चावावे. लंपनच्या भाषेत एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट वेळा चावा. असा एकही दात असता कामा नये की ज्याने च्युईंगमवर घाव घातला नाही. सरावाने कधी थांबावे ते कळेल पण साधारणपणे जेव्हा च्युईंगममधे एकप्रकाराचा एकजिनसीपणा येतो आणि त्याबरोबरच ते अमीबाप्रमाणे कोणताही आकार घेउ शकते तेव्हा पाठ चार कडे वळावे.
[कधी कधी खूप चावल्यावर, लाळ कमी झाल्यासारखे वाटते किंवा कोरड्या ढेकरा येतात अशा वेळी ५ मिनिटे चावणे थांबवावे, पाचच मिनिटात मुखांतर्गत स्थिती पूर्ववत होईल मग पाठ ४ मधली कृती करा]

पाठ ४ च्युईंगमची पातळ लादी बनविणे

आता च्युईंगमला तोंडाच्या पुढच्या भागात खेळवावे. दातांच्या मागच्या बाजूचा वापर करुन त्याची पातळ लादी करायचा प्रयत्न करावा, लादी जेवढी पातळ होईल तेवढी चांगली. परंतु हवाच धरु शकणार एवढी पातळा लादी नको.

नंतर जीभेने हळूच ताणून ही लादी तोंडाबाहेर आणावी यावेळेला काही भाग तोंडातच आत राहिला पाहिजे, फुग्याचा देठ असल्यागत. [आकृतीत लाल चौकटीत दाखविल्याप्रमाणे] आता फक्त च्युईंगममधे हवा सोडणे राहिले
अनुक्रमणिका


पाठ ५
चिंफु चिंफु, लॅंड !

जीभ हळूच काढून घेवून आत हवा सोडावी आणि फुगा फुगवावा. ह्या क्षणी बेसिक चिंफु तयार आहे - पुढचे सगळे इम्प्रोव्हायजेशन. जेवेढी जमेल तेवढी हवा सोडून फुगे काढा. मोठ्ठे फुगे काढायला सुरुवात करण्याआधी दोन तीन छोटे छोट फुगे पटापट काढावेत [नारळ फोडण्याआधी कसा हलकेच आपटतात एक दोनदा तसे.]



*मोठ्ठा फुगा बनवायचा असल्यास शक्यतो पंखा सुरु असताना प्रयत्न करु नये, वाऱ्याने फुग्याच्या बाहेरील भिंती हलून कोमेजल्यागत होतात,मग त्या पूर्णपणे फुलु शकत नाहीत.

पाठ ६ चिंफु फोडणे
समाधान झाल्यावर, फुगा पूर्ण टरारला असताना खणखणीत आवाज होईल असे पाहून चिंफु फोडून टाकावा. फुगा मोठ्ठा असेल तर तो फुटल्यावर बरेचदा पापुद्रे तोंडावर चिकटायची शक्यता असते अशावेळी ते काढाण्यासाठी धसमुसळेपणा करु नये. शांतपणे तोंड आणि जबडा हलवूनच कमीत कमी हात वापरुन च्युईंगम पुन्हा तोंडात ढकलावे.
अनुक्रमणिका


पाठ ७
आवर्तने
एक ते सहा पाठांची आवर्तने करावीत. चांगला फुगा काढायला जमायला लागल्यास ईतरांस पण अशीच आवर्तने करावयास सांगावे

पाठ ८ काही नाही
सम आकडा असावा म्हणून हा पाठ आहे नाहीतर वर जिथे लिंक्स बनविल्या आहेत तिथे नीट दिसले नसते.
अनुक्रमणिका


मराठी प्रतिशब्द

च्युईंगम आणि बबलगम हे दोन्ही शब्द ईंग्लिशमधे एकमेकांऐवजी सर्रास वापरले जातात. परंतु च्युईंगम आणि बबलगममधे थोडासा फरक आहे. तो समजून घेण्यास थोडेसे विषयांतर करावयास लागेल.

ईंग्लिशमधे एक प्रसिध्द म्हण आहे - "At the end of the day, every bubble gum is a chewing gum". एखाद्या कलेत/शास्त्रात अत्त्युच्च प्रावीण्य मिळवणाऱ्याला त्यातल्या सर्वसाधारण बाबी माहित असतातच असे सांगयचे असते तेव्हा ही म्हण वापरतात. उदाहरण देतो -
माझ्या मित्राला जाम सर्दी झाली होती तेव्हा मी शेजारच्या फ्लॅट्मधल्या डॉक्टरांकडे जावू म्हणालो तर तो म्हणाला, "पण ते तर एम्‌. डी. गायनॅक आहेत". यावर हलकेच हसून मी म्हणालो -
"ऍट द एन्ड ऑफ द डे, एव्हरी बबलगम इज अ च्युईंगम"
तर सांगायचा मुद्दा हा की, बबलगम हे खास फुगे काढण्यासाठी विशेषकरुन बनविलेले च्युईंगमच होय. त्यात च्युईंगमचे सर्व गुणधर्म असतातच. पूर्वी च्युईंगमस् चिकट व घट्ट असत. काळाच्या ओघात बबलगमस्‌ला ही च्युईंगमच म्हणू लागले पण ही अर्थछटा लोकांना कळावी म्हणून हा म्हणप्रपंच.

च्युईंगमला मराठीत वेगळा शब्द असल्यास माहित नाही. प्रत्येक ईंग्लिश शब्दाला मराठीत प्रतिशब्द असावा का? तो भाषाशुध्दीचा अतिरेक नाही का होणार? इत्यादी प्रश्न येथे गैरलागू आहेत. आजपर्यंत विविध देशात विविध कंपन्यांची अनेक च्युईंगमस्‌ मी विविध वेळी खाल्ली आहेत. खाल्ल्या च्युईंगमला जागावे म्हणून त्यांना मराठी प्रतिशब्द अर्पण करणे माझे कर्तव्य आहे.

च्युईंगम - चिंघळविंथ.
मूळ व्युत्पत्ती: चघळणे + डिंक. बोलीभाषेतील उच्चार "चिंगम" ला ट्रिब्युट म्हणून चिं ने सुरुवात तर रवंथ ला ट्रिब्युट म्हणून विंथ

बबलगमला मराठी प्रतिशब्द - चिंफुडिक
मूळ व्युत्पत्ती: च्युईंगम + फुगा + डिंक.
अनुक्रमणिका


उपसंहार

पाने संपतील पण च्युईंगमचा विषय संपायचा नाही, आणि संपवायचा म्हणला तरी कसा काय संपू शकेल - च्युईंगम कधी संपले आहे का?
च्युईंगममधला रस संपतो पण स्वत: च्युईंगम? शरीर नष्ट होते पण आत्मा? रुप जाईल, वैभव जाईल पण ‘स्व’त्व जाईल? कितीही चावा, त्यातला रस संपवून टाका, जबड्यातून कितीहा वेळा फिरवा, वैफल्याने गिळून टाका पण ते स्वत: नष्ट नाही होणार - मूकपणे ते सांगत राहील, "जगण्याचा माझा धर्म आहे, मी जगणार. मला मारा, संपवा तरीही मी उरणार".

निसर्गाने मत्त होउन कधी मानवाला विचारले "अरे क्षुद्रा, हे डोंगर, दऱ्या, समुद्र असीम आहेत, या ग्रहावरचे संपले तर त्या ग्रहावर आहे. असंख्य आकाशगंगात माझे अगणित ठसे आहेत. मर्त्य मानवा, तू निदान तुझ्या ग्रहावर हजार वर्षे टिकेल असे काही बनविले आहेस का?"
यावर मनुष्याने "अनंत आमुची ध्येयासक्ती...किनारा तुला पामराला" प्रकारचे तात्विक उत्तर देण्यापेक्षा एक छोटेसे च्युईंगम दाखविल्यास निसर्गाचा थरकाप उडेल. जीवनातील सर्व शाश्वत मूल्यांचे अमर प्रतिक तेही मानवाने बनविलेले!

असो. अ लॉट लाईक लव्ह मधे नायक/नायिका ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या भावना शब्दांत व्यक्त करत नाहीत. दरवेळी नायिका म्हणते - "डोन्ट, यु’ल रुईन ईट". च्युईंगम,च्युईंगमचा फुगा यावर अजून बरेच काही लिहावेसे वाटते आहे(कवितासुध्दा) पण मन म्हणते आहे "बास, यु’ल रुईन ईट"

काही गोष्टी पूर्णपणे शब्दात सांगता येत नाहीत आणि त्या सांगायचा प्रयत्नही करु नये.
हिरव्यागार माळावर चरणाऱ्या गुरांच्या पाठीवर किडे टिपणारे पाखरु बसते तेव्हा त्या गुराच्या मनात उमटलेले भावतरंग - मांडता येतात शब्दांत ?
तरारलेल्या गवताच्या पातीवरल्या टपोऱ्या दवबिंदुवर जेव्हा पहिला सूर्यकिरण पडतो त्यावेळचे गवताचे आणि दवाचे हितगुज - मांडता येते शब्दांत ?
निद्रिस्त ज्वालामुखी जेव्हा अचानक पर्वतमाथ्याची पहिली खपली काढतो तेव्हा पाझरणाऱ्या लाव्हाचा आनंद - येतो का सांगता शब्दात ?

च्युईंगम खाताना, च्युईंगमचा फुगा बनवितानाची अनुभुती पूर्णपणे शब्दबध्द करण्याचा प्रयत्न करु नये - ती शब्दातीत आहे.
अनुक्रमणिका


शब्दसूची

चिंफू - च्युंईगमचा फुगा
फाफे - फास्टर फेणे
बथाव - अ बबल इज वर्थ थाउजंड वर्डस्‌

***

Monday, April 20, 2009

दारधार

पाच मिनिटे दारावर ठकठकवून, धाडधाड धुडधुड करुनपण दार नाही उघडले तर बाहेर काय करत बसावे माणसाने ?

दारधार

दार उघडा दार
लागलीय रक्ताची धार
केलेत सपासप वार
गळ्यात चपलांचा हार
आणि फासलय तोंडाला टार
तासभर गाढवावरच भार
आणि कुत्र्यागत मार

होतेकी आमचेपण दोस्त चार
बसलेले उबवत पार
दोघे झाले फटफटीवरुन फरार
बाकी दोघे कडेलाच गप गार

दार उघडा दार
खरंच लागलय हो फार

आता अगदी मेलो ठार
तरी नको ती नासकी धार
आणि नको बा चरसी तार
लांबनच बरी ती नटवी नार
बाप्पा, आता कायमचा बंद तो बार
*
देजा वू सारखे वाटते आहे, माझीच ताजी ताजी गरम कविता आहे का मी आणि कुणाची कुठे वाचली होती पूर्वी?
यमकपाऊस अलंकारात आहे ही कविता.

गस्त, फस्त, त्रस्त, ध्वस्त, मस्त, चुस्त - नको चुस्त नको