Sunday, November 23, 2008

थाप

बाकी काही न बघता, लोकांना ते केवळ खोटं किती बोलले या हिशोबाने स्वर्ग-नरकात पाठवायचे ठरविल्यास मी नरकातला सेलिब्रिटी म्हणून ओळखला जाईन.
मी एक अट्ट्ल ‘कंपल्सिव लायर’आहे. [हे वाक्यच डेड्ली आहे, खरे म्हणा खोटे म्हणा, भावार्थ असा निघतो की लिहिणारा माणूस खोटारडा आहे]

असो. आत्ता हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे, आत्ताच एक ताजी गरम थाप मारली आणि तासाभराने मनात विचार आला - आयला, आपण आत्ता का खोटे बोललो ?
एका ओळखीच्या मुलीने(मैत्रिण नाही म्हणता येणार) फोन केला, घरी येते म्हणाली. मी म्हणालो, नको आत्ता नको येवूस थोड्या वेळाने ये, आत्ता मी बाहेर आहे, घराची ड्युप्लिकेट किल्ली बनवतोय. असेही नाही की मला तिला कटवायचे होते, थोड्या वेळाने मी गपगुमान फोन केला, ती आली etc etc.

पण विनाकारण मी तिला ड्युप्लिकेट किल्लीची थाप का मारली हे माझे मलापण ठाऊक नाही. तिला पण थाप पटली होती राव :S ‘थाप मारणे चालु आहे’ हे स्वतःलाच माहित नसेल तर दुसऱ्याला काय संशय येणार ?

George एकदा Seinfeld ला म्हणतो - "Jerry, just remember, it's not a lie if you believe it"

***


Friday, November 21, 2008

...

साडेआठ हजारावर आला सेनसेक्स तेव्हा गुंतवायला एक दमडीपण नाही. २१ हजाराच्या आसपास होता तेव्हा म्हणजे, कुठुनपण अचानक पैसा मिळायचा - जुन्या नोकरीतले पीएफचे पैसे ११ महिन्यांनी नेमके सेनसेक्सने २० ओलांडले आणि मिळाले.
आता काय घेऊ आणि काय नको असे झाले आहे आणि पैशाची बोंब ! सेनसेक्स १० च्या आत आहे, दुसरे एक पीएफ खाते पहिल्याच्यापण आधी बंद केले होते, जवळजवळ दिड वर्ष झाले - अजुन एक पैसा नाही मिळाला.

कुणाचेतरी लॉज् होते - तुम्ही ज्या रांगेत आहात ती दुसऱ्या रांगेपेक्षा जास्तच हळू पुढे सरकेल वगैरे- खरे आहे बाबा अगदी :(

***


Thursday, November 20, 2008

पुणेरी रग्बी

लाखो कारणे आहेत पुण्याचा अभिमान बाळगण्याची, त्यात अजून एकाची भर !

"पुण्यातल्या मुलींच्या रग्बी संघाला हॉंगकॉंगहून आमंत्रण"

ही बातमी ऐकूनच भरुन आले, डोळे डबडबले, छाती फुलली, शेवट नाकातला जो सायनस का काय असतो तो, घशात ढकलून "घ्र्का घ्र्का..स्म्म्म्म...sssss" असे केल्यावर सावरलो मी कसाबसा.

आता हा संघ तिकडे जावो, न जावो, जिंको, हरो आमाला कायबी फरक नाय पडुचा...आमंत्रण आले काय कमी आहे का आणि चेष्टाय का रग्बी खेळायची म्हणजे?

अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले, परदेशी खेळांची कसली कौतुके, रग्बी कसली खेळता कबड्डी खेळा, असे अकलेचे तारे कुणाला तोडायचे असतील तर त्यांनी भले तोडावेत, आम्ही काही थांबवले नाही.
लोकशाही आहे - तुमची अक्कल, तुमचा हात, तुमचे तारे, पोतंभर तोडा आणि तुळशीबागेत जावून विकून या, आम्हाला काय घेणं आहे.

एकदा ‘याचि देहा, याचि डोळा’ रग्बी पाहिली म्हणजे कळेल हा काय भारी प्रकार आहे मग पुण्याचा जाज्ज्वल्य अभिमान असा शँपेनसारखा फसफसत वर नाही आला तरच नवल.

***