Sunday, February 12, 2017

खेमक्याची गोष्ट


आज अचानक आरेवाडीच्या काकांची आठवण झाली आणि त्यांची ती सुप्रसिद्ध खेमक्याची भुताची गोष्ट. गोष्ट सस्पेन्स वगैरे काही नाही, भितीदायक तर अजिबातच नाही, एकदम प्रेडिक्टेबल आहे, पण काका आवाजात चढउतार करुन ती अश्शी काही सांगायचे की बासच. वाचताना कदाचित तेवढी(किंवा काहीच) मजा येणार नाही.

अकरावी-बारावीपर्यंत मी नियमीतपणे सोडवीच्या मावशीकडे जायचो. नंतर त्यांनी गाव सोडलं मग आमचे जाणे तर संपलेच. मावशी कुलकर्ण्यांच्या वाड्यात बिर्‍हाडकरू होती. वाडा म्हणजे नावाला वाडा - मोठ पडकं घरच ते. मधे मोकळी जागा, त्यामागे लांबरुंद सोपा होता, आणि चारीबाजूनी दोन-दोन छोट्या स्वतंत्र खोल्यांची सबघरं, एका कडेला पाण्याची टाकी. (संडास म्हणजे टाकीमागचे कॉंग्रेस गवत).
वाड्यात ताई(मालकीण) आणि अजून चार बिर्‍हाडं होती. ताई एकट्याच रहायच्या - मुलगा, सून, नातवंड सुट्टीत पाटणहून यायचे, बाकी बिर्‍हाडकरुंकडचे पाव्हणे पण त्या सुमारास यायचे - मेमधे संध्याकाळी सगळ्यांची मधोमध जेवणं उरकली की तशाच खरकट्या हातांनी दोन-चार तास गप्पा. आरेवाडीचे काका आले असले तर ठरवून भुताच्या गोष्टी, मग चांगला बारा-एक वाजेपर्यंत कार्यक्रम. आरेवाडीचे काका म्हणजे ताईंचा मावसभाऊ. त्या भागातले नावाजलेले आचारी होते, पण मला आठवतयं तसे त्यांनी ते काम थांबवलेलेच होते. खरेतर ते आजोबांच्या वयाचे पण सगळे त्यांना काका म्हणायचे म्हणून आम्हीपण काका.
तसे लोकात जास्त रमणारे नव्हते ते, मोजकंच बोलणार, तेपण फक्त ताईंशी आणि त्यांच्यात्यांच्या नातवंडांशी. ते असं प्रीसंध्याकाळ यायचे. फेटा काढून ठेवून, नॉयलॉनची चट्टेरीपट्टेरी पिशवी खुंटीला टांगायचे. आत बसून ताईंशी तासभर गप्पा मारुन मग हनुमानाला जायचे ते थेट जेवणाच्या वेळी हजर. काका आलेले कळालं कीच आम्ही सगळे एक्साईट व्ह्यायचो - आज जेवताना भुताचा विषय निघणार म्हणून, विशेषत: आम्ही शहरातली मुलं.

जास्त वर्णन करत बसलो तर  खेमक्याच्या गोष्टीपर्यंत पोचणार नाही आपण. जेवण झाल्यावर कुणीतरी मोठ्ठ माणूस म्हणायचचं - काका, तो खेमक्याचा काय हो तुमचा अनुभव, सांगा की, खरं म्हणायचं का गोष्ट नुसती? मग काकांचा नूरच पालटायचा.
*
खेमक्याची गोष्ट

अरे ती गोष्ट नाही बाबा, असा अनुभव, कधी विसरणारच नाही बघ. तसा मी माणच्या बाहेरच्या कामाला नाहीच म्हणायचो. पण लाडूमामासारख्या खणखणीत माणसाकडून निरोप आल्यावर नाही म्हणायला जागाच नव्हती. चार मुलींवर मुलगा झालेला त्यामुळे खेमक्याच्या नामदारांना गावजेवण घालायचे होते. पाचसहा गावं जेवणार होती. मला खास जिल्बीसाठी आणि दशरथदादांना बुंदीसाठी माणमधून बोलावणे धाडले होते. आदल्यादिवशी रात्रीच पोचलो आम्ही दोघं, इनामदारांच्या घरातच सगळ्यांची रहायची व्यवस्था केली होती, घर कसलं गढीच होती. इनामदार येवून जातीनं चौकशी करुन गेले. किती माणसं होतील, ऐनेवेळेला सामानासाठी कुणाला हाक मारायची वगैरे सगळं सांगून गेले, लाडूमामांनी मोठ्ठं काम केलं बघा माझं, अस दोनदोनदा म्हणाले.
दुसर्‍या दिवशी पहाटेपासून जो पिट्ट्या पडला म्हणून सांगू. दुपारी चार काय पाचपर्यंत पंगती उठत होत्या. नुस्ता मठ्ठा म्हणशील तर दर पाच मिनीटाला बंबाएवढा संपत होता. आमची दोन्ही बारीची जेवण, एकाचवेळी संध्याकाळी झाली. जेवणं झाल्यावर इनामदारांनी सगळ्यांना पाकीटं दिली, म्हणाले निजा इथं आणि उद्याचच निघा आता. आम्ही एवढं थकलो होतो की आम्हाला काय, पडत्या फळाची आज्ञा.

इनामदारांच्या माणसानं सोप्यात प्रत्येकाला एकेक जागा दिली. आम्ही आपापल्या पिशवी मानेखाली घेतल्या आणि तिथे लागलीच पाठ टेकवली. अर्ध्यातासाभरात वाड्यात निजानीज झाली. मला अतिश्रमाने म्हणा किंवा दरथदादांच्या घोरण्याने म्हणा झोपच लागेना. तिथून उठलो, जिन्याशेजारी बसलो थोडावेळ, पाठ धरली होती त्यामुळे जास्तवेळ बसवेना. मग परत आपल्या जागी झोपायला चाललो तेव्हा सोप्याच्या कोपर्‍यात एक ओटा दिसला. त्याच्यावर चांगलं स्वच्छ पांढरं जेन घातलं होतं. मला वाटलं एखाद्या गड्याची झोपायची जागा असेल, लघवीबिघ्वीला गेला असेल. मी माझ्या जागेवर झोपायला गेलो, झोप काही परत येईना. मग परत ओट्याकडे नजर गेली तर रिकामाच. दुसर्‍या जागी झोप लागेल कदाचित असा विचार करुन मी चंबुगबाळं आवरुन तिथे झोपायला गेलो. आणि पाठ टेकताक्षणीच जी झोप लागली की ज्याचं नाव ते.
कितीवेळ झोपलेलो काही आठवत नाही, अचानक खूप उकडायला लागलं, परक्याच्या घरात असल्यानं मी काही शर्ट काढला नव्हता. एवढं उकडायला लागल्यावर काढला, आणि पहाटेच्या वेळी मात्र घालू परत असा विचार करुन झोपलो. जरा वेळ झोपतोय तोवर पाठीला कडकडून काहीतरी चावलं, बघितलं तर मुंगीबिंगी काही नव्हती. झोपलो तसाच दामटून. पण थोड्याच वेळाने आवाज आला - ए ऊठ, इथे नको झोपूस. मला वाटलं भास झाला, मी दुर्लक्ष केले तर आवाज वाढला. आता पेकाटात काठी टोचत होती आणि वरुन आवाज येत होता - ए ऊठ, आमची जागा आहे ही, उठ पटकन, दुसरीकडे नीज. आता मात्र मी घाबरलो, झोप उडाली, खाडकन डोळे उघडून पाहिलं तर आजूबाजूला कोणी नव्हतं. मग परत आवाज आला - इकडं वर बघ, आमची जागा आहे ही, इथं नाही झोपायचं, इथून ऊठ, दुसरीकडं जा, तुला काही त्रास देणार नाही आम्ही. मी वर पाहिलं तर तुळईवर सात माणसं बसली होती, मळका शर्ट, पांढरे धोतर, तुळईवरुन चौदा पाय लोंबकाळत होते. आश्चर्य वाटेल तुम्हाला, भूतं बघतोय हे मला कळालं होतं. पण नुसता आवाज ऐकून जी भिती वाटत होती ती त्या सात जणांना बघितल्यावर कुठल्या कुठं पळून गेली. मी त्यांना म्हणालो - अहो इथे चांगली झोप लागली होती तुम्ही उठवेपर्यंत, बाकी कुठे झोप येत नाहीये. खूप दमलोय हो, जिलब्या तळून हात खांद्यापासून मोडून आलाय.
वरच्यातला एकजण म्हणाला, आचारी आहेस का तू? मी म्हणालो - होय हो. तेवढ्यात दुसरा म्हणाला, गळ्यात माळ आहे, वारीला जातोस का? मी म्हणालो - हो, नियमीत नाही तसा पण दोन-तीन वर्षातून एकदा तरी चुकवत नाहीच. तुळईवर बसलेला शेवटचा ईतरांना उद्देशून म्हणाला - जाऊ दे गड्यांनो, आपल्यासारखाच आहे. मग मला म्हणाला - हे बघ एवढी रात्रच हां, उद्या परत येशील आणि इथे झोपायचंय म्हणशील तर तसं नाही चालणार. मी म्हणालो - नाही हो, उद्या सकाळीच खेमका सोडणार मी.
बरं बरं, झोप मग - असं म्हणत ते सातजण शांत बसले, मी एकवार वर नजर टाकली तर चंची काढून तंबाखू मळत बसले होते. मग पांघरुणात डोकं खुपसून ढाराढूर झोपलो.

सकाळी जाग आली ती गलबल्यानंच. पांघरुण काढून उठतो तोवर कळालं की, आख्खा वाडा सोप्यात जमला आहे आणि सगळे माझ्याकडे बघताहेत. जरा पुढं, आम्हाला अंथरुणं घालून देणारा कालचा गडी दातखीळ येवून पडलेला, दोनचार जण चप्पल-कांदा घेवून त्याच्यापाशी बसले होते. तेवढ्यात इनामदार आले आणि म्हणाले - अवं पाव्हणं, तिकडं कसे गेला तुम्ही. काय झालं असतं म्हणजे केवढ्याला पडलं असतं बगा. मी काही बोलायच्या आत मला म्हणले, आता तुम्ही काही बोलू नका, पाणी कढत ठेवलयं, ईथनं उठून आधी अंघोळ करा, बाजूला मारुतीला जा आणि मग डायरेक वरच्या दिवाणात या. मी हो म्हणून दशरथदादांकडं बघितलं आणि उठलो.
अंघोळ, मारुती उरकून वरच्या माडीत गेलो तर इनामदार  आणि त्यांच्या शेजारी दशरथदादाही होते. मी आल्यावर इनामदार लगेच उठले आणि म्हणाले - या, या, रागवला नाही ना, मगाशी जरा आवाज चढला होता. मी मान डोलावली. चहा आला. दोन बशा झाल्यावर इनामदार म्हणाले - काही बोलायच्या आधी एक सांगा, काही त्रास नाही ना झाला रात्री, आत्ता होत नाहिये ना? कशात काही नसेल तर तुमच्या डोक्यात काही भरायला नको उगा.

मी बारीकसा हसलो त्यावरुनच त्यांना कळालं. मग सगळा झाला प्रकार मी त्यांना सांगितला. इनामदार डोळे मोठ्ठेच ठेवून म्हणाले - चांगलीच बडदास्त ठेवली म्हणायची की तुमची, वाड्यातलं कुणी तिथं पाच मिनीटं बसू शकत नाही, अंगाची लाही होती. आणि एकदम गप्प बसले.
शेवट चहा झाल्यावर मीच विचारलं - इनामदार आता, एवढं कळालं आहे, कोण आहेत हे लोकं तेपण सांगा की, पूर्वज आहेत का तुमचे? काही उपाय का करत नाही तुम्ही.
इनामदार म्हणाले - अहो, सगळे उपाय झाले, मी काय, माझ्या आजोबांपासून सगळ्यांनी बरेच उपाय करून पाहिले, पण हे सातजण काही जात नाहीत. आणि बाकी काही त्रास नाही त्यांचा तसा, त्यामुळे, आम्हीपण मग काही जास्त गोवत नाही तिकडं. जोवर तिथे कोण बसत-झोपत नाही, सगळं बरायं.
हे घर आमच्या आजोबांनी बांधलं बघा. त्याच्याआधी हे आहे त्याच्या दुप्पट घर होतं याच जमिनीवर. पण ते बरच पडलेलं, रोजची डागडुगी इतकी की, पणजोबापासून सगळ्यांच्या डोक्यात होतं, नवीनच घर बांधावं. आमच्याच तोंडान सांगतोय आता, आणि नाहीतरी बाहेर पडल्यावर हे कळंलंच तुम्हाला. आमचे पूर्वज लय बेरकी होते.
आठ-दहा पिढ्यांपूर्वीची गोष्ट आहे - तेव्हा खेमका तसं मोठ्ठ होतं तसं, बाजरपेठेचं गाव होतं. पण आमची ही जागा मुख्य गावाच्या बर्‍याच बाहेर, आताआता गाव इथपर्यंत पसरलंय, तेव्हा दोनचार पांद्या ओलांडून यायला लागायचं. तेव्हाचे इनामदार, आमचे पूर्वज गडगंज होते पण वृत्तीनं एकदम बेकार. दोघे भाऊ होते, ताडमाड रंगेल गडी, तोंडाळ नंबर एक, तोंड उघडलं की शिव्याच. अंगात रग एवढी की, जरा एखाद्याचा शब्द मागंपुढं झाला की मारायला कमी करायचे नाहीत. एकाच शेतचं खाल्ल्यालं, घरच्या बायकाही तशाच. शेतात कुळं होती त्यांना काम सोडून जायची सोय नव्हती. गावतले बाकीचे इनामदारांशी कशाला वाकडं घ्या म्हणून त्यांना काम द्यायचे नाहीत, त्यामुळे शेताचं सगळ नीट चालायचं. पण यांना घरकामाला काही गडी मिळायचा नाही. एकतर वाडा हा एवढा लांब, रानात, आणि यांची किर्ती ही अशी. बायकांच्या भुणभुणीला वैतागून दोघा इनामदारांनी बसून एक उपाय काढला. दोघे आषाढीला पंढरपूरला गेले. तिथे पुढचंमागचं कोण नसलेला एक धडधाकट गडी बघितला. बोली ठरली - वर्षाला पाच रुपये, एक धोतरजोडी आणि पंचा, वारीला तीन आठवडे सुट्टी, आणि दोनवेळचं खायला मिळेल - पण काम कुठलं पडेल ते. रिकाम्या हातांसाठी देवच पावला जणू. परत येवून जुंपला गड्याला वाड्यावर. दिवसरात्र कामाचं जू. एकदा वाड्यावर आल्यानंतर क्वचित कधीतरी गडी खेमक्यात गेला तर गेला. शक्यतो न्हाईच. पण दोनवेळच्या व्यवस्थित जेवणानं गडी खूष होता. आणि मगाशी म्हणलं तसं इनामदार बेरकी होते, त्याला जास्त त्रास द्यायचे नाईत.
वर्ष झालं, इनामदार म्हणाले - घट्ट निघालास मर्दा, आता वर्ष झालं बघ, संध्याकाळी मागच्या पडवीत ये, तिथे धोतरजोडी देतो आणि मग जावून ये सुट्टीला. मागची पडवी म्हणजे इनामदारांचा खास भाग होता तिथे त्यांचे सगळे कार्यक्रम चालायचे, झाडझूड सोडली तर तिथे जास्त वावर नव्हता. रात्री गडी आला, त्याला धोतर, पाच रुपये दिले. धाकटा इनामदार म्हणाला - दादा धान्य देवूया थोडं, एवढं वर्षभर राबतोय, हूंकीचूं नाही केलं कधी. दादा म्हणाले - कळीचं बोललास. मग मोठे इनामदार-दादा, गड्याला म्हणाले - ये रे खालच्या घरात, गड्याला ही खोली नवीन होती, एकदम छोटी. दादांच्या पाठोपाठ हा आला. दादा म्हणाले - थांब हा, मी गोणी आणतो. पटकन पाच पायर्‍या चढून वर गेले आणि तळाघराचं दार बंद करून आडणा टाकला. गड्याला काही कळायच्या आत तो अंधार्‍या चिंचोळ्या खोलीत अडकला. आठवडाभराने, दोघा इनामदारांनी स्वत: तळघरात जावून त्याला तिथेच पुरला.
मग परत पंढरपुरला नवीन वर्षासाठी नवीन गडी शोधायला निघून गेले. गावात कुणाला काही कळायचा प्रश्नच नव्हता, एकतर हा गडी जास्त गावात जायचाच नाही आणि पंधरा दिवसानी तर दोघे भाऊ नवीन गड्यासोबत परत यायचेच.
सध्याचे इनामदार एवढं सांगून शांत बसले, माझा चेहरा बघून म्हणाले - अवो मी नाही हो त्यांच्यातला, घाबरू नका, तुम्हाला चांगलं सोप्यात सगळ्यांना एकत्र झोपायला दिलेल नां? असं म्हणाले आणि आम्ही सगळेच हसलो. मग इनामदार अभिमानाने म्हणाले - पण खरंच हां, आमच्यात त्यांचं रक्त नाही. त्यांची मूलं काही जगली नाहीत कोणी, आम्ही सगळे मामाकडून दत्तक आलेल्याची पिढी.
मी म्हणालो - बरं, मग हे थांबलं, कसं सात गड्यांनंतर?
इनामदार म्हणाले - अहो सातवा गडी तल्लख निघाला, तळघरात गेल्यागेल्या त्यानं विचार केला, एवढ्या छोट्या चिंचोळ्या खोलीत इनामदार धान्य कशाला ठेवतील आणि इथली जमीन तर कधी मी सारवली नाही, इथं कसं धान्य ठेवतात. त्यानं मोठ्ठ्या इनामदारांकडे बघितलं, आणि क्षणात दोघांना एकमेकाचे पुढचे विचार समजले. वयानं म्हणा किंवा अपेक्षित नसल्याने म्हणा मोठे इनामदार बावचळले आणि पायर्‍या चढताना पडले. गड्याने तिथलीच कोठी यांच्या डोक्यात घातली, पण तेवढ्यात धाकटे इनामदार तिथं आले आणि त्यांनी दार लावून टाकले.
आम्ही पिढीजात ही गोष्ट ऐकत आलो, कधी वाटायचं कुणीतरी आपलं इनामदारांच्या बदनामीसाठी रचलय. आजोबांनी जुनं पाडून नवीन घर बांधलं, पूर्वीच्या त्या छोट्या तळघराच्या जागेवर आत्ताचा सोप्यातला तो ओटा आला. नवीन घरात त्या कोपर्‍यात झोपणार्‍यांना सगळ्यांना चित्रविचित्र अनुभव यायला लागले मग आमचा या गोष्टीवर विश्वास बसायला लागला. पूर्वी तिथ ओटा बांधला नव्हता, नंतर आपला एक ओटा बांधून आम्ही तिथं जेन टाकलं. आजतर तुम्ही सात जण बसली होती सांगून पक्की खात्रीच केलीत.

इनामदार शांत बसले, दशरथदादानं खुणेनंच सांगितल मला की चल आता. मी मग उठून म्हणालो - बरं तर मालक, आम्ही आमच्या आरेवाडीला निघतो. तिथं जेनबिन ठेवू नका बघा तेवढं, एखाद्याला झोपुसं वाटायचं तिथे परत.
*

आरेवाडीच्या काकांच्या या गोष्टीनं सुरुवात झाल्यावर मग पुढे मैफिल चांगली रंगायची. वेताळाची पालखी, किरुताईचा चहा, वाचलास रे वाचलास, सगळेच किस्से आठवायला लागलेत आता.
***

2 comments:

Meghana Bhuskute said...

बापरे! मस्ताय गोष्ट. मला आधी तुंबाडची आठवण झाली थोडी. पण पुढे नाही. भारीच. तू असल्या अजून गोष्टी लिही गड्या. डोळ्यासमोर आले ते तुळईवर बसलेले सात जण.

Yawning Dog said...

हो ना, मी पहिल्यांदा तुंबाड वाचले तेव्हा मला हीच गोष्ट आठवली होती. मधे हिंदू वाचली तेव्हा त्यातली चिंधीआत्याची गोष्ट पण अशीच वाटली होती.