हे एक दळणीय पोस्ट होणारे याची मला चांगलीच कल्पना आहे. पण आपल्याला काय वाटेल ते लिहावे, मग ते दळ/वणीय होवो नाहीतर, जीएड होवो, जास्त विचार करू नये. पर्वा नै. फेसबूकवरील कोटनुसार जगावे<एकच जीवन मिळते, ते कुणा दुसर्यासारखे जगून वाया घालवू नका वगैरे>. मागच्या वर्षी म्हैसूरला टॅक्सी केलेली आजूबाजूला फिरायला. टॅक्सीवाला एक कॅरॅक्टर होता. त्याला असूदे, काय हरकत नाही वगैरे म्हणायचं असलं तर तो म्हणायचा पर्वा नै. आपल्याला जेवायला जरा उशीर होईल - पर्वा नै. पाउस आलाय आजचा सगळा ठरलेला कार्यक्रम होईल का - पर्वा नै. भारी होती त्याची स्टाईल.
तर.
बालपणापासून मी काही गोष्टीत एक्स्पर्ट आहे. खरेतर एक्स्पर्ट शब्दासाठी असलेले बर्यापैकी सर्व समानार्थी मराठी शब्द मला तोंडपाठ आहेत - निष्णात, पारंगत, पटाईत, निपुण, वाकबगार, सराईत, प्रवीण. पण अडचण अशी आहे की, मला ते सर्वच समसमान आवडतात त्यामुळे त्यातला कुणाला वापरले तर उरलेल्यांना वाईट वाटणार.
मी दळण आणण्यात प्रचंड भारी आहे. लहानपणापासून. मला सातवीत नवीन सायकल आणली होती, आणि त्यावरून केलेले पहिले काम म्हणजे दळण आणणे. येताना मी सायकल गिरणीच्या बाहेर विसरलो पण दळण नाही विसरलो. मग घरी आल्यावर आईने सायकल कुठाय विचारल्यावर डोक्यात प्रकाश पडला. सायकल परत आणायला जाताना आईने अजून नवीन एक काहीतरी गिरणीत टाकायला दिले. अशारितीने मला रिकर्शन, फॉर लूपचे, कुमारकडूच मिळाले आहे. रिकर्शन का रिकर्षन? रिकर्षन ब्राह्मणी शब्द, रिकरसन उत्तरेतला शब्द वाटतो, रिकर्श्नन जैन शब्द वाटतो.
दळण टाकण्यात आणि ते आणण्यात एक्स्पर्ट असण्यासारखं काय आहे असे मूढसामान्यांना वाटणे साहजिकच आहे. बर्याच बारीक गोष्टी असतात.
आपल्याला हवे तसे (म्हणजे घरातून सांगण्यात आले आहे तसे) दळण पाहिजे असल्यास ह्युमन नेचरचा अभ्यास खूप गरजेचा आहे. अगदी जरुरी शब्द वापरण्याइतका. समजा तुम्हाला सांगितले आहे बारीक दळण आण तर गिरणीत जावून शंभरदा सांगायला लागते बारीक द्या, बारीक द्या. एवढेच नाही तर तिथे रडायलाही लागते, बघा हं बारीक नसलं तर माझे आई/बाबा/बायको रागावतील. हे सर्व करत असताना आपला दळणाचा डबा/पिशवी, त्या श्वेतकर्बद्विपादास स्पष्ट्पणे दिसले पाहिजेत (नाहीतर तो नंतर विसरू शकतो कुणी बारीक सांगितले वगैरे.) रडगाणे गायल्यावर ९०% माणसे ऐकतात असा माझा अनुभव आहे. रागावलं, आरडाओरडा केला की नाही ऐकत.
अजून खूप इंट्र्कसीज आहेत - समजा नाचणी दळायला टाकायचीय तर टाकणार्याचा पहिला प्रश्न पाहिजे, बरोबर काय दिले आहे कारण गिरणीवाले म्हणणार तुमच्याच गव्हावर टाकणार हां. नुसती नाचणी कोण टाकेल? बायदवे हे सर्व दळणाबाबात डंक प्रकार काय आपल्याला जास्त झेपत नाही.
दळण आणण्यातही बरेच बारकावे आहेत - डबा असेल तर तो सायकल, मोटारसायकल, मोपेड, हॅचबॅक, सेडानमधे कसा ठेवावा. उदाहरणार्थ डब्याला सीटबेल्ट लावायला लागतो पण पिशवीला नाही. सायकलवरून जाताना डब्याला परत पिशवी लागते, तीपण लांब बंदांची. मोटारसायकलवर असताना बंद लांब पाहिजेत पण खूप लांब नकोत, खांद्यात अडकतील असे पाहिजेत.
असं काय काय नाटक असतंय. माझ्या डोक्यात तो ॲल्युमिनिअमचा डबा असला बसलाय की, कुठेही डेटाबेसचे ते दंडगोल चिन्ह पाहिले की मला दळणाचा डबाच आठवतो.
*
तर परवा मी नित्यनेमाप्रमाणे दळण टाकलं, रात्रौ साडेआठला आणायला गेलो आणि अनपेक्षितरित्या एका गंभीर प्रसंगास सामोरे जावे लागले. आमची गिरणीवाली, एक डॅंबिस आजी आहे आणि माझ्या अंदाजाने ती या भागातील नामचीन गुंडाची नामचीन नेतीणबाई आहे. कारण सगळे आजूबाजूचे टगे तिच्याशी नीट बोलतात किंवा चौकात एखादी भांडाभांडी चालू असेल तर ती लगेच मिटवते, सगळ्या पार्ट्या ऐकतातपण तिचं. अचानक जागतिकीकरण दत्त म्हणून उभे राहिल्याने गिरणीतल्या भागाचे अचानक अल्ट्रानागरीकरण झाले आहे. त्या चौकात बीएमडब्ल्यू आणि सायकलवाल्यांचीपण भांडणे होतात. अतिशयोक्ती नाही. पण अशीही नॉव्हेल भांडणे त्या बाईला सहजगत्या सोडवताना मी पाहिले आहे. दळणाचं बघायला तिने एक बिहारी ठेवला आहे आणि ही आपली बाहेर तंबाखूच्या चंचीतून सुट्टे पैसे काढून लोकांना देत असते कायम. कधी सुट्टे नाहीत असे म्हणत नाही ही सुस्त्री. हा बिहारी मराठी बोलतो पण त्याचा मूड नसेल किंवा त्याला संकटाची चाहूल लागली तर तो हिंदीत बोलू लागतो. (भांडण करावे लागले तर कॉन्टेक्स्ट मातृभाषेत आधीच सेट असलेले बरे, असा विचार असेल)
मी नेहमीप्रमाणे वरच्या फळीवर बघितले तर तिथे आमची पिशवी नव्हती, शेजारीच दोन पिशव्या होत्या बर्यापैकी सारख्या दिसणार्या.
त्याला म्हणालो - सकाळी गहू टाकलेले ५ किलो. पिशवी नाहीये.
धोका ओळखून तो म्हणाला - "होगाना उधरीही, देखो आगेपिछे"
नाहीये हो.
कितने बजे डाला था?
११:३० वाजता
कैसी पिशवी थी?
लव्हेंडर आणि पांढर्या कलरची, बच्चनचं चित्र होतं त्याच्यावर.
अच्छा दावत राईसवाला थैली होता है वैसा क्या.
हां असेल बहुतेक, पण आमची ही काका लोकवन बरोबर मिळालेली पिशवी होती.
मी काही चिडलो नव्हतो पण मला आपले दळण स्टेटस - "आलोच दोन मिनीटात घेवून" चे "इट्स कॉंप्लिकेटेड" होणार आहे हे समजून चुकले होते. सारख्या दिसणर्या पिशवीवाल्यांपैकी कोणा एकाने आमची पिशवी नेली हे पीठाएवढे स्वच्छ होते.
आणि हा मनुष्य उगाच आपले काहीही विचारत होता. तेवढ्यात मालकीणबाईंनी लक्ष घातले. आजी भयंकर ॲक्शन ओरिएंटेड आहेत, त्या म्हणाल्या - त्या दोनपैकी एक पिशवी न्या ना. काय नावं आहेत त्यांच्यावर मी पाहिले तर - माळी आणि देशपांडे.
"पण चुकीच्या माणसाची नेली तर, परत नवीन येणारे ओरडतील ना", आजींनी लक्ष घातल्याने गिरणीवाला समजूतीने बोलू लागला होता. माझ्याही मनात हाच प्रश्न होता. मला वाटत होते की काहीतरे मिस मार्पल, पॉयरॉ किंवा शेरलॉक प्रमाणे डोके चालवून, आमची पिशवी कोणी नेली असेल याचा शोध लावावा. त्यासाठी मी सगळ्या फॅक्ट गोळा करू लागलो. आजींना विचारलं - यातलं कोणी ओळखीचं नाही का? माळी, देशपांडे?
त्या वैतागल्याच - तुम्ही इतके दिवस येताय, तुमचं आडनावपण माहित नाही मला. सगळ्यांची नावं आणि चेहरे कसे लक्षात राहतील?
रस्त्यापलीकडचे एक डॉक्टर आले आणि त्यांनी झाला प्रकार समजून घेतला, ते म्हणाले - माळीसाहेबांची बायको इथेच दळण टाकते, थांबा म्हणत त्यांनी माळींच्या घरी फोन लावला.
वहिनी, डॉक्टर बोलतोय, आज दळण नेलं होतं का?
..
बघता का जरा, तुमच्याच नावाची पिशवी नेली आहे का?
..
अहो, एकदाच बघा ना प्लीज, जरा गडबड झाली आहे, तुमच्या नावाची पिशवी आहे का ते बघा.
..
असे दोनचार मिनीटं संभाषण झाल्यावर ते म्हणाले. हो त्यांच्याकडे गेली आहे तुमची पिशवी. त्यांचा मुलगा आजारी आहे तेव्हा त्या आत्ता काही येवू शकत नाहीत पण उद्या सकाळी गिरणीत आणून देते म्हणाल्या. तुम्हाला अगदीच घाई असली तर त्यांची पिशवी घेवून जा, आणि पीठ वापरलं तरी चालेल म्हणाल्या. त्या तुमचं नाही वापरणार, असही निरोप सांगितला आहे.
मी म्हणालो - त्यांना विचारता का प्लीज, मी त्यांच्याकडे पिशवी बदलून द्यायला तर चालेल का? आमचं पीठ संपलय, आणि घरचे शंभर टक्के दुसर्या कुणाचं वापरणार नाहीत. शंभर प्रश्न असतील त्यांचे.
डॉक्टरसाहेब सिरियसली खूप सेन्सिटीव्ह होते, त्यांनी माळीवहिनींना कन्व्हिन्स केलं. मला म्हणाले - त्यांना सांगितलं आहे, त्या सोसायटीत खाली येतील पिशवी बदलायला. केशवकुंज माहितेये ना, तिथे सी मधे राहतात त्या.
मी केशवकुंजला गेलो - तर तिथला वॉचमन जगातला सगळ्यात इनकंपिटंट वॉचमन होता, त्याला आपली जबाबदारीच माहित नव्हती. त्याला म्हणालो सीमधे जायचे आहे, तर तो म्हणाला - इथे ए,बी, सी नाही तीन नंबरच्या बिल्डींगमधे जायचे असले तर उजवीकडून दुसरी.
फायनली माळीबाईंशी भेट झाली खाली, त्यांनी शंभरदा माफी मागितली माझी, मुलाला बरं नसल्याने त्यांचं चित्त थार्यावर नव्हतं त्यामुळे पटकन नाव न बघताच पिशवी घेवून गेल्या.
वेगळी लगेच कळावी म्हणून लव्हेंडर पिशवी घेतली तर तीपण बदलली गेली, आता कस्टममेड स्पायडरमॅनचं चित्र असलेली नेतो हल्ली मी.
सगळ्या नादात दळणाचे पैसे दिलेच नाहीत, आणि मीपण काही विशेष अगदी आठवून पुढच्यावेळी पैसे परत देण्याएवढा प्रामाणिक नाहीये. मागितले तर देईन अजून.
यात लिहीण्यासारखं काही नाहिये खरतर. काय लिहीलं ते परत वाचवतही नाहिये.
**
I look at all the comics' super-villains - Thanos, Steppenwolf, Ego, Hela and I'm like - give me a break, have you met "Stewie Griffin"?
***
3 comments:
रिकर्शन काय... डेटाबेस काय... गव्हाऐवजी इंजिनीरिंगचं दळण दळल्यासारखं वाटतंय! असो. लेख एकदम मस्त!
Thanks Rajat - I've perfect work-life balance. So I think about work when out of office and think about life when in office :)
अगदी सेम आठवणी आहेत दळणाच्या पिशव्या सायकल पांढराबाबा खकाणा गव्हावरगहू डाळीवरडाळ चिल्लर
Post a Comment