Thursday, May 14, 2009

निरर्थक-२

स्पीडोमीटरचा काटा कनफ्यूज झाला होता. १२० अणि १२५ - दोन्हीच्या खुणा त्याला आपल्याकडे ओढत होत्या. जीप धड्डाधड ३-४ फूट उंच उड्या मारतच पुढे जात होती. गोळ्यांचे सूं सूं आवाज जीपच्या भसाड्या आवाजालासुध्दा चिरुन जात होते. मेंदूच्या सूचनांबरहुकुम मी अधे मधे खाली वाकत होतो. नेमके तेव्हाच मागून येणारी एखादी गोळी जीपच्या आधीच फुटलेल्या समोरच्या काचेतून आरपार जात होती. मागे एक नजर टाकली पण धूळीत नीट काहीच दिसत नव्हते, साधारण १०-१५ गाड्या तरी मागावर असाव्यात. वाळवंटात रस्ता असा नसल्याने, दूरचा तो अंधुक पांढरा ठिपका नजरेआड न होउ देता त्यादिशेने मी जीप पळवत होतो. गोळ्या चुकवण्यासाठी अधेमधे वेडीवाकडी वळ्णे घेत होतो.

मी ह्या भानगडीत कसा काय सापडलो? हे लोक माझ्या मागे का लागले आहेत? मला सगळे नीट आठवत का नाहीये? ह्या सगळ्या विचारांच्या गर्दीने डोके फुटेल का काय असे वाटत होते. घामाने चिंब ओले झालेल्या तरीही तापलेल्या खांद्याला अचानक हळुवार स्पर्श झाला. ती कण्हत म्हणाली, "एवढा...एवढा विचार करु नकोस आत्ता, एकदा फकीरगढला पोचलो की सगळे आठवेल तुला", कशीबशी मान उंचावून पांढऱ्या ठिपक्याकडे एक नजर टाकून काळजीयुक्त स्वरात पुढे म्हणाली "...सहीसलामत पोचलो तर". मी उगाचच तिच्यावर खेकसलो, "बाकी काहीच मला समजत आणि आठवत नाहीये, फक्त एवढेच कळते आहे की, आत्ता मी थांबलो तर मागचे ते हरामखोर आपल्याला क्षणार्धात संपवतील".

ती काहीच बोलली नाही. तिच्या रक्ताने भरलेल्या कुडत्याकडे बघताना मनात विचार आला - अजून तासाभरात उपचार नाही झाले तर ही तशीही मरेलच. तेवढ्यात अंदाजाने मी पटकन खाली वाकलो, एका हाताने तिचेही डोके खाली चेपले, एकामागोमाग एक तीन-चार गोळ्या वरुन गेल्या आणि पुढे कुठेतरी हरवल्या. माझ्या मनातला मगासचा विचार ओळखल्यासारखे ती म्हणाली, "ह्याच वेगाने जात राहिलो तर...तर अर्ध्या तासात पोहोचू आपण...मग मी कदाचित जगेन". मी वरमलो. मला दिलासा देण्यासाठी का कोण जाणे पण ती पुढे म्हणाली, "नाहीतरी, तू वाचवले नसतेस तर तिथेच मेले असते मी, शिवाय या पाण्याच्या बाटल्या पण त्यांच्या हातात पडल्या असत्या".

पाच सहा मिनीटे झाली असतील, गोळ्या चुकवत जीप पळतच होती. आता तो ठिपका जरा मोठ्ठा झाला होता, रेषाच. लांबवर पांढऱ्या भिंतीत छोटी कमान दिसत होती. बराच वेळा झाला, पाठलाग आणि गोळ्या चालूच होत्या. तिची काहीच हालचाल नव्हती, कण्हण्याचाही जास्त आवाज येत नव्हता पण मधेच ती मंद स्वरात "पाणी पाणी" असे पुटपुटत होती. गियरपाशी पाण्याच्या त्या २ बाटल्या होत्या. एका हाताने गाडी सावरत मी एका बाटलीचे टोपण काढणार तोच ती दचकून म्हणाली, "नाही, नको, त्या शेवटच्या २ पाण्याच्या बाटल्या आहेत, ते पाणी वाया नको घालवूस". मी परत खेकसलो, "अरे, पण जगातल्या शेवटच्या आहेत का या बाटल्या?" "तसंच काहीसं आहे, नाहीतर २ बाटल्यांसाठी कोण जीवावर...", तिने वाक्य पूर्णच केले नाही.

मी जमेल तेवढ्या सौम्य आवाजात म्हणालो, "हे बघ, आत्ता तू जर पाणी प्याली नाहीस तर..., आणि मी जवळ पाणी असताना स्वत:च्या डोळ्यादेखत कुणाला मरु देणार नाही", तिचा निश्चय माझ्या बोलण्याने अचानक डळमळीत झाला असावा, तिने मंद आवाजात विचारले "खरंच, थोडे पिउ का पाणी". तिला काही कळायच्या आत मी बाटलीचे टोपण उघडले आणि तिच्या तोंडावर पाणी ओतायला सुरुवात केली. साता जन्माची तहानलेली असल्यासारखी ती गटागटा पाणी पित होती.

त्याचक्षणी मला फकीरगढच्या कमानीतून १५-२० गाड्या भरधाव वेगाने येताना दिसल्या आणि माझ्या लक्षात आले की, पाठलाग गोळ्या पूर्णपणे थांबल्या होत्या. आता ही मुलगी वाचणार अशी माझी खात्री पटली.

पाणी पिणे सुरु असतानाच तिने माझ्याकडे मलूल पण आनंदी डोळ्यांनी बघितले, प्रथमच मला ती अत्यंत सुंदर आहे याची जाणीव झाली.
**

आता एखाद्याने एवढे सगळे रामायण सांगितल्यावर जर का, "हे स्वप्न होते" असे मला सांगितले आणि सांगणारा मनुष्य माझ्याहूनही अशक्त निघाला तर मी त्याला तुफान फटकावीन. पण मलाच स्वप्न पडले तर काय करा. आज मी जो उठलो तोच स्टन्‌ड होउन. पाच मिनिटे गादीवर बसून शांतपणे विचार केला - एकदम व्यवस्थित सिनेमास्कोप चित्र, सुंदर काल्पनिक नटी शेजारी आणि सिंदबादी धाडस. गाडीसुध्दा काय हाणत होतो मी - एकदम ट्रान्सपोर्टर मधला जेसन स्टॅथम(गरिबांचा ब्रुस विलीस).
असे सगळे आखीव-रेखीव स्वप्न का पडावे बाबा? मग आदल्या दिवशीच्या घटना आठवल्यावर सगळा उलगडा झाला.
**
१ दिवस आधी

दुपार
आम्ही तिघे, दुपारची कॉफी पित उभे होतो तळ्याशेजारी.
मित्र -: लय काम आहे आज.
मी: हो मलापण लय.

मित्र -: आत्ता या तळ्यात कुणी बुडायला लागले तर वाचवाल का?
मी + मित्र -: मुलगी असेल तर वाचवीन.
मी + मित्र -: सह्हीच, सेम विचार केला आपण.

मित्र -: ह्म्म, हातात अंगठी बघुन उडी घ्याल का तशीच?
मी: अंगठी बघुन शक्यतो. प्रश्न बास आता पण.
मित्र -: हो ना साला, आम्ही काय व्हिलन वाटलो का?
प्रश्न विचारत सुटलायस, "कॉफी विथ करण"ला आलोय का इथे?
आमचे सोड, तू तर लेका उडी घ्यायचा विचारपण नाही करायचास.
मित्र -: उडी घेईन ना मी, पण गोरी पोरगी बुडत असली तरच मी उडी घेईन.
देसी असेल तर काय सांगता येत नाही.
मी: ऍक्च्युअली भारतात तसे करीन मी, अमेरिकेत उलटे करीन.
नाही, शक्यतो उडी घेईनच.
मित्र -: ह्म्म, कोणीही असले तरी, मी उडी घेईनच असे काही नाही.
मी + मित्र -: बोर झाला रे टॉपिक, बदलूया.

मित्र -: सार्‌कॅस्टिक शब्दामधे पूर्वी सायलेंट पी असणार.
कुणीतरी एकजण विसरला आणि मग सगळेच चुकीचे स्पेलिंग लिहायला लागले.
*

रात्र
मित्र -: अर्रे, सहीच पिक्चर लागलाय. ती ‘सहारा’ पिक्चरमधली नटी कोण ती?
मी: पेनेलप क्रुझ
मित्र -: हां हां, पेनेलोप, तिचाच लागला आहे.
मी: कुठला?
मित्र -: सहारा.
मित्र -: नको तो पिक्चर. ती दरिद्री, एकच काळा टी-शर्ट घालून फिरते पिक्चररभर.
मित्र -: मंद आहेस रे तू च्यायला, चला बघुया.
*

सकाळ
परके साहेब -: गेला का फिक्स प्रॉडक्शनला?
मी: पाठवला आहे, प्री-प्रॉड टेस्टिंगमधे आहे

५ मिनिटांनी
परके साहेब -: अरे, तो तुमच्या मॉड्युलचा एक अर्जंट फिक्स होता म्हणे. गेला का प्रॉडक्शनला?
मी: माझ्या मॉड्युलचा नाहीये तो. पण मी फिक्स पाठवला आहे, प्री-प्रॉड टेस्टिंगमधे आहे.

१० मिनिटांनी
परके साहेब -: ...
मी: ...

शेजारचा: बंदूका घेवूनच तुझ्या मागे लागले आहेत रे सगळे आज
मी: हां ना राव, आमचा इश्यूपण नाहिये तो, लोकांची खरकटी काढण्यातच जन्म जाणार आमचा.
*

संध्याकाळ
आमचे साहेब: ऑं, चार चार पेनं, एक घेवू का?
मी: घे की बाबा, कशी काय आली माझ्या डेस्कवर एवढी पेनं, देव जाणे.
बायदवे, तुला कशाला पेन लागतं, सगळी कामे तर मी करतो.
आमचे साहेब: तुझ्या पगाराच्या चेकवर सही करायला.
**

यावेळी जरा महा-लांबडे व अति-निरर्थकच झाले. जावूदे, तसे मी लिहितो ते सगळेच पाल्हाळीक आणि निरर्थक असते.
***

11 comments:

Unknown said...

swapna bharich !! :)
:D :D

Vidya Bhutkar said...

hehehe mala anand hotoy ki majhyasarkhech bakichehi 'nirarthak' vachtil aani pachtavtilhi... :-) I am glad I wont be the only fool.....

btw...end la kitihi faltu vatle tari suruvatichi story bharich hoti... :-) mala pan ghaam aala vachun. :P

-Vidya.

Meghana Bhuskute said...

भारीच आहे. ’मुलगी असली तर उडी मारीन’, ’तुला कशाला पेन लागते’, ’लोकांची खरकटी’, ’सायलेंट पी’ आणि स्वप्नातली ती मरणासन्न सुंदर मुलगी. एक लालसर गोरी नाजूक सुंदर मुलगी आणि एखादी बेदरकार सावळी लवलवती डोंबारीण शेजारी शेजारी बसल्यायत आणि तू दोघींशी एकदम गप्पा मारतोयस आणि मग तुझं डोकं गरगरतंय असं वाटलं. :)

Anonymous said...

मस्त लिहिलंय! पहिली ष्टोरी छानच आहे पण दुसऱ्या पार्टातल्या यडचापपणामुळे ष्टोरी वेगळीच उंची गाठतेय :)
BTW, मी तुझा ब्लॉग माझ्या ब्लॉगवरच्या फेवरेट्सच्या यादीत टाकलाय... I really enjoy reading it!

सर्किट said...

हा..हा..हा.. :) जबरी रे!

स्वप्नातली कथा ही भन्नाट, आणि तुमचा तळ्याकाठचा संवादही. :)

Unknown said...

भन्नाट.

MuktaSunit said...

गोष्टीचा सम्यक् आणि व्यापक विचार करतां , लेखकावर "नाईट एरंट्स आणि डॅमसेल इन डिस्ट्रेस" या , काही शतकांपूर्वी मर्ढेकर किंवा गेलाबाजार गुरुनाथ नाईक यांच्या साहित्याइतक्याच जोरात खपणार्‍या साहित्यप्रकाराचा प्रभाव जाणवतो. मात्र , अशा , "शूर शिलेदार मीट्स ट्रान्स्पोर्टर (पार्ट १/२/३/४ ) " स्वप्नरंजक शौर्यगाथेच्या अंती आलेल्या , त्या स्वप्नांच्या "एट्मोलॉजी"चा अभ्यास करतां , एकूणच , सॉफ्टवेअर-बग्स रूपी पवनचक्क्यांशी गनीम म्हणून लढणार्‍या स्वनामधन्य सॉफ्टवेअर किडेबाज "डॉन किओटे"च्या कथानकाचे स्वरूप या स्वप्नमय गाथेला आलेले पाहून माझा (पलायनवादी स्वप्नील बॉलीवूडबेगडप्रेमी) आत्मा तळमळला नसता तर नवल ! हाय ! या जेसन स्टॅथमने चुकविलेल्या गोळ्या म्हणजे , (दुसर्‍यांनी) करून ठेवलेल्या "सॉफ्ट" घाणीचा उडलेला फवारा असून , वाळवंटातली तरुणी म्हणजे एका दुय्यम हॉलीवूड चित्रपटातल्या तिय्यम नायिकेची प्रतिमा असावी ! अर्रर्रर्र .. या लिखाणाला शीर्षक द्यायचे झाल्यास "स्वप्नाची समाप्ति" असे द्यावे लागेल (कै. तात्या ! मजप्रत क्षमा द्यावी !) . "काढ सखे बाटलीवरचे तुझे माखलेले हात, क्युबिकल्च्या पलिकडे , उभे प्रॉडक्शनचे भूत !" ;-)

Yawning Dog said...

@भाग्यश्री - थॅंक्स :)

@विद्या - कसं येडं बनवले :)

@मेघना -
"एक लालसर गोरी नाजूक सुंदर मुलगी आणि एखादी बेदरकार सावळी लवलवती डोंबारीण शेजारी शेजारी बसल्यायत आणि तू दोघींशी एकदम गप्पा मारतोयस"
एवढं कुठलं नशीब, स्वप्नातसुध्दा औकातीमंदे होतो, एकच आली :)

@सर्किट - थॅंक्स :)

@संतापक - थॅंक्स :)

@मुक्तसुनीत - देवा (म्हणजे गॉड नाही, तुम्ही) हा सम्यक विचार समजून घ्यायला एकदा समक्ष भेटीला येतो :)
थॅंक्स :)

Yawning Dog said...

@निवेदिता - थॅंक्स, फेव. मधे टाकल्याबद्दल :)

Jaswandi said...

Mahaaann!

Dhanya Dhanya zale mi he vachun... :D

रोहन... said...

खरच भन्नाट स्वप्न आणि त्या मागची दिवसभरची स्टोरी. आता आम्हाला तुझी स्वप्न पडली नाही म्हणजे झाल... हा हा हा .. ;)